मंगला आठलेकर
वर्तमानातले सारे प्रश्न पंच्चाहत्तर वर्षांपूर्वीच्या इतिहासातही कसे मुळं रोवून उभे होते आणि हटवादीपणापेक्षा परस्पर सहिष्णुताच कशी जगणं सुकर करू शकते, हे सांगणारं ‘परिपूर्ती’ हे डॉ. इरावती कर्वे यांचं पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं. खरा पुरोगामी भेटणं कठीण, पुरोगामित्वाचा मुखवटा चढवलेल्यांचा सुळसुळाट मात्र खूप, अशी भूमिका घेत त्या एकेक विषय उलगडत जातात. वाचकांना संवादात सामावून घेतानाच त्यांच्या डोळय़ांत झणझणीत अंजन घालतात.

‘आपण का लिहिता?’ हा कोणत्याही लेखकाला विचारला जाणारा हमखास प्रश्न! ‘परिपूर्ती’, ‘गंगाजल’ आणि ‘भोवरा’ हे ३ ललित लेखसंग्रह लिहिणाऱ्या इरावतीबाईंनाही (इरावती कर्वे) हा प्रश्न जेव्हा विचारला गेला, तेव्हा ‘भोवरा’ या संग्रहातल्या ‘सुटका’ या लेखात ‘आपण का लिहितो’ हे सांगताना त्या म्हणतात, ‘एका माणसाच्या आयुष्याची कमाई किती असणार? ती कमाई करताना अनुभूतीचा प्रवाह तुडुंब भरून वाहून चालला, की मनुष्य आपण होऊन दुसऱ्याला बोलावतो आणि आपली कमाई वाटत सुटतो.’ डॉ. इरावती कर्वे यांनी अतिशय सहजभावानं दिलेलं उत्तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातलं साधेपण आणि सभोवतालाविषयी त्यांच्या मनात असलेला मैत्रभाव व्यक्त करणारं आहे.

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..

आपले अनुभव त्यांना इतरांना सांगावेसे वाटतात. एकीकडे आपण जे काही अनुभवलं त्यातून होणारी ती सुटकाही असते आणि त्याचबरोबर आपल्याला पडणारे प्रश्न त्यांना वाचकांसमोर ठेवावेसेही वाटतात. आणि मग ‘स्वगत’ म्हणून उच्चारलेल्या या प्रत्येक मनोगताशी आपोआप वाचकाचा संवाद सुरू होतो. ‘परिपूर्ती’ या ललित लेखसंग्रहातून इरावतीबाई वाचकांशी जो संवाद साधतात त्यात या मैत्रभावाचा प्रत्यय येतो. त्यांच्या साऱ्याच लेखनाला आत्मपरतेचा स्पर्श आहे. घरात वा घराबाहेर घडलेले प्रसंग, त्यानिमित्तानं त्यांच्या मनात सुरू झालेलं विचारमंथन, त्यातून त्यांना पडणारे प्रश्न, त्यांची त्यांनी शोधलेली उत्तरं आणि ती उत्तरं वाचकांनी स्वीकारलीच पाहिजेत यासाठी अजिबात आग्रही नसणाऱ्या इरावतीबाई ‘परिपूर्ती’मध्ये आपल्याला भेटतात.

१९४९ मध्ये लिहिल्या गेलेल्या या पुस्तकात आज वर्तमानात भेडसावणारेच अनेक प्रश्न इरावतीबाईंना त्या वेळी अस्वस्थ करत होते हे लक्षात येतं. या प्रश्नांकडे पाहाताना मनुष्य- स्वभावावर, समाजव्यवस्थेवर त्यांनी केलेली अतिशय मार्मिक टिप्पणी आणि तरीही अंतिमत: सामंजस्याची भूमिकाच सर्व समस्यांवरचा गुणकारी उपाय असतो, ही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. अर्थात वृत्तीतली उदारता हा सार्वत्रिक गुण नाही, हेही त्या अनुभवत होत्याच. विचारांची नवता, पुरोगामित्वाचा पुरस्कार म्हणजे जुनं सगळं झिडकारणं नव्हे आणि स्वातंत्र्याचा उदोउदो म्हणजे फक्त स्वत:ला हवं ते करण्याची मोकळीक आणि दुसऱ्याची गळचेपी नव्हे, हे सांगणाऱ्या इरावतीबाईंच्या परखड, तरीही लोभस अशा व्यक्तिमत्त्वाचं दर्शन ‘परिपूर्ती’मध्ये होतं.
वर्तमानातले सारे प्रश्न पंच्चाहत्तर वर्षांपूर्वीच्या इतिहासातही कसे मुळं रोवून उभे होते आणि हटवादीपणापेक्षा परस्पर सहिष्णुताच कशी जगणं सुकर करू शकते, हे विचार मांडणारं ‘परिपूर्ती’ हे पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं. सामाजिक मूल्यांची पडझड हा इरावतीबाईंच्या सततच्या चिंतेचा विषय तर होताच, शिवाय प्रश्न स्त्री-स्वातंत्र्याचा असो, धर्मजातीनं मांडलेल्या विध्वंसाचा असो, दोन पिढीतल्या विसंवादाचा असो वा माणसाला भेडसावणाऱ्या अंतिम एकटेपणाचा असो.. आपल्या सर्वाच्या आयुष्याशी निगडित असलेल्या या साऱ्या प्रश्नांचा विचार त्यांच्या लेखनातून समोर येताना दिसतो. इरावतीबाईंच्या व्यक्तिमत्त्वात असलेला जुन्या-नव्याचा सुंदर मेळ आणि दुसऱ्याला समजून घेण्याची उदारता, यातून इरावतीबाई या साऱ्या प्रश्नांची उकल करू पाहातात. खरा समंजसपणा, उदारता उदाहरणानिशी त्या वाचकांसमोर ठेवतात. त्या पार्श्वभूमीवर स्वत:ला ‘मानवतावादी’ म्हणवत केवळ मिरवण्याचं काम करणाऱ्यांचं कसं पेव फुटलं आहे, याचं झणझणीत अंजन डोळय़ात घालणारं ‘परिपूर्ती’ हे पुस्तक नुसतं वाचायला हवं असं नव्हे, तर ते प्रत्येकाच्या संग्रहीच असायला हवं.

१९४२ मधली इरावतीबाईंच्या मनाला लागलेली एक घटना त्या सांगतात. तेरा-चौदा वर्षांची पोरं स्टेशनं, चौक्या, शाळांच्या इमारती जाळत होती. उगवत्या पिढीच्या मनात कालवलं गेलेलं धर्म आणि पंथीय विचारसरणीचं हे विष पाहाताना इरावतीबाईंमधलं आईचं मन तळमळत होतं. त्यातल्या एकाला त्या विचारतात, ‘‘काय रे, तुमच्या पुढाऱ्यानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू ऐकशील काय रे?’’ बालदृष्टीनं बाईंकडे पाहात तो मुलगा उत्तर देतो, ‘‘अर्थात, वाटेल त्याचा खून करावयास सांगितला तरी मी तो करीन.’’ ते ऐकताना हजारो र्वष मोजून मिळवलेली माणुसकीची मूल्यं धुळीला मिळवायला एक पिढीसुद्धा लागत नाही, या भावनेनं इरावतीबाई कष्टी तर होतातच, पण निरागस वाटणाऱ्या मुलांचा प्रवास इतक्या टोकाच्या भूमिकेपर्यंत कधी होतो हे आईवडिलांना ठाऊकही नसतं, या जाणिवेनं त्यांचं मन खिन्न होतं.

या प्रसंगानं इरावतीबाईंच्या मनात विचारांचा झंझावात सुरू होतो. व्यक्तिपूजेचा अतिरेक कोणत्याही समाजाच्या ऱ्हासाला कारणीभूत होत असतो. मग तो कोणताही धर्म असो वा पंथ असो! अशा शब्दांत सर्वच कडव्या व्यक्तिपूजकांचा समाचार इरावतीबाई घेतात.एकेश्वरी पंथ मनुष्यसमाजाचा घात केल्याशिवाय राहात नाही. पण इरावतीबाई फक्त याला/ त्याला जबाबदार धरून थांबत नाहीत. धर्म ही पेटती चूड आहे, हे पाहात आणि अनुभवत असतानासुद्धा बाईंची भूमिका संयमी आणि सर्वाना सामावून घेण्याची आहे. ‘देशभक्त काय ते आम्हीच. इतर सगळे देशद्रोही!’ या तऱ्हेची उर्मट देशभावना आणि त्यातून जन्मणारा परस्परद्वेष संपवण्याचा मार्गही त्या सांगतात. हवं ते स्वीकारण्याचं आणि नको ते नाकारण्याचं स्वातंत्र्य आपण साऱ्यांनीच एकमेकांना दिलं पाहिजे, इतका सोपा मार्ग आपण का आपलासा करत नाही, या विचारानं हळहळून त्या म्हणतात, ‘माझ्यासारख्या हिंदू संस्कृतीत रुजलेल्या व या वादाने भांबावलेल्या मनाला वाटते, एकाचाच आग्रह का? सगळेच राहीनात! कोणी कोणावर जुलूम नाही केला म्हणजे झालं!’ ज्याला जे दैवत मानण्याची इच्छा आहे, त्याला ते मानू द्यावं आणि ज्याला कुठलंच दैवत मानायचं नाही, त्याला त्याचं नास्तिकपण जपू द्यावं, हेच खरं व्यक्तिस्वातंत्र्य. या व्यक्तिस्वातंत्र्याची आस इरावतीबाईंच्या मनाला होती. इरावतीबाईंना अनेकदैवतवादी संस्कृती प्रिय होती. पण म्हणून ती सर्वाना प्रिय असलीच पाहिजे, हा त्यांचा आग्रह नाही. ही सवलत प्रत्येकानं दुसऱ्याला द्यायलाच हवी. आपण ईश्वर नाकारतो, म्हणजे आपण फार पुरोगामी आणि स्वीकारतो तो प्रतिगामी, असं मानणाऱ्या प्रत्येकानं विचार आणि भावनांच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपण दुसऱ्याला देणार की नाही, हा प्रश्न स्वत:ला विचारावा. दुसऱ्याला हे स्वातंत्र्य जो देतो, तोच खरा पुरोगामी. ही उदारता सोपी नाही. म्हणूनच तर खरा पुरोगामी भेटणं कठीण, पुरोगामित्वाचा मुखवटा चढवलेल्यांचा सुळसुळाट मात्र खूप, असं इरावतीबाईंचं मत होतं.

परखडपणा, स्पष्टवक्तेपणा आणि निग्रही वृत्ती हे इरावतीबाईंचे खास विशेष होते. ‘परिपूर्ती’मध्ये त्याचा वारंवार प्रत्यय येतो. एका सुधारणावादी घरामध्ये त्यांचं सगळं आयुष्य गेलं. व्यवस्थेनं केलेली स्त्रीची कोंडी मात्र त्या इतरत्र पाहात होत्याच. स्त्रियांचा कैवार घेणाऱ्या आणि जगण्यासाठी स्त्रियांना शिक्षण आवश्यक आहे असं मानणाऱ्या महर्षी कर्वे यांचेही संस्कार त्यांच्यावर झाले होते. सीतेला ‘टाकणाऱ्या’ रामाचा लहानपणी शाळेत शिकत असताना त्यांना साहजिकच फार राग येई. िहगण्याच्या अनाथ बालिकाश्रमात जेवणाच्या वेळी मुली, परित्यक्ता ‘सीताकांतस्मरण जयजयराम’ म्हणत, तेव्हा ‘खरेच, रामासारख्या माणसांमुळेच तर असले आश्रम भरतात, तेव्हा त्यांचे स्मरण योग्यच आहे’ असा कटू, उपहासात्मक विचार त्यांच्या मनात येई. पण तरीही समस्त पुरुषजातीला त्या धारेवर धरत नाहीत, त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडत नाहीत, की स्पष्ट शब्दांत वारंवार आपल्या लेखनातून त्यांचा निषेधही करत नाहीत.

लग्नव्यवस्थेचा उपहास मात्र त्यांच्या लेखनात काही निमित्तांनी दिसतो. त्यांच्या भटकंतीतलंच एक उदाहरण- बिहारमध्ये कामानिमित्त फिरताना त्यांना आढळून आलं, की गंगेच्या सुपीक खोऱ्यात चार िभतींच्या कोंडवाडय़ात बायका स्वयंपाक करून यजमानांची वाट पाहात बसतात. बरोबरची मुलगी त्यांना विचारते, ‘जन्मभर वाट पाहत असे कुजतच बसायचे काय!’ इरावतीबाई उत्तरतात, ‘नाही. त्यांना फार काळ कुजत बसावे लागत नाही. आजार त्यापूर्वीच त्यांची सुटका करतात.’ किंवा ‘आई ही चामडय़ाची पिशवी, मुलगा बापाचाच, बापच त्याच्या रुपानं जन्म घेतो.’ हे समाजाच्या मनात ठसवलं गेलेलं पुरुषप्रधान संस्कृतीचं बधिर करणारं वास्तवही त्या मांडतात.

इरावतीबाई स्वत: समृद्ध, संपन्न जीवन जगल्या. नवऱ्याची जेवणासाठी वाट पाहाणाऱ्या इरावतीबाई जगभर िहडलेल्याही होत्या. व्यक्ती म्हणून समृद्ध होण्यासाठी आवश्यक असलेलं सर्व स्वातंत्र्य घेणाऱ्या होत्या. पण तरीही कुठल्याशा सभास्थानी आपली करून दिलेली ओळख अपुरी वाटली म्हणून ‘काय कमी होतं त्या ओळखीत?’ असा विचार करत असताना शेजारीच खेळणाऱ्या मुलांपैकी कुणीतरी, ‘अरे ती बघ, आपल्या वर्गातल्या कव्र्याची आई!’ असं म्हटल्यावर आपली ओळख पूर्ण झाल्याचा आनंद त्यांना मिळतो. मातृत्व किंवा पत्नीत्व हे अनुभव आपल्यासाठी आनंददायी आहेत, असं म्हणताना आपण मागासलेले ठरू अशी भीती त्यांना वाटत नाही.

लोकांनी आपल्याला काय ठरवावं, यापेक्षा आपण काय आहोत, हे आपल्याला स्वच्छपणे आणि ठामपणे माहीत असावं आणि जे आपण आहोत त्याबद्दल आपला आपल्याला अभिमान असावा, कारण आपण स्वीकारलेलं तत्त्वज्ञान आपल्याला पूर्णपणे पटतं म्हणून स्वीकारलेलं आहे, लोकांना दाखवण्यासाठी किंवा लोकांसमोर आपली ‘बंडखोर विचारवंत’ अशी प्रतिमा निर्माण व्हावी म्हणून नाही, अशी जग फिरून आलेल्या इरावतीबाईंची भूमिका होती.
साहजिकच मुक्ती ही व्यक्तिगत प्राप्तीची गोष्ट आहे, असं त्यांचं मत होतं. म्हणूनच उच्च शिक्षणासाठी जर्मनीला जाताना महर्षी कव्र्याचा, सासऱ्यांचा आशीर्वाद त्यांना महत्त्वाचा वाटला. तो मिळाला नाही किंवा आपण परदेशी जाऊ नये, ही त्यांची इच्छा आहे हे कळलं, तरी जर्मनीला जाण्याचा आपला निर्णय त्या बदलत नाहीत. स्वत:च्या जीवनाबाबत स्वत: आग्रही असणं हेच व्यक्तिस्वातंत्र्य. या त्यांच्या धारणेत कुठे गोंधळ नाही, संभ्रम नाही. आपलं जीवन कसं व्यतीत करावं, हा ज्याचा त्याचा हक्क आहे, असं त्या मानत होत्या. म्हणूनच चळवळी उभारून आपलं पुरोगामित्व सिद्ध करावंसं त्यांना वाटलं नाही.

जगण्याचं स्वातंत्र्य हा माणसाचा प्रधान हक्क आहे, असं त्या मानत होत्या. त्यांच्याकडे निवाडा करण्यासाठी म्हणून आलेल्या एका लहान मुलीच्या खटल्याची गोष्ट वाचण्याजोगीच आहे. एक मिशनरीबाईंनी त्या लहान मुलीला तिच्या आईवडिलांकडून काढून घ्यावं आणि आपल्या मिशन बोर्डिगमध्ये ठेवावं, कारण त्यांनी लग्न न करताच मुलीला जन्म दिला आहे, असा अर्ज केला होता. तेव्हा ‘मी हा खटला हातात घेणार नाही. ज्या घरी मूल आहे, तेथे त्याचे पालनपोषण नीट होत आहे. आईबाप निव्र्यसनी आणि सुस्वभावी आहेत. केवळ त्यांचे लग्न झाले नाही या भानगडीशी मला कर्तव्य नाही. तुमच्या चर्चतर्फे त्याविरुद्ध जाऊन काय इलाज करायचा तो करा, पण हिंदी सरकारने लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या संसारात लुडबुड करायला मुलांचे कोर्ट नेमलेले नाही.’ असं निक्षून सांगून ती केस त्या काढून टाकतात. लग्न न करता स्त्री-पुरुषानं एकत्र राहाणं, लग्नाशिवाय मुलाला जन्म देणं, या गोष्टी आणि संस्कृती यांची सांगड न घालणं, कुणाचा घात न करता माणसं जर स्वत:चे आनंद शोधत असतील, तर ते स्वातंत्र्य त्यांना असलं पाहिजे म्हणून आग्रही असणं, हे खरं पुरोगामित्व! इरावतीबाईंच्या विचारात ते किती खोलवर रुजलेलं होतं याचा प्रत्यय ‘परिपूर्ती’मध्ये येतो.

इतकं संवेदनशील मन घेऊन जन्माला आलेल्या इरावतीबाईंना आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर एकाकीपणाच्या भावनेचा वेढा झाकोळून टाकणार होताच. एकाकी वाटणं हे एकाकी वाटण्यापाशीच कुरतडत राहतं. त्याला शेवट नाही, किनारा नाही. पण इरावतीबाईंचं मन हा निवाराही शोधतं. ‘माझ्याभोवती माझी काळजी घेणारी, माझ्या अंत:करणाचा ठाव ज्यांना सापडला आहे अशी जिवलग माणसं आहेत, तरी मी एकाकी का?’ हा प्रश्न त्यांना पडतो आणि मग त्या प्रश्नाची पिंजण सुरू होते. ही पिंजण करणारं मन श्रद्धाळू आहे, पण ते भाबडं नाही, विचारी आहे. ‘माझ्या मनातली श्रद्धा मला कठीण परिस्थितीतून निभावून नेते’ इतकी त्यांची देवविषयक धारणा स्वच्छ आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वैचारिक पुरोगामित्व आणि श्रद्धास्थानं यांचा हा जो मेळ दिसतो, त्यामुळेच बंडखोर लेखिका म्हणून त्यांची कधी ओळख झाली नाही आणि ती आस त्यांना कधी नव्हतीही. विज्ञान आणि श्रद्धा या दोन गोष्टी इरावतीबाईंना न मिरवता स्वतंत्र ठेवता आल्या. देवाचं महत्त्व त्यांनी जाहीरपणे मानलं. देवावर आपली श्रद्धा आहे, हे सांगताना त्यांना लाज वाटली नाही किंवा ते मागासलेपणाचं लक्षण आहे असंही वाटलं नाही. हे प्रतिगामित्व असेल तर आपण प्रतिगामी आहोत, असं बिनदिक्कतपणे त्या सांगत.

एक समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्राची अभ्यासक, संशोधन आणि व्याख्यानांच्या निमित्तानं देशविदेशात भटकंती केलेली एक विदुषी आणि त्याचबरोबर नवरा-मुलात रमलेली, प्रसंगी देवावर विसंबणारी संसारी स्त्री, अशा इरावतीबाईंच्या विविध रूपांचं दर्शन घडवणारं ‘परिपूर्ती’ हे एक विलोभनीय पुस्तक आहे हे निर्विवाद!
mangalaathlekar@gmail.com