मी, रोहिणी… : जयदेव!

आम्ही आमच्या कामांमध्ये एकमेकांना नेहमीच ‘स्पेस’ दिली.

लहानग्या असीमबरोबर जयदेव.

|| रोहिणी हट्टंगडी
‘‘मित्र, मार्गदर्शक, नवरा, साथीदार अशा अनेक नात्यांनी मी आणि जयदेव बांधलेलो होतो. जसे इंद्रधनुष्याचे रंग वेगवेगळे दिसतात, ओळखता येतात, तसेच हे रंग वेगळे ठेवणंही आपल्याच हातात असतं, तसंच आमचं नातं होतं. त्याने मित्र म्हणून सल्ले दिले, ऐकून घेतलं, पण ‘नवरेगिरी’ करून कधी अडवलं नाही. दिग्दर्शक असताना त्याच्यातला नवरा कधी आडवा आला नाही. आम्ही आमच्या कामांमध्ये एकमेकांना नेहमीच ‘स्पेस’ दिली. ना मी त्याच्या कामात लुडबुड केली, ना त्यानं माझ्या! आज त्याच्याविषयी त्याच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं… ’’

‘Behind every great man there is a womanlहे आपल्याला माहीत आहेच… ‘And behind every great woman there  is a greater man!lही पुढची पुस्ती मात्र जयदेवची, माझ्या नवऱ्याची! आता बोला! आणि पुढे त्याचं समर्थनपण द्यायचा, ‘इतक्या युगांची परंपरा मोडून काढायचं धाडस करणारा पुरुषच जास्त ग्रेट! बायकोच्या मागे उभं राहायचं, त्यासाठी काळीजही तितकंच मोठं लागतं. बायकोचा मोठेपणा सहन करणारे पुरुष विरळाच!’… आणि खरंच, खरं आहे हे!

‘आधी घरातलं बघा, मग बाहेरचं,’ अशीच वृत्ती अजूनही आहे आपल्या समाजात. आणि आमच्या या व्यवसायात पडलं, की ‘वाया गेला’ किं वा ‘वाया गेली’ असंच वाटतं लोकांना. असो. तर, माझा विषय चालला होता- माझा नवरा जयदेव! खरंच हा भारी भक्कम खांब माझ्यामागे उभा नसता ना, तर मी इथपर्यंत पोहोचलेच नसते. अर्थात घरच्यांची साथही तितकीच महत्त्वाची. पण खरी साथ ती हीच! जयदेवची आणि माझी पहिली भेट झाली राष्ट्रीय नाट्य विद्यालयामध्येच (एनएसडी). आम्ही एकाच वर्गात होतो. मुंबईहून कोणी आलंय, म्हणून मला बरं वाटलं. पण बघते तर काय, हा हिंदी, इंग्लिशमध्ये बोलणारा, ‘कॉन्व्हेंट’मध्ये शिकलेला मुलगा. मराठीशी फार सख्य नसलेला. माझं इंग्रजी सोडा, हिंदीही कामचलाऊ. एकुलता एक ‘मॉरल सपोर्ट’ गेला असं वाटलं. अर्थात सहाएक महिन्यात झाली सवय हिंदीची. जयदेवचा पहिला आधार मला मिळाला भाषेच्याच बाबतीत. मी सायन्सची विद्यार्थिनी. पण इंग्रजीमध्ये पन्नासच्या वर कधी माझे गुण गेले नव्हते. बोलणं तर सोडाच. आणि आम्हाला इथे जे प्रोजेक्ट्स लिहून द्यायचे असायचे, ते हिंदी किंवा इंग्लिशमध्ये. मी ‘माझ्या’ इंग्रजीमध्ये ते लिहायची. ते जयदेवकडून भाषेसाठी तपासून घ्यायची. आम्ही चांगले मित्र झालो. कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला असूनही ‘इंग्रजाळलेला’ नसलेल्या या मुलाची मला ओळख होत गेली. रा.ना.वि.ला यायच्या आधीसुद्धा थिएटरमध्ये खूप काम केलं होतं त्यानं. सत्यदेव दुबेजींच्या ‘थिएटर युनिट’मध्ये काम करायचा अनुभव होता. अगदी बुकिंग काउंटरवर बसण्यापासून ते नाटकात भूमिका करण्यापर्यंत. खालसा कॉलेजमध्ये रमेश तलवार, कुलदीप सिंग वगैरे मित्रमंडळींमुळे ‘इप्टा’मधेही ( इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) काम करायचा. असा सगळा अनुभव घेऊनच रा.ना.वि.मध्ये दाखल झाला होता. खरं तर दुबेजींनी पाठवलं, असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या वर्षाच्या शेवटी आम्ही वर्षभरात किती भूमिका के ल्या त्याची यादी आम्हाला काढायला सांगितली होती, त्या वेळी त्याच्या नावावर छोट्या, मोठ्या मिळून वर्गात सर्वांत जास्त भूमिका निघाल्या. तेरा. वाटलं, याला अभिनय हाच विषय मिळणार. पण अल्काझी (इब्राहिम अल्काझी) सरांनी गुणवत्तेनुसार त्याला दिग्दर्शन दिलं.

दिग्दर्शन विषयात त्यानं खूप मेहनत घेतली. अल्काझी सरांना आपल्या विद्यार्थ्यांनी जमेल ते, आणि जमेल तितकं आत्मसात करावं, असं खूप वाटायचं. वेळोवेळी अभ्यासक्रमाबाहेरच्याही गोष्टींमध्ये सहभागी करून घ्यायचे. कधी पेंटिंगच्या प्रदर्शनाची मांडणी करायला, तर कधी स्कूलच्या नाटकाच्या सेटची उभारणी करताना. एकदा आमच्या वर्गातील दिग्दर्शनाच्या विद्यार्थ्यांना एक नामवंत पेंटर निवडून त्याच्या पेंटिंग्सवर, जीवनावर ‘स्लाईड शो’ तयार करायला सांगितला. जयदेवला अमृता शेरगील यांच्यावर असा स्लाईड शो बनवायला सांगितला. कॅनव्हासवरचे रंग, मांडणी, मूड, याचा अभ्यास. विचार करायला उद्युक्त करण्यासाठी. जेणेकरून, ते तुमच्या कामात उपयोगी होईल. अर्थात, तो काय आणि किती शिकला हे मी नाही सांगू शकणार, पण त्याच्या नंतरच्या कामाच्या पद्धतीवरून निष्कर्ष निघूच शकतो.

आम्ही आमच्या कामांमध्ये एकमेकांना नेहमीच ‘स्पेस’ दिली. ना मी त्याच्या कामात लुडबुड केली, ना त्यानं माझ्या ! ‘चांगुणा’ १९७६ ला, ‘मेडिया’ १९८३ ला आणि नंतर बऱ्याच वर्षांनी १९९६ मध्ये ‘अपराजिता’. मला साजेसा किंवा ‘या रोलसाठी रोहिणीच’ असं असेल तरच मला सांगणार. माझ्यासाठी ‘अमुक नाटक कर’ असं ना मी त्याला सांगितलं, ना त्यानं मला कधी भरीस पाडलं. दिग्दर्शक म्हणून प्रत्येकाला हाताळायची पद्धत वेगवेगळी असायची. एखादा नट करू शकेल, असं त्याला वाटलं तर सोडायचा नाही. चिडायचाही. पण तेवढ्यापुरतं. नवीन नटांबरोबर काम करायला आवडायचंच त्याला. ‘त्यांना घडवता येतं’ असं म्हणायचा. कोरी पाटी घेऊन त्याच्यासमोर उभं राहिलं पाहिजे. मग सगळं सुकर व्हायचं. नाटक करताना त्याची आखणी आधी तयार करूनच जमवाजमव करायची, असा खाक्या होता त्याचा.

रा.ना.वि.मधून बाहेर पडल्यानंतर ‘आविष्कार’ मध्ये नाटक करायला अरविंदभाऊ आणि सुलभाताईंनी सांगितलं, ही आम्हा दोघांसाठी खूप मोठी संधी होती. कारण त्या वेळी रंगभूमीवर पाय रोवायला खूप झगडावं लागलं होतं आमच्या सीनियर्सना. ‘चांगुणा’ केलं. ते राज्य नाट्य स्पर्धेत पहिलं आलं आणि मग हळूहळू आम्ही ‘आविष्कार’चेच झालो. ‘आविष्कार’साठी जयदेवनं नाटकं तर केलीच, नाट्य शिबिरंही केली. ३५ वर्षं सातत्यानं हा उपक्रम चालू होता. सुरुवातीला प्रवेशासाठी खूप गर्दी व्हायची, पण शिबिरात एका वेळी ३०-३५ पेक्षा जास्त लोक कधी घेतले नाहीत. शिबिरांच्या बाबतीत त्याचं एकच म्हणणं होतं, ‘माझं शिबीर हे रंगभूमीची माहिती करून देणारं आहे. शिबिरार्थी वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळे हेतू घेऊन येणारे आहेत हे मला माहीत आहे. पुढे काम मिळेल, असं गाजर मी दाखवत नाही. ज्यांना रस असेल ते आकर्षित होतील. पण काही लोकांना हे आपलं काम नाही, असं वाटलं तरी बिघडलं नाही. मी कमीत कमी नाटक पाहाणारा प्रेक्षक तयार केला, असं समाधान मला मिळतंय. मोठे कलाकार होणं नंतर, आधी ‘तण’ उपटून टाकू या!’

आणखी एक गोष्ट त्यानं शेवटपर्यंत पाळली, की ही शिबिरं त्यानं एकट्यानं घेतली. पाहुणे वक्ते नसायचे. कारण शिबिरार्थी नवीन, रंगभूमीचा अनुभव नसलेले असतील, तर वक्त्यांची वेगवेगळी मतं, विचार ऐकून गोंधळून जातील. ‘आधी गमभन लिहायला शिका, मग कॅलिग्राफी,’ असं म्हणणं त्याचं.

मित्र, मार्गदर्शक, नवरा, साथीदार अशा अनेक नात्यांनी आम्ही बांधलेलो होतो. जसे इंद्रधनुष्याचे रंग वेगवेगळे दिसतात, ओळखता येतात, तसं या नात्यांचं असलं पाहिजे. हे रंग वेगळे ठेवणंही आपल्याच हातात असतं. तसं आमचं होतं. मित्र म्हणून त्यानं सल्ले दिले, ऐकून घेतलं, पण ‘नवरेगिरी’ करून अडवलं नाही. दिग्दर्शक असताना त्याच्यातला नवरा कधी आडवा आला नाही. नवरा नेहमी साथीदारासारखाच वागला. लग्न झाल्यावर मला एका मैत्रिणीनं विचारलं होतं, ‘तुम्ही दोघं काम करताय एकाच क्षेत्रात. कधी असं वाटतं का गं तुला, किंवा त्याला, की आज तो किंवा तू एक पाऊल पुढे आहे माझ्यापेक्षा?’ मी क्षणभर बघतच राहिले तिच्याकडे! जयदेव एक गोष्ट बोलला होता, ते आठवलं. लग्न करायचं म्हटल्यावर तो एकदा मला म्हणाला होता, ‘‘रोहिणी, तू अभिनेत्री आहेस. तू प्रेक्षकांच्या नेहमी समोर असणार आहेस. लोक तुला जास्त ओळखणार आहेत.

मी दिग्दर्शक! मी पडद्यामागे असणार आहे. हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं.’’ असं जमिनीवर ठेवणारा साथीदार मला मिळाला होता. तो म्हणायचा, ‘‘तू पॉप्युलर आहेस, पण मी फेमस आहे!’’ त्यानं दिग्दर्शक म्हणून मी केलेल्या इतर कामांवर कधी चांगलं किंवा वाईट या व्यतिरिक्त भाष्य केलं नाही. ‘‘आणखी काही करायला हवं का?’’ असं विचारलं, तर ‘‘तुझ्या दिग्दर्शकाला विचार,’’ असं म्हणून त्या दिग्दर्शकाचा मान ठेवायचा.

एकदा मात्र त्यानं शिक्षाच केली मला. ‘लपंडाव’ नाटकाचे प्रयोग चालू होते. रात्री प्रयोग संपल्यावर जयदेव मला घ्यायला यायचा. एका प्रयोगात सतीश दुभाषींनी ऐन वेळी काही तरी अ‍ॅडिशन घेतली आणि स्टेजवर मी आणि अरुंधती राव, आम्ही दोघी हसलो! ते नेमकं जयदेवनं पाहिलं. घरी जाताना म्हणाला, ‘‘उद्यापासून तुझी तू घरी यायचं. मी तुला घ्यायला येणार नाही.’’ मी विचारल्यावर म्हणाला, ‘‘स्टेजवर सीनमध्ये हसलीस का? आवरता येत नाही का एवढं? तालमी कशाला असतात?’’ जाम भडकला होता. नाही तर नाहीच आला. पंचवीसएक प्रयोगांनंतर सतीशभाईंनी विचारलं, ‘‘जयदेव का नाही येत हल्ली?’’ मी सांगितलं त्यांना. मग त्यांनी त्याला बोलावून, ‘‘असं रागावू नकोस रे,’’ म्हणून सांगितल्यावर जरा निवळला. शिस्त, वेळ पाळणं, नेटकेपणा तर अंगी भिनलेलाच होता. शिबिरातल्या बऱ्याच लोकांना उशीर झाला म्हणून परत पाठवल्याचे अनुभव आहेत.

दोघंही एकाच क्षेत्रात असल्यावर समजून घेणं जसं असतं, तसंच गैरसमजही होऊ शकतात. ईर्ष्या वाटू शकते, कधी असुरक्षितताही डोकावून जाऊ शकते. या धोक्यांचा विचार आधीपासूनच व्हायला हवा. घरच्यांचा आधार हाही तितकाच महत्त्वाचा. काम आणि घर हे वेगळं ठेवणं जरुरीचं. कामाचं निमित्त पुढे करून जबाबदारी टाळणं तितकंच धोकादायक. आमचा एक अलिखित नियम झाला होता. आम्ही,  माझे सासू-सासरे, मुलगा, असे एकत्र होतो. त्यामुळे जयदेव किंवा मी, आमच्यापैकी कोणीतरी एकानं मुंबईत असलंच पाहिजे, असा नियम. आमची कामं आम्ही तशी अ‍ॅडजस्ट करून जुळवून घ्यायचो. कधी एखादं काम सुटायचंही. पण जयदेवचा ‘पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्युड’ दांडगा. म्हणायचा, आपल्यासाठी असतील कामं, तर ती  येणार. आज नाही तर उद्या. पण येणारच!

खऱ्या अर्थानं ‘फ्रें ड, गाईड, फिलॉसॉफर’ मिळणं किती महत्त्वाचं आहे, हे माझ्यासारख्या अनेकांनी अनुभवलं असेल. लिहायला बसले आणि जसं आठवत गेलं, वाटत गेलं, तसं  लिहून काढलं. मी ‘लेखक’ नाही. या अशा नात्यावर सुविहित लिहिणं शक्य नाही झालं. खूप लिहायचं होतं, खूप राहून गेलं. पण मी प्रयत्न केला. कारण… आज २८ ऑगस्ट. जयदेवचा जन्मदिवस!

hattangadyrohini@gmail.com

 

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Me rohini author rohini hattangadi friends guide husband companion the colors of the rainbow akp