पुरुष हृदय बाई : वेगळेपणा म्हणजे विषमता नव्हे

सदराच्या शीर्षकातील ‘हृदय’ म्हणजे मानसिकता. स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेवर विवेचन करण्याअगोदर माझी मूल्य-वैचारिक भूमिका थोडक्यात सांगतो.

|| राजीव साने

‘स्त्री-पुरुषांच्या स्वभावात लिंगामुळे नैसर्गिक गुणवैशिष्ट्ये नसतातच आणि पितृसत्ताक व्यवस्थेने ठाकूनठोकून मुरवलेले ‘मेल ट्रेट्स’ व ‘फीमेल ट्रेट्स’ हे उपरे असल्याने ते काढून टाकता येतील, बदलता येतील, अशी जहाल स्त्रीवाद्यांची श्रद्धा असते. मला मात्र हे मान्य नाही. स्त्रीदास्याचा उगम राज्य-धर्म-अर्थ-संस्था यातच पाहिल्यामुळे आपण हे विसरतो, की मनुष्य बनण्याअगोदरच्या जीवउत्क्रांतीच्या कथेतच स्त्रीदास्याचे मूळ दडलेले आहे. स्त्री व पुरुष यांच्यात अनेक बाबतींत वेगळेपणा आहे, पण वेगळेपणा म्हणजे नेहमीच विषमता नव्हे. स्वाभाविक वेगळेपणासह परस्परपूरकता शोधल्याने स्त्री-पुरुषांचे जगणे सौहार्दपूर्ण होऊ शकते.’     

सदराच्या शीर्षकातील ‘हृदय’ म्हणजे मानसिकता. स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेवर विवेचन करण्याअगोदर माझी मूल्य-वैचारिक भूमिका थोडक्यात सांगतो. माणसांनी एकमेकांशी सर्वत: समान, पण परस्परमारक असण्याऐवजी काही बाबतीत असमान, पण परस्परपूरक आणि म्हणूनच सौहार्दपूर्ण असणे चांगले, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. तसेच कोणाच्याही सुस्थिती/ दु:स्थितीमागे स्वकर्तृत्व, भाग्य आणि न्याय-अन्याय हे तीनही घटक काही ना काही प्रमाणात असतातच, असेही मी मानतो. ‘दोष हा कुणाचा?’ या प्रश्नापेक्षा ‘उपाय काय करायचा?’ या प्रश्नाला मी महत्त्व देतो. उपायांपैकी काही संघर्षात्मक असतीलही, पण संघर्षाच्या नादात अख्खी विचारसरणीच ‘शत्रूकेंद्री’ बनवण्यामुळे प्रचंड घात झालेला आहे.

जी जी अतिसामान्यीकरण केलेली विधाने असतात ती दिशाभूल करणारी असतात. कारण कोणत्या तरी ठरावीक दृष्टीने व मर्यादित प्रमाणावर सत्य असलेली निरीक्षणे, त्या त्या संपूर्ण लोकसंख्येवर लादली जातात. दुसरे टोक म्हणजे केस-स्टडी! सर्वच व्यक्ती अनन्य असल्यामुळे अमुक स्त्रीच्या दृष्टीने तमुक पुरुष (किंवा उलटे) असे या विषयाला हाताळता येणार नाही. कारण कोणत्याही व्यक्तिगत गुणदोषांमागे अगणित योगायोग दडलेले असतात व त्यामुळे कोणतीच केस (माझ्यासकट) प्रातिनिधिक नसते. तसेच कट्टर स्त्रीवादी असणारे स्त्री-पुरुष या ‘मानसिकतांकडे कसे बघतात?’ यातही अडकण्यात अर्थ नाही. तरीही, त्यात न अडकण्यासाठीच, स्त्रीवादाचे मुख्य प्रकार थोडक्यात उल्लेखिणे भाग आहे.

स्त्रीवादाचे मुख्य प्रकार

आधुनिक युगात ज्याला स्त्री-व्यक्ती-स्वातंत्र्यवाद (लिबरल फेमिनिझम) म्हणतात, तो मलाही मान्य आहे व बऱ्याचशा वाचकांनाही मान्य असणार. या प्रवाहाने फारच गौरवास्पद कामगिरी केलेली आहे व ती अपूर्ण असली तरी यशाच्या दिशेने वाटचाल करणार यात शंका नाही. शिक्षण, घराबाहेर रोजगार, घरकामाचे औद्योगिकीकरण, मतदानाचा अधिकार, विभक्त कुटुंबे, स्त्रीच्या पुढाकारानेही घटस्फोटाची तरतूद, संतती नियमनाची साधने, शस्त्रांचे शारीरिक बळावर अवलंबून नसणे आणि प्रचंड थेट संपर्क (केंद्रीकृत नसलेला) या मोठ्या घटना आणि वैयक्तिक पातळीवरील जागृती, विद्रोह व आत्मचिकित्सा यांमुळे ‘लिबरल फेमिनिझम’ सफल होत जाणार यात शंका नाही.

पण जहाल-स्त्रीवादाचे दोन प्रकार (जे मला मान्य नाहीत) तेही नोंदवले पाहिजेत. स्वभावात लिंगामुळे नैसर्गिक गुणवैशिष्ट्ये ‘नसतातच’! पितृसत्ताक व्यवस्थेने ठाकूनठोकून लादलेले/ मुरवलेले पुरुषी वृत्तिगुणसंच (मेल ट्रेट्स) व स्त्रैर्ण वृत्तिगुणसंच (फीमेल ट्रेट्स) हे उपरे असल्याने ते आरपार काढून टाकता येतील व डिझाइन करून बदलून ठेवता येतील, अशी जहाल स्त्रीवाद्यांची श्रद्धा असते. जहाल स्त्रीवादामध्ये दोन स्पष्ट प्रवाह आहेत व ते चक्क परस्परविरोधी आहेत. पहिला म्हणजे पुरुषी-जहाल स्त्रीवाद आणि दुसरा स्त्रैर्ण जहाल स्त्रीवाद.

 पहिल्या प्रवाहानुसार मुलींवर मुलग्यांसारखेच संस्कार करणे, आपण पुरुषांना आकर्षक वाटणार नाही याची काळजी घेणे, मुद्दाम लेस्बियनिझम ‘पाळून’ पुरुषांना ‘उरलो शुक्राणूपुरता’ असे निकालात काढणे आणि मेरीट निरपेक्ष हक्कमिळवत राहाणे, असा यांचा पितृसत्ता उलथून टाकण्याचा कार्यक्रम असतो. दुसऱ्या प्रवाहानुसार स्त्रैर्ण वृत्तिगुणसंच हेच जास्त मानवीय आणि जास्त पर्यावरणपूरक असतातच! ते स्वत:तही जपले पाहिजेत व पुरुषांतही आणले पाहिजेत. म्हणजे मुलग्यांवर मुलींसारखे संस्कार करावेत. पितृसत्ता उलथून टाकण्याऐवजी तिच्यातले वैयथ्र्य दाखवून जग सुधारत न्यावे, असा या प्रवाहाचा दीर्घकालीन कार्यक्रम असतो. पहिल्या ‘ब्रा-बर्निंग’, बॉयकट करणाऱ्या व जाडेभरडे मळकट रंगांचे कपडे घालणाऱ्या पुरुषी-जहाल स्त्रीवाद्यांच्या मुलींनी त्यांच्याविरुद्ध बंड करून ‘मला नाही आईसारखं रूक्ष व्हायचं’ अशी घोषणा दिली आणि त्यातून दुसरा प्रवाह तयार झाला. वादविवादात हे दोन्ही प्रवाह लिबरल फेमिनिझमवर आणि आपसात एकमेकांवर तुटून पडत असतात. हे दोन्ही प्रवाह विद्यापीठांच्या

कॅ म्पसमध्ये व स्वत:त मग्न अशा बंदिस्त जहाल गटांमध्ये अडकून पडतात आणि हे ‘लिबरल फेमिनिझम’साठी चांगलेच आहे.

जनुकीय उत्क्रांतीची पार्श्वभूमी

या पार्श्वभूमीवर स्त्री-पुरुषांनी आपण स्वभावत: (या स्वभावात प्रकृतीचे व संस्कृतीचे घटक बेमालूमपणे मिसळेले असतात) एकमेकांपेक्षा वेगळे आहोत व आधुनिक काळात निव्वळ वेगळे असण्यानेच आपोआप सत्तासंबंध उद्भवत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. सत्तासंबंध उत्क्रांतीतून आला आणि मध्ययुगीन काळात फारच तीव्र झाला. त्याने स्त्रियांवर अनन्वित स्थूल आणि सूक्ष्म अत्याचार केले व त्यांचे अंश आजही टिकून आहेत. तरीही आपण स्त्रीवादी आहोत म्हणून सगळीकडे स्त्रीवाद लावत सुटणे, जसे की स्त्री-कामगारांच्या ‘कामगार प्रश्नाला’सुद्धा ‘स्त्रीप्रश्न’च मानणे इत्यादी, हे माझ्या मते चूक आहे. एखाद्या सामाजिक एककात व भूमिकेत स्त्रीसुद्धा दमनकारी शासक असू शकते व तिच्याशी लढा द्यावा लागतो. पण शासितांनी शासकांशी कसे संघर्ष/ समन्वय करावे, हा प्रश्न मी या लेखात घेत नाहीये. सत्ता-संघर्ष या विषयात न अडकता, एकमेकांचा वेगळेपणा स्वीकारून, एकमेकांना समजावून व सांभाळून घेत मैत्र कसे साधावे, यावर या लेखात मी भर देत आहे.

स्त्रीदास्याचा उगम राज्य-धर्म-अर्थ-संस्था यातच पाहिल्यामुळे आपण हे विसरतो, की मनुष्य बनण्याअगोदरच्या जीवउत्क्रांतीच्या कथेतच स्त्रीदास्याचे मूळ दडलेले आहे. यासाठी उत्क्रांतीतील लैंगिक हितसंबंध समजावून घेतले पाहिजेत. जनुके टिकून राहण्याच्या दबावाखाली नर व मादी यांच्यात कसे कसे फरक पडले, याची कथा थोडक्यात पाहू.

नरांच्या दृष्टीने अफाट पुरवठ्याचे शुक्राणू जितक्या जास्त ठिकाणी टाकून ठेवू तेवढे चांगले असते. साहजिकच नर चंचल-बहुगामी बनतात. तरीही सर्वसाधारणपणे समुद्रात व आकाशात निर्विवाद मादीराज्य आहे. गडबड आहे ती जमिनीवर! पक्ष्यांच्या बाबतीत अंडे ही मोठी व आयुष्यात कमी वेळा येणारी ‘इन्व्हेस्टमेंट’ असल्याने पक्षीण अत्यंत सावध असते. जो नर उत्तम घरटे बांधून देईल, मादीलाही पिल्लू मानून चारण्याची क्षमता दाखवेल, अशाच नराची निवड पक्षिणी करतात. याला ‘सद्गृहस्थ निवड’ म्हणता येईल. मासा मादी कुठेही अंडी घालून ठेवते. नर जेव्हा त्यावर शुक्राणू टाकतो तेव्हा मादी अगोदरच गायब झालेली असते. मग हीच अपत्ये आपली, हे फक्त नरालाच स्पष्ट असते व म्हणून नरच अडकतो.

याउलट सस्तन प्राण्यात वेगळेच चित्र असते. गर्भारपण, बाळंतपण आणि अपत्यपोषण या गोष्टी मादीला चिकटूनच असतात व भारभूत होतात. यामुळे नरांची दादागिरी मुळात प्रस्थापित होते व त्यांच्यातल्या नरावर सद्गृहस्थ बनण्याचा दबाव कमी उरतो. आता सद्गृहस्थ नर उपलब्धच नसल्याने माद्यांचा मोर्चा आपल्या अपत्यांना कोणत्या नराकडून जोमदार जनुके मिळतील, या प्रश्नाकडे वळतो आणि ‘नरोत्तम निवड धोरण’ प्रस्थापित होते. नराच्या जनुकातून नर जास्त जास्त बलवान होत जातात. बलवान नर निवडून माद्यांनीच जणू स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. अर्थात माद्यांचे व पिलांचे रक्षण करणे हे काम नराकडे येते. आपण परापत्य रक्षणात तर ऊर्जा घालवत नाही ना (ककोल्डिंग) ही चिंता नरांना असते. यापायी इतर नरांना मारून टाकणे किंवा पळवून लावणे व आपण स्वत: दांडगा ‘अल्फा मेल’ (बहुमादी कुटुंबात मक्तेदार नर) बनणे अशी स्पर्धा सस्तन प्राण्यांतील नरांत असते. म्हणजे मादीदास्य प्राप्तीसाठी कितीतरी ‘नर’बळी दिले जातात! नरोत्तम निवडीमुळेच मादीने तिचे मूळचे निवडस्वातंत्र्य गमावलेले असते. माद्यांमध्ये आपण(ही) कशा पसंत पडू याची स्पर्धा असतेच. या पार्श्वभूमीवर आता मनुष्यप्राण्यात काय घडते हे पाहू.

मनुष्यातील आदिम श्रमविभागणी

दूरवर जाऊन शिकार करून आणणे हे पुरुषांकडे व जवळच्याच परिसरात शाकाहारी अन्नपदार्थ गोळा करून आणणे हे स्त्रियांकडे, ही श्रमविभागणी मनुष्यप्राण्यात फारच दीर्घकाळ होती. आता या क्षणी भाला फेकायचा की नाही? असे विरोधी निर्णय झटकन घेता येणे, इतर टीम मेम्बर्सची फील्डिंग बरोबर लागली आहे यावर विश्वास टाकणे, लांबवर प्रवासात पत्ता शोधणे,

हे सारे पुरुषांच्या वाट्याला आले. उलट, हे फळ आजच खुडावे की अजून पिकू देण्यासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी? असे सलगपटाचे निर्णय, भरपूर वेळ घेऊन, मग घेणे हे स्त्रीला परवडत होते. इतर जणी काय व कसे करतायत, हे प्रत्यक्ष जवळच दिसत होते. थेट उडी घेण्याचे ‘शेंडी-पारंबी’ निर्णय आणि गोल गोल विचार करत सावकाश होऊ देण्याचे निर्णय, यात फार फरक आहे व त्याचा मानसिकतेवरील परिणाम आजही टिकून आहे (अर्थात निरपवादपणे नाही). पुरुषांत वितुष्ट आले तर ‘एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन’ असे ‘बार्बारिक’ द्वंद्वयुद्ध होई. स्त्रिया एकमेकींवर लक्ष ठेवणे, एकमेकींविषयी अफवा पसरवणे आणि भरपूर ‘गॉसिप’ करणे हे करीत असत. आजही मुलगे दांडगाई करतात व मुली कुचुकुचु करतात, असे निरीक्षण शाळांमध्ये नोंदले गेलेले दिसते. अनेकदा असे आढळते, की स्त्री तिच्यापुढील प्रश्न (इश्यूज) मिक्सअप करते आणि पुरुष प्रांत पाडून, तुकडे पाडून विचार करतो. अर्थात सध्याच्या फारच गुंतागुंतीच्या श्रमविभागणीद्वारे, शिक्षणाद्वारे आणि प्रबोधनाद्वारे क्षमता व वृत्ती नव्याने आत्मसात करणे शक्य झाले आहे. स्त्री-वृत्तिगुणसंच व पुरुष-वृत्तिगुणसंच यांत बराच ‘ओव्हरलॅप’ (सामाईक संच) आलेला आहे. पुन्हा व्यक्ती तितक्या प्रकृती हे आहेच. निसर्गत:सुद्धा काही पुरुषांत काहीसे स्त्रैर्ण गुण व काही स्त्रियांत काहीसे पुरुषी गुण आढळतात. म्हणूनच ‘कल’ जास्त करून काय दिसतो, इतपतच निष्कर्ष काढता येतात.

निकोपपणेही वेगळेपणा

स्त्री मानसिकता आणि पुरुष मानसिकता यांत निकोपपणेही वेगळेपणा असतो. एकमेकांसारखे बनणे नव्हे, तर एकमेकांच्या वेगळेपणाबाबत सहिष्णू व समावेशक बनून पूरकता कशी साधता येईल हा विचार करणे आता जास्त अगत्याचे झाले आहे. अशा विचाराच्या एका लेखकाने त्याच्या पुस्तकाचे शीर्षक म्हणून ‘मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हीनस’ असे हास्यास्पद वाक्य वापरले आहे! कोणाचाच वाईट हेतू नसतानासुद्धा वेगळेपणा लक्षात न ठेवण्याने, नकळत कशा चुका होतात व त्यातून जे कलह होतात, ते कसे सहज टाळता येतील, अशा उदाहरणांनी हे पुस्तक भरलेले आहे. जेव्हा स्त्री काही सांगत असते, ते पूर्ण ऐकून न घेता पुरुष हमखास ‘पण यात मी करण्यासारखं काय आहे?’ किंवा त्याहून तुटक असेल! ‘पण मग मी काय करू?’ असे प्रश्न विचारून तो स्त्रीचा हिरमोड करतो. पुरुषांच्या दृष्टीने ‘सांगणे’ ही गोष्ट काहीतरी करण्यासाठी असते. पण स्त्रियांच्या दृष्टीने कित्येकदा ‘सांगणे हेच करणे’ असते. ते आस्थेने ऐकून घ्यावे, एवढीच पुरुषाकडून अपेक्षा असते. ‘हा आपलं काही ऐकूनच घेत नाही,’ असे वाटून ती रागावते. पुरुषाचे बोलणे जास्त करून निष्कर्षात्मक असते, तर स्त्रियांचे बोलणे जास्त करून वर्णनात्मक असते. पुरुष त्यांच्या विचारपद्धतीमुळे अनेक तपशील दुर्लक्षित करतात. पण ही उणीव स्त्रीच्या विचारपद्धतीमुळे भरून निघू शकते. अशा परस्परपूरकता शोधल्या गेल्या पाहिजेत.

वेगळेपण हे दमनामुळेच, भेदभावामुळेच येते, ही समजूत खोटी असल्याचे स्कँडेनेव्हियन देशांत आढळून आले आहे. तिथे स्त्री-पुरुष समता फारच चांगली आहे. स्त्रीने करण्याच्या ‘टिपिकल’ नोकऱ्या आणि पुरुषाने करण्याच्या ‘टिपिकल’ नोकऱ्या यांना समान वेतन आहे. तसेच कोणी कोणता जॉब करावा, याचे स्वातंत्र्यही आहे. असे असूनही स्त्रिया आपण होऊन  स्त्रीने करण्याचे ‘टिपिकल’ जॉब्ज (नर्स, डॉक्टर, शिक्षक, इ.) जास्त प्रमाणात आवडीने निवडत आहेत. हे आढळूनही ‘टिपिकली स्त्रीने करण्याचे जॉब्ज’ म्हणजे लादलेलेच असणार, अशी श्रद्धा असल्याने शत्रूकेंद्री विचारवंत ही बातमी ऐकून घ्यायलाही तयार नसतात.

प्रणय साफल्यासाठी

परस्परपूरकता साधण्याचे एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे खुद्द लैंगिकता होय. प्रणय ही त्यातील साफल्यासाठी व माधुर्यासाठी कसेही करून उरका पाडण्याची गोष्ट नसते. मनुष्यातला प्रणयप्रसंग बहुसंवेद्य असतो. कलाकृतीप्रमाणे बढत होत जात त्याचे संभोगात पर्यवसान व्हावे, हे जास्त साफल्यकारक असते. पुरुषाचा कामज्वर वेगाने चढू व वेगाने उतरू शकतो. स्त्रीची स्वाभाविकपणे एकच लय असते. पुरुषाला हुकमीपणे स्वावलंबन करता येत असल्याने व मोकळे व्हायचे असल्याने, प्रणयप्रसंगात विघ्न आले तरी तो सुटका मिळवू शकतो. स्त्रीचा उत्कर्षबिंदू इतका हुकमी नसतो व काही वेळा येतच नाही. यात स्त्रीला जे लटकलेपण येते ते त्रासदायक असते. तिची अशी निराशा होऊ नये याची काळजी पुरुषाने घेतली पाहिजे व त्यासाठी तिला शारीरिकरीत्या कुठे, कसे स्पर्श-कर्ष हवेसे वाटतात, हे आवर्जून शोधून काढले पाहिजे. स्त्रियांनीदेखील पुरुषांच्या साफल्यासाठी अभिव्यक्त प्रतिसाद दिला पाहिजे. संभोगाबाबत टाळाटाळ न करता सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे किंवा प्रतिसाद ‘नकोच’असा असेल तर पुरुषाने संयम पाळला पाहिजे.

प्रणयच नव्हे, तर सर्वच क्षेत्रात परस्परपूरकतेला वाव आहे. तो ओळखता आला पाहिजे. पालकत्व, श्रमविभागणी, लोकशाहीत सहभाग अशा सर्वच क्षेत्रांत नेहमी नमुनेदारपणे येणारे दमन, सत्तासंबंध, वर्चस्ववाद, हे विषय मान्य करूनही, एकमेकांच्या स्वाभाविक वेगळेपणाचा स्वीकार करून त्यात पूरकता शोधणे, याकडे दुर्लक्ष होऊ देता कामा नये.

rajeevsane@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Purush hriday bai author rajeev sane difference is not inequality akp

Next Story
खाणे, पिणे आणि खूप काही – गावाकडची चव : झणझणीत खांडोळी
ताज्या बातम्या