डॉ. प्रदीप पाटकर
पुरुषत्वावर पारंपरिकरीत्याच एक श्रेष्ठतेचं ओझं असतं. समाजानं लादलेल्या समजुतींमधून आपसूक तयार होणारं ओझं. अनेक पुरुषांकडून त्याची प्रौढी मिरवली जाते, ती पुरुषाच्या स्वत:च्या भावनिक आरोग्याच्या दृष्टीनं खरं तर मोठीच अडचण असते. वृद्धत्वात ओझ्याची भावना प्रबळ होते. आजूबाजूच्या अनेक गोष्टी पटत, रुचत नाहीत, ‘कशातच काही अर्थ नाही आणि नव्हता’ असंही वाटू लागतं. अशा क्षणांशी त्यांनी स्वत: कसा लढा द्यावा आणि समाजानं त्यांना कशी साथ द्यावी, त्यातून बाहेर पडायला कशी मदत करावी ते सांगणारा लेख..

प्रसिद्ध उद्योजक श्री. कीर्तने यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी आपल्या महालसदृश घराच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली तेव्हा सारेच आश्चर्यचकित झाले होते. इतक्या श्रीमंत उद्योजकाला काय टेन्शन असावं, हा प्रश्न ‘अर्था’लाच अर्थपूर्ण सार्थक जीवन समजणाऱ्या समाजाला पडणं स्वाभाविक होतं.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

अशा आत्महत्येविषयी विचार करताना असं लक्षात येतं, की जवळच्या व्यक्तींना या व्यक्तीतल्या नैराश्याच्या काही खुणा बहुधा समजल्या नसाव्यात. अन्यथा अशा माणसांना वेळीच प्राथमिक मानसोपचारांची मदत पोहोचवून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करता आलं असतं. यशस्वी समजल्या जाणाऱ्या प्रौढ पुरुषांमध्ये नैराश्य, वैफल्य आणि आत्महत्येचे विचार आढळून येतात, पैसा, मानमरातब, निरोगी प्रकृती, मदतीला सहकारी असतानाही अशा माणसांना यशाच्या शिखरावरून आत्मनाशासाठी उडी मारावीशी वाटते, याचं आकलन कठीण आणि क्लिष्ट आहे.

आता तर वाढलेला ताणतणाव, कामाच्या त्रासदायक वेळा, नोकरीची अशाश्वती, या आणि अशा अनेक कारणांनी तरुणांचं आरोग्य बिघडत चाललं आहे. लैंगिक प्रश्न वाढताहेत, वैवाहिक जीवन निरस होत जाताना दिसतं आहे. निराशा वयाआधीच प्रौढ होते आहे!प्रौढांमधल्या निराशेबाबत काही लक्षणं वेळीच समजून घेणं जरुरीचं आहे. मानसोपचारानं नैराश्य दूर करता येतं. वयानुसार संप्रेरकं कमी होतात, वेगवेगळे इतर आजार होऊ शकतात, एकटेपण छळू शकतं, व्यसनं सुटता सुटत नाहीत. असं असलं तरी या सर्वावर उपाय आहेत. वेळीच नैराश्य ओळखणं नितांत गरजेचं आहे. काय असू शकतात या खुणा, ही लक्षणं? अशा व्यक्तींना काय काय वाटत असतं? त्यांच्या बोलण्या-वागण्यात पुढील लक्षणं/चिन्हं दिसतात का, याबाबत सजग राहाणं जरुरीचं आहे.

जगणं जड, निर्थक, निरुपयोगी वाटतं.
सगळंच आता संपलं आहे.
काय उपयोग हे असं जगून?
काहीच आता सुधारणार नाही, यापुढे हे असंच असणार आणि ते मला मान्य नाही.
मी जगण्यासाठी लायक नाही.
मी आजवर केलेलं सारं फुकट गेलं.
कुणीच मला समजून घेत नसाल तर हा मी चाललो.
मी माझ्या माणसाचं नाक कापलं, त्यांच्यावर ही लाजिरवाणी परिस्थिती मीच आणली.
माझी मलाच लाज वाटते. मी होतो काय आणि झालो काय!
सगळंच घालवून बसलो. आता हे परत उभं करणं मला शक्य नाही. मी गेलेला बरा. मी नसेन तर परिस्थिती सुधारेल.
कुणालाच मी आवडत नाही. कुणासाठी जगू?
मी मरेन, मग धडा शिकतील ही सारी!
माझं काम मी इतकंच करू शकतो. ते मी पूर्ण केलं आहे. आता मी जायला मोकळा आहे.
सतत मनात निराश विचार येतात. सारखं रडू येतं. नको वाटतं सारं काही.
बास झालं आता. थांबावं वा संपावं इथेच.

प्रतिकूल परिस्थितीचा जोरदार तडाखा बसलेले विस्थापित प्रकल्पग्रस्त, बेकार, डोळय़ांसमोर गारपिटीनं पीक उध्वस्त झालेले कर्तबगार तरुण, कर्जात बुडालेले शेतकरी, व्यसनग्रस्त घरं, आत्महत्याग्रस्त कुटुंबं, भूकंपात घरदार-कुटुंब उध्वस्त होऊन उरलेली माणसं मी पाहिली आहेत. त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन मानसोपचारांची मदत दिली आहे. अशा विपत्तीनंतर येणारं वैफल्य, उध्वस्त झालेलं भावविश्व, त्यातून सुरू झालेली नैराश्याची व्याधी, हे सारंच तीव्र असह्य असतं; पण त्वरित उपचाराद्वारे याची तीव्रता कमी करता येते. काही इतर वैद्यकीय आजार आणि त्यावर वापरली जाणारी काही औषधंदेखील, प्रौढावस्थेत नैराश्य देऊ शकतात. नातेसंबंधांत प्रचंड वादळं निर्माण होऊ शकतात. नाती तुटणं नैराश्य वाढवतं. दु:ख आणि दु:खाचं दु:ख प्रसंगी घातक ठरू शकतं.

संप्रेरकांचा अभाव जीवनातल्या आनंदाला कसर लावू शकतो हे खरं आहे; पण जीवनेच्छा कोमेजू न देता ती फुलवणं आता आधुनिक वैद्यकीय शास्त्राला व विवेकी वात्सल्यपूर्ण समंजस समाजाला शक्य आहे. आशेबरोबरच निराशा जन्मापासून साथ देते. लहानपणातली निराशा तारुण्यावस्थेत संप्रेरकांच्या जोरदार प्रवाहात त्रासदायक ठरू शकते. संप्रेरकांच्या मदतीनं तारुण्यातला उत्साह टिकवत माणसं ताणतणावाचा सामना करत जीवन अर्थपूर्ण करू पाहतात. प्रौढावस्थेत संप्रेरकं माघार घेऊ लागतात. आजवरच्या अर्थपूर्ण जीवनाला वास्तव पराभूत आणि निर्थक करू पाहातं. जीवनाचा अर्थ कळता कळत नाही. सार्थक नेमकं कशात ते समजत नाही. आजूबाजूचं जग बदलतं. यशापयशाच्या व्याख्या बदलतात. ताणतणावाचं स्वरूप बदलतं. जीवनातले काही बदल हे अपरिहार्य प्रतिकूल बदल म्हणून जबरदस्तीनं स्वीकारावे लागतात. ते विवेकाच्या आधारे सहजतेनं स्वीकारणं खरं तर सोपं ठरू शकतं. अस्तित्वाच्या लांबलेल्या सावल्या संध्याकाळ जवळ येत चालल्याची स्पष्ट जाणीव देतात. आजवरचं जगणं हे अस्तित्वाचं यश असतं; पण माणसं ते नजरेआड करतात. माणसं अस्तित्वाच्या नाशवंत स्वरूपालाच टाळू पाहातात, घाबरतात. आजवरचं लढणं ठीक होतं; पण आता शस्त्रं जड, न पेलणारी वाटू लागतात. गात्रं साथ देत नाहीत. पारंपरिक कृतार्थतेच्या आनंदाच्या व्याख्या माणसं विसरू शकत नाहीत आणि मग अटळ निराशेकडे झुकतात. हा असा प्रवास करत प्रौढत्वाच्या अवघ्या टप्प्याला निराशा ग्रासून टाकते..

अस्वीकाराच्या भावनेतून आलेलं हळवेपण मनात खोलवर रुजतं आणि पाहाता पाहाता संवेदनशीलतेचा ताबा घेतं. हे बी रुजतं कसं, कुठून हे घरच्या माणसांना कळत नाही; पण त्या अस्वीकारातून नातेसंबंधांत आलेला दुरावा आधी पत्नीला आणि नंतर घरातल्या इतर सर्वाना जाणवू लागतो. ‘मी ‘कर्ता’ होतो तोपर्यंत माझ्या मतांना (सक्तीनं का होईना) मान्य केलं जात होतं. मी कमावता राहिलो नाही, तेव्हापासून घरातलं माझं महत्त्वाचं स्थान ढासळलं आहे. मी पुरवठादार नाही, असं जाणवल्यावर प्रेमादराकडून घरवाले इतर रुक्ष कर्तव्यभावनेकडे वळल्याचं मला स्पष्ट जाणवतं आहे. मी वडील, पण आता न कमावता, म्हणून कमावत्या मुलांना विशेष आदरणीय वाटत नाही. मी कुठे जन्मलो, कसा वाढलो, शून्यातून वर कसा आलो, ही कर्तृत्वगाथा घरातील कुणालाच ऐकावीशी वाटत नाही. मी कोण आहे? इथे का आहे? असे ‘अस्तित्व-छळवादी’ प्रश्न मला एकच उत्तर द्यायला लावतात- मी कुणीच नाही. मीच एक शून्य आहे. मी कुणालाच नको आहे. वाल्याच्या पापाचे कुणी वाटेकरी झाले नाहीत, पण माझ्या पुण्याचे ज्यांना फायदे झाले आहेत तेही मला आता दूर लोटू पाहात आहेत.’

हा वरील सारा संवाद अस्वीकाराबाबत हळवं करत, जखमी, दु:खी करत स्वत:च्या अस्वीकाराकडे ढकलतो. मग माणसं निराशेच्या दाट जाळय़ात अडकतात आणि स्वनाशाकडे वळतात. जिथे आयुष्यभर आपल्या गुणदोषांचा विनाअट स्वीकार आपल्याला जमत नाही, तिथे इतरांनी आपल्याला झिडकारलं वा दुर्लक्षिलं तर वैफल्याशिवाय हाती काय उरतं? मनातली संदर्भाची चौकट संकुचित होत जाते, तसतसं नैराश्य वाढत जातं. तारुण्य आशेत आणि जोषात जातं. लाचारी स्वीकारायला वृद्धत्व मदत करतं! कारण ते नाइलाजाशिवाय इतर पर्याय समोर ठेवत नाही; पण प्रौढत्व ‘अजूनही परिस्थिती बदलता येईल’ अशी लालूच देत राहतं आणि ‘अजूनही परिस्थिती बदलत नाहीये’ ही कळ मनात सारखी उद्भवत राहातेच!

प्रौढावस्थेतलं नैराश्य हे असं आशा-निराशेचे हेलकावे मनात देत राहातं. अपेक्षाभंग रुचत नाहीत, जगण्यातली चव घालवतात. त्याला सौम्य शब्दात ‘डिस्फोरिया’ (disphoria) म्हणतात. जगणं असह्य होतं तेव्हा नैराश्य आलं असं म्हणता येईल. तक्रार करणारी, चिडणारी, आग्रही, संतापी प्रौढ मंडळी परिस्थितीत विशेष अनुकूल बदल घडलेले नसतानाही जर गप्प, शांत बसू लागली, त्यांची आग्रही, संतापी भूमिका नरमली, त्यांची अधिकाराविषयीची संवेदनशीलता कमी झाली, तर हे सारे मनातले अनुकूल निरोगी बदल नसतील असं समजावं. उलट आता त्यांचं नैराश्य तीव्र होत चाललं असेल, असा सावधानतेचा इशारा इथे मी त्यांच्या काळजीवाहकांना देऊ इच्छितो. अशा वेळी काही माणसं इतरांना खूश करण्याचा निष्फळ कृत्रिम प्रयत्न करत राहतात. तर काही प्रयत्न सोडून देतात, कृतिशून्य होतात. फारच कमी माणसं या नैराश्यावर मात करून स्वप्रयत्नानं चांगले, सर्जक प्रयत्न करून आनंदी होतात.

या अशा आजारावर काही प्रभावी औषधं उपयुक्त ठरतात. सोबत समुपदेशनाचाही आधार घ्यावा हे उत्तम. आपले काही नकारात्मक विचार स्वप्रयत्नानं थांबवावे. त्या विचारांना महत्त्व देऊ नये. नकारात्मक भावनांपाशी रेंगाळू नये. त्या विचार/ भावनांनाच नाकारावं.
कोणते आहेत हे असे विचार?

पूर्वीच मी हे असं करायला हवं होतं.
सध्याच्या मनस्तापात पश्चात्तापाची भर घालू नका. ती संधी गेली. तो काळ गेला. त्याची किंमत मी व्यवहारात मोजलीदेखील. प्रत्येक निवडलेल्या पर्यायाची किंमत असतेच. ती चुकवावी लागते. सर्व पर्याय/ ऐच्छिक गोष्ट संपूर्णत: मान्य नसतात. त्या त्या वेळी ते स्वीकारावे लागतात. हे लक्षात ठेवल्यास पश्चात्तापाचा प्रसंग येणार नाही. पश्चात्तापाची तीव्रता कमी होईल. पश्चात्ताप सर्जक ठरेल, असं समजू नका. थोडी हळहळ, वाटल्यास त्वरेनं समोरच्या पर्यायाकडे वळा.

आयुष्यात मला काहीच नीट जमलं नाही अतिरेकी नकारात्मक भूमिका असे विचार देते. आपलं यश ती झाकून टाकते. आपल्याच चुका वाढवून सांगते. त्या त्या वेळच्या अपयशाला तुम्हाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी घटना, परिस्थिती, व्यक्तीदेखील कारणीभूत असतात. स्वत:ला दोष देणं बंद करा.
कुणीच मला समजून घेत नाही.

असं म्हणून खिडक्या-दारं बंद करून घेतलीत, तर हितचिंतक मित्र आत येऊ शकणार नाहीत. समोरचे आपल्याला समजून घ्यायला कमी पडत आहेत असं वाटत असल्यास समजुतीनं कसं सांगावं यावर चिंतन करा. एकदम नातेसंबंधावर फुली मारू नका. तुमची मानसिक गरज अनेकदा नेमकी तुम्हालाच समजून येत नाही. तर इतरांनी ती समजावी यासाठी वेगळय़ा शब्दात, वेगळय़ा स्वरात, वेगळी उदाहरणं, मुद्दय़ांसह प्रयत्न करावा.
मला हवं ते कधी मिळणारच नाही.

अशी भविष्यवाणी उच्चारू नका. कुणालाच भविष्यवेध घेता येत नाही. तुमचा भूतकाळ हे वाक्य तुमच्या मनात तयार करत असेल तरी तो भूतकाळ आहे हे लक्षात घ्या. आता हे लिहिता-वाचतानासुद्धा हे वाक्य जुनं झालेलं आहे. अपयशाची, अभावाची नीट छाननी करून भविष्याला सुसज्ज मनोधारणांनी व संतुलित व्यवहार्य प्रयत्नांनी सामोरे जा. तुमच्या आनंदी, सुखी जीवनासाठी प्रयत्न करण्याचं थांबू नका.सर्व काही एकदम नीट, ‘परफेक्ट’ केलं तर सर्व नीट होईल- ही भूमिका आशादायी, प्रेरणादायी वाटते खरी, पण ती अतिशयोक्त आणि म्हणून अपेक्षाभंगही करू शकेल. ‘मला जमेल ते सर्व करून पाहीन’ अशी भूमिका व्यवहारी ठरेल.

लवकरच मी प्रयत्नांना सुरुवात करतो- असं म्हणून सुस्त, गाफील राहू नका. त्या प्रयत्नांतले जे काही थोडेफार आज करता येतील तेवढे करा.
मात्र हे सारे विचार येत आहेत हे लक्षात आल्यावर करावयाच्या प्रयत्नांत सर्वात महत्त्वाचं पाऊल ठरेल ते मानसशास्त्राची, मनोविकार-मनोविकासतज्ञाची मदत त्वरित घेण्याचं. दोष सर्व जण उत्साहानं दाखवतील. योग्य दिशा देण्याचं काम मानसशास्त्र करेल याची खात्री ठेवा आणि निरोगी, निरामय मानसिकतेकडे वळा. काळजीवाहकानं, आप्तांनी, मित्रांनी, आपल्या घरातल्या प्रौढ माणसांमध्ये अशी लक्षणं दिसत असल्यास सजग होऊन त्याची मानसिक स्थिती समजून घ्यायला हवी. आदर, आस्था, आधाराबरोबर उत्तेजन, प्रोत्साहन, संवाद, प्रत्यक्ष मदत इत्यादी उपाय वापरून प्राथमिक मानसोपचार करावेत. त्वरित जवळच्या मानसतज्ञांशी संवाद साधावा. विलंब करू नये वा वेळखाऊ महाग आणि अवैज्ञानिक, अंधश्रद्ध उपचार करू नयेत.

पुरुषाची समाजातली भूमिका, पुरुषत्वाविषयीच्या पारंपरिक, आधुनिक, अवैज्ञानिक कल्पनांविषयी समाजात मंथन होणं आवश्यक आहे. पुरुषप्रधान समाजातली पुरुषाची भूमिका आधुनिक स्त्री-पुरुष समतेच्या काळात विसंगत, असमंजस आणि उपद्रवी ठरत आहे (तशी ती प्रतिगामी पूर्वीही होतीच!). समानतेच्या पायावर स्त्री-पुरुष नातेसंबंध अधिक प्रगल्भ, अधिक विकसित, प्रागतिक व वस्तुनिष्ठ होऊ शकतात. त्यातून निरामय आनंद निर्माण करता येतो. पुरुषत्वावरचं पारंपरिक श्रेष्ठतेचं ओझं कमी व्हायला हवं. स्त्रियांच्या हातापायातले पारंपरिक गुलामीचे साखळदंड तुटून ती मुक्त व्हायला हवी. समानतेच्या पातळीवर आले, तरच स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या हातात हात घालून जीवनाचा प्रवास सहज, सोपा, आनंदी करता येईल. उतरंडीवर उच्च जागी असलेल्या पुरुषाला घसरण्याची भीती, तर नीचस्थानी असलेल्या स्त्रीची शिडीवरील पुरुषाशी हात मिळवताना होणारी ओढाताण हवीच कशाला? दोघांकडे समसमान बुद्धी आणि विविध गुण आहेत. दोघांमधली भिन्नता, कलात्मक, सर्जक व विविध वैशिष्टय़ांनी युक्त आहे. एकमेकांचा विकास साधत वाटचाल केल्यास मेनोपॉझ व ॲन्ड्रोपॉझ हा काळ ही दोघं सुखानं घालवू शकतील. तसा प्रयत्न करणं यालाच संस्कृती (सह व सम्यक) कृती म्हणतात.
patkar.pradeep@gmail.com