|| उषा महाजन

आयुष्यात अनेक गोष्टी करून बघायच्या, अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यायच्या, विशिष्ट पदार्थ चाखायचे अशी इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. थोडक्यात काय तर मृत्युपूर्वी करण्याच्या गोष्टींची बकेट लिस्ट तयार करायची. तरुणपणातच अशी बकेट लिस्ट करून ठेवण्याची मला सवय लागली. त्यातल्या बऱ्याच गोष्टी पूर्ण केल्या तर काही प्रयत्न करूनही असफलच राहिल्या. एकीकडे नवनवीन गोष्टींची भरही पडत चालली होती..

What are the charges against Israel Netza Yehuda Battalion
यहुदी तालिबानʼवर अमेरिकाही नाराज… इस्रायलच्या नेत्झा यहुदा बटालियनवर कोणते आरोप आहेत?
ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार

हिमाचल प्रदेशात मनाली इथे बियास नदीत रिव्हर राफ्टिंग तर अंदमानमध्ये अंडर सी वॉक, श्रीलंकेत सिग्रिया लायन रॉकच्या १३७५ दगडी पायऱ्या चढून पाचव्या शतकातील किल्ल्याचे अवशेष बघून लगेच तेवढय़ाच पायऱ्या उतरून खाली येऊन परत दिवसभर इतर ठिकाणांना भेट असले उद्योग वयाच्या साठीनंतरही करून पाहिले. प्रत्येक परदेशवारीमध्ये अतिशय वेगाच्या तुफानी रोलर कोस्टर राइड्सची मजा घेताना तर वयाची जाणीवही झाली नाही आणि अजूनही तेवढय़ाच आनंदाने त्या घेत असते.

२००४ मध्ये अमेरिकेत टीव्हीवर प्रथम ‘स्काय डायव्हिंग’चा धाडसी खेळ बघून तर मी हरकून गेले आणि कसंही करून हे करून पाहिलंच पाहिजे, अशी तीव्र इच्छा झाली. मुलानेही कौतुकाने सगळी माहिती काढली, परंतु हवा खराब असल्याने बुकिंग मिळालं नाही. माझ्या ‘बकेट लिस्ट’वर ही इच्छा अग्रकमांकावर स्थानापन्न होऊन बसली होती. पाच महिन्यांपूर्वी अमेरिकेत पेनसिल्वानिया स्टेटमध्ये पिटसबर्गला गेल्यावर तिथे मात्र तब्बल १३ वर्षांनी माझी ही इच्छाही पूर्ण झाली. माझ्या बहिणीची नात आणि तिचा नवरा या दोघांनी माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनमोल मदत केली. आम्ही तिथे पोहोचण्याआधीच मी तिला याबद्दल पूर्ण माहिती काढून ठेवण्यास सांगितलं होतं. त्यासाठी नीट चालता येणं, जमिनीवर उतरताना दोन्ही पाय ९० अंश कोनात वर करता येणं आणि प्रचंड इच्छाशक्ती एवढंच आवश्यक असतं. वयाचा प्रश्न नाही. हे कळल्यावर तर काळजीच मिटली. ११ वर्षांपूर्वी पाठीच्या मणक्याचं झालेलं ऑपरेशन आणि तीन वर्षांपूर्वी लेहमध्ये पाय फ्रॅक्चर झाल्याचं सांगून टाकलं. ‘काही हरकत नाही’ असा दिलासा दिला गेला.

या साहसाला निघायच्या आधीचा दिवस उजाडला. १३ वर्षांपासून बघत असलेलं स्वप्न पूर्ण होणार या विचाराने रात्री झोपच येईना. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तयार होऊन, नाश्ता आटोपून आम्ही नवरा-बायको, माझी भाची जयश्री, तिची मुलगी केतकी आणि जावई गिरीश असे पाच जण कारने निघालो. केतकीने स्वत: बऱ्याच वर्षांपूर्वी टेक्सासमध्ये हा अनुभव घेतल्याने ती मला सतत टिप्स देत होतीच. साधारण दहाच्या सुमारास आम्ही मर्सीर या शहरातल्या स्काय डायव्हिंग सेंटरला पोहोचलो.

माझ्याबरोबर आणखी पाच-सहा जण होते. सुरुवातीला एक ३० पानी फॉर्म भरून, अनेक ठिकाणी सह्य़ा करून अनेक अटी-शर्ती वाचून (उदा. काही अघटित घडल्यास कोणाला जबादार धरणार नाही इ. इ.) दिला. नंतर आमच्या घातलेल्या कपडय़ांवरच आणखी एक स्पेशल सूट चढवला. त्याच्यावरून कमरेपासून गुडघ्यापर्यंत चामडय़ाचे हार्नेस घट्ट आवळले. डोक्यावरचं शिरस्त्राण विमानात बसल्यावर कसं लावायचं याची दोन-तीनदा प्रॅक्टिस करवून घेतली. भला मोठा पारदर्शक चष्मा आणि लोकरीचे हातमोजे विमानातच देणार होते.

त्यानंतर मोकळ्या मैदानावर इन्स्ट्रक्टरने सगळे नियम, कशी उडी मारायची, दारापर्यंत कसं यायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलं. सराव करून घेतला. नीट समजेपर्यंत परत परत विचारून घेण्याची मुभा होती. ही पहिल्या वेळची उडी म्हणजे आपल्याबरोबरचा इन्स्ट्रक्टर मागे आणि आपण पुढे असं. त्याच्या हार्नेसला आपलं हार्नेस विमानात आधीच घट्ट आवळून लॉक करतात. अनेकांना वाटतं हे पॅरासेलिंग सारखं असतं. तर तसं अजिबात नाही. इथे पॅराशूटशिवाय डायरेक्ट उडी मारायची असते आणि खाली येताना काही वेळाने पॅराशूट उघडतं.

सगळी जय्यत तयारी झाली. घरच्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आम्ही लांबवर थांबलेल्या आमच्या छोटय़ाशा विमानाकडे निघालो. अंगात उत्साह भरभरून वाहत होता. वाटेत प्रत्येकाचा इन्स्ट्रक्टर भेटला. विमानात प्रवेश केला. आत दोन्ही कडांना थोडी जागा सोडून दोन लाकडी बाक होते. एकीकडे तीन आणि दुसरीकडे चार त्यात दोघं जण एकएकटेच उडी मारणारे – त्यांची दुसरी-तिसरी वेळ होती आणि वेगळं प्रशिक्षणही घेतलेले होते असे आम्ही बाकांवर दोन्हीकडे पाय टाकून बसलो. माझ्या मागे बसलेल्या इन्स्ट्रक्टरने त्याचे हार्नेस माझ्या हार्नेसला घट्ट आवळून बांधले. एकीकडे परत परत त्याचं सूचना देणं चालूच होतं. डोक्यावर टोपी नीट बांधली, चष्मा, हातमोजे चढवले. सगळे जण १४,००० फुटावर विमानाचं दार उघडण्याची वाट बघत बसले होते.

हृदयाचे वाढलेले ठोके कानात ऐकू येत होते. पाठीशी फक्त इन्स्ट्रक्टरचा आधार होता. बाकी सगळं तर स्वत:च करायचं होतं. त्याच्या पाठीवर बंद पॅराशूट बांधलेलं होतं. एव्हाना १४,००० फुटांची उंची गाठलेली होती आणि अचानक विमानाचं दार उघडलं गेलं आणि बघता बघता समोरच्या दोघांनी उडी मारलीदेखील. हो! त्यांच्यानंतर आमच्या पाच जोडय़ा पाठोपाठ सरकत सरकत पुढे आल्या. आमची जोडी दाराशी आली. ‘भीती वाटली तर दीर्घ श्वास घ्या’ ही सूचना आठवलीदेखील नाही. मेंदू कामच करत नव्हता. दाराची दोन्हीकडची हॅण्डल डाव्या उजव्या हाताने घट्ट पकडली. मुडपलेला डावा गुडघा बाहेर काढला. नंतरच्या सूचनेनुसार हॅण्डलवरचे हात सोडून समोर छातीवर क्रॉस करून उजवा गुडघा तसाच बाहेर काढला आणि माझे पाय मागच्या दिशेने सरळ झाले. बुटांनी त्याच्या पायावर टॅप करून मी तयार असल्याचा इशारा दिला आणि त्याने दमदार आवाजात ‘जम्प’ अशी सूचना दिलेली कानावर पडली आणि तो अवर्णनीय क्षण येऊन ठेपला..

पूर्ण पुढे झुकून मी खालच्या आसमंतात शरीराला चक्क झोकून दिलं. अहाहा, काय वाटलं मला त्या क्षणी? नाही! नाही! शब्दात व्यक्त होतच नाही ते अपुरे पडतात शब्द! तो क्षण प्रत्यक्ष अनुभवावा लागतो. आपला आपल्यालाच. मग त्याने दोन्ही हात पंखासारखे पसरवायला सांगितले. तोंडाचा आ वासल्यामुळे बाहेरची जोरदार हवा आत जात होती. घसा इतका कोरडा पडू शकतो हे प्रथमच कळत होतं. डोळ्यावरच्या पारदर्शक चष्म्यामुळे भन्नाट वाऱ्यातही डोळे बंद होत नव्हते. ढगांच्या पांढऱ्या पुंजक्यांवरून पक्ष्याप्रमाणे विहार करत आम्ही फिरत होतो. तुम्हाला खरं वाटणार नाही पण अत्त्यानंदाने मी तर, ‘‘आज मै उपर, आसमां नीचे! आज मै आगे, जमाना है पीछे॥’’ या ओळी जोरजोरात गात होते. त्या अमेरिकन तरुणाला समजत नव्हतं, पण माझा उल्हास बघून तो खूप हसत होता. साठ सेकंदाच्या त्या फ्री फॉलमध्ये आमचा स्पीड ११० कि.मी. होता. त्या २४-२५ र्वष वयाच्या मुलाला तर हा रोजचाच अनुभव असतो, असं त्यानं सांगितलं.

६० सेकंदांनंतर त्याने मला सांगितलं की, आता एक हलका झटका बसेल तर तयार रहा. झटक्यात त्याच्या पाठीवरचं पॅराशूट उघडलं. तोपर्यंत ढगही पांगले होते आणि काय वर्णावा तो खालचा नजारा! पर्वतांच्या रांगा, इवलीशी नदी, मग रस्ते आणि खेळातल्या गाडय़ांसारखा सुळुक्  सुळुक्  धावणाऱ्या कार, पानगळ चालू असल्याने, मनमोहक रंगात नटलेली नवी पालवी. अशा मोहक दृश्याचा अवीट आनंद घेत आम्ही दोघं अवांतर गप्पा जवळजवळ चार-पाच मिनिटे तरी अवकाशात तरंगत होतो. मध्येच तो पॅराशूट डावी-उजवीकडे तिरकं तिरकं करून फिरवत होता. आता कुठे माझ्या आधी उडी मारलेले आजूबाजूला आकाशात भ्रमण करताना दिसू लागले होते. तो अविस्मरणीय प्रवास संपूच नये असं वाटत होतं. पण खाली धरणीमाता आमचं स्वागत करायला हात उंचावत होती आणि अंतर कमी कमी होत चाललं होतं. किती आणि काय डोळ्यांत साठवून ठेवू असं झालं होतं. पण ‘लेग्स् अप’ अशी सूचना मिळाल्यावर मी मागच्या दिशेला असलेले पाय समोर उंचावून घेतले आणि हळूहळू अलगदपणे आम्ही मऊ गवतावर उतरलो. हार्नेस सोडवून तो आधी उठला. मी मात्र उठताना त्याचा हात धरून उभी राहिले. ‘‘एकदम ठीक आहेस ना? चक्कर येत नाहीये नं?’’ अशी प्रेमाने त्याने विचारपूस केली. मी स्वत:ला चाचपून खात्री केली की मी अगदी सुखरूप परत आले होते..

घरचे चौघं जण दूरवर दिसत होते आतुरतेने माझी वाट बघत. मला पुढे चल असं सांगूत तो पॅराशूटचं गाठोडं बखोटीला घेत पाठोपाठ आलाच. घरच्यांबरोबर गळाभेटी झाल्या. तेव्हाही मी तरंगतच होते. पाय लटलटतदेखील नव्हते. सगळ्या वस्तू परत करून सर्वाचे आभार मानून आम्ही निघालो. वाटेत फोटो सेशन चालूच होतं.

तिथून मग आम्ही बाहेरच जेवण करून सेलिब्रेट केलं. दिवसभर हिंडून फिरून घरी परतल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मला खरंच वाटत नव्हतं की मी एवढं मोठं धाडस केलं होतं खरंच, की स्वप्नच पडलं होतं.

साठी पूर्ण होण्याआधी हे अनुभवण्याची इच्छा, शेवटी १३ र्वष वाट बघून वयाची ७२ र्वष पूर्ण होण्यास केवळ ५० दिवस उरलेले असताना सफल झाली, ती केवळ माझ्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे आणि वय, आधीचं ऑपरेशन, फ्रॅक्चर याचा बाऊ न केल्यामुळे. जोडीला घरच्यांचं भरपूर पाठबळ तर होतंच होतं. ‘भलतं धाडस करू नकोस’ असा अनाहूत सल्ला देणाऱ्यांकडे मी दुर्लक्ष करत असते. माझ्या मनात फक्त एकच विचार असतो आताशा ‘बकेट लिस्ट’मधली आणखी एक इच्छा पूर्ण झाली! ‘बकेट लिस्ट’मधल्या उरलेल्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत अजून..

sayhi2usha@gmail.com