भाजीपाल्याची लागवड करावयाची असल्यास त्यास चार ते सहा इंच खोली पुरेशी होते. पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू अशा पालेभाज्यांची लागवड करताना बियाणे किंवा देठाची लागवड केली तरी चालते. एकदा बियाणे अंकुरले व त्यांना पाने फुटली की ती कापून घ्यावीत. खोडे तसेच जमिनीत ठेवावीत. पुन्हा वीस ते पंचवीस दिवसांत त्यास नवीन फुटवा येतो व आपल्याला भाजी मिळते.
फळभाजीसाठी १२ ते १६ इंच खोलीची कुंडी किंवा वाफ्याची गरज असते. भाजीपाल्याच्या नर्सरीत फळभाजीची तयार रोपे मिळतात. ती आणून लागवड करावी. म्हणजे बियाणांचा खर्च वाचतो तसेच ती रोपे मोठी करण्यात पडणारे श्रम आणि काळज्या वाचतात. रोपांची लागवड साधारणत: सायंकाळी करावी, म्हणजे रात्रभरात ती मूळ धरतात. शक्य झाल्यास त्यांना सुरुवातीला दोन-तीन दिवस अर्ध ऊन-सावलीत ठेवावीत म्हणजे तग धरतात. वांगी, मिरची आदी फळवर्गीय झाडं यांना फळं येऊन गेलीत की ते महिनाभराचा विसावा घेतात. पुन्हा फळे येतात. झाड जुनं झालं की त्यास खोडापासून चार इंचांवर छाटावं त्यास पुन्हा बहर येतो.
विविध वेलवर्गीय भाज्या या वाफा पद्धतीत छान बहरतात. वेलांच्या वाढीचं, त्याला लागणाऱ्या फळांचं एक नसíगक तंत्र आहे. वेल हा मातीच्या पृष्ठभागात ६ ते १० इंच खोलीपर्यंत लावलेला चालतो. पण वाफा हा लांब असावा. कारण वेलाच्या मुळ्या जितक्या लांब पसरतील तितक्याच तो वेल बहरतो. बऱ्याचदा कुंडीत, गोणीत लावलेल्या वेलाची पाने पिवळी पडतात, फुले गळून पडतात, फळं अर्धवट अवस्थेत गळून पडतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे मुळांना पसरायला जागा नसते. त्यांना पोषण कमी पडतं. वाफा पद्धतीत वाल आणि त्याचे विविध प्रकार, कारलं, डांगर, देवडांगर, गिलके, भोपळा, दोडके, पडवळ, काकडी, तोंडली, चवळी यांचीही लागवड करता येते.
कंदवर्गीय भाज्यांना सहा ते आठ इंच खोली लागते. शक्यतो कंदमुळांना जेवढा ऑक्सिजन घेता येईल तेवढे त्याची वाढ व वजन वेगाने वाढते. कंदमुळांना शक्यतो माती किंवा भरणपोषण हे भुसभुशीत असावं. कंदवर्गात मुळा, लाल मुळा, गाजर, रताळी, बीट, बटाटे घेता येतात. यातील गाजर हे प्रत्येक कुंडीत, वाफ्यात लावलं तर उत्तम. कारण दुधाळ वनस्पती मातीतील सूक्ष्म घटकांचं विघटन करून ते इतर झाडांना देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीप चव्हाण
sandeepkchavan79@gmail.com

मराठीतील सर्व परसबाग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top tips for home gardening
First published on: 19-12-2015 at 01:03 IST