‘‘आमचा शेरू आता नाही.

संपूर्ण हयातभर कुटुंबातल्या सगळय़ांकडून पुरेपूर लाड करून घेऊन आणि बदल्यात आम्हाला प्रेम देऊन तो गतवर्षी आमच्यातून निघून गेला. आता त्याच्या श्वानभगिनी अवनी आणि एंजल यांनी पुन्हा गोकुळ नांदतं केलं आहे. पाळीव प्राण्यांसाठी त्यांचं जग फक्त आपणच असतो! खरंच, ही आगळीवेगळी दुनिया आहे. कुठून आणतात हे प्राणी इतकं निव्र्याज प्रेम? की आपलं विश्वच ते स्वत:चं विश्व मानतात!’’ सांगताहेत प्राणिप्रेमी मेघा काळे.

Nagpur, Man Stabs Brother to Death in Nagpur, Dispute about Parents, murder in nagpur, crime in nagpur, marathi news, crime news, nagpur crime news,
आईवडीलांना शिवीगाळ; मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
posthumous organ donation of two women gave life to four people
शेतात राबणाऱ्या ‘त्या’ दोघींच्या मरणोत्तर अवयवदानातून चौघांना जीवनदान
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या

House is not a home without a dog हे वाक्य आम्हाला एकदम लागू पडतं. लहान असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याची गोष्ट ऐकली होती. तो अतिशय स्वामिनिष्ठ होता. तसंच उत्कट आणि एकनिष्ठ प्रेम आम्हाला आमच्या ‘शेरू बेटा’कडून कायम मिळालं. २५ सप्टेंबर २००८ रोजी मी ऑफिसमध्ये असताना माझ्या नवऱ्याचा, म्हणजे राहुलचा फोन आला की, ‘सहा महिन्यांचं एक पिल्लू घरी आणतोय. स्वत:च घरी येऊन बघ तू. फोटो पाठवणार नाही.’ त्यामुळे घरी पोहोचेपर्यंत उत्सुकता होती. शेरू जातिवंत जर्मन शेफर्ड असल्यामुळे सहा महिन्यांचा असला तरी मोठा आणि राजिबडा होता. पहिले दोन दिवस शेरू उदास होता. कदाचित त्याला त्याच्या पहिल्या घराची आठवण येत असावी. हळूहळू आम्ही आणि तो एकमेकांना समजून घ्यायला लागलो. आम्ही ऑफिसला जाताना त्याच्या चेहऱ्यावर रडवेला भाव असायचा.

शेरूचे डोळे अतिशय बोलके होते. खिडकीतून खाली वाकून बघत बसायचा. मग आम्ही त्याला सांगायचो, ‘‘कामाला जातोय, संध्याकाळी लवकर येणार.’’ मगच तो आत जायचा! आणि संध्याकाळी घरी गेल्यावर आमचं जोरदार स्वागत व्हायचं. अंगावर उडय़ा! शेरू चप्पलसुद्धा काढायला द्यायचा नाही. मांडीमध्ये त्याचं डोकं खुपसून लाड करून घ्यायचा. त्याशिवाय सोडायचाच नाही. माझे सासरे ऑफिसमधून यायच्या वेळी त्यांची गाडी इमारतीच्या गेटमध्ये आलेली फक्त त्यालाच समजायचं आणि मग त्याची लगेच चुळबुळ चालू! अगदी दारातच जाऊन उभा राहायचा आणि दार उघडून दिलं की, विजेच्या वेगानं खाली धावत जायचा. बाबा गाडीचं दार उघडून ठेवायचे आणि मग शेरू विंगमधून गाडीत उडी मारायचा. संध्याकाळची त्याची हक्काची फेरी असायची. आमच्या घरातली कुणीही व्यक्ती बिल्डिंग परिसरात आल्याचं आम्हाला शेरूच्या हालचालींवरून कळायचं. कान टवकारलेले, नजर तीक्ष्ण आणि रोखून पाहाणं सुरू झालं, की आम्हालाही वर्दी मिळायची.

माझ्या सासूबाई त्याच्यासाठी ऑफिसमधून येताना व्हॅनिला आइस्क्रीम आणायच्या. शेरूसाठी त्याला आवडणारे पौष्टिक लाडू, मोतीचूर लाडू आणि खास रवा केक हा खाऊ नेहमी आणला जायचा. आमचे बाबा चेंडू लपवायचे आणि शेरू तो शोधून काढायचा. चेंडूशी खेळणं त्याला फार आवडायचं. गाडी तर जीव की प्राण असल्यामुळे शेरू आमच्याबरोबर पुणे, गुहागर, नाशिक, महाबळेश्वर आणि अगदी खारेपाटणपर्यंत फिरला होता. सगळय़ा ठिकाणी छान राहायचा. कसलाही त्रास नव्हता त्याचा.

आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशींचं स्वागत शेरू जोरदार भुंकून करायचा. त्या कोणत्याही खोलीत गेल्या, की शेरू त्यांच्या मागे मागे जायचा. त्या कधी आल्या नाहीत, तर त्यांची वाट बघत दारापाशी बसून असायचा! मावशीही शेरूची दृष्ट काढायच्या. शेरूचा वाढदिवससुद्धा छान व्हायचा. त्याला आम्ही ओवाळायचो. अशा अनेक न पुसल्या जाणाऱ्या आठवणी आहेत आमच्या मनात. शेरू साधारण ११ वर्षांचा झाल्यावर म्हणजे २०१९ पासून त्याच्या हालचाली मंद व्हायला लागल्या. पलंगावर चढताना आणि गाडीत चढताना त्याला मागून धरायला लागायचं. त्याला सोबत म्हणून ऑक्टोबर २०२० मध्ये आमच्याकडे अकरा महिन्यांची ‘गोल्डन रीट्रीव्हर’ जातीची गोंडस कुत्री आणली. शेरूला बहीण मिळाली. तिचं नाव अवनी. आम्हाला वाटायचं, शेरू इतकी र्वष एकटा होता, त्यामुळे तिच्याबरोबर रुळेल का? परंतु दोघंही छान रुळले. ‘दादा कुठे?’ म्हटल्यावर अवनी त्याच्याकडे बघायची. असा आमचा लाडका बेटा २ ऑक्टोबर २०२१ रोजी आम्हाला सोडून गेला. जायच्या आधी महिनाभर तो झोपून असायचा, उठू शकत नव्हता. त्याला वेदना होत असाव्यात, म्हणून तो जागच्या जागी फिरून जमिनीवर आणि िभतीवर डोके आपटायचा. ते मात्र आम्हाला बघवायचं नाही. अवनी त्याच्या जखमा चाटून बऱ्या करायची. तेव्हा ‘करोना’मुळे मी ऑफिसचं काम घरूनच करायचे. त्यामुळे शेरूकडे पूर्ण लक्ष देता आलं. सुरुवातीला शेरूला त्या अवस्थेत बघणं जड गेलं. नंतर आम्ही असा विचार केला, की त्याचे जितके दिवस राहिले असतील ते छान आणि सुसह्य जाऊ देत. त्याला दोन गाद्यांवर ठेवलं आणि सर्व बाजूंनी लोड आणि उशा ठेवल्या, जेणेकरून त्यानं डोकं आपटलं तरी लागणार नाही. माझी जवळची मैत्रीण त्याच्यासाठी मोतीचूर लाडू, पेढे घेऊन आली होती. ते खाताना त्याच्या डोळय़ांत जे भाव होते ते डोळे अजूनही मला समोर दिसतात. शेरूला दिवसातून दोनदा डेटॉलनं पुसून घ्यायचो. महिनाभर रात्री जागरण झालं, पण त्याचा त्रास कधी झाला नाही. हे सर्व लिहिण्यात आमचा मोठेपणा अजिबात नाही, पण शेरू जणू आमचा मुलगाच होता! मी २२ सप्टेंबरला गिरनारला जाणार होते, पण माझा पायच निघत नव्हता. आमचे कुंभारेकाका मला म्हणाले, ‘‘तुम्ही काळजी करू नका. श्री दत्त महाराजांनी तुम्हाला शेरूसाठीच बोलावलं आहे.’’ योगायोग असा, की माझं तिकडे देवदर्शन झाल्यावर इकडे शेरू उठून बसायला लागला होता. तसंच आमच्याबरोबर आलेल्या रश्मीमैयांनी ३० सप्टेंबरला नर्मदामैयाचं तीर्थ आमच्याकडे प्रसाद म्हणून पाठवलं. आपल्यालाही सहज न मिळणारा गिरनारचा प्रसाद आणि नर्मदामैयाचं तीर्थ शेरूला सहज मिळालं. तीर्थ घेतल्यावर शेरू एका दिवसातच म्हणजे २ ऑक्टोबरला गेला. जणू काही यासाठीच तो थांबला होता! शेरूवर आम्ही अग्निसंस्कार केले.

जवळपास १४ वर्षांचा ऋणानुबंध आमच्या मनात ठेवून आमचा शेरू कायमचा लांब गेला. आम्ही तीन दिवस दिवाही ठेवला होता. अवनी तिच्या दादाच्या दिव्यापाशी बसून होती पहिल्या दिवशी! निव्र्याज प्रेम असतं हे. आमच्या बिल्डिंगमध्ये कामाला येणाऱ्या मावशी मला नेहमी म्हणतात, की तुमचे प्राणी भाग्यवान आहेत; पण त्यांच्यापेक्षा आम्हीच सर्वात भाग्यवान आहोत. सध्या आमच्याकडे अवनीबरोबर एंजल ही ‘लॅब्रेडोर’सुद्धा आहे. या तिघांशी जुळलेले आमचे ऋणानुबंध खूप अनमोल आहेत. शेरूनं आमच्या आयुष्यात येऊन खूप आनंद दिला. त्याच्याबरोबर खेळण्यात, बोलण्यात कसा वेळ जायचा ते कळायचंच नाही. शेरूची आठवण आली की, डोळय़ांत पाणी येतं. अजूनही घरी गेल्यावर असं वाटतं, की शेरू येईल लाड करून घ्यायला आणि नजर त्याला शोधत राहाते. त्याच्या भुंकण्याचा आवाज अजून कानात रेंगाळतो आहे..

आमच्याकडे मांजरी, कावळे, चिमण्या यांच्यासाठीसुद्धा खाणं ठेवलं जातं. माझा भाऊ नेहमी मला म्हणतो, की तुमचं घर म्हणजे एक प्राणिसंग्रहालयच आहे! राहुलचं, माझ्या पतींचं दहिसरला प्राण्यांचं पाळणाघर आहे. प्राण्यांचे पालक त्यांच्या चार पायांच्या बाळांना राहुलकडे ठेवून निर्धास्तपणे बाहेर जातात आणि ते परत घ्यायला आले की, या बाळांना होणारा आनंद बघण्यासारखा असतो! न बोलता बरंच काही सांगणारे प्राणी आपल्याला निरपेक्ष प्रेम करायला शिकवतात, आपली दुनिया समृद्ध करतात. आपल्या जगात आपल्यासाठी आपले नातेवाईक आणि मित्रपरिवार असतो; पण पाळीव प्राण्यांसाठी त्यांचं जग फक्त आपणच असतो! खरंच, ही आगळीवेगळी दुनिया आहे. प्राणी आणि लहान मुलं, यांच्याबरोबर जो निर्मळ आनंद मिळतो त्याची तुलना कशाबरोबर होऊच शकत नाही. आपल्यापेक्षा प्राणी खूप जास्त नि:स्वार्थी आणि प्रेमळ आहेत.
आपण जर त्यांच्यासारखं एक टक्का जरी चांगले वागलो, तरी हे जग सुंदर होईल!
megharahulkale@gmail.com