भूषण कोळेकर

kolekarbs@yahoo.com

bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
Modelling Career Attractive society Career Opportunity
चौकट मोडताना: ही वाटच निसरडी
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

आईची विस्मृती वाढतच होती. कायम माझी आंघोळ झाली आहे, असे सांगून आंघोळ करण्यास सपशेल नकार देणे, निकटवर्तीयांना कधी कधी न ओळखणे, दैनिक विधीतील अनियमितता, आदींचे प्रमाण वाढत होतेच, पण अडेलतट्टूपणाही वाढत होता. एकाच खोलीत पडून राहायची. ना खाण्याचं भान ना बोलण्याचं. परिस्थिती हाताबाहेर जाऊ  लागली होती. काय करावं हा प्रश्न सतावू लागला.. निर्णय घेणं भाग होतं..

मी एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातला.  आणि माझी पत्नी शुभदाही अशाच एका कुटुंबात वाढलेली. आम्ही दोघेही बँकेत नोकरीला. बदलीची नोकरी. घरातील वडीलधाऱ्यांचा प्रेमाने सांभाळ करायचा ही संस्कृती. माझे आजी-आजोबा त्यांच्या जीवनातील शेवटची तीन वर्षे माझ्याकडेच वास्तव्याला होते. शुभदाने तिची नोकरी सांभाळून त्यांची खूप सेवा केली. माझे वडील लवकर निवर्तले, तेही माझ्या घरीच. आईचे छत्र सुदैवाने माझ्या डोक्यावर आहे.

माझी आई डॉक्टरेट पदवी मिळवलेली. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि जनसंपर्कही दांडगा. देशात-परदेशात एकटी फिरत असे. पण आठएक वर्षांपूर्वी आम्हाला तिच्यात बदल जाणवू लागला. विसराळूपणा वाढला. एकदोनदा बाहेर पडली.. रस्ताच विसरली, पण संध्याकाळी परत घरी आली. पुण्यातील नामवंत डॉक्टर आणि माझा मित्र मोहन मगदूम याने निदान केले, ‘‘तुझ्या आईची तब्येत उत्तम आहे, पण तिला विस्मृतीदोष, डिमेंशिया आहे. डिमेंशिया बरा होणे अवघड आहे, फक्त तो आपण तात्पुरता नियंत्रणात आणू. पण दिवसेंदिवस तो वाढतच जाईल. आपण त्याच्या वाढीची गती कमी करण्याचा प्रयत्न करू.’’  त्याने योग्य ते उपचार केले. पुढील ३ / ४ वर्षे छान गेली. पण विस्मृती वाढत होती. कायम माझी आंघोळ झाली आहे, असे सांगून आंघोळ करण्यास सपशेल नकार देणे, निकटवर्तीयांना कधी कधी न ओळखणे, दैनिक विधीतील अनियमितता, आदीचे प्रमाण वाढत होतेच, पण अडेलतट्टूपणाही वाढत होता. एकाच खोलीत पडून राहायची. ना खाण्याचं भान ना बोलण्याचं. परिस्थिती हाताबाहेर जाऊ  लागली होती. काही काळ केअर टेकर ठेवून बघितले. पण त्यांच्याही क्षमता अपुऱ्या ठरल्या. दोन जणी नोकरी सोडून गेल्या.

आता काय करायचे, हा प्रश्न सतावू लागला. मला एक गोष्ट प्रचंड तीव्रतेने जाणवली.. ती म्हणजे मला आईला सांभाळायची मनापासून इच्छा आहे. पण तिच्या या परिस्थितीत तिला सांभाळण्याचे कसब माझ्यात नाही. त्यामुळे तिचे बिचारीचे हाल होणार. काही निकटवर्तीयांशी बोललो. एकादोघांनी सांगितले की काही उपचार केंद्रे आहेत का बघ. मनावर दगड ठेवून मी अशा केंद्रांचा शोध घेण्यास सुरुवात केली. एक लक्षात आले अशी ठिकाणे मुख्यत: वृद्धाश्रमच आहेत. ठिकाण निवडायचे कसे? मनात एकच खूणगाठ बांधली. जिथे गेल्यावर.. ‘येथे मला ठेवले तरी मी आनंदाने राहीन.’ अशी भावना निर्माण होईल अशाच ठिकाणी मी माझ्या आईला ठेवेन. अनेक ठिकाणे पहिली. आणि एक दिवस मी पुण्यातलं एकज्येष्ठ आनंदनिवास नक्की केलं. प्रशस्त, हवेशीर आणि प्रकाशमयी अशी वास्तू मला आवडली. मुख्यत: स्वच्छता उत्तम होती. हेच ते ठिकाण असे वाटू लागले. पण अजूनही मनातील संस्कार मला निर्णय घेऊ  देत नव्हते. अशा वेळी तेथील व्यवस्थापिकांनी मध्यम मार्ग सुचवला. १५ दिवस ठेवून बघा. ते मला पटले.

त्या पंधरा दिवसांत मी प्रचंड अस्वस्थ होतो. कोणत्याही वेळी तिथे जायचो. नाश्ता किंवा जेवणाच्या वेळी पोहोचायचो. एकंदर व्यवस्थेवर लक्ष ठेवायचो. पंधरा दिवस संपले आणि माझ्या लक्षात आले की आईचा मूड चांगला आहे. समवयस्क लोकांमध्ये ती मिसळते आहे (ओळख पटली नाही तरीही), चेहऱ्यावरची सूज कमी झाली आहे. एकंदर मला तिच्या दैनंदिन जीवनात सुधारणा दिसली. रोज गाणी म्हणते, स्तोत्रे म्हणते. त्यामुळे मी तिला तिथेच ठेवायचा निर्णय घेतला.

गेले एक वर्ष ती तिथे आहे. तिची शारीरिक तब्येत उत्तम आहे. मी आठवडय़ातून दोन वेळा जाऊन भेटतो त्या वेळी ती माझे आनंदाने स्वागत करते. मला सोडून ती कोणालाही ओळखत नाही, पण मूड चांगला असतो. तेथे ती खूप गाणी म्हणते, समवयस्क लोकांशी निर्थक का असेना गप्पा मारते. आता तिला तिथे ठेवल्याबद्दल अपराधीपणाची भावना माझ्या मनात अजिबात नाही. उलट तेथील मामा आणि मावशा यांच्यामध्ये अशा लोकांना वागवण्याचे  उत्तम कसब असते हे माझ्या लक्षात आलंय. आणि हेही लक्षात आलंय की ते माझ्यात नाही. ती आनंदात आहे म्हणून मी पण आनंदात आहे. मधूनमधून आमच्या नातेवाईकांना घेऊन तिला भेटायलाही जातो.

या निमित्ताने मी काही गोष्टी तुमच्याशी बोलाव्याशा वाटतात.

वृद्धाश्रम की ज्येष्ठ आनंदनिवास? याला तसा काही अर्थ नसतो. विभक्त कुटुंबांमुळे घरातील संख्याबळ घटले आहे. त्यामुळे कुटुंबाच्या मनात कितीही प्रेम किंवा आदर असला तरी त्यांच्याकडे वेळ नाही. अशा कुटुंबात ही ज्येष्ठ मंडळी एकटी पडतात. कुटुंबांमध्ये जोपर्यंत त्या ज्येष्ठ व्यक्ती आपले दैनंदिन व्यवहार स्वतंत्रपणे कोणाच्याही मदतीविना करू शकतात तोपर्यंत काहीही अडचण येत नाही. पण अशा व्यक्तींचे शारीरिक (अंथरुणाला खिळलेले) किंवा मानसिक (अल्झायमर किंवा विस्मृतीग्रस्त.) स्वास्थ्य जर एका प्रमाणापलीकडे बिघडले तर मात्र सगळ्यांचीच ओढाताण होते. काही जण घरीच २४ तासांसाठी ‘केअरटेकर’ ठेवतात. पण त्यांचे वेगळे प्रश्न निर्माण होतात. अशा परिस्थितीत असा निवासी स्वरूपाचा पर्याय नक्कीच चांगला वाटतो.

आई-वडिलांना असं वेगळं ठेवणं अनेक मुलांसाठी त्रासदायक ठरतंच. काहीजण तो कृतघ्नपणा मानतात. पण खरं तो तसा आहे का? – वर सांगितलेल्या परिस्थितीत जर आपण आपल्या भावनेपोटी या ज्येष्ठांना घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला तर कुटुंबातल्या व्यक्तीची ओढाताण होतेच, पण ज्येष्ठांचीही होते. फक्त तीन गोष्टी महत्त्वाच्या – आपण मुलांच्या पाळणाघरावर आणि शिक्षणावर खर्च करताना जसा आनंद मानतो तसा या बाबतीत खर्च करतानाही मानायला हवा.

आता महत्त्वाचा प्रश्न या बाबतीत भावंडांनी कसे वागावे? जर एकुलता एक मुलगा किंवा मुलगी असेल तेव्हा फार सोपे असते. पण जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक भावंडे असतात तेव्हा अनेक वेळा मतभेदांमुळे वातावरण गढूळ होते. त्यांच्यामध्ये कितीही मतभेद असले तरी या बाबतीत सामंजस्याने निर्णय घ्यायला हवा ज्यायोगे आपल्या आईबाबांना यातना होणार नाहीत. या बाबतीत मी भाग्यवान आहे. माझी एकुलती एक बहीण भावना अमेरिकेला असते, तिचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे मला आईबाबतीत निर्णय घेणे खूप सोपे गेले.

खरं तर आपले आईवडील शेवटपर्यंत आनंदी राहावे एवढीच आपली इच्छा असते. काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात, परंतु त्याला नाइलाज असतो. आज आई आणि त्यामुळे आम्हीही आनंदाने राहतो आहोत, त्यासाठी एक निर्णय फक्त घ्यावा लागला. तो मी घेतला..