|| रोहिणी हट्टंगडी

अभिनयात करिअर करताना ‘मला स्टार व्हायचंय, मी छोट्या भूमिका करणार नाही’ असं म्हणणं योग्य नाही. अभिनेता म्हणून आपल्याला एखाद्या भूमिके त काय करता येईल, हे बघणं महत्त्वाचं. प्रत्येक भूमिकेचा एक उच्च बिंदू असतो, तो  लक्षात घेतला की पुढे भूमिका सकस होतेच. डोळसपणे काम करत गेलं, तर लहान भूमिकांमध्येही खूप काही करायला मिळतं आणि रसिकांच्या ते लक्षातही येतं.

Aai kuthe kay karte fame actress akshaya gurav replace sana sayyad palki in kundali bhagya
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री झळकणार लोकप्रिय हिंदी मालिकेत, साकारणार प्रमुख भूमिका!
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
nilu phule son in law omkar thatte play role in Indrayani new serial
निळू फुलेंचे जावई झळकले लोकप्रिय मालिकेत, साकारतायत ‘ही’ महत्त्वाची भूमिका

आजवरच्या माझ्या नाटक-चित्रपटाच्या वाटचालीत मुख्य भूमिकांपासून अगदी छोट्या भूमिकांपर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका मी केल्या. ती व्यक्तिरेखा आवडली, तर त्याच्या ‘लांबीरुंदी’चा विचार नाही केला. मला काही तरी करण्यासारखं असायला हवं, हा एक विचार. तो कधी यशस्वी झाला, तर कधी अयशस्वी. पण काम नेहमी मनापासूनच केलं!

अशीच एक छोटीशी, पण महत्त्वाची माझी भूमिका ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’मधली.  चित्रपटाचा दिग्दर्शक राजू हिरानी. काय कल्पक बुद्धी आहे या माणसाची! हा विषय किती सहजतेनं हाताळला आहे. कुठेही अतिरेक न करता व्यवसायातल्या त्रुटी मांडणं सोपं काम नाही आणि त्या भोवती गोष्टीची गुंफण! क्या बात है! चित्रपट खूप गाजला, तो त्याच्या वेगळ्या विषयामुळेच. मी चित्रपटाचा विषय आणि गोष्ट ऐकली, तेव्हाच त्याचं वेगळेपण मला जाणवलं आणि मी होकार दिला. अर्थात सुनील दत्त,

संजय दत्त, बोमन इराणी, आदी चांगले सहकलाकार असणार होते; तेही एक ‘सोने पे सुहागा’! सुनील दत्तसाब यांच्याबरोबर याआधी ‘कुर्बान’ या चित्रपटात काम केलं होतं. ते चित्रपटात १३ वर्षांच्या गॅपनंतर काम करणार होते. इतक्या वर्षांत मला एक गोष्ट जाणवली आहे, कोणत्याही भूमिकेत एखाद्-दुसरा महत्त्वाचा सीन असतो (ज्याला मी ‘की सीन’ म्हणते), ज्यात त्या भूमिकेचा हेतू म्हणा, अर्क म्हणा, सार म्हणा- आलेलं असतं. तो हळूहळू कळतो. शोधावा लागत नाही. तो अधोरेखित झाला, की त्या अनुषंगानं आपल्या व्यक्तिरेखेची उभारणी करायला सोपं जातं. ‘मुन्नाभाई’मध्ये गच्चीतल्या झोपाळ्यावरचा सीन असाच माझा सगळ्यात आवडता आहे. आई-मुलाचा- त्यांच्यातल्या नात्याचा. लहान मूल होऊन आईच्या कुशीत शिरल्यानंतर सुरक्षित वाटतं आणि मन मोकळं करावंसं वाटतं. मुन्नाला तिच्याकडे मन मोकळं करायचं आहे, पण हिंमत होत नाहीये. तिला कुठेतरी हे जाणवतंय. लहानपणी तिच्या ‘जादूच्या झप्पी’मुळे त्या वेळचे अनेक प्रश्न, भीती नाहीशी झाली होती; ते आजही होईल अशी आशा, कदाचित दोघांच्याही मनात आहे. म्हणूनच काही न बोलता ती त्याला लहानपणासारखी ‘जादूची झप्पी’ देते. त्याला मोकळं वाटून तो बोलणार, तितक्यात बाबूजी येतात आणि त्याचं अवसानच जातं. इतका हळुवार सीन होता तो. मजा आली तो सीन करायला. मायलेकाचं हळुवार नातं, मूल कितीही मोठं झालं तरी तसंच राहतं, हे सांगणारा.

या चित्रपटातला आणखी एक मला आवडणारा प्रसंग… चित्रपटाच्या शेवटी शेवटी येतो तो. ‘माँ की याद आ रही हैं. इतनी, की वो मुझे सामने दिख रही हैं!’वाला सीन. त्यात मुन्ना आणि बाबूजी समोरासमोर येतात आणि बाबूजी विचारतात ‘हमारे गले नही मिलोगे?’ ओशाळत मुन्ना त्यांना मिठी मारतो. ते दोघे एकमेकांसमोर उभे. दत्तसाब संजयला कवेत घेतात आणि मी नुसती बघत असते. पण बघताना मला आठवतंय, मी भारावून गेले होते. एक तर दत्तसाब यांचं व्यक्तिमत्त्व. त्यांनी केलेलं काम. कोणत्याही सामाजिक आणीबाणीत- मग ते शहरातले दंगे असोत, की लोकांसाठीच्या काही योजना असोत. त्यांच्याकडून फोन यायचा. या सगळ्यात ‘पक्षा’चं नाव टाळलेलं असायचं. म्हणजे, कफ्र्यूमध्ये शांतता पाळायचं आवाहन करायला जायचं आहे किंवा अमुक ठिकाणी दंगा रोखायला जायचं आहे. त्यांचा फोन आला, की निघालेच त्यांच्या वांद्र्यातल्या घरी. माझ्यासारखे चित्रपटसृष्टीतले अनेक जण असायचे तिथे. आणि मला खात्री आहे, त्यांच्याही मनात माझ्यासारख्याच भावना असायच्या. म्हणूनच ते तिथे असायचे. बरं वाटायचं! राजकारणातले असले तरी एक वेगळाच आदर होता दत्तसाब यांच्याबद्दल. त्यांच्याकडून बरीच वर्षं माझ्या आणि जयदेवच्या (जयदेव हट्टंगडी) वाढदिवसाच्या दिवशी, लग्नाच्या वाढदिवशी शुभेच्छा देणारं पत्र हमखास यायचं. (फक्त मलाच नाही, सगळ्यांनाच पाठवत असावेत ते). २५ मे २००५ रोजी त्यांचं निधन झालं आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २८ मेला आमच्या लग्नाच्या वाढदिवसासाठीच्या शुभेच्छांचं त्यांचं पत्र हातात पडलं. पाकीट  पाहिलं आणि शहाराच आला. बाकी पत्र टाईप केलेलं असलं, तरी वर ‘प्रिय रोहिनीजी और जयदेवजी’ आणि खाली स्वाक्षरी त्यांच्या हस्ताक्षरात असायची. या पत्रावरही तशीच होती. मनात आलं, आधीपासून करून ठेवलेली असेल त्यांनी. तरीही आत कुठेतरी गलबललं! मुन्नाभाईचं चित्रीकरण चालू असताना एक दिवस त्यांच्या १३ वर्षांनंतरच्या चित्रपटातल्या आगमनाच्या बातमीसाठी निर्मात्यांनी पत्रकार परिषद आयोजित के ली होती. त्या वेळी सहकलाकार म्हणून मलाही आवर्जून बोलावून शेजारी बसवून घेतलं होतं त्यांनी. माझं करिअर दृष्टिपथातही नसताना त्यांचे ‘सुजाता’, ‘खानदान’, ‘मदर इंडिया’सारखे चित्रपट पाहिलेली, ‘गांधी’मुळे नाव झालेली असले तरी त्यांच्यासमोर ज्युनिअरच मी! त्यांची पदयात्रा, ‘यादें’सारखा प्रायोगिक चित्रपट, सामाजिक कार्य, असं किती तरी! अनुभवलेल्या एकेका क्षणाची भर पडून एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर उभं राहतं, तशी सुनील दत्तसाहेबांची प्रतिमा माझ्या मनात घर करून आहे…  जरा विषयांतर झालं नाही? असो.

तर मी सांगत होते छोट्या भूमिकांबद्दल. ‘मुन्नाभाई’ मध्ये माझा पहिला सीन होता रेल्वे स्टेशनवरचा. एका पॉकेटमारला चोर म्हणून लोक मारतात, दत्तसाब त्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगतात. तितक्यात मुन्नाचे दोस्त आम्हाला घ्यायला येतात. तो पॉकेटमार त्यांच्या ओळखीचा असूनही आमच्यासमोर ते ओळख दाखवत नाहीत. पॉकेटमारचं काम करणारा तो अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. त्या चित्रपटात काम मिळालं, तेव्हा तो ‘स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर’ होता. छोटीशी, पदरात पडलेली भूमिका करत होता. आता, ‘त्याच वेळी मी मनात म्हटलं होतं, की हा मोठा स्टार होणार’ असं मी अजिबात म्हणणार नाही! पण हा मुलगा ‘जेन्युइनली’ काम करतोय, जे आहे ते मनापासून करतोय हे दिसत होतं. त्याची आणि अर्शद वारसीची ‘केमिस्ट्री’ दिसत होती. जे मिळालं ते त्यानं व्यवस्थित केलं. याच त्याच्या ‘अ‍ॅटिट्युड’मुळे यशस्वी झाला तो! ‘मला ‘स्टार’ व्हायचंय, मी असली छोटी भूमिका नाही करणार,’ असं म्हणाला असता तर?  या चित्रपटात काम केलेले बोमन इराणी. माझा आवडता नट! त्यांना मी त्याआधी नाटकात पाहिलं होतं. आपल्या सुधीर जोशींबरोबर. नाटकाचं नाव होतं- ‘आय अ‍ॅम नॉट बाजीराव’. पारशी बाबाची भूमिका केली होती त्यांनी. गेले होते सुधीरचं नाटक म्हणून बघायला आणि यांच्या भूमिकेच्या प्रेमातच पडले. नाटक संपल्यावर सुधीरलाच त्यांची ओळख करून दे, म्हणून मागे लागले. इंग्रजी नाटकातले अनुभवी नट होते ते. प्रामाणिकपणे आपलं काम करणारा नट. कधीतरी फळ हे मिळतंच, हे सिद्ध केल्यासारखे ते स्टार झाले. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. कोणीतरी भूमिका सोडली आणि तीच ज्याला मिळाली त्यानं तिचं सोनं केलं. आणि भूमिका मिळूनही काहीही झालं नाही, अशीही उदाहरणं आहेतच की! शेवटी काय,      ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!’ हा प्रामाणिकपणा दाखवला, तर इतरांचं जाऊ दे, आपल्याला समाधान मिळतं हे नक्की! अथकपणे काम करणाऱ्यांना नेहमी एक प्रश्न विचारला जातो, ‘इतकी एनर्जी तुम्ही आणता कुठून?’ मला वाटतं, याचं उत्तर वेगवेगळ्या तऱ्हेनं दिलं, तरी शेवटी ‘समाधान मिळतं’ इथेच येऊन ठेपत असेल. भूमिका छोटी असो, की मोठी. ती करताना आनंद मिळाला, लोकांपर्यंत पोहोचता आलं की बस्स! जयदेवला मी अनेक वेळा हे म्हणताना ऐकलं आहे, की ‘शंभरातल्या पाच जणांपर्यंत हे पोहोचलं तरी चालेल. पण आपल्याला जे पटतं तेच करावं!’

‘नटसम्राट’ मराठीतलं अजरामर नाटक. वि.वा. शिरवाडकरांच्या लेखणीतून उतरलेलं. ‘या नाटकात काम कराल का?’ असं जेव्हा मला लोहकरेंनी (निर्माते चंद्रकांत लोहकरे) विचारलं, तेव्हा क्षणार्धात ‘हो’च तोंडून निघालं! अशी एखादी भूमिका असते, जी कोणीही केली असली, कितीही वेळा झाली असली, तरी ती आपणही करून बघण्यात आपलाच कस लागतो. ‘नटसम्राट’मधली कावेरीची भूमिकाही तशीच. शांताबाई जोग, सुलभा देशपांडेंसारख्या अभिनेत्रींनी केलेली. तसं बघितलं तर ‘आप्पा बेलवलकरां’चं हे नाटक. त्या मानानं कावेरीची भूमिका अगदीच लहान, पण महत्त्वाची. आपला नवरा मोठा नट आहे, याचा अभिमान तर आहेच तिला. पण त्या जगातले खाचखळगेही माहीत आहेत. आर्थिक आणि मानसिकसुद्धा. म्हणूनच आयुष्याच्या उतरत्या काळात ‘तुम्हाला मैत्रिणी किती होत्या?’ हे अगदी सहजपणे ती आप्पांना विचारू शकते. ‘एका खास मैत्रिणीची अजूनही आठवण येते का?’ असं स्त्रीसुलभ- किंचित असूयेनं विचारते. तेही तिला प्रामाणिकपणे कबुली देतात आणि सांगतात, की शेवटी त्यांच्या ‘गलबताला विसाव्यासाठी बंदरातच यायला लागलं.’ आपल्या नवऱ्यानं भेट म्हणून दिलेला सोन्याचा हार लाजत स्वीकारते, पण मिरवत नाही. नवऱ्याचा आत्मसन्मान जपायला मुलाचं घर एका क्षणात, बेधडक सोडायचा निर्णय घेते. शेवटपर्यंत नवऱ्याची ढाल बनून राहते. दोघांचं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करत राहते. ती गेल्यावर मात्र आप्पांचं आयुष्य भरकटतं. माझ्या परीनं मी कावेरी उभी करण्याचा प्रयत्न केला. एकदा एक प्रसंग करताना मनात आलं, आप्पांकडून भेट मिळालेला सोन्याचा हार कोणाला माहितीच नसेल, तरच पुढे नाटकात नलू हे पात्र जो संशय घेतं तो सहज वाटेल. म्हणून सीन संपल्यावर एक्झिट घेताना गळ्यात हार तसाच न ठेवता काढून पदरात झाकून एक्झिट घ्यायची. हे स्क्रिप्टमध्ये लिहिलं

नव्हतं. मीच माझ्याकडून तो अर्थ देण्याचा खटाटोप केला.

माझ्या एका गुजराती नाटकात मी गुडघेदुखीनं हैराण झालेल्या स्त्रीची भूमिका के ली होती. त्यात काठीचा आधार घेऊन मी वावरत असते आणि माझी सून तुमची सोय वरच्या मजल्यावरच्या खोलीत केली आहे असं तिला सांगते. नाइलाजानं कशीबशी जिन्याच्या चार पायऱ्या मी चढते आणि तो प्रसंग तिथेच संपतो, असं दाखवलं होतं. मला सारखं काहीतरी कमी असल्याचं वाटत होतं. एक दिवस अचानक सुचलं. मी जिना चढल्यावर मागे वळून पाहिलं आणि जणू त्या चार पायऱ्या पर्वतासारख्या आहेत माझ्यासाठी, असं. आणि मग तिथेच कठड्याला डोकं टेकून मला रडू कोसळतं, असं दाखवलं. त्याच नाटकात आईच्या गुडघ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खर्च कोण करणार, याची एकमेकांवर जबाबदारी टाकण्याची दोन सुनांमध्ये चढाओढ लागलेली असते. माझे सगळे दागिने माझ्या दुखण्यांसाठी मुलांवर भार नको, म्हणून आधीच विकलेले असतात. हातात पैसे नाहीत, सगळी भिस्त मुलांवर. तेव्हा तो प्रसंग चालू असताना हतबलतेनं मी माझ्या गळ्यातल्या सोनसाखळीला हात लावायची- की या उरलेल्या साखळीवर काही शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही. या दोन्ही गोष्टी मी माझ्याच करत होते, पण दिग्दर्शक, सहकलाकारांच्या ते लक्षात आलं होतं. काही प्रयोगांनंतर नाटक संपल्यावर मागे भेटायला आलेल्या एका रसिकानं याचा उल्लेख माझ्याशी बोलताना के ला, तेव्हा मला पटलंच जयदेवचं म्हणणं!

या सगळ्यामधून आपण जे करतोय ते लोकांच्या लक्षात येतंय की नाही हे बघत बसण्यापेक्षा आपल्यासाठी त्याकडे ‘भूमिकेचा सर्वांगीण विचार’ या दृष्टीनं बघावं असं मला वाटतं. कमीतकमी मी स्वत: तसा विचार करते. मात्र प्रेक्षक म्हणून एखादा चित्रपट किंवा नाटक परत परत बघताना त्यातल्या कलाकारांनी शोधलेले हे असे बारकावे लक्षात येतात. आणि तसे ते लक्षात आले, की वेगळाच आनंद मिळतो. चार वेगवेगळ्या कलाकारांनी रंगवलेला ‘नटसम्राट’ बघताना हा अनुभव आला असेल तुम्हाला! अनुभवलाय?

hattangadyrohini@gmail.com