वृषाली विनायक

मीमेडिकलला जावं असं घरी सर्वानाच वाटायचं. तशी तयारीही सुरू झाली होती. पण मला मात्र कधीच विज्ञान शाखा आवडली नाही. भौतिकशास्त्र आजही कळत नाही म्हणा! कदाचित माझी ‘केमिस्ट्री’ या शाखेसोबत जुळत नव्हती. तेव्हा मी कवितेत रमायचे. मराठीतल्या कथा, कादंबऱ्यांनी अक्षरश: पछाडलं होतं. अशात विज्ञान शाखेचा अभ्यास झेपेनासा झाला. मग काय, सगळी रीतसर माहिती घेऊन कला शाखेत प्रवेश मिळवला. आज मागे वळून बघताना या निर्णयाचा किंचितही पश्चात्ताप होत नाही. माझ्यातल्या ‘मी’ला या एका घटनेनं नवं आयुष्य मिळवून दिलं.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

मराठी भाषेवर शालेय वयापासूनच प्रेम असल्यानं पदवी व पदव्युत्तर शिक्षण मराठी साहित्यात पूर्ण केलं. ‘आज मराठीला कुणी विचारत नाही’, ‘मराठी डाऊन मार्केट झालंय’, ‘मराठी विषय घेतलायस खरं पण या विषयात नोकऱ्या कुठायंत?’ एक ना अनेक प्रश्न. (आताही विचारले जातात) पण मग आपणही हेच चघळत राहायचं? आपली भाषा आपण टिकवायला हवी. या विषयात उत्पन्नाची साधनं नसतील तर आपण निर्माण करू. दिशा मिळालीये, पायवाटेचा राजमार्ग करणं आपल्याच हातात आहे. आज ‘बोरूची शाळा’ हा भाषिक कौशल्यांवर आधारित उपक्रम याच प्रेरणेतून सुरू करता आला. तेव्हा मी ठरवून साहित्याच्या अभ्यासाकडे वळले.

मला आठवतं, पदवीच्या पहिल्या वर्षांला शिकत असल्यापासून पु.शि. रेगे, ग्रेस, विंदा करंदीकर, आरती प्रभू, अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ, मलिका अमरशेख, अरुण काळे, नीरजा, प्रज्ञा दया पवार यांच्या कविता, जयवंत दळवी, चिं.त्र्यं.खानोलकर, विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांच्या कादंबऱ्या-नाटके अमृता प्रीतम, गुलजार यांचं साहित्य या समृद्ध खुराकावर मी महाविद्यालयीन आयुष्य जगत होते. सात्र्, सिमॉन हेही अधूनमधून सोबत असायचे. या मंडळींचं तेव्हा विशेष काही कळायचं नाही, पण या समृद्धीनं आजवरचं जगणं अर्थपूर्ण केलंय एवढं मात्र नक्की. सिमॉन-द-बुव्हॉ म्हणते, ‘स्त्री ही जन्मत नाही तर घडवली जाते.’ या वाक्याची उत्सुकता कळत्या वयात निर्माण झाली आणि मग ‘सेकंड सेक्स’ जसं जमेल तसं न् जमेल तेव्हा वाचत गेले. आज स्त्रीवादी विचारांची मांडणी करताना भूमिका स्पष्ट होण्यात या ग्रंथाचा मोलाचा वाटा आहे. अरुण काळेंच्या ‘सायरनचे शहर’ या संग्रहामुळे महानगर माझ्या समोर उभं राहिलं. आजही अघटित बघताना वेळीअवेळी हा सायरन माझ्याही मनात घुमू लागतो. दचकायला होतं पण पुन्हा हेच महानगर सावरतं. मानवी मनाचं वर्तन तपासणं या साहित्यकृतींमुळे शक्य झालं. मी मलाही अनेकदा याच परिमाणांत पारखत असते. समाजभान जागृतीतली ही घडण मला एकीकडे अस्वस्थ करत सतत उसवत असते तर दुसरीकडे माणूस बनण्याच्या प्रक्रियेतला एकेक टाका मजबूत करत असते. आजही माझा, व्याख्याने, ग्रंथप्रदर्शन यांचा शोध सतत सुरू असतो. या बाह्य़ शोधात माझं अंतरंग उजळून निघतं.

मी कविता का लिहू लागले, हे सांगता यायचं नाही पण प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे अभिव्यक्ती दडपली जाण्याच्या काळात मी लिहू लागले. डिजिटल टेक्नो पिढीची मी प्रतिनिधी. मी व्यक्तच मुळी स्क्रीनवर होते. कम्प्युटर स्क्रीनची काच जगाचा चेहरा मला दाखवते आणि इथेच माझ्यातली मी बोलू लागते. ज्या काळात मी लिहितेय तो काळ संभ्रमाचा आहे, प्रलोभनाचा आणि उलथापालथीचा आहे. म्हटलं तर माझा भोवताल रोज बदलतोय; नाही तर कालच्यासारखाच. माझ्या सभोवती शांतता कधीच वस्तीला नसते. धार्मिक तेढ, प्रांतिक वाद, अस्मितेचा संघर्ष, नोकरी टिकवण्याची धडपड तर कधी लोकलमध्ये दोन पावलांसाठी मारामार. या सगळ्यात माझ्यातल्या कवीला अक्षरश: घाम फुटतो. भीती, जगण्याची धडपड मी शब्दात एकवटते आणि स्क्रीन वेदनेने धूसर होत जाते.

स्वत:ला शोधताना मी पुस्तकांत विरघळते, आसमंताचा निळा प्रकाश डोळ्यांत साठवू बघते. कधी भर रस्त्यात स्वत:वर गोळ्या झाडून घेते तर कधी माणसांच्या गर्दीत बहिरी होऊन त्याची नग्नता कारुण्याने बघत राहते. कधी कधी अवघं जगणं चित्रवत वाटू लागतं तर कधी आर्ट गॅलरीतल्या रंगात न्हायलेलं बोबडं पोर माझ्याशी बोलू बघतं. मी मलाच नव्याने निरखू लागते, बघता बघता गाऊ  लागते. माझ्या गर्भात मी स्वत:च स्वत:ला पुन्हा पुन्हा रुजवू पाहते.

‘बोरूची शाळा’ हा भाषिक कौशल्यांवर आधारित उपक्रम मी सुरू केला. त्यातला एक प्रसंग मला आठवतो. कविवर्य मंगेश पाडगावकर यांची ‘चिऊताई’ ही कविता मी अभिवाचनात समजावून सांगत होते. पाडगावकरांची ही कविता बंधमुक्त होण्यास प्रेरणा देणारी आहे. मी जेव्हा जेव्हा ही कविता वाचायचे तेव्हा स्वत:ला निरखून बघायचे. कधी स्त्री, कधी शिक्षिका, कधी कलावंत, कधी सर्वसामान्य व्यक्ती तर कधी कुणीच नाही. अशा प्रत्येक भूमिकेत मला नेहमी नवी उमेद मिळायची. मी अधिकाधिक मोकळी व्हायचे. पालिका शाळेत शिकणारी एक मुलगी ‘बोरूची शाळा’ या उपक्रमात सहभागी झाली होती. संपूर्ण वर्गासमोर मी ‘चिऊताई’ कवितेचं अभिवाचन केलं. –

‘निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही

आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही’

चिऊताई, तुझं दार बंद होतं

डोळे असून अंध होतं

बंद घरात बसून कसं चालेल

दार उघड, चिऊताई.’

पालिका शाळेतल्या त्या मुलीच्या डोळ्यांत या कवितेचा संपूर्ण नवा आशय मी मूर्त रूपात बघत होते. जे मी बोलत होते तेच ती जगत होती. कितीतरी वेळ मी, कविता आणि त्या मुलीचे डोळे यांत नव्या आशयात स्वत:शी लपंडाव करत होते.  या प्रसंगानंतर मी कायम जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने बघत आले. निराशेची पोकळी कित्येकदा आली तरीही मी हलले नाही. धैर्याने सामोरं जाण्याचं बळ मिळालं.

आपल्या भोवतालचे कितीतरी प्रसंग आपल्याला आकारत असतात. शाळेत शिकत असताना मी वक्तृत्व स्पर्धेत पहिली असायचे. पुढे हेच कौशल्य वृत्तनिवेदनात आणि सूत्रसंचालनात कामी आलं. सूत्रसंचालन आज वलयांकित व्यवसाय आहे. पैसा आणि प्रसिद्धी निश्चितच मिळते.  मीही बऱ्याच कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करायचे. पैसेही मिळायचे, नाहीच असं नाही. एकदा माझ्या एका समविचारी मित्राच्या भाषणात एक वाक्य ऐकलं, ‘श्रीमंत व्हायचं की समृद्ध यातला फरक कळला पाहिजे.’ या सूत्राला अवलंबण्याची सुरुवात मी सूत्रसंचालनाच्या निवडीपासून केली. कार्यक्रमाची गुणवत्ता बघून मगच निवड करू लागले. प्रसंगी काही व्यक्ती दुखावल्याही असतील. पण माझ्या जडणघडणीत मात्र मी आर्थिक श्रीमंतीऐवजी गुणधारक समृद्धीची पायवाट स्वीकारली हे नक्की! ती चालताना मी समाधानी असते.  हायस्कूलला शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाचा एक प्रसंग आठवतोय, माझी एक विद्यार्थिनी वर्गात सतत रडत होती. काही दिवस असंच सुरू होतं. एक दिवस माझ्या जवळ येऊन म्हणाली, ‘‘मला तुमच्या सोबत राहूद्या. तुमच्या सोबत मला फार बरं वाटतं.’’ प्रत्यक्षात सतत तिला सोबत ठेवणं मला शक्य नव्हतं, पण शाळेत बराच वेळ ती माझ्या आसपास असायची. तिला विश्वासात घेऊन संवाद साधल्यावर कळलं, तिनं अभ्यासाचं दडपण घेतलं होतं. हळूहळू त्या मन:स्थितीतून ती बाहेर आली, अगदी पूर्वीसारखी झाली. मला मात्र एक प्रकर्षांनं जाणवलं, लहानांपासून मोठय़ांपर्यंत इथे असुरक्षितता प्रत्येकाच्या मनात आहे. दडपणाखाली सगळेच आहेत. ती सांगण्याची निरागसता, ते धैर्य मात्र आपणच गाडून टाकलंय. माझ्याहून निम्म्या वयाच्या त्या कळीला माझ्या सावलीत सुख वाटलं. मग मी बाहेर कोणता गारवा शोधत असते? या प्रसंगानंतर कितीतरी दिवस मी मलाच खलत राहिले. माझ्यातल्या निरागसतेची ओल चाचपत राहिले. माझीच मला मी नव्याने आकळत गेले. ‘अत्त दीप भव’चा खरा अर्थ मी इथे अनुभवत होते.

स्वत:ला शोधण्याचा प्रवास अव्याहत सुरूच असतो. कधी जाणवतो कधी आपसूक नकळतपणे काही गोष्टी घडत असतात. माझ्या जडणघडणीतली एक गोष्ट मी हेतुपुरस्सर केली. माझं आडनाव वगळणं. आडनावाने धर्म, पर्यायाने जात शोधण्याचं काम आपल्याकडे प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे केलं जातं यात मुळीच अतिशयोक्ती नाही. भारतीय तत्त्वज्ञानाचं एक पुस्तक वाचनात आलं. त्यानंतर बुद्धी आणि मन समपातळीवर आलं आणि ठरवून टाकलं, नित्यनव्या ओळखीत आडनाव वगळून टाकावं. जात-धर्म-लिंग यापलीकडे माझं कार्यकर्तृत्व हीच ओळख बनावी. हा विचार स्वीकारला आणि कृतीत आणला. मला आजही छुपेपणाने तर कधी उघड यासंदर्भात विचारणा होते. मी मात्र ठाम झालेय. नवविचार मंथनात आपली पावलं उमटवत प्रवाहाविरुद्ध चालण्याची जिद्द आणि तयारी मला आपसूकच बळ मिळवून देतेय.

माझ्या स्वशोधात माझे वडील व आई सदैव आधारस्तंभासारखे पाठीशी उभे असतात. निर्णयस्वातंत्र्य आणि त्यासाठी लागणारी विवेकबुद्धी त्यांच्यामुळेच मला प्रत्यक्ष अवलंबता आली. मी स्वत:ला धुंडाळत असताना आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘कायद्याने वागा लोकचळवळ’. सांविधानिक मार्गाने प्रश्न सोडवणाऱ्या या संघटनेमुळे कितीतरी विषयांकडे मी सजगपणे बघू शकले. साहित्य क्षेत्रात वावरत असताना नामवंत कवी, लेखक, अभ्यासक, रसिक यांनी पाठीवर कौतुकाची थाप ठेवल्याने या क्षेत्रात वावरणं सहज शक्य होतंय. ‘झिम्माड’ या समाजमाध्यमातील ‘व्हॉट्सअ‍ॅप’ समूहाची साहित्यिक चळवळ उभी करताना ‘साहित्यिक कार्यकर्ता ते नेतृत्व’ या अवघ्या काही वर्षांच्या काळातल्या प्रवासात मी मलाच नव्याने भेटत गेले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी ते प्रस्थापित साहित्यिकांपर्यंत सर्वाना सोबत घेत साहित्यक्षेत्रात वाटचाल करत असताना माझ्या अस्तित्वाची संस्कृती रोज नवनवा इतिहास नोंदवत असते. फुले-आंबेडकरी विचार स्वजागृतीत चैतन्य ठरतात. स्वभान आणि समाजभान हातात हात घालून चालत असले, की पायांतलं बळ आपोआप वाढतं आणि जगणं गतिमान होतं. हे माझ्या कवितेच्याही रक्तात भिनलंय. म्हणूनच माझा स्वशोध स्वातंत्र्याचा पुकारा करतो, समतेचा दावा करतो, बंधुतेची अपेक्षा आणि न्यायावर हक्क सांगतो.

माझ्या कवितेची लिपी जगण्याची

माझ्या कवितेची वेदना मुकेपणाची

माझी कविता हुंकारते जमीन भेगाळताना

कविता पेटून उठते माय रक्ताळताना.

या वर्तमानाच्या रेटारेटीत मी स्वत:ला शोधत चालतेय. संवेदनेच्या समृद्धीत. निर्मितीच्या मिजाशीत. नवनिर्माणाच्या शोधात मी स्वत:सोबत चालतेय. भाषेचं बोट धरून स्वत:शी बोलतेय! चालतेय!

vrushalivinayak10@gmail.com

chaturang@expressindia.com