उत्पल व. बा. utpalvb@gmail.com

‘तत्त्वविचार’ हा शब्द जड वाटला तरी तो महत्त्वाचा आणि दिशादर्शक आहे. प्रेम असो, राग असो, भौतिक इच्छा-आकांक्षा असोत की लैंगिक आकर्षण असो – आपण आपल्या वैचारिक सामर्थ्यांच्या आणि वैज्ञानिक दृष्टीच्या बळावर या प्रत्येक ऊर्मीचा तात्त्विक विचार केला तरच आपल्याला प्रत्यक्षात काय करायचं हे कळू शकेल. चूक-बरोबर ठरवण्याआधी ‘स्वरूप समजून घेणं’ महत्त्वाचं आहे.

रामगोपाल वर्माने दिग्दर्शित केलेला ‘नि:शब्द’ हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. साठ वर्षांचा एक गृहस्थ विजय (अमिताभ बच्चन) आणि त्याच्या विशीतल्या मुलीची मैत्रीण जिया (जिया खान) हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. यातून मोठा गहजब उडतो आणि सगळेच नातेसंबंध ताणले जातात. विजयच्या मनात अपराधभाव दाटून येतो आणि शेवटी सगळीच नाती तुटतात. कथेचा शेवट दु:खात होतो.

आपण ही कथा उदाहरणादाखल म्हणून घेऊ या, पण ती उदाहरणादाखल आहे हेही लक्षात ठेवू या. या कथेतील पुरुषाच्या जागी स्त्री असू शकेल आणि ती तिच्याहून वयाने बऱ्याच लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडू शकेल. किंवा एखाद्या उदाहरणात समवयस्क स्त्री-पुरुष लग्नबाह्य़ प्रेमात पडू शकतील. ‘नि:शब्द’मध्ये विजयच्या मनात जे होतं ते प्रातिनिधिक आहे. वास्तविक पाहता प्रेमात पडणं ही एक चांगली गोष्ट आहे. सुंदर गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूने असं म्हणता येईल की तिचं उदात्तीकरण करण्याचीही खरं तर गरज नाही. एक सहज भावना म्हणून प्रेमाकडे बघण्यात काहीच अडचण असता कामा नये. प्रेमात गुन्हेगारी स्वरूपाचं काहीच नाही. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. स्त्री-पुरुषांमधील प्रेम हे सहजतेने घेतलं जात नाही. मुळात आपण प्रेमात पडलो म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय असं प्रेमात पडणाऱ्यालाच आधी वाटतं. पहिल्यावहिल्या किंवा तारुण्यातील प्रेमात बहुधा असं वाटत नाही, पण लग्न झाल्यावर किंवा प्रौढावस्थेत कुणाविषयी प्रेम वाटलं तर अपराधभावाने मन दबून जातं. असं होतं कारण आपण प्रेमभावनेला स्वतंत्र, मोकळं ठेवलेलं नाही. स्त्री-पुरुषांमधील ‘रोमँटिक लव्ह’ हा सुटा विषय म्हणून रोमांचक वाटला तरी प्रत्यक्ष जगण्यात आपण प्रेमाला ‘ओझं’ केलं आहे किंवा ते आपल्याकडून झालं आहे. आदिम अवस्थेपासून आजच्या अवस्थेपर्यंत येताना आपण अनेक गोष्टी स्वीकारल्या, अनेक नाकारल्या, अनेक गोष्टींना वळण दिलं. त्यामुळे आपलं मानस हे स्वतंत्रपणे, आपण एकटय़ाने घडवलेलं असणं शक्य नाही. आपल्या मानसिकतेमागे ‘माणसाची महाकथा’ उभी आहे. आपलं मन हे एका अर्थी ‘प्रोग्रॅम्ड’ आहे. पण माणूस आणि इतर सजीवांमध्ये एक प्रमुख फरक असा केला जातो की, ‘माणूस हा जाणिवेची जाणीव असणारा सजीव आहे’. त्यामुळेच तो जाणिवेला आकार देऊ शकतो. मागच्या लेखात आपण युव्हाल हरारीने मांडलेली ‘कल्पित वास्तव’ ही संकल्पना पाहिली होती. आपण ‘कल्पित वास्तवा’वर विश्वास ठेवणारे मनुष्यप्राणी आहोत, पण ‘कल्पित वास्तव’ आपण निर्माण करतो याचीही आपल्याला जाणीव आहे.

मग या आपल्या बलस्थानाचा आपल्याला उपयोग होऊ शकेल का? विजय आणि जिया प्रेमात पडल्यावर जो गहजब उडतो तो टाळून त्या दोघांच्या जाणिवांकडे थोडय़ा तटस्थपणे बघणं आपल्याला शक्य आहे का? आपण जी नैतिकतेची भक्कम भिंत आपल्या आंतरिक प्रेरणांभोवती उभी केली आहे त्या भिंतीवर चढून पलीकडे पाहायचा प्रयत्न आपण करू शकतो का? गडबड अशी होते की ही भिंत आहे, हा जगाचा शेवट नाही हेच आपण लक्षात घेत नाही. भिंतीपलीकडे काहीतरी असू शकतं हा विचार करायला आपण शिकायला हवं. वरील उदाहरणात विजय त्याच्या प्रेमाबद्दल बायकोला लगेच सांगू शकत नाही. अपराधभाव त्याला ग्रासून टाकतो. तो तिला सांगतो पण कालांतराने. इतक्या वर्षांच्या सहजीवनानंतर तो आपल्या मनातलं मोकळेपणाने, दडपण न घेता बायकोला सांगू शकत नाही कारण असं काही होणं हे चुकीचं आहे अशी दोघांचीही ठाम धारणा आहे. वास्तविक लग्न झालेलं असताना अन्य कुणाविषयी प्रेम/आकर्षण वाटणं हे मुळात याचं द्योतक आहे की या मानवी ऊर्मीचा लग्न झालेलं असण्या/नसण्याशी संबंध नाही. लग्नव्यवस्था, त्यावर आधारलेली कुटुंबव्यवस्था जर इतकी कार्यक्षम आणि परिणामकारक असेल तर स्त्री-पुरुषांच्या मनात असे विचारच येता कामा नयेत. पण तसं होताना दिसत नाही. कारण व्यवस्था हा नियमनाचा प्रयत्न असतो आणि त्याबद्दल व्यवस्थेचा आदर करायला हवाच, पण व्यवस्थेतून निर्मूलन होऊ शकत नाही.

विनोबा भावे यांचं ‘स्वराज्यशास्त्र’ नावाचं एक छोटंसं पण राजकीय विचारासंदर्भात अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. यात त्यांनी ‘राजकीय प्रश्नाचा कृत्रिम अर्थ’ आणि ‘राजकीय प्रश्नाचा स्वाभाविक अर्थ’ दिले आहेत. भाषाभेद, धर्मभेद, आर्थिक भेद हे मूळ भेद नव्हेत. त्यामुळे तेवढेच लक्षात घेऊन व्यवस्था कशी राखायची हा राजकीय प्रश्नाचा कृत्रिम अर्थ आहे असं ते लिहितात. समाजात स्वाभाविकपणे वर्ग असा कोणताच नाही, तर कमी-अधिक सामर्थ्यांची माणसे आहेत. या कमीअधिक सामर्थ्यांच्या माणसांनी मिळून आपली व्यवस्था कशी राखून घ्यावी हा राजकीय प्रश्नाचा मूलभूत आणि स्वाभाविक अर्थ होतो असं त्यांचं प्रतिपादन आहे. ‘कृत्रिम अर्थ’ आणि ‘स्वाभाविक अर्थ’ हा भेद आपण स्त्री-पुरुष संबंधांबाबत पाहिला तर ‘नैतिकदृष्टय़ा अमुक एक वर्तन योग्य असताना स्त्री-पुरुष त्याचं पालन करत नाहीत म्हणून प्रश्न निर्माण होतात’ हा झाला कृत्रिम अर्थ. ‘प्रेम, रोमँटिक क्षण अनुभवायची आस, शारीरिक आकर्षण, मैत्रभाव, राग-द्वेष-कंटाळा, नात्यातील साचलेपण यांसारख्या इतर मानवी भावना अशा विविध पातळ्यांवर स्त्री-पुरुषांमधील आंतरसंबंध कायम कार्यरत असतात. तर त्यांची व्यवस्था कशी लावायची हा मूलभूत अर्थ आहे (केवळ स्त्री-पुरुषच नव्हे, तर सर्वच मानवी संबंधांना हे लागू होईल). लग्न, लिव्ह इन, ओपन मॅरेज हे व्यवस्थांचे पर्याय आहेत. त्यातून स्त्री-पुरुष संबंधांचं नियमन होईल हे खरं, पण म्हणून व्यवस्थेला पावित्र्य बहाल करणं हे स्वत:ची फसवणूक करण्यासारखं आहे. स्त्री-पुरुष संबंधांबाबत गरजेचं काय असेल तर ती सम्यक, तटस्थ दृष्टी. प्रेमामुळे, लैंगिक आकर्षणामुळे स्त्री-पुरुषात जे घडतं त्याकडे ‘जगबुडी आली’ या भावनेने न बघता मानवी जाणीव म्हणून बघता येण्याची क्षमता (आणि याचं प्रशिक्षण किशोरवयात सुरू व्हायला हवं. जीवनकौशल्य या विषयावर आपण या लेखमालेत बोलणार आहोत.).

आपल्यावरील संस्कार, प्रस्थापित नैतिकता आणि यामुळे घडलेलं आपलं मानस यातून संपूर्णपणे मुक्त होणं आपल्याला शक्य नाही. पण या सगळ्याबरोबरच प्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळीने आपल्याला दिलेलं दुसरं एक साधन आहे ते म्हणजे तर्क आणि विवेक. आपल्याभोवती जे घडतं त्याला आपल्यावरील ‘संस्कारां’निशी सामोरं जाण्यापेक्षा ‘विवेका’ने सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. ‘नि:शब्द’ चित्रपटाचं उदाहरण पाहिलं तर आपला नवरा वयाने मुलीएवढय़ा असलेल्या मुलीच्या प्रेमात पडला आहे हे कळल्यावर बायको आणि मुलीला धक्का बसणं हे समजण्यासारखं आहे. पण आता हे घडलं आहे तर त्याला सामोरं जायचा मार्ग आपण शोधू या हा विवेकी विचार आहे. स्त्री-पुरुषांमधील जैविक ताण प्रबळ होतात, होऊ शकतात हे स्वीकारत या संबंधांचं व्यवस्थापन करणं ही विवेकी कृती आहे. पण इथेच दृष्टीचा प्रश्न येतो. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी स्वच्छ नाही. प्रेमात माणूस बहकतो, तो स्वत:ला समर्पित करू पाहतो आणि त्यातून त्याचंच नुकसान होतं या काळजीपोटी त्याला सावधगिरीचा सल्ला देणं हे ठीक, पण म्हणून प्रेम नाकारण्याला अर्थ नाही. मला असं वाटतं की एकीकडे चित्रपट आणि कथांमधून उभं केलेलं प्रेमाचं उदात्त रूप, प्रेम हे सर्वस्व आहे अशी कल्पना आणि दुसरीकडे प्रेमाचा साधा स्वीकारही न करणारं जातीय, वर्गीय आणि सांस्कृतिक वास्तव या परस्परविरोधी शक्तींमध्ये आपण आपलं स्वत:चं, व्यक्ती म्हणूनचं, स्त्री-पुरुष म्हणूनचं ‘प्रेमाचं आकलन’ करून घेण्यात कमी पडतो. ते जर होऊ  शकलं तर आपण प्रेमामुळे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टींमुळे हबकून जाणार नाही. विजयच्या बायको आणि मुलीने ‘तुम्ही दोघे प्रेमात पडला आहात. आता हे नातं पुढे कसं न्यावं असं तुम्हाला वाटतं? या नात्याची आणि इतर नात्यांची व्यवस्था कशी लावावी असं तुम्हाला वाटतं?’ असे प्रश्न विचारणं अधिक गरजेचं आहे. या प्रश्नांमध्ये सहजीवनाचं नवीन प्रारूप तयार व्हायच्या शक्यता आहेत.

‘तत्त्वविचार’ हा शब्द जड वाटला तरी तो महत्त्वाचा आणि दिशादर्शक आहे. प्रेम असो, राग असो, भौतिक इच्छा-आकांक्षा असोत की लैंगिक आकर्षण असो – आपण आपल्या वैचारिक सामर्थ्यांच्या आणि वैज्ञानिक दृष्टीच्या बळावर या प्रत्येक ऊर्मीचा तात्त्विक विचार केला तरच आपल्याला प्रत्यक्षात काय करायचं हे कळू शकेल. चूक-बरोबर ठरवण्याआधी ‘स्वरूप समजून घेणं’ महत्त्वाचं आहे. पुढील लेखात आपण ‘प्रेमाची व्यवस्था’ लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘पॉलीअ‍ॅमरी’ या संकल्पनेच्या ‘अंमलबजावणी’विषयी बोलू. या संकल्पनेवर गेल्या वर्षी एक विस्तृत लेख मी ‘चतुरंग’मध्येच लिहिला होता. ज्यांनी तो लेख वाचला नसेल त्यांना  https://loksatta.com/lekh-news/articles-in-marathi-on-what-is-polyamorous-relationship-1580267/ या लिंकवर तो वाचता येईल.

chaturang@expressindia.com