‘विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे परस्पर नातेसंबंध कसे असावेत’ या विषयावर एका सामाजिक संस्थेने निरनिराळ्या शाळांतील काही शिक्षक आणि पालक यांचे चर्चासत्र आयोजित केले होते. मी तेथे समन्वयक म्हणून गेले होते. चर्चेमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांवर शाळेतील, घरातील किंवा इतर समस्यांवर तोडगा कसा काढावा हे ठरले. विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कुवत, कष्ट करण्याची तयारी, विशिष्ट विषयात किंवा खेळात असलेला रस हे पालक आणि शिक्षकांच्या निरीक्षणातून ठरवावे. त्याप्रमाणे मुलांकडून तयारी करून घ्यावी, उपजत असलेल्या गुणांना खतपाणी घालून त्यात प्रावीण्य मिळविण्यात मदत करावी म्हणजे वेळ वाया जात नाही. विद्यार्थ्यांवर जबरदस्ती होत नाही. कोणालाही नैराश्य येणार नाही. पालकांनी पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. त्याच्या पातळीवर जाऊन, त्याचे मित्र होऊन त्याची आवड, कल जाणून घ्यावा. दोघांत मित्रत्वाचे नाते असावे.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते गुरू-शिष्याचेच असावे. शिक्षकांचा आदर केलाच पाहिजे ही शिकवण त्याला मिळाली पाहिजे. त्याच वेळी शिक्षकांनी ही काळजी घ्यावी की, एखाद्या कमी गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा अपमान होणार नाही. यामुळे प्रेमाचे, आदराचे, आपुलकीचे नाते आपोआप तयार होईल. पालक आणि शिक्षक दोघांनी समजून घेतलेले असते, समजावून सांगितलेले असते अशाने विद्यार्थी आनंदाने दिलेले काम करेल. तरीसुद्धा नाराज असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कठोर निर्णय त्यांच्या भल्यासाठी घ्यावे. आळस, नको तेथे केलेले अवास्तव लाड अशा कारणांनी डोक्यावर बसलेल्या विद्यार्थ्यांला सौम्य दंड दिला जावा. असा एकूण सूर चर्चेतून आला.
वर्गात असलेली विद्यार्थ्यांची भली मोठी संख्या पाहता वैयक्तिक लक्ष देणे कठीण आहे. अशा वेळी अतिहुशार, हुशार, सामान्य, खेळांची आवड असणारे, कलागुण असलेले, भाषेवर प्रभुत्व असणारे असे गट करून टीमवर्क केले तर कामे वाटली जातील. कामाचा बोजा कमी होईल. प्रत्येक विद्यार्थ्यांला पुढील आयुष्यात करण्यायोग्य काही तरी अवश्य सापडेल. असा एकूण सारांश होता.
नरेंद्र नावाच्या एका मुलाच्या वडिलांनी त्यांच्याबाबतीत घडलेली घटना सांगितली. नरेंद्रने अतिउत्तम कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनीअिरग करावं, त्यासाठी लागणारे नव्वदपेक्षा जास्त टक्के गुण मिळवावेत, असा त्यांचा आग्रह होता. नरेंद्रची कुवत ऐंशीपर्यंत आहे हे त्यांना ठाऊक होते, पण चांगले मार्गदर्शन करणाऱ्या महागडय़ा क्लासमध्ये त्याला घालून भरपूर अभ्यास केला तर काहीही शक्य होईल, असा त्यांचा समज होता. बहिणीने, आईने त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यावे. वेळ वाया घालवू नये, अशा अनेक सूचना दिल्या. घरात प्रत्येक जण तणावाखाली राहू लागला आणि एकदाची परीक्षा झाली. आता निकालाचे टेन्शन! तीही तारीख उजाडली.
दुपारी ऑनलाइन निकाल आला. नरेंद्र ८४ टक्के मिळवून पास झाला. वडील त्याला शोधत त्याच्या खोलीत आले. अतिशय उदास चेहरा करून, खाली मान घालून बसलेल्या मुलाला पाहून त्यांना धक्का बसला. आपण केलेल्या अवास्तव अपेक्षांची त्यांना लाज वाटली. नरेंद्रच्या शाळा, कॉलेजच्या पालक, शिक्षकांच्या बैठकीला ते नियमितपणे जात असत. तेथे झालेल्या चर्चा मनात घोळत असायच्याच. मुलाने पूर्ण प्रयत्न केले आहेत या गोष्टीशी ते सहमत होते. ते पटकन पुढे झाले, मुलाला जवळ घेऊन अभिनंदन केले. म्हणाले, ‘‘बेटा, ८४ टक्के गुण कमी नाहीत. खूप चांगले कोर्सेस आहेत तुला करता येण्यासारखे! तुला काय आवडतं, काय करावंसं वाटतं यावर विचार कर आणि सांग. मी आहेच तुला मदत करायला.!’’ नरेंद्रने न रहावून बाबांना
मिठी मारली.
-गीता ग्रामोपाध्ये
geetagramopadhye@yahoo.com