scorecardresearch

Premium

जरा विसावू या वळणावर..

उदासीनता ही चांगली का वाईट या वर्गीकरणात अडकू नये. उदासीनता हा वळणावरचा विसावा आहे.

तिनं तिच्या स्वभावानुसार मागे वळून पाहिलं नाही. मीही माझ्या वाटेवर पावलं टाकीत राहिलो.
तिनं तिच्या स्वभावानुसार मागे वळून पाहिलं नाही. मीही माझ्या वाटेवर पावलं टाकीत राहिलो.

सुखाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या, पण सुखाची अभिलाषा सारखीच. उदासीनता ही चांगली का वाईट या वर्गीकरणात अडकू नये. उदासीनता हा वळणावरचा विसावा आहे. तिचाही काही उपयोग आहे. ती मनाला उभारी घेण्यापूर्वीची तयारी करते. आत्मपरीक्षणाची संधी देते. तिला कवटाळून बसू नये, पण अव्हेरूही नये!

जीवनाचं उद्दिष्ट काय? तर सुखाचं आयुष्य मिळावं! सुखाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या, पण सुखाची अभिलाषा सारखीच. मात्र आयुष्यात सतत, कायमस्वरूपी सुखंच वाटय़ाला आलेला माणूस अस्तित्वात नाही. दु:ख, उदासीनता हा अंतिमत: सुखाचाही एक अविभाज्य भाग आहे, हे आमच्या लक्षातच येत नाही. तब्बल चाळीस वर्षे जयश्रीची पुन्हा भेट होईपर्यंत माझ्याही लक्षात आलं नव्हतं.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

आठवीच्या सुमारास, आकर्षण म्हणजे काय हे माहीत नसताना मी तिच्याकडे आकर्षित झालो. बॉब केलेले केस, तरतरीत नाक, खटय़ाळ डोळे आणि सदैव उत्साहाने फसफसलेली. तिला कुणी उदास तोंड करून बसलेले आवडत नसे. तिच्या लेखी आयुष्य हा जत्रेतला आकाशपाळणा होता. खाली आला तरी वेगानं वर जाणार, आपण फक्त वेगाचा आनंद उपभोगायचा.

जयश्री जबरदस्त धावपटू होती. त्यात अडथळ्यांची शर्यत तिची आवडती. अभ्यासात मन नव्हतं, त्यामुळे मॅट्रिकला पास झाली, पण क्षमतेपेक्षा कमी मार्क घेऊन. तिने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला तिथेच मीही घेतला. ट्रेकिंग ग्रुपमध्ये प्रवेश घेतला, पाठोपाठ मीही! असे ‘कमळापरि मिटति दिवस, उमलुनी तळ्यात’ जात असतानाच तिच्या वडिलांची कोलकात्याला बदली झाली. जयश्री आयुष्यात आली तशी निघूनही गेली. तिनं तिच्या स्वभावानुसार मागे वळून पाहिलं नाही. मीही माझ्या वाटेवर पावलं टाकीत राहिलो.

चाळीस वर्षे गेली..

एका स्वागत-समारंभाला गेलो होतो. तिथे कुणी तरी जयश्री नावाचा उल्लेख केला. मग गावाचा, शाळेचा उल्लेख झाला, अन् क्षणार्धात मला ‘ती’ तीच असल्याची खात्री झाली. ‘ओळख कोण मी’ म्हणून समोर जाऊन उभा राहिलो. तिनं शांतपणे न चाचपडता माझं नाव घेतलं. मला आनंद झालाच होता, त्याहीपेक्षा आश्चर्य वाटलं. ही जयश्री? माझ्या स्मरणातली उसळती, खळाळती पोरगी कुठे गेली? आवाज मंद सप्तकात, डोळ्यातले भाव खोल बुडालेले, पण शांत. पुढील काही दिवसांतच भेटीगाठी झडल्या. आता वेग नव्हता. आवेगही नव्हता, कुतूहल होतं. एक निवांत संध्याकाळ मिळताच ती बोलती झाली. सावळ्या संधिकाली दिवसभराचे दृश्यमान असे रात्रीच्या रंगहीन रुखावळीत आपसूक उलगडते. ती खोल कुठे तरी पाहत बोलू लागली.

‘‘पप्पांची कोलकात्याला बदली झाली. टुरिझमचा हटके कोर्स निवडायच्या माझ्या अट्टहासाला पप्पांनी दुजोरा दिला. चार लोकांत, नव्या प्रदेशात वावरायचं, अनोळखी लोकांशी बोलायचं, हे माझ्या स्वभावात होतंच. खूप उत्साही होते मी. एकदा एका ग्रुपबरोबर भूतानला गेले होते. गंगटोकच्या रस्त्यावर भू-स्खलन होऊन गाडय़ा बंद पडल्या. वाहनांची लांब रांग लागली. आठ तास उलटले. ग्रुपमधल्या मुलांना भुका लागल्या. काय करावं सुचेना. मागच्या बसमधला एक तरुण, त्याचं नाव सुब्रतो, मदतीला आला. त्यानं जवळच्या गावातून दूध, ब्रेड आणलं. माझ्या साऱ्या ग्रुपची भूक भागवली. शेवटी उरलेले पाव जबरदस्तीने मला खाऊ  घातले. प्रेम-बीम या गोष्टीपासून दूर स्वतंत्र वृत्तीची मी, सुब्रतोच्या एकदम प्रेमातच पडले. आपली कुणी काळजी करतंय, कुणी आपल्याला जपतंय या जाणिवेनंच मी विरघळले!’’

‘‘माझ्या उत्साहाचा प्रपात आता सुब्रतोच्या दिशेनं उसळू लागला. त्यात मीही चिंब झाले. एकमेकांशिवाय चैन पडेना. त्याला पडत होती की नाही कोण जाणे. या नात्यात त्याची गुंतवणूक किती हे समजून घेण्याचंही भान मला नव्हतं. मी आपणहूनच धावत होते. त्याच्या सोबतीला त्याचं धावणं समजत होते. प्रेमाचा उन्माद कुठला विचारही करू देत नाही. अडचणींच्या डोक्यावरनं उडी मारायची वृत्ती! त्या सोडवायला थांबावं लागतं. उडी मारली की त्या टाळता येतात, पण मोठय़ा होऊन पुन्हा पुढय़ात येतात.’’ तिनं कॉफीचा शांत घोट घेतला.

‘‘सुब्रतोच्या कर्मठ मां-बाबूजींना हे आंतरप्रांतीय नातं पसंत नव्हतं. त्यांनी विरोध केला. या अडथळ्याला मी उडी मारून पलीकडे जाणार, तेवढय़ात लक्षात आलं, त्यानं माझा हात सोडलाय. त्याला आई-वडिलांना दुखवायचं नव्हतं. एका क्षणात त्यानं माझी, माझ्या प्रेमाची, या नात्याची उंची खुजी ठरवली. नफा-तोटय़ाचा तक्ता मांडला. आयुष्याच्या अडथळ्यांच्या शर्यतीत पहिल्यांदा मी कोलमडून पडले. यापूर्वी मी रेसमध्ये हरले असेन, पडले नव्हते!’’

‘‘माझ्या पायातलं चक्रच जाम झालं. माझी झोप उडाली. जीवनातला रस आटला, जगण्यातलं स्वारस्य गेलं, आयुष्यातलं रहस्य संपलं. रडण्याचा अनुभव नव्हता, पण भिंतीनं ओल धरावी तसा आपोआप चेहरा भिजायचा. या उदासीनतेनं मला जणू एका खोल खाईत लोटलं.

पप्पांनी मला एका मानसोपचारतज्ज्ञ नेलं. डॉक्टर चांगला होता, मात्र त्याच्या गोळ्यांनी घसा कोरडा पडायचा. सारखी गुंगी यायची, चकरा यायच्या. गरज असेलही मनाला त्यांची, पण शरीराला त्रास झाला.’’

‘‘असे किती दिवस गेले असतील. एके दिवशी मी टीव्हीसमोर बसले होते, क्रिकेट पाहत. ड्रोन कॅमेराचा व्ह्य़ू सुरू झाला. आधी धावपट्टी, मग सारं मैदान, मग प्रेक्षागृह, मग स्टेडियम, मग शहराचा तो भाग, मग सारं शहर. ड्रोन कॅमेरा वरवर जाऊ  लागला. त्याच्या दृष्टिक्षेपात ते स्टेडियम, त्यावर रंगलेला खेळ, ती भारताची हार, त्या विकेट पडणं, सारं सूक्ष्म होऊन गेलं. नगण्य झालं. ते सारं शहर एका सुदूर दृष्टिक्षेपात सामावून घेणारा तो कॅमेरा, असंख्य उत्तुंग इमारती, त्या प्रत्येक इमारतीतली असंख्य घरटी, त्या प्रत्येक घरटय़ात चालणारे सुख-दु:खाचे खेळ. किती सूक्ष्म होऊन जातात या गोष्टी एकदा दृष्टिक्षेप विशाल झाला की! मला स्टेडियमवर चाललेला यशापयशाचा खेळ नगण्य वाटायला लागला. हळूहळू ड्रोनसोबत वरवर जात मी माझ्याच आयुष्याकडे बघायला लागले. बुद्धाच्या भाषेत ‘सम्यक्’ दृष्टीने पाहायला लागले. आयुष्य किती विशाल पसरलं होतं सभोवताल, अन् मी फोकस करून फक्त सुब्रतोच्या प्रतारणेकडे बघत बसले होते. त्या फसलेल्या उडीकडे पाहत दु:खाला कवटाळून बसले होते.

आता ते दु:ख, ती निराशा मी थोडी विलग केली. दुखावल्या जयश्रीकडे ड्रोन कॅमेरानं, उंचावरून बघायला लागले. उदासीनतेच्या अवस्थेत मला लक्षात आलं, या उदास मन:स्थितीने माझा वेग नियंत्रित केला आहे, मला स्थिरावण्याची, आत्मपरीक्षणाची संधी दिली आहे. ऊर्जा नियंत्रित केली आहे. मला अंतर्मुख केलं आहे. या गप्प बसण्यानं माझ्या आतला संवाद सुरू झाला. एक अंतर्यात्रा सुरू झाली. कोण आहे मी? माझ्या अस्तित्वाचं उद्दिष्ट काय? किती बडबड करायचे मी निष्कारण! ती बडबड बंद झाली आणि अंतर्मनाचे बोल मला ऐकू येऊ  लागले.

हर्षांनं मला बेभान केलं होतं, खेदानं माझा तोल सांभाळला. सुखात माणूस जगाचा शोध घेतो, दु:खात स्वत:चा शोध घेऊ लागतो. ज्ञानानं माणूस जाणीवसंपन्न होत असेल, वेदनेनं भावसंपन्न होतो. क्षमाशील होतो. ताप येणं हे नैसर्गिक प्रतिकारशक्तीचं लक्षण आहे. ताप हे आधण आहे, प्रतिकार करणाऱ्या रसायनांचं. ते मर्यादेत उपयुक्तच आहे. तसा नैराश्य हा मनाचा ताप आहे. सुब्रतोनं मला फसवलं नव्हतं, तो सामान्य होता एवढंच. आजवर त्याच्या प्रतारणेनं मी माझ्या मेंदूला जाळत होते, तो धुमसता भाग मी विझवून टाकला. अचानक शांत वाटायला लागलं.’’

उदासीनता ही चांगली का वाईट या वर्गीकरणात अडकू नये. उदासीनता हा वळणावरचा विसावा आहे. तिचाही काही उपयोग आहे. ती मनाला उभारी घेण्यापूर्वीची तयारी करते. आत्मपरीक्षणाची संधी देते. तिला कवटाळून बसू नये, पण अव्हेरूही नये! भले-बुरे घडून गेलेल्या आयुष्याच्या धावपट्टीवर जयश्रीने एका वळणावर ‘जरा विसावा’ घेत अडथळा नुसता ओलांडला नव्हता, पारही केला होता.

डॉ. नंदू मुलमुले nandu1957@yahoo.co.in

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मन विकार विचार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dr nandu mulmule article on definition of happiness

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×