क्रोध ही समस्या बनते, ती त्याच्या दुष्परिणामांमुळे. क्रोधामुळे माणसाचे स्वत:वरील नियंत्रण पूर्णपणे जाते अथवा सल होते, त्याची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होते व त्याच्या हातून चुका घडू लागतात व मग त्याला या चुकांचे परिणाम भोगावे लागतात.
एकदा एक गृहस्थ तीर्थयात्रा करून आले. तीर्थयात्रेची सांगता करताना कोणत्या तरी एका गोष्टीचा त्याग करावा लागेल असे त्यांना भटजींनी सांगितले. पण या गृहस्थांना काहीच सोडवेना. त्यांच्याजवळ असलेले सर्व काही त्यांना हवेहवेसेच वाटत होते. शेवटी त्यांनी ‘आजपासून मी राग सोडला,’ असे म्हणत हातावरून उदक सोडले. तीर्थयात्रा संपवून ते घरी परतल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी त्यांचे अनेक मित्र व नातेवाईक येऊ लागले. त्यातील एकाने त्यांना ‘तुम्ही या तीर्थयात्रेच्या शेवटी काय सोडले,’ असे विचारले. ‘मी राग सोडला,’ असे त्या गृहस्थांनी उत्तर दिले. त्यांच्या मित्राने तोच प्रश्न त्यांना पुन्हा विचारला व त्यांनीही पुन्हा तेच उत्तर दिले. परंतु त्यांच्या मित्राचे समाधान होईना. त्याने तोच तो प्रश्न विचारणे चालूच ठेवले. शेवटी ते गृहस्थ रागाने म्हणाले, ‘किती वेळा तुम्हाला सांगायचे, की मी राग सोडला आहे म्हणून. एकदा सांगून तुम्हाला कळत नाही का?’ त्याबरोबर त्यांचा मित्र उद्गारला, ‘तुम्ही रागाला सोडले म्हणता, पण त्याने मात्र तुम्हाला सोडलेले नाही. तो अजूनही तुमच्याबरोबरच आहे.’
माणसाने कितीही राग सोडायचा म्हटले तरी तो सुटत नाही. राग सोडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले की, मग माणसाला अधिकच राग येतो. राग आलेल्या व्यक्तीला आपणास राग आला आहे हे कधीच मान्य होत नाही. तिला जर कोणी म्हटले की, एवढे रागवायला काय झाले, तर ती लगेच म्हणते की मला कुठे राग आला आहे; तुम्हालाच तसे वाटते आहे. एखाद्यास आलेल्या रागाची इतरांनी दखल घेणेही आवश्यक असते. अशी दखल न घेतल्यास त्याला अधिकच राग येतो. ‘मी एवढा रागावलोय, पण कुणालाही त्याचे काहीच वाटत नाहीये,’ असे विचार आपल्यापकी किती तरी जणांनी मनातल्या मनात अनुभवले असतील. राग हा केवळ माणसाच्याच पाचवीला पुजलेला आहे असे नाही, तर बडय़ा बडय़ा देवतांना व ऋषिमुनींनाही त्याने सोडलेले नाही. कामदेवाच्या खोडीने ध्यानभंग झालेल्या शिवाने क्रोधायमान होऊन आपल्या क्रोधाग्नीने कामदेवास कसे भस्म केले याची कथा बहुश्रुतच आहे. तसेच क्रोधित ऋषींमुनींनी त्यांच्या क्रोधास कारणीभूत असलेल्या व्यक्तींना दिलेल्या शापांच्या अनेक कथा आपल्याला पुराणांमध्ये वाचावयास मिळतात. मानवी इतिहासातदेखील क्रोधित राजांनी त्यांच्या प्रजेवर केलेल्या जुलमांच्या तसेच संपूर्ण राज्येच्या राज्ये नष्ट केल्याच्या कथा वाचावयास मिळतात. आत्ता, अगदी हल्लीच्या काळात देखील रागाचा उद्रेक व त्याचे दुष्परिणाम दर्शविणाऱ्या अनेक घटना आपणास पाहावयास मिळतात. राग किंवा क्रोध म्हणजे नेमके काय? त्याचे स्वरूप कसे असते? हा माणसाच्या पाचवीलाच पुजलेला आहे की, त्यापासून माणसाची सुटका होऊ शकते? रागाला नियंत्रित कसे करायचे?
क्रोधाच्या प्रक्रियेची तीन अंगे स्पष्टपणे दिसतात. डिवचले जाणे, त्यामुळे आपल्या आत संवेदना निर्माण होणे आणि त्यातून आपली प्रतिक्रिया बाहेर पडणे. क्रोधाची ढोबळ व्याख्याच करायची झाली तर क्रोध म्हणजे डिवचले गेल्याने माणसाच्या आत निर्माण होणाऱ्या संवेदनेतून उमटणारी प्रतिक्रिया. क्रोधाची ही तीन अंगे शारीरिक, भावनिक व वैचारिक अशा तिन्ही पातळींवर असतात. डिवचण्याची प्रक्रियादेखील या तिन्हींपकी कोणत्याही पातळीवर सुरू होऊ शकते. रस्त्याने चालताना कोणी जर आपल्याला विनाकारण ढकलले तर आपल्याला राग येतो व पटकन आपल्या मुखातून प्रतिक्रियात्मक शब्द बाहेर पडतात, ‘‘काय रे ए, दिसत नाही का, की तुझे डोळे फुटलेत.’’ या ठिकाणी डिवचण्याची प्रक्रिया ही शारीरिक पातळीवर सुरू झालेली असते. आपल्या भावनांना दुसऱ्याकडून जर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर आपल्याला राग येतो. एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या िहसक घटना या भावनिक पातळीवर डिवचले गेल्याने येणाऱ्या रागाचे उत्तम उदाहरण आहे. आपले विचार, आपल्या समजुती, अपेक्षा, आपली तत्त्वे, यांना कोणीतरी मोडता घातल्याने येणारा राग हा वैचारिक पातळीवर डिवचले जाण्याचे उदाहरण होय. डिवचण्यातून निर्माण होणारी संवेदना ही मात्र तिन्ही पातळ्यांवर असते. आपल्याला राग येतो तेव्हा आपला रक्तदाब वाढतो, शरीराचा दाह होऊ लागतो. अंगाची लाहीलाही होणे हा वाक्प्रचार त्यातूनच उद्भवला असावा. आपल्याला अस्वस्थ वाटू लागते, जिवाची तगमग होऊ लागते, रागास कारणीभूत झालेल्या गोष्टीला इजा पोहोचवावीशी वाटते. त्यातून मग आपले विचारचक्र सुरू होते. ते सर्व विचार रागास कारणीभूत झालेल्या गोष्टीसंबंधी असतात. दुसऱ्याला राग आला आहे हे आपल्याला त्याच्या प्रतिक्रियांवरून कळते. राग आणणाऱ्या व्यक्तीची हत्या करणे, तिला चपराक लगावणे, अद्वातद्वा बोलणे, वस्तूंची मोडतोड करणे, आदळआपट करणे, रागाने पाहणे, अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्तीनुरूप पाहावयास मिळतात. अशा प्रतिक्रिया होणे म्हणजे राग व्यक्त करणे होय. बरेच मानसोपचारतज्ज्ञ राग आला तर तो व्यक्त करून काढून टाका करण तो आतच राहिला तर अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण करू शकतो, असा सल्ला देतात. बऱ्याच वेळा राग आलेली व्यक्ती बाहेरून कोणतीच प्रतिक्रिया दाखवीत नाही, पण आतून मात्र रागाची संवेदना अनुभवत असते व ही संवेदना विरून गेली की, मग ती व्यक्ती राग तात्पुरता का होईना, विसरते. यालाच आपल्याकडे राग गिळणे असे म्हणतात. रागाचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर तो गिळायला शिका, असाही सल्ला बऱ्याच वेळा दिला जातो.
क्रोध ही समस्या बनते ती त्याच्या दुष्परिणामांमुळे. क्रोधामुळे माणसाचे स्वत:वरील नियंत्रण पूर्णपणे जाते अथवा सल होते, त्याची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होते व त्याच्या हातून चुका घडू लागतात व मग त्याला या चुकांचे परिणाम भोगावे लागतात. क्रिकेटच्या खेळात गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक जेव्हा फलंदाजाला अपशब्द बोलून वा अन्य हरकती करून डिवचतो तेव्हा त्याचा उद्देश त्याला राग आणणे हा असतो. फलंदाजाला राग आला म्हणजे त्याची एकाग्रता भंग होते, खेळावरचे त्याचे लक्ष कमी होते व मग त्याच्याकडून चुका घडू लागतात. या चुकांचा गोलंदाजाला फायदा मिळून फलंदाजाला आउट करणे सोपे होते. राग हा पूर्णपणे वाईट असतो का, या प्रश्नाला बहुतेकांचे नाही असेच उत्तर असते. आपल्याला जर राग आलाच नाही तर इतर लोक आपला गरफायदा घेतील, असे आपल्यातील बहुतेकांना वाटत असते. तसेच रागावल्यामुळे काही वेळा गोष्टी सोप्या होतात असेही पुष्कळांना वाटते. उपद्व्याप करणारे, त्रास देणारे मूल शिक्षक अथवा पालक यांना आलेल्या रागामुळे तात्पुरते का होईना पण लगेच शांत होते. या ठिकाणी एका मजेदार व्यंगचित्राचा उल्लेख करणे अनुचित होणार नाही. बालमानसशास्त्राचे पुस्तक वाचून त्रास देणाऱ्या लहान मुलाला शांत करण्याचा प्रयत्न करणारे वडील जेव्हा त्या पुस्तकानेच त्या मुलाला एक रट्टा मारतात, तेव्हा ते मूल लगेचच शांत होते.
रागाचे अनेक प्रकार दिसून येतात. कोणावरही अन्याय होताना पाहून जेव्हा माणसाला राग येतो तेव्हा त्याला सात्त्विक संताप असे म्हणतात. कारण या ठिकाणी रागाचे कारण व्यक्तिगत नसून मानवनिष्ठ असते. असा सात्त्विक संताप चांगलाच नव्हे तर आवश्यकही मानला जातो. त्यामुळे माणसातील वाईट प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होते असे समजण्यात येते. रागाचा उद्रेक, त्यातून निर्माण होणारी िहसा व त्यानंतर ओसरणारा त्याचा आवेग हा रागाचा सर्वसामान्य प्रकार झाला, परंतु रागाचे आणखीही प्रचलित प्रकार आहेत. बऱ्याच वेळा रागाचा लगेच उद्रेक न होता तो दीर्घ काळ धुमसत राहतो. अशी व्यक्ती मग अशांत झालेली दिसते व ही अशांतता वेळोवेळी त्या व्यक्तीच्या वागण्यातून स्पष्ट होते. या ठिकाणी बाह्य़ परिस्थितीमुळे राग लगेच व्यक्त होऊ शकत नाही व म्हणून तो आतल्या आत धुमसत राहतो. रागाचे मुख्य कारण आत खोलवर कोठेतरी दडून बसलेले असते, पण बाहेरील क्षुल्लक कारणे त्याला डिवचून थोडय़ाफार प्रमाणात व्यक्त होण्यास भाग पाडत असतात. बऱ्याच वेळा रागास कारणीभूत झालेली व्यक्ती निघून गेलेली असते, मात्र आलेला राग हा दुसऱ्याच व्यक्तीवर काढला जातो. यालाच आपल्याकडे वडय़ाचे तेल वांग्यावर काढणे असे म्हणतात. ऑफिसमध्ये वरिष्ठांचा आलेला राग घरी आल्यावर बायकामुलांवर काढणे, एखादा गुंड त्रास देऊन गेल्यावर भोवतालच्या दुर्बळ व्यक्तींवर डाफरणे, ही अशा प्रकारच्या रागाची उदाहरणे नित्यच बघायला मिळतात. चिडचिडणे हाही रागाचा एक प्रकार नेहमी पाहवयास मिळतो. अशा व्यक्तींना चिडचिडय़ा स्वभावाच्या म्हणून ओळखले जाते. त्यांच्या रागाचे ठोस असे काही कारण नसते. पण वेळोवेळी घडणाऱ्या विविध गोष्टींमुळे ते सतत चिडलेले असतात. अशा प्रकारचा राग मोठय़ा िहसेच्या स्वरूपात व्यक्त न होता तो त्या व्यक्तीच्या वागण्यातून व्यक्त होत राहतो. अशा व्यक्तीच्या वागण्यात एक प्रकारचा तिरसटपणा असतो. उपरोधिकपणे बोलणे, दुसऱ्यातील चांगल्या गुणांचे कौतुक न करता त्याच्यातील दोष मोठे करून सांगणे, सतत लहानसहान कारणांवरून भांडणे, इत्यादी या प्रकारच्या रागाची उदाहरणे सांगता येतील.
रागाचे व्यवस्थापन कसे करायचे व त्यातून आपल्याला हवे असलेले परिणाम कसे मिळवायचे आणि नको असलेले परिणाम कसे टाळायचे यासंबंधी अनेक मार्गदर्शक पुस्तके व लेख इंटरनेटवर उपलब्ध आहेत, परंतु रागाच्या प्रक्रियेपासून मानव पूर्णपणे मुक्त होऊ शकतो का, हा एक पूर्णत: भिन्न प्रश्न आहे व त्याचा स्वतंत्रपणे विचार होणे आवश्यक आहे.
(उर्वरित भाग २० जुलैच्या अंकात)     किशोर खैरनार,
संचालक, कृष्णमूर्ती एज्युकेशन ट्रस्ट
संपर्क : kkishore19@gmail.com

sea level rise
समुद्र वाढता वाढता वाढे; आपल्या आयुष्यावर काय परिणाम?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?