डॉ. ऊर्जिता कुलकर्णी
प्रसंग काय आहे, त्यावर माझी काय प्रतिक्रिया आवश्यक आहे. तिचे लगेच आणि दूरगामी होणारे परिणाम काय?
ते परिणाम, माझ्यासोबत, इतरांवर, माझ्या आजूबाजूच्या वातावरणावर कशा प्रकारे टिकून राहतील, या साऱ्यांचाच सहज होणारा विचार म्हणजे आत्मभान! ते सतत जागृत ठेवणे महत्त्वाचे.
नात्यांच्या मुळाशी असणारी, कायम दुर्लक्षित केली जाणारी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येकाचे ‘आत्मभान’. सहज जाता-जाता या शब्दाकडे पाहिलं तर, ‘त्यात काय? हे असतंच प्रत्येकाला!’ असं वाटण्याची दाट शक्यता. परंतु बारकाईने याचा अर्थ समजावून घेतल्यानंतर मात्र, आत्मपरीक्षण करावेसे वाटते. त्यातून आपण याच्या किती जवळ आहोत हेही लक्षात येते.
आत्मभान म्हणजे, जगताना स्वत:चे आणि इतरांचे एकंदरीत जीवनाविषयी असणारे निकष, त्यातली भिन्नता, ते सामावून घेण्याची स्वतची क्षमता, इतरांच्या मतांविषयीचा आदर, या साऱ्यांकडे पाहण्याचा सशक्त, सुदृढ दृष्टिकोन! याच सोबत, स्वतला जोखण्याची, तटस्थपणे स्वतचे मूल्यमापन करता येण्याची योग्य कुवत!
इतर गुण-दोषांइतकीच किंबहुना त्याहूनही सतत जवळ बाळगावी अशी ही प्रवृत्ती. नैसर्गिकरीत्या, आत्मभानदेखील आपण नकळत आत्मसात करत राहतो. त्याविषयी शिकत राहतो. परंतु कालांतराने, या शिकण्याला खीळ बसण्याची शक्यताच अधिक. ते परिस्थितीजन्य असते. माणूस म्हणून आपण एखाद्या व्यक्तीचे जे वर्णन करतो, म्हणजे एखादा शांत, विचारी, विवेकी, रागीट, भोळा आहे इत्यादी, त्यामध्ये याची पुसटशी छटा नक्कीच असते.
कसे? अजून सोपे करू या. आपल्या सहकाऱ्याला त्याच्या गावी अचानक काही कामानिमित्त जावे लागत असल्याने, आपल्याला त्याचे काम करावे लागते. पर्यायाने काही पातळ्यांवर तडजोडही करायला लागते. हे आनंदाने, किंवा पुढाकाराने स्वीकारणे. असे वारंवार घडायला लागले तर मात्र त्याच्याशी समजुतीने बोलून, हे सतत करता येणे शक्य नाही हे त्याला समजावून देणे. यातील कोणत्याही प्रसंगात कोणत्याही प्रकारे या आणि अशा कृतीमधून अनावश्यक भावनांचे, विचारांचे गोंधळ तयार होऊ न देता हे हसत-खेळत हाताळणे इथे उपयोगी पडते ते आत्मभान. प्रसंग काय आहे, त्यावर माझी काय प्रतिक्रिया आवश्यक आहे. तिचे लगेच आणि दूरगामी होणारे परिणाम काय? ते परिणाम, माझ्यासोबत, इतरांवर, माझ्या आजूबाजूच्या वातावरणावर कशा प्रकारे टिकून राहतील, या साऱ्यांचाच सहज होणारा विचार म्हणजे आत्मभान!
आता दुसरे उदाहरण बघू या! एखाद्या घरात, मूल होण्यासाठी, नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या पाठीमागे लागलेला प्रौढांचा ससेमिरा! यात बऱ्याचदा स्त्रियांची मानसिकता हळूहळू आजूबाजूच्या लोकांविषयी विशिष्ट ग्रह होण्यात, किंवा कटुता येण्याची होऊन जाते. परंतु इथे आपल्याला काय हवे आहे? मूल हवे असेल तर ते कधी? किंवा नको असेल तर तो जोडप्याचा वैयक्तिक प्रश्न कसा? या साऱ्याच बाबी मोकळेपणाने चर्चा करून, न बुजता, कोणतेही किंतु न ठेवता बोलता येऊ शकतील. त्यातून निष्पन्न होणाऱ्या परिणामांविषयी आधीच काही ठोकताळे बांधून ती चर्चाच टाळणे, यातून एके दिवशी सर्वाचेच विचार, भावना यांचा उद्रेक होऊ शकतो. इथेही उपयोगी पडते ते आत्मभान! कदाचित आपण सांगतोय ते आत्ता पचनी पडणार नाही, समजणार नाही, हे माहीत असूनही, त्याविषयी, खुली चर्चा करायला काहीच हरकत नाही. घरातून त्या क्षणी उमटणारे पडसाद पचवायला जड असतीलही, परंतु, तसेच हा निर्णय इतरांच्या दृष्टिकोनातून समजावून घ्यायला अवघड असू शकतो, हे समजून घेऊन चर्चा करता येतेच! हेच एखाद्या लग्नासाठी उत्सुक नसणाऱ्या मुला/मुलीच्याबाबत घडू शकतं.
वर दिलेल्या उदाहरणांतून हे लक्षात येईल, की यामुळे, आजूबाजूच्या परिस्थितीतील अनावश्यक ताण ताबडतोब निवळला जातो. नीट विचार केल्यावर, थोडेसे सूक्ष्मपणे या सगळ्याच विषयाकडे पाहिल्यावर, हे जाणवेल की आपण सगळेच अशा आपल्याच व्यक्तींमुळे तयार झालेल्या एक प्रकारच्या तणावात सातत्याने जगत असतो. तो तणाव, त्याने होणारी ओढाताण प्रत्येकालाच जाणवते; पण कोंडी कोण फोडणार म्हणून गप्प राहणे हाच मार्ग सोईस्कर समजला जातो!
आत्मभानाच्या बाबत हे कृतीतूनही दाखवता येते. तिथे काही बोलण्याची गरज पडेलच असे नाही. उदाहरणार्थ, रोजच उशिरा घरी येणाऱ्या लेकीला रागवण्यातून लाखोली वाहण्यापेक्षा, तिच्यासाठी दरवाजा उघडा ठेवून काहीही न बोलता जागत राहणारी वडीलधारी मंडळी, यातून कित्येकदा कृतीमध्ये हवी असलेली सुधारणा घडते.
आपल्या रोजच्या क्रिया, दिनचर्या यात, कित्येक मंडळी कळत-नकळत गोवली गेलेली असतात. आपल्यासोबत जाता-जाता त्यांचाबाबतही असणारा स्पष्ट आणि स्वच्छ विचार म्हणजे आत्मभान! यातच महत्त्वाची बाब म्हणजे मनाची जागरूकता. ती असल्याशिवाय आत्मभान असणे केवळ अशक्यच. गर्दीच्या ठिकाणी, रांगेत उभे राहिल्यास काम सोपे होईल, किंवा समोरच्याच्या चुकांवर ओरडून बोलण्यापेक्षा तेच शांत पण कडक शब्दात सांगूनही काम होईल, किंवा घरात म्हातारी माणसे असल्यास, आपण वापरत असलेल्या सगळ्या मनोरंजनाच्या उपकरणांचा आवाज कमी ठेवल्यास त्यांना त्रास होणार नाही. या आणि अशा कित्येक गोष्टींची गणितं मनात आपसूक तयार व्हायला आत्मभान फारच उपयुक्त ठरते.
पाहा, कसं आहे, माणूस म्हणून आपल्याला जसे साधे सोपे आयुष्य अपेक्षित असते, तसेच ते इतरांनाही असते. इतके सरळ समीकरण जरी सतत मेंदूत जागे ठेवले तरी वागताना अंगवळणी पडलेल्या काही नकोशा कृती आपोआप टाळल्या जातील!
आत्मभानाच्या बाबत अजून एक म्हणजे, मला आयुष्याकडून जे हवे आहे, ते मला माहीत आहे का? याचा अर्थ ध्येय नव्हे. याचा अर्थ, ध्येय सोडून जे इतर आयुष्य मी व्यक्ती म्हणून विचार करत आहे, ते कसे आहे. ते माझ्यापुरते सुलभ करताना, इतरांचे खच्चीकरण तर होत नाही ना? हा महत्त्वाचा विचार. यात काही गुंतागुंत होऊ शकते. ती सवयीने टाळता येईल. इतरांच्या अपेक्षा, त्यांचे अवास्तव ओझे, झटकून टाकायलाही आत्मभान मदत करते. इतरांच्या बाबत आलेला कटू अनुभव, त्यातून आपली बदलत जाणारी मानसिकता, त्यातही जर ती नकारात्मकतेकडे झुकत असेल तर, त्यालाही वेळीच आळा बसतो.
जन्माला येताना आनंदी असणारी प्रत्येक व्यक्ती, पुढे यापासून फारकत का घेते, याचं उत्तरही यातच सापडेल. स्वतची आत्मभानापासून झालेली फारकत, त्यात असलेले कित्येक अडथळे, मग, साध्या सरळ ओलांडून जाता येतील अशा रेषांसारखे दिसायला चालू होतात.
आत्मभान जिवंत असण्याने, आपण कित्येक मानसिक व्याधी, विकार, परिस्थिती, गुंतागुंत यापासून स्वतला लांब ठेवू शकतो. नात्यांमुळेच हे सारे चक्रव्यूह आपल्या सभोवार तयार होत असताना, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग, आत्मभान पुन्हा जिवंत करणे हाच. कारण त्याशिवाय दिलेले कोणतेही उपचार, समुपदेशन हे केवळ तात्पुरत्या परिणामांसारखे तेवढय़ापुरतेच काम करू शकतात.
आता हे जर गमावून बसलो असू, तर आपण काय करू शकतो? अगदी सहज करता येण्यासारखी बाब, म्हणजे आपल्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे डोळसपणे पाहणे हे याचे उत्तर! त्या घटनेत विचार असतील, व्यक्ती असतील, भावना असतील, इतरांशी दैनंदिन घडणारे या सर्व पातळ्यांवरचे व्यवहार असतील, या साऱ्यांकडेच आपण डोळसपणे पाहू लागलो की आपसूकच आपल्याला त्यातल्या कितीतरी त्रुटी कमी झाल्यासारख्या लगेच जाणवतील.
याच्याआड एक गोष्ट अतिशय पटकन येते, ती म्हणजे, आपल्याला असणारा अहंकार, आणि काही प्रमाणात, बराच काळ मुळाशी धरून ठेवलेल्या कल्पना! कारण आत्मभान आपल्याला, त्याच्या विरुद्ध किंवा वेगळे असे काहीतरी चित्र दाखवते. ते आपल्या बुद्धीला पटायला चालू झाल्यानंतर खरी लढाई चालू होते ती स्वतची स्वतशीच! त्यातून आरोपीच्या पिंजऱ्यात सतत कोणाला तरी पाहायची सवय असलेल्या आपल्याला, आपण स्वतच वारंवार तिथे दिसायला लागतो. मग स्वतत, आपल्या विचारात बदल करण्यावाचून गत्यंतर उरत नाही. अर्थात हे त्या सर्वासाठी, ज्यांचे आत्मभान जिवंत झाले, आणि त्यांनी ते स्वीकारले तर. नाही तर पुन्हा आहे तसेच आयुष्य कवटाळणे अवघड नाहीच. त्यात इतरांना दोष देत, परिस्थितीला दोष देत, स्वतवर कीव करत, रडत, कुढत, किंवा इतरांचा अजिबातच विचार न करता, स्वार्थीपणे सुखे पायाशी लोळण घेत असतानाचे आयुष्य नक्कीच ढकलत राहता येईल. त्यातून ना गुंतागुंत कमी होईल, ना परिस्थिती सुधारेल.
आता यातील पथ्य!
अतिशय महत्त्वाचे, आपल्याला आत्मभान आहे, म्हणजे ते इतरांना आहेच किंवा असावे, हा विचार, ही अपेक्षा! थोडासा विचार केल्यास लक्षात येईल, की अशी मंडळी कमीच. जी आहेत त्यांचे आयुष्य आपल्याला या तीरावरून तरी सुखी- समाधानी दिसते! आणि त्याचे गमक काय याचाच आपण रात्रंदिवस विचार करतो. आत्मभानातून मिळणारी देणगी म्हणजे, समाधान! याचा अर्थ आपला यशाचा वेग मंदावतो, किंवा महत्त्वाकांक्षा कमी होते असे अजिबातच नाही. उलट त्या व्यवस्थित मांडता येतात. त्यांचा आलेख आखता येतो. आजूबाजूच्या परिस्थितीला धक्का न लावता त्यापर्यंत पोचण्याचे कित्येक मार्ग दिसू लागतात. तरीही आजूबाजूला असणाऱ्या, किंवा संपर्कात येणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीला आपण, सुखी, आनंदी ठेवू शकत नाही, किंवा तशी जबाबदारी केवळ आपल्याच खांद्यावर घेऊन जगावे असे मुळीच नाही. त्यातूनही नकोसा ताण तयार होतो. तो जास्त मारक. अशा व्यक्ती इतरांचाच इतका विचार करतात, की स्वत्व विसरून जातात.
आत्मभान या सगळ्यात एक सुंदर समन्वय साधून देते. मी माणूस आहे, मला जे नियम लागू तेच इतरांना, त्याशिवाय, जगताना मी कोणाच्याही आयुष्यात अडथळा म्हणून येत नाही; उलटपक्षी, ते जास्त सोयीस्कर करण्याचाच प्रयत्न करतो, तेही जाता जाता, सहज. ही जादू आत्मभानाची! प्रत्येक पाच व्यक्तींमागे अशी एक व्यक्ती आत्मभान जगणारी असेल, तरीही, इतरांवर त्याचा नक्कीच परिणाम होईल.
urjita.kulkarni@gmail.com
chaturang@expressindia.com