चिंब पाऊस

विचार करतच लोटलेला दरवाजा उघडून ती घरात शिरते आणि तिला धक्काच बसतो.

प्रतिनिधिक छायाचित्र
‘‘नका हो विचार करू एवढा. खरं सांगायचं तर इतकं झाल्यावर कळतं की, विचार करण्यासारखं काही नसतंच मुळी. त्या त्या वेळी ते ते जगून संपवायचं असतं बस्स्! कशाला फुकाच्या चिंता? जे आहे ते छान आहे की. जे होईल ते त्या त्या वेळी निभावून जाईलच. असं नाही, तर तसं. जेव्हा निभावणार नाही तेव्हा संपेलच सगळं. आहे काय अन् नाही काय.

सत्य असतं ते त्या त्या क्षणापुरतं, बस्स.. ’’

‘‘आमच्या अप्पांना ना, दवाखान्यात अ‍ॅडमिट केलंय.’’

दुपारच्या सुट्टीतला डबा खाताना मनू म्हणाली.

‘‘बाप रे! कधी नेलं गं हॉस्पिटलला?’’

‘‘परवा रात्री. काल शाळेला सुट्टी होती ना.’’

‘‘तुला माहित्येय मनू, माझ्या आजोबांनासुद्धा असंच अ‍ॅडमिट केलं होतं.’’

‘‘मग घरी कधी आले ते?’’

‘‘ते परत आलेच नाहीत. एक्स्पायर झाले ना.’’

तोंडातला घास मनूच्या घशातच अडकला. अप्पांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत ते. बरे होऊन एक-दोन दिवसांतच घरी येतील असंच तर आई म्हणत होती. हा असला काही विचार तिच्या डोक्यातच आला नव्हता.

तिच्या इवल्या हृदयातली धडधड वाढली. छोटे केस घामेजले. अप्पांचं असं काही होईल, मग रात्री कुणाच्या कुशीत झोपायचं, कुणाकडे गोष्टीसाठी हट्ट करायचा? अप्पांच्या कुशीत कसं छान छान वाटतं. मस्त उबदार पांघरुणात शिरल्यासारखं. अप्पा दोन दिवस गावाला गेले तरी उगाच रडू येत राहातं आणि ते कायमचेच निघून गेले तर..

तिची भूकच संपून जाते. अप्पांची घरची आठवण यायला लागते.

‘‘आत्या आल्येय का?’’

‘‘हो कालच आली ती. का गं?’’

‘‘हूंऽऽऽ माझीसुद्धा आत्या लगेच आली होती.’’

‘‘पण.. बरं आहे आता अप्पांना. घरात सगळी असंच म्हणत होती.’’

‘‘असंच सांगतात गं, आपल्या लहान मुलांना. मोठय़ा माणसांच्या आयडिया असतात त्या.’’

मनूची धडधड आणखी वाढते. चेहरा लालबुंद होतो. डोळ्यांत पाणी जमायला लागते.

ती डबा आवरते.

‘‘का गं, जेव ना?’’

‘‘नको, वॉशरूमला जाऊन येते.’’

तिला अनावर रडू येत असतं. वॉशरूममध्ये ती थोडं रडून घेते. तोंडावरून पाणी फिरवते. बाटलीतलं पाणी घटाघटा संपवते. थोडं बरं वाटतं; पण धडधड थांबत नाही. शाळेत एरवी एवढय़ातेवढय़ानं वाटणारी गंमत हरवून जाते. तिचं इवलंसं तोंड पाहून मॅडम विचारतात,

‘‘काय गं! बरं वाटत नाही का?’’

ती मलूल हसून मान हलवते. कशी तरी शाळा संपते. व्हॅनमधली दंगामस्ती आज तिला नकोशी वाटते. घर येतं. दररोज तिची वाट बघत अप्पा बाल्कनीत उभे असतात. तिला पाहून मस्त हसतात. ‘‘आली गं मनू’’ म्हणून आत आवाज देतात. ती दाणदाण पायऱ्या चढून घरात शिरते आणि पायातल्या बुटांसकट अप्पांना मिठी मारते; पण आज बाल्कनीत कुणीही नसतं..

घर कमालीचं शांत वाटतं. सावकाश एक एक पायरी चढताना मनूला उगाचच थकायला होतं. बाहेरच बूट काढताना ती विचार करते, ‘‘आजीबरोबर आज अप्पांना बघायला जायला पाहिजे; पण लहान मुलांना सोडत नाहीत म्हणे; पण माझे आजोबा आहेत ते, मला भेटायचं आहे.’’

विचार करतच लोटलेला दरवाजा उघडून ती घरात शिरते आणि तिला धक्काच बसतो. अप्पा मस्तपैकी सोफ्यावर बसलेले असतात. आजी डाळिंबाचे दाणे काढत असते आणि आत्या गालातल्या गालात हसत आजीला काही तरी सांगत असते. मनूला एकदम भारी वाटून जातं. ती धावतच अप्पांच्या कुशीत शिरते.

‘‘अगं हळू, आत्ताच दवाखान्यातून आलेत ते.’’

आता मात्र मनूला राहावत नाही. दुपारपासून दाबून ठेवलेले रडू बाहेर फुटतं.

‘‘काय गं, काय झालं?’’ सगळीच जरा धास्तावतात.

‘‘मला खूप भूक लागलीय.’’ रडता रडता मनू सांगते. अप्पा जोरजोराने हसू लागतात. हसताना त्यांचे डोळे पाणावतात.

बाहेर पाऊस सुरू होतो.

‘‘तू माझा फोन का उचलत नाहीस?’’

‘‘मीटिंगमध्ये होतो.’’

‘‘माझा फोन होता, कळलं असेल ना तुला?’’

‘‘अगं, म्हणूनच तर गेले दोन दिवस फोन करतोय, मेसेज करतोय. तुझा रिप्लायच नाही.’’

‘‘त्या दिवशी का नाही केलास?’’

‘‘एवढं काय विशेष होतं, त्या दिवशी?’’

क्षणभर शांतता..

‘मला प्रमोशन मिळालंय आणि हो, ट्रान्स्फरही.’’

खळ्खळ्.. काही तरी तुटतं आणि सगळं विखरून जातं. त्याचं हृदयच जणू थांबतं.

‘‘हेच सांगायचं होतं त्या दिवशी?’’ काही तरी विचारायचं म्हणून तो विचारतो.

‘‘नाही. जगणं आणि काम करणं यात निवड करायची होती.’’

‘‘म्हणजे?’’

एक क्षण तिची घालमेल. बोलावं की नको, पण आता नाही तर कधीच नाही.

‘‘आय लव्ह यू म्हणायचं होतं तुला.’’

‘‘क्काय?’’

मघाशी तुटलेलं सगळं क्षणात एकसंध होऊन जातं. थांबलेलं हृदय पुन्हा सुरू होतं. खरं तर पहिल्याच नजरेत जाणवलेलं दोघांमधलं खास काही तरी जे आजपर्यंत कधीच कुणाबद्दल वाटलं नव्हतं, जे तिच्या नजरेतून, कृतीतून उमटलं होतं, जे गेली दोन वर्षे दररोज तो स्वत:शी गुणगुणत होता आणि तिच्याकडून ऐकण्यासाठीच जणू जगत होता. किती क्षण आले सांगण्याचे आणि ऐकण्याचेही, पण त्या त्या क्षणांबरोबर निसटून गेलं, राहूनच गेलं, ते माहीत होतं दोघांनाही आणि आज अचानक ही काय बोलत्येय हे..

‘‘चल, निघते मी.’’

‘‘कुठे? अगं, आत्ताच तर म्हणालीस..’’

‘‘म्हणाले नाही, म्हणायचं होतं त्या दिवशी, ठरवायचं होतं प्रमोशन घ्यायचं की नाही; पण मी प्रमोशनही घेतलंय आणि ट्रान्स्फरही. उशीर झालाय सगळ्यालाच आता.’’

‘‘जगणं सुरू करायला कधीच उशीर होत नाही.’’ एक अनामिक हक्कानं तो तिचा हात पकडतो. त्याच्या स्पर्शातली नवी धिटाई तिला खूप मोहवते. तरीही ती म्हणते, ‘‘माझं सगळं ठरलंय आता.’’

‘‘आणि आपण दोघांनी मिळून ठरवलेलं?’’

आता ती संभ्रमात..

‘‘आपण? कधी ठरवलं?’’

‘‘हूंऽऽऽ कधीपासून सुरुवात करू? आपण भेटलो पहिल्यांदा त्या वेळेपासूनच करतो. मी तुला आणि तू मला पाहिलंस, नकळत माझा हात केसांकडे गेला आणि जाता जाता तूही पुन्हा वळून पाहिलंस माझ्याकडे, तेव्हाच ठरवलं नाही का आपण, की यापुढे सतत भेटत राहायचं, दुसऱ्याच भेटीत मी जागा राखून ठेवली माझ्या शेजारची तुझ्यासाठीच आणि तूही नेमकी तिथेच येऊन बसलीस ती तुझीच असल्यासारखी, तेव्हाच ठरवलं नाही का आपण, की एकमेकांसोबत राहायचं कायम आणि त्या दिवशी तू सहज म्हणालीस, तो निळा रंग तुला खूप आवडतो. म्हणून मी चार दुकानं शोधून शोधून त्या रंगाचा घेतलेला शर्ट घालून आलो तर मला तोच दिसला. तुझ्या हळव्या डोळ्यात त्याच वेळी ठरवलं नाही का आपण, की एकमेकांची आवड व्हायचं.’’

आणि..

निसटलेला प्रत्येक क्षण उलगडत रहातो तो तिच्यापुढे.

पाऊस रिमझिमत राहातो अखंडपणे..

‘‘किती मस्त पाऊस पडतोय. भजी कर गं छानपैकी आणि हो धणे टाक हं पिठात कुटून.’’

‘‘अहो, या महिन्यात किती अपथ्य झालंय. त्यात आणि पुन्हा भजी कर म्हणताय. अहो, आजारी पडलात तर दवाखान्यात कोण नेईल?’’

‘‘अगं, इतके रामा, भीमा, जान्हवी, रमा जमा करून ठेवल्येस ना तू. नेईल कुणीही. तू नको काळजी करू.’’

‘‘ते तर नेतीलच हो. त्यांच्याच तर भरवशावर निवांत आहोत आपण.’’

‘‘हूंऽऽऽ आपल्या भरवशाच्या म्हशीला ‘ऑस्ट्रेलियाचा’ टोणगा झाला ना. आता परक्यांचाच भरवसा.’’

‘‘अहो, अभिमान वाटला पाहिजे तुम्हाला, मुलगा ऑस्ट्रेलियात असतो याचा.’’

‘‘परदेशाची मखमली चादर वरून कितीही पसरली आयुष्यावर तरी आतून गोधडी उसवत चालली आहे त्याचं काय?’’

‘‘आताशा फारच हळवे होता हं तुम्ही. चांगलं महिनाभर राहून कालच मंडळी गेली ना. अहो, आपल्याचसाठी येतो ना तो सवड काढून.’’  ‘‘खरं सांगायचं तर नकोच वाटतं त्याचं येणं. येऊन उगाच आपल्या आयुष्याची घडी विस्कटून जातात. दर वेळी विस्कटलेलं सगळं

पुन्हा मांडताना त्रास होतो गं आता. नाही सोसवत, दमछाक होते.’’

काका शून्यात हरवतात. काकू अस्वस्थ होतात.

‘‘एवढा का विचार करताय?’’

‘‘प्रश्न पडतात गं, काय आणि कशासाठी? कुठवर आणि कुणासाठी? आयुष्याचं प्रयोजन काय? हरवलं काय मिळालं काय?’’

काकांचे प्रश्न ऐकताना आपोआपच काकूंना काही सुचायला लागतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर अचानक हसू उमटतं. काकूंचं ते हसू काकांना परिचित असतं. काही समजून उमजून आल्यावर त्या अशाच हसतात. प्रसन्न, मोकळं, अगदी तळातून काकांना ते खूप आवडतं. ते प्रश्न विसरतात.

‘‘काय गं, काय झालं?’’

‘‘नका हो विचार करू एवढा. ही ती वेळ आहे का? खरं सांगायचं तर इतकं झाल्यावर कळतं की, विचार करण्यासारखं काही नसतंच मुळी. त्या त्या वेळी ते ते जगून संपवायचं असतं बस्स्! आपलं तर सरणही रचून तयार आहे. कशाला फुकाच्या

चिंता? जे आहे ते छान आहे की. जे होईल ते त्या त्या वेळी निभावून जाईलच. असं नाही, तर तसं. जेव्हा निभावणार नाही तेव्हा संपेलच सगळं. आहे काय आणि नाही काय. आता आपण मस्तपैकी भजी खायची आणि छानसा चहा प्यायचा एवढंच काय ते सत्य, त्या त्या क्षणापुरतं. एकटेपणाचा एकांत करण्याची ही वेळ. आयुष्याचा कसला विचार करताय?’’

तिच्या बोलण्यानं काकांच्या मनावरचं मळभ धुऊन निघतं. त्यांना एकदम प्रसन्न आणि हलकं वाटू लागतं.

‘‘चल, भजी कॅन्सल. मी जरा कट्टय़ावर जाऊन येतो. बऱ्याच दिवसांत मित्रमंडळींची मैफल जमली नाही. आज जमवून आणतो.’’

काकांचा बदललेला मूड बघून काकूही सैलावतात. कधीची कपाटात येऊन थांबलेली नवीन कादंबरी त्यांची वाट बघत असते. बहिणींना, मैत्रिणींना फोन करायचे असतात आणि एकांतात स्वत:शीच बोलायचं असतं खूप खूप.. गेले काही दिवस कशाकशात गुंतून पडलेला जीव मोकळा होतो..

बाहेरचा पाऊस आता पूर्ण थांबलेला असतो. मावळतीची सोनेरी किरणं मंद मंद प्रकाशत असतात.

ऊर्मिला मुर्के chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: When my father is admitted to the hospital