आत्महिताशी परहिताची सांगड घालून त्याला व्यापक समाजहितापर्यंत पोहोचवण्याचा प्रवास सर्वांचा सारखाच असतो. ‘मनआरोग्य’ क्षेत्रामध्ये व्यसनाधीनतेवरचं समुपदेशन खूप खडतर समजलं जातं, तरीही दोन भिन्न पार्श्वभूमी आणि प्रशिक्षण मिळालेले उजवे आणि डावे एकजीव होऊन कार्यरत होऊ शकतात. हासुद्धा एक रोज घडणारा चमत्कारच!

ठरवल्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास पुण्याच्या आमच्या ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’च्या परिसरात शिरलो. मित्रांचा उपचारगट घ्यायचा होता. आम्ही पेशंट्स वा रुग्ण हा शब्द वापरतच नाही. सर्वच जण ‘मुक्तांगण मित्र’. तेच आमच्या संस्थेचंही नाव. मी पोहोचेपर्यंत मंगेश आणि निहार या माझ्या तरुण सहकाऱ्यांनी एका वेधक सूत्रावर सत्र सुरू केलं होतं. आमच्या टीममध्ये दोन प्रकारचे कार्यकर्ते आहेत. काही जण त्यांच्या व्यसनमुक्तीच्या प्रवासामध्ये प्रथम ‘मित्र’ होते. उपचारांचा भाग म्हणून ते ‘मुक्तांगण’मध्ये राहू लागले. हीच त्यांची पाठशाळा आणि प्रयोगशाळा. कालांतराने ते केंद्रातच पूर्णवेळ काम करू लागले. काही जण आहेत, शास्त्रीय पदवी असलेले मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक. त्यांच्यातल्या अनेकांची पुढच्या आयुष्याची कारकीर्द ‘मुक्तांगण’मध्येच सुरू झाली. पुस्तकातल्या ज्ञानाला इथे परिपक्वतेचे पंख मिळाले.

महिन्यातल्या कोणत्याही दिवशी केंद्रामध्ये सरासरी २०० ‘मित्र’ राहत असतात. उपचाराच्या विविध टप्प्यांवर असणाऱ्यांसाठी वेगवेगळे निवासी वॉर्डस्आहेत. इतके ‘व्यसनी’ एकत्र असूनही प्रत्येक दिवसाला एक प्रवाही शिस्त असते. ‘मुक्तांगण’चा दिनक्रम हीच इकडची मोठी ‘थेरपी’ आहे. भरकटलेल्या अस्ताव्यस्त आयुष्याला ‘ताल’ आणि ‘तोल’ देणारी. दिवसभरामध्ये भरगच्च कार्यक्रम असतो. सकाळी सहापासून रात्री दहापर्यंत. आखलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे छोटे वर्ग, मोठे उपचारगट, संगीत-कला उपचार, वैयक्तिक मार्गदर्शन. प्रत्येक वॉर्डसाठी सदस्यांनीच ठरवलेले सुशासन प्रतिनिधी, मनोविकारतज्ज्ञाच्या भेटी असतात, दृक् -श्राव्य सत्रे असतात. उत्तम वाचनालय आणि अद्यायावत व्यायामशाळा असते. अतिशय सुग्रास भोजन आणि नाश्ता असतो. आम्ही दाखल होताना आणि तिथून निघतानाच्या वेळची ‘मित्रां’ची छायाचित्रे त्या वेळी देण्यात येणाऱ्या कार्डवर लावतो. दृष्ट लागावी इतका फरक असतो त्या दोन छायाचित्रांमध्ये. हे सारे मित्र आपापल्या टीम्स तयार करून हस्तलिखितं तयार करतात. प्रत्येक सण आणि राष्ट्रीय दिवस उत्साहाने साजरे होतात. व्यसनमुक्तीच्या प्रवासात काही दिवस हे ‘चुकायचे’ असतात. उदाहरणार्थ वर्षअखेर, होळी, श्रावण सुरुवात…अशा वेळी ‘सुरक्षित जागा’ म्हणून अनेक व्यसनमुक्त इथेच राहायला येतात.

हा सारा पसारा पेलण्याचे काम संचालक म्हणून मुक्ता (अवचट-पुणतांबेकर) करते आणि तिला सर्व कार्यकर्ते साथ देतात. आमच्या संघामध्ये अनेक स्त्री कार्यकर्त्या आहेत. त्या सर्वांना आमच्या ‘मित्रां’मध्ये वावरताना जराही संकोच वाटत नाही. मुक्ताताई, सोनालीताई, प्रफुल्लाआत्या अशी सारी नाती आहेत. मलाही सर्व जण ‘आनंदकाका’ अशीच हाक मारतात. व्यसनाच्या अनारोग्यकारी चिखलातून शुभ्र कमळे फुलावीत असे आमचे ‘मित्र’ सफेद गणवेशात सर्वत्र ‘विहरत’ असतात. पण परिसर सोडायचा नाही ही अट. मोबाइल बंद…पूर्ण कालावधीसाठी! ‘मुक्तांगण’मध्ये दर आठवड्याला स्वेच्छेने ३० जण भरती होतात. साधारण महिन्याची ‘वेटिंग लिस्ट’ असते. आमचे काही कार्यकर्तेसुद्धा ‘निवासी’ आहेत. काही जण रोज रात्री पाळीपाळीने येऊन राहतात. नियमित कामाव्यतिरिक्त महाराष्ट्रात २२ ठिकाणी पाठपुरावा केंद्रे भरतात. प्रवेशाच्या वेळी भरायची माफक फी सोडली तर पुढचे सर्व ‘फॉलो-अप’ आयुष्यभरासाठी नि:शुल्क असतात. राष्ट्रपतींचा केंद्रीय पुरस्कार, ‘आय.एस.ओ.’ नामांकनाची अग्रश्रेणी आणि ‘सत्यमेव जयते’पासून ‘केबीसी’पर्यंत मिळालेली मान्यता हे या साऱ्या कार्यकर्त्यांचे कर्तृत्व आणि कौतुक.

तर त्या दिवशी, मंगेश आणि निहार त्यांचा समुपदेशक म्हणून असलेला प्रवास सर्व मित्रांना सांगत होते. मंगेशच्या घराण्यात व्यसनाचा ‘व’सुद्धा वर्ज्य! त्या पार्श्वभूमीवर मानसशास्त्रज्ञ म्हणून ‘मुक्तांगण’मध्ये काम करताना त्याला स्वत:च्या पूर्वग्रहांचा सामना करावा लागला. ‘दारुडे म्हणजे वाया गेलेली वाह्यात माणसे’ किंवा ‘सिगारेट ओढणे म्हणजे पाप’ अशी विचारधारा त्याच्या वैचारिक घडणीमध्ये होती. अशा समुपदेशकाला, व्यसनात मुरलेले ‘मित्र’ विचारतात की, ‘‘तुम्हाला व्यसनाचा अनुभव नसताना तुम्ही त्या विषयावर कसे बोलता?’’ हर्ष भोगले यांनी टेस्ट क्रिकेट खेळलेले नसते, ज्ञानेश्वर नाडकर्णी हे कलासमीक्षक स्वत: कलाकार नव्हते. अशी अनेक उदाहरणे आहेत. ‘व्यसनाच्या अनुभवापेक्षा व्यसनासक्त माणसाच्या वेदनेबरोबर स्वत:ला जोडणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे’ मंगेश म्हणाला. ‘‘प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञांना आमचे ‘मित्र’ अनेक वेळा गुंडाळण्याचा प्रयत्न करतात. कारण व्यसनाधीनतेच्या आजारात रुग्णांच्या व्यक्तिमत्त्वातले दोष ठळक होतात. अशा वेळी मला ‘शिकवण्याच्या’ नादात तो मित्र मोकळेपणाने बोलायला लागायचा.’’ आमचा मानसशास्त्रज्ञ मानव मला एकदा सांगत होता.

निहारच्या व्यसनमुक्तीची सुरुवात ‘मुक्तांगण’मध्येच झाली. अलीकडेच त्याने स्वत:च्या तंबाखूमुक्तीच्या प्रवासावर एक उपयुक्त पुस्तिका लिहिली आहे. त्याच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे आमचे ‘मित्र’ औत्सुक्याने आणि आदराने पाहतात. आमच्या चमूमध्ये पूर्वायुष्यामधले वॅगनफोडे, शार्पशूटर अशी ‘नामचीन’ मंडळी आहेत. ‘सामान्य’ आयुष्य जगण्यासाठी लढलेल्या युद्धांची गाथा त्यांच्याकडे असते. आमचा राहुल हा असाच एक. तो सांगतो, ‘‘निवासी स्वयंसेवक म्हणून इथे काम करताना स्वच्छतागृह साफ करण्याचं काम मी मद्दाम मागून घेतलं होतं. मन लावून ‘कमोड’ स्वच्छ करताना ‘मनाला शुद्ध बनवण्याची कृती’ असे मी त्याच्याकडे पाहायला लागलो.’’ पुढे तो मॅरेथॉन धावपटू झाला. ज्येष्ठ कार्यकर्ता दत्ता ‘मास्टरशेफ’च्या अंतिम दहामध्ये आला. अमोलने गिर्यारोहणाचे कोर्सेस यशस्वी केले. संभाजीनगरच्या नितीन घोरपडेने तर पाच वेळा ‘आयर्न मॅन’ हा किताब मिळवला. व्यसनमुक्त मित्रांसाठी हे कार्यकर्ते दीपस्तंभासारखे असतात हे या गटाचं वैशिष्ट्य. ‘ज्या शाळेतून तू नुकताच उत्तीर्ण झालास तिचा मी मुख्याध्यापक होतो.’ अशा अर्थाच्या फिल्मी संवादाची आठवण अशा वेळी होते. व्यसनी मनाचे कपटी डावपेच हे समुपदेशक ताबडतोब ओळखू शकतात. स्वत:च्या अनुभवातले सत्त्व, नव्या मित्रांपर्यंत पोहोचवू शकतात.

प्रमोद हा ज्येष्ठ कार्यकर्ता आता ३३ वर्षं व्यसनमुक्त आहे. तो मुंबईतील नामांकित कंपनीमध्ये कामाला होता. त्या कंपनीत मी, मानद सल्लागार म्हणून दर आठवड्याला जायचो. ‘मुक्तांगण’च्या वास्तव्यानंतर त्याने कंपनीतील २५-३० सहकाऱ्यांना व्यसनमुक्त करण्यास मदत केली. निवृत्तीनंतर तो ‘मुक्तांगण’मध्ये येऊन राहतो आणि सर्वांशी संवाद साधतो. या प्रवासात त्याने ‘अल्कोहॉलिक अॅनोनिमस’ या संस्थेची अभ्यासतत्त्वे पचवली. त्या स्वाध्यायाचा फायदा त्याला समुपदेशक म्हणून बोलताना होतो.
‘मनआरोग्य’ क्षेत्रामध्ये व्यसनाधीनतेवरचं समुपदेशन हे खूप खडतर समजलं जातं. आमच्या तरुण निर्व्यसनी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आमचे व्यसनमुक्त सभासद करतात. समुपदेशनाची तत्त्वं, प्रक्रिया, नोंदी ठेवण्याची पद्धत, संशोधन यामध्ये निर्व्यसनी कार्यकर्ते पुढे असतात. आमची एक कार्यकर्ती सध्या पीएच.डी.चे संशोधन करत आहे. आणि तिचा पतीसुद्धा आमचाच व्यसनमुक्त कार्यकर्ता आहे. तो तिचा ‘फॉर्मेट’ तयार करताना त्यात स्वानुभवाची भर घालत आहे.

‘‘क्रिकेट टीममध्ये डाव्या आणि उजव्या हाताने बॅटिंग करणारी जोडी असेल तर टीमला त्याचा खूप फायदा होतो’’ मी म्हणालो. निहार आणि मंगेश खरंच माझ्या डाव्या-उजव्या बाजूला बसले होते. चर्चेत सहभागी मित्रांनी त्यांचे आमच्या कार्यकर्त्यांबद्दलचे अनुभव सांगितले. जे उपचाराचे लाभार्थी, त्यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणं ही गोष्ट फार महत्त्वाची होती. दोन्ही प्रकारच्या सरांकडून आम्ही काय शिकलो याची एक यादीच त्या चर्चेतून सुरू झाली. माझ्या असं लक्षात आलं की तेवढा काळ आमच्यावरच्या ‘समुपदेशक’ आणि ‘लाभार्थी’ या झुली उतरल्या होत्या. आम्ही सारे खऱ्या अर्थाने ‘विद्यार्थी’ बनलो होतो. खूपच पारदर्शक अनुभव होता तो.

सत्राच्या शेवटी मी बोललो. कार्यकर्त्यांची भिन्न पार्श्वभूमी हा भेद दिसतो खरा, परंतु त्यापैकी प्रत्येकाची समान सेवावृत्ती हा ‘मुक्तांगण’चा प्राण आहे. आत्महिताशी परहिताची सांगड घालून त्याला व्यापक समाजहितापर्यंत पोहोचवण्याचा प्रवास सर्वांचा सारखाच असतो. ३८ वर्षांपूर्वी संस्थेचं काम सुरू झालं. त्या काळात मी आणि सुनंदा (डॉ. अनिता अवचट, मनोविकारतज्ज्ञ, संस्थापक) एकत्र ‘रुग्ण’ अर्थात ‘मित्र’ तपासायचो. आमच्या एका मित्राने ‘मुक्तांगण’ची, साउंड सिस्टीम घेऊन पोबारा केला. ती कवडीमोल किमतीला विकली. आठवडाभर व्यसन केल्यावर कुणीही थारा न दिल्याने तो परतला. सुनंदाने आम्हा सर्वांचा विरोध झेलून त्याला राहायला दिलं. त्याला सकाळ ते रात्र कोणती उपयुक्त कामे करायची ते आखून दिलं आणि त्यांची तपशीलवार नोंद ठेवली. चार महिन्यांनंतर त्या सगळ्या कामाचे मानधन किती झाले असते त्याचा हिशोब आमच्या अकाउंटंटने केला. हासुद्धा आमचा व्यसनमुक्त मित्रच होता. ‘‘मॅडम, हजार रुपये तरीही कमी पडत आहेत.’’ त्याचा अपराधी आवाज कापत होता. डोळ्यात पाणी होतं. ‘‘हरकत नाही… ते मी भरते. तुझ्या प्रायश्चित्तामध्ये माझा वाटा,’’ सुनंदा हसत हसत म्हणाली. तो पुढे जन्मभर व्यसनमुक्त जगला. ‘‘तू त्याला ही संधी का दिलीस?’’ मी सुनंदाला विचारलं होतं. ‘‘कारण, संपूर्ण हरलेल्या आणि हरवलेल्या अवस्थेत तो ‘मुक्तांगण’मध्ये परतला म्हणून. त्याच्यामधला चांगुलपणा त्याला दुसरीकडे कुठेच परत मिळाला नसता’’ ती म्हणाली. सुनंदा एक वाक्य नेहमी म्हणायची, ‘देअर इज नो होपलेस केस ऑफ अॅडिक्शन’ या क्षेत्रात चार दशकं काम करताना हे शब्द मला आणि आम्हा सगळ्यांना ऊर्जा देतात.

माणसामधल्या सद्भावाला इतक्या विश्वासानं जोपासणारी सुनंदाची वृत्ती हा आमचा वारसा असतो. गांधीवादी कुटुंबातून आलेल्या सुनंदाच्या संस्कारांमध्ये व्यसनांचा चंचुप्रवेशही नव्हता. कुठून आली असेल तिच्यामध्ये इतकी शक्तिवान माया!..तिच्यापुढे आमच्या व्यसनी मित्रांचे सारे डावपेच लटकेच पडायचे. धावणारा अंगुलीमाल लयीत चालणाऱ्या गौतम बुद्धांना गाठू शकत नाही त्याचे रहस्य हेच असणार. आणि दुसरं वाक्य बाबा म्हणजे डॉ. अनिल अवचटांचे. ‘मुक्तांगणमध्ये चमत्कार ही रोज घडणारी गोष्ट आहे.’ ‘मुक्तांगण’च्या कार्यामागचे तत्त्वज्ञान सांगणारी वाक्यं आहेत ही दोन्ही. दोन भिन्न पार्श्वभूमी आणि प्रशिक्षण मिळालेले उजवे आणि डावे एकजीव होऊन कार्यरत होऊ शकतात हासुद्धा एक रोज घडणारा चमत्कारच म्हणायचा.

संस्थेच्या रथाची दोन चाकं एका दिशेने सातत्याने नेणाऱ्या माझ्या सगळ्या आजीमाजी सहकाऱ्यांना प्रणाम करून सत्र संपले. माझ्याभोवती नेहमीप्रमाणे ‘मुक्तांगण मित्रां’चा गराडा पडला. कुणाला डायरीवर सही हवी होती, कुणाला संदेश.

‘‘आनंदकाका, तुम्ही नेहमी सांगता की उपचारांनंतर घरी जाताना ‘मुक्तांगण’ला मनात घेऊन जा… आज मला त्याचा अर्थ कळला.’’ पुढच्या आठवड्यात घरी जाणारा एक ‘मित्र’ म्हणाला. आणि माझ्या पाया पडला. त्यांचे वंदन मी, तत्परतेने पाठीशी असणाऱ्या अनिल-सुनंदाच्या एकत्र हसऱ्या फोटोला अर्पण केले.

(लेखक मुक्तांगणमित्र संस्थेचे संस्थापक आणि विद्यामान अध्यक्ष आहेत.)