scorecardresearch

आनंदी दुनिया

माझ्यात एकदम नाटक शिरले कुठून, ते कळत नाही. मात्र एखाद्या भुताने झपाटावे तसे अगदी नकळत्या वयातच रंगभूमीने हे झाड धरले.

आनंदी दुनिया

‘‘माझ्यात एकदम नाटक शिरले कुठून, ते कळत नाही. मात्र एखाद्या भुताने झपाटावे तसे अगदी नकळत्या वयातच रंगभूमीने हे झाड धरले. म्हणजे मी खूप नाटके पाहिली नाहीत. अगदी आजही मी संख्येने खूप नाटके बघत नाही. याचे कारण माझा रंगभूमीशी संबंध बाहेरून पाहण्याचा नाही, निर्मितीचा आहे. सर्जनाचा आहे. आतला आहे. एक पूर्णपणे वेगळी, आनंदाची दुनिया, माझ्या मनातच नव्हे, तर संबंध व्यक्तिमत्त्वात तयार झाली.’’  सांगताहेत प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार रत्नाकर मतकरी.
नाटककार, दिग्दर्शक, निर्माता आणि कधी कधी नट, या सगळ्याच नात्यांनी माझा रंगभूमीशी जो संबंध आला, त्या अनुभवाविषयी हा लेखनप्रपंच. अनुभव केवळ शारीरिक नसतो. मानसिक, वैचारिकही असतो.
आजवर नेहमीच मी रंगभूमीशी (मराठीच, पण ती प्रातिनिधिक समजायला हरकत नाही.) वेळोवेळी काय आणि कसा संबंध आला, याचा विचार केला. रंगभूमी हे काय कोडे आहे, हे वेगवेगळ्या पातळ्यांवरून समजून घेण्याचा प्रयत्न केला. तरीही रंगभूमीशी माझे काय नाते आहे, हे समजले नाही. मी रंगभूमीच्या नादाने काय काय केले हे पाहिले. पण मुळात रंगभूमीचा हा नाद मला लागला कसा, हे समजले नाही.
आमच्या घरात कुणाला नाटकाचा नाद नव्हता. वडिलांना वाचनाची, लेखनाची जशी आवड होती, तशीच थोडीफार नाटके पाहण्याची, वाचण्याची आवड होती; पण त्यापलीकडे खास असे काही नाही. ना कुणा नाटकवाल्यांशी मैत्री, ना रंगमंचापाठीमागे जाणे-येणे. नाटक-सिनेमा फार पाहणेही घरात नाही. किंबहुना जे काय थोडे-फार होते, तेही माझ्या वाढीच्या वयात, कमी होत गेले. असे असताना माझ्यात एकदम नाटक शिरले कुठून, ते कळत नाही. मात्र एखाद्या भुताने झपाटावे तसे अगदी नकळत्या वयातच रंगभूमीने हे झाड धरले. म्हणजे मी खूप नाटके पाहिली नाहीत. अगदी आजही मी संख्येने खूप नाटके बघत नाही. याचे कारण माझा रंगभूमीशी संबंध बाहेरून पाहण्याचा नाही, निर्मितीचा आहे. सर्जनाचा आहे. आतला आहे.
तो मात्र कसा निर्माण झाला हे तेव्हा कळले नाही. आताही ठाऊक नाही. माझ्या परीने मी त्याचे स्पष्टीकरण शोधले आहे. म्हणजे वाचनाची आवड, आजूबाजूला नाटकांची पुस्तके असणे वगैरे. पण ते सगळे लक्षात घेऊनही हे समजणे कठीण आहे, की तेवढय़ाने एक पूर्णपणे वेगळी, आनंदाची दुनिया, माझ्या मनातच नव्हे, तर संबंध व्यक्तिमत्त्वात कशी तयार झाली? या दुनियेत मी सुरुवातीला स्वेच्छेने प्रवेश करू शकलो. पुढे माझी इच्छा असो वा नसो, आजूबाजूला पोषक वातावरण असो वा नसो, माझ्या डोळ्यांसमोर नाटय़प्रयोग येतच असे. त्याचा मला रोज त्रासही होत असे. या जगण्यात कॉलेजच्या दिवसांमध्ये आणि नंतरही. पण पुढे त्याची सवय झाली. माझा, मनातल्या या रंगभूमीच्या दुनियेत शिरण्यावर ताबा राहिला नाही, या अर्थाने मी झपाटलेला राहिलो.
सुदैवाने, या झपाटलेपणाचे नुसतेच वेडात रूपांतर झाले नाही, कारण माझी विचारशक्ती शाबूत होती. ती रोजच्या जगण्याशी ताळमेळ ठेवायला मदत करत असेच, पण मला दिसणाऱ्या दृक्प्रतिमांनाही पोषक असे. ती मला शक्य तेवढे वाचन, चिंतन करायला लावत असे. या वाचन-चिंतनाचे प्रमाण माझ्या उत्स्फूर्ततेच्या प्रमाणात खूपच कमी असे, पण झपाटलेपणाचे रूपांतर काही विधायक गोष्टींमध्ये करण्यासाठी मात्र त्याची खूपच मदत होई. म्हणजे असे, की वॉर्डन रोडवरून चालत असताना, सरत्या संध्याकाळी, पियानोवरची एखादी धून ऐकू आली, की मरीन लाइन्सवरच्या एखाद्या जुन्या ब्रिटिश बंगल्याची बाग त्याच्याशी जुळून जाई आणि मनात एक पूर्ण नेपथ्य उभे राही. पण विचारशक्ती सांगे की, हे नुसते रोमँटिक जग नाही; या बागेत एक किडे खाणारे झाडदेखील असू शकते. मग हे झाड ज्याने तिथे लावले, तो माणूस कसा असेल? तो पूर्ण दुष्ट असणार नाही. कारण ते पियानोचे सूर- तेही या चित्राचा भाग आहेत. मग काय तो स्वत:च्या नकळत दुष्टपणाने वागतो? त्याच्या परीने तो असहाय आहे का? आणि झाडाने खाल्लेले किडे- या माणसाच्या वासनेचे बळी कोण?.. त्या माणसाला पत्नी आहे का? तिचे स्थान काय? अशा विचारातून, मनातल्या नेपथ्य-संगीताला हळूहळू अर्थ येई- अर्थाला एक शरीर मिळे. मात्र विचारांची प्रक्रिया आता सांगितली तशी पायरीपायरीची नसे. तीही गतिमान, झपाटलेपणाचीच असे.
वर उल्लेख आला आहे, तो त्रासाबरोबरच आनंदाचा. हा आनंद काही तरी निर्माण होण्याच्या प्रक्रियेतून आलेला, खरोखरीच वर्णन करायला कठीण असा. आपण या दुसऱ्या दुनियेत आपले आपण आहोत, स्वतंत्र आहोत, या अस्पष्ट जाणिवेचा त्या आनंदाशी संबंध होता. बाहेरचे जग अस्तित्वात आहे; पण आता त्याचा आपल्यावर ताबा नाही, अशी काहीशी स्वातंत्र्याची भावना तयार होत असे. रोजचे जग असे पुसट होत जाणे, त्याचे महत्त्व कमी कमी होत जाणे, यामुळे माणूस अडचणीत येऊ शकतो. त्याचे करिअर धोक्यात येते, त्याला असाव्यात तेवढय़ा महत्त्वाकांक्षा असत नाहीत. जगाच्या नजरेत आपली प्रतिमा रुबाबदार कशी करावी, याचा विचार तो करीनासा होतो. पण या सगळ्या गोष्टी तेव्हा तरी त्याच्या ध्यानात नसतात, कारण तो एका वेगळ्या आनंदात असतो. आत्ता म्हटले तसे भौतिक अर्थाने त्याचे नुकसान होत असले, तरी त्यात त्याचा फायदाही असतो. कारण रोजच्या जगात पदोपदी दिसणारा स्वार्थ, संकुचितपणा यांचा त्याला फारसा त्रास होईनासा होतो. एवढेच नाही तर अडचणी, क्लेशदायक घटना यांचेही फार काही वाटेनासे होते. सर्वसामान्य तरुणाला असतील त्या सर्वच अडचणी मलाही होत्या. थोडय़ा जास्तच होत्या. कारण माझ्या अभ्यासातल्या हुशारीमुळे ज्या प्रकारच्या ‘अ‍ॅकॅडमिक’ अपेक्षा माझ्याकडून केल्या गेल्या होत्या, त्या मी पुऱ्या करू शकलो नाही. अशा अपेक्षांचे ओझे फेकून देऊनही, कुठलीही कौटुंबिक जबाबदारी न टाळणे, हे तणावाचे असतेच. तो तणाव मला कधी जाणवला नाही, कारण मी मनाने रंगभूमीच्या दुनियेत केव्हाही प्रवेश करून मोकळा होऊ शकत होतो.
सर्जनाच्या आनंदाबरोबरच मला, वर म्हटले त्याप्रमाणे आणखी एका गोष्टीचा लाभ होत होता, तो स्वातंत्र्याचा. गंमत म्हणजे घरच्या जबाबदाऱ्यांपासून मी जे स्वातंत्र्य घेतले नाही, ते सर्जनात मात्र अवश्य घेतले. हे साधले ते पुन्हा वर म्हटल्याप्रमाणे भौतिक आशा, अपेक्षा, आकांक्षा न ठेवल्यामुळेच. आपण लिहिलेले छापून यावे, त्याची पुस्तके निघावीत, त्यांना पारितोषिके मिळावीत, एकांकिकांचे स्पर्धामधून प्रयोग व्हावेत, असले काहीच मला वाटत नसे. सुरुवातीला नाही, नंतरही नाही. खूप लहान वयात ‘सत्यकथा’सारख्या सन्माननीय मासिकात माझ्या एकांकिका, प्रौढांसाठीच्या परीकथा छापून आल्या. त्या वेळी ‘सोफिस्टिकेटेड’ छपाई ही मला वाटते, फक्त ‘सत्यकथा’चीच होती. त्यामुळे त्यात छापून आलेले, बघायला चांगले वाटले. पण यापलीकडे मला काही विशेष सन्मानाची भावना जाणवली नाही. कारण त्याच वेळी तेंडुलकरांच्या संपादनाखाली निघणाऱ्या ‘वसुधा’मध्येही मी लिहीत असे आणि त्याचाही मला आनंद वाटत असे. किंबहुना माझ्या मनात ‘सत्यकथा’ची जी प्रतिमा होती, ती मी शाळेत असताना वाचत असे त्या ‘सत्यकथा’च्या अंकाची, ४९-५०चा तो काळ असेल. त्या अंकांवर दीनानाथ दलालांची- बायकांचीच, पण दलालांच्या वेगळ्या शैलीतली मुखपृष्ठे असत, ज्यातली काही, मी अजूनही प्रेमाने जपून ठेवली आहेत. हे विषयांतर झाले, पण सांगायचा मुद्दा असा, की एकदा ‘सत्यकथा’मध्ये लिहिले, म्हणजे आपण थोर साहित्यिक झालो, इतर सगळे तुच्छ असे वाटण्याच्या त्या काळात, माझ्यावर काही ‘सत्यकथा’ पद्धतीचे लिहिण्याचे दडपण आले नाही. भागवत-पटवर्धन यांच्याविषयी मला नितांत आदर होता. अजूनही आहे. मात्र आमचे क्वचितच काही बोलणे होई. लिखाण खटाववाडीत नेऊन दिले की, एकदम अंकातच पाहायला मिळे. त्यात कधीच बदल नसे, त्यामुळे बोलणेही नसे. तात्पर्य, कुणाला आवडावे, म्हणून काही लिहिण्याचा प्रश्नच कधी आला नाही.
या दडपण न घेण्याच्या सवयीमुळेच ‘बालनाटय़ा’कडे वळणे सोयीचे गेले. मुलांसाठी लिहिणे हे दुय्यम, असे तेव्हाही समजले जायचे, अजूनही जाते. म्हणून तर आपले काही श्रेष्ठ लेखक, थोडेसेच बालवाङ्मय लिहून पुन्हा प्रौढांकडे वळले. पण माझ्या हे डोक्यातही आले नाही, कारण मुलांसाठीचे एक नाटक माझ्या डोळ्यांसमोर दिसत होते, ते करायला हवेच होते. मग कसली लेखकाची प्रतिमा आणि कसले काय? सुधा करमरकर बरोबर मी दोन-तीन (तिसरे ‘शुभंकरोति कल्याणम्’ फक्त एका संमेलनातल्या प्रयोगापुरते!) नाटके केली. तिचे आणि माझे संबंधही चांगले होते; पण माझ्या कल्पनेतले नाटक ती कशी करू शकेल? म्हणून मी माझी स्वत:ची ‘बालनाटय़’ संस्था वयाच्या २४व्या वर्षी काढली. केवळ आपल्याला हवेत ते रंगप्रयोग करून पाहण्यावर कुणाचे दडपण नको, म्हणून!
स्वातंत्र्य हा माझ्या दृष्टीने सर्जनासाठी अत्यावश्यक घटक असतो; पण त्याची किंमत द्यावीच लागते. ती, मी आणि प्रतिभा, आम्ही दिली. मुलांच्या नाटकाचा घाटय़ातला कारभार चालवणे आर्थिकदृष्टय़ा कठीण आणि प्रयोग लावणे शारीरिक आणि मानसिक कष्टाचे. पण हे सगळे तिने निभावले. माझ्यापर्यंत कटकटी येऊ दिल्या नाहीत. फक्त सर्जनाशी संबंधित प्रश्नच माझ्याकडे आणले. त्यामुळे माझी जी लिखाणासाठीची स्वातंत्र्याची कल्पना होती, ती अबाधित राहिली. स्वातंत्र्याची एक आणखी वेगळ्या प्रकारची किंमतही मोजावी लागते. तुम्ही स्वावलंबी आहात, याचा अर्थ दुसऱ्याची मदत घेत नाही. याचा त्या दुसऱ्यांना नेहमीच त्रास होतो. त्यामुळे प्रत्येक निर्मितीगणिक शत्रू वाढत. विशेषत: राज्य नाटय़स्पर्धा ही नामवंत संस्थांच्या विरोधात जिंकल्यामुळे त्यातून खोऱ्याने शत्रू तयार झाले, पण आमचा काही इलाज नव्हता. यातली ‘आरण्यक’, ‘लोककथा ७८’सारखी महत्त्वाची नाटके, आम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो असतो, तर रंगमंचावर येऊच शकली नसती! -ज्यांच्याशी आमचा परिचयही नाही, अशा अनेकांचे शिव्याशाप घेऊनही, आम्हाला जे म्हणायचे आहे ते म्हणण्यासाठी स्वतंत्र निर्मिती करावी लागली! ती यशस्वी झाली, हे सुदैव!
मुलांच्या नाटकांत आणि प्रायोगिक नाटकांत स्वतंत्रपणे माझे मला अनेक प्रयोग करून पाहता आले आणि त्यातून वेळोवेळी काही शिकतादेखील आले. माझी नाटके मी इतरांनाही दिली, पण मोठय़ा, नावाजलेल्या संस्थांकडे मी कधीही नाटक घेऊन गेलो नाही. याचे साधे कारण असे की, माझा कोणाकडेच काही घेऊन जाण्याचा स्वभाव नव्हता. मासिकांकडेही छापण्यासाठी कथा पाठवणे मी कधी केलेच नव्हते. कदाचित ही माझी असमर्थता असेल. माझ्या स्वभावातला भिडस्तपणा असेल; पण त्यामुळेच मला स्वत:ला हवे तेच लिहिता आले. कोणा निर्मात्यासाठी, कोणा दिग्दर्शकांसाठी, कोणा नटासाठी स्वत:च्या मर्जीविरुद्ध लिहावे लागले नाही. मी स्वत:च्या डोळ्यांसमोर जे नाटक आले ते लिहिले. रंगभूमीच्या किंवा समाजाच्या उपयोगाचे आहे, असे जे वाटले, त्या परकीय नाटकाचेही रूपांतर केले. लिहिले मुळात स्वत:साठी. स्वत:च्या मनात आलेले लिहून टाकायलाच हवे, या निकडीने. ते रंगमंचावर कोण आणील, याचा विचार न करता. ते कोणासाठी आहे, याचा विचार न केल्यामुळे अमक्यासाठी उजवे लिहावे, तमक्यासाठी थोडे डावे चालेल, असा प्रश्नच येत नसे. स्वत:चे समाधान होईपर्यंत पुन:पुन्हा संस्कार करून संहिता लिहून ठेवायची आणि नंतर ती बाजूला ठेवून द्यायची, अशी माझी पद्धत. चांगल्या हेतूने आलेल्या निर्मात्याला, मग तो नवा असला तरी चालेल, त्याने मागितल्यास लिहून ठेवलेले नाटक त्याला द्यायचे, असेच मी आजवर करत आलो. मोठय़ा निर्मात्यांनी नाटक केल्यामुळे मिळणारे फायदे मला मिळाले नाहीत, बरीचशी नाटके अकाली बंद पडली, हे खरे; पण स्वत:च्या मनाप्रमाणे संहिता लिहून झाली आणि कुणाकडेही जावे न लागता, ती रंगमंचावर आली, एवढेच समाधान मला पुरेसे होते.
तरीही नाटकावर अन्याय झाल्यास दु:ख व्हायचे ते होतेच. अशा वेळी मी वर म्हटलेली आनंदाची दुनिया माझ्यासाठी खुली असते. दु:खाची आणि अन्यायाची रोजची दुनिया हळूहळू धूसर होत जाते आणि पुन्हा नव्या कल्पना, नवे नाटक यांच्यात मी बुडून जातो. हा आनंद, हे जीवनातल्या वाईट गोष्टींवर मात करणे, हे मला रंगभूमीने दिलेले वरदान. हे तिचे आणि माझे आनंदाचे नाते. नाटके पाहणे, त्यांविषयी चर्चा करणे, अशा कुठल्याही बाह्य़ गोष्टींशी संबंधित नसलेले आंतरिक नाते!
या नात्याचा अनेक वेळा उपयोग झाला. मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात मला अनेकांचे वाईट अनुभव आले आहेत. दिलेला शब्द न पाळणे, नैतिक जबाबदारी न मानणे, कामापेक्षा इतर गोष्टी महत्त्वाच्या मानणे, निष्ठा नसणे, अशा गोष्टी गेल्या काही वर्षांत वाढतच गेल्या म्हणा. हे अध:पतन सर्वच क्षेत्रांत झालेले आहे, त्याला रंगभूमी तरी अपवाद कशी असणार? अहंकार, कंपूबाजी ही तर सर्वत्रच दिसतात तरीही, मी स्वत:ला रंगभूमीवरच्या सर्जनशील कामापुरते मर्यादित ठेवले आणि या क्षेत्रातल्या राजकारणापासून लांब राहिलो, म्हणून वाचलो. मात्र खरे वाचवले ते डोळ्यांसमोर दिसत असलेल्या त्या रंगभूमीच्या जादूनेच! दिवसभरातल्या वाईट अनुभवांचा विचार करत जरी रात्री झोपी गेलो, तरी सकाळी जाग येते, ती पुन्हा नवीन कल्पनांसकट! त्यामुळे काल घडलेले धूसर वाटू लागलेले असते, काही वेळात ते विसरलेही गेलेले असते. मला या कल्पना सतत सुचत नसत्या, तर मी किती विषण्ण झालो असतो कोण जाणे!.. पण सुचलेली कल्पना मार्गी लावण्याचे काम समोर असल्यामुळे विषण्ण व्हायला वेळच नसतो. अर्थात, मार्गी लावणे म्हणजे त्याच्यावर विचार करणे आणि हा विचार लिहून काढणे.. पुढे त्याचे काय होईल, हे आपल्या हाती नाही. पण आतापुरती तरी त्या कल्पनांनी आपली विषण्णता दूर केली आहे, याचे समाधान वाटते.
मी परमेश्वर मानतो. नाही तर, अगदी बालपणापासून आतापर्यंत कुठल्या शक्तीने माझ्यासाठी, रंगभूमी नावाचे एक आनंदाचे उद्यान खुले केले आणि आजपर्यंत ते सतत बहरत ठेवले?
मात्र कधी कधी असाही एक विचार मनात सलतो की, आपण आपल्याच आनंदाचा विचार केला. इतरांसाठी काय केले? मग जनतेच्या थेट उपयोगी पडणारे अनेक जण दिसतात. सीमेवरचे सैनिक दिसतात, अग्नीशी झुंज घेणारे फायर ब्रिगेडिअर्स दिसतात, अंधांना दृष्टिदान करणारे डॉक्टर्स दिसतात. वेश्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणारे समाजसेवक दिसतात. बालमजुरांना त्यांचे बालपण परत देणारे दिसतात. वाटते, काय अचाट लोक आहेत हे?.. आपल्याला असे काही का करता आले नाही?
पण आता ते पुढल्या जन्मावर गेले! – म्हणजे, तो असलाच तर!
(‘माझे रंगप्रयोग’ या आगामी आत्मचरित्रातून, साभार)
छाया – प्रदीप कोचरेकर

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-07-2013 at 01:01 IST

संबंधित बातम्या