स्त्रियांवर होत असलेला लैंगिक अन्याय, अत्याचार याची नेहमीच चर्चा होते आणि ती होतच राहणार, मात्र अलीकडे अशा घटनांची वाढलेली संख्या आता धोक्याची पातळी ओलांडून पुढे जात असल्यामुळे त्याची कारणे काय आहेत, हे शोधत असताना पुरुषी लैंगिकतेचा प्रश्न सोडवल्याशिवाय किंवा तो समजून घेण्याशिवाय पुढे जाताच येणार नाही.
रोजच्या वर्तमानपत्रात एक तरी बलात्काराची, विनयभंगाची घटना समोर येत असतानाच दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील तरुणीचे निधन झाले नि सारा देशच चिडून उठला आणि इतके दिवस दबला गेलेला विषय उफाळून बाहेर आला तो म्हणजे पुरुषांना नेमकं झालंय तरी काय? स्त्रियांवर होत असलेला अन्याय, अत्याचार याची नेहमीच चर्चा होते आणि ती होतच राहणार. मात्र अशा घटनांची वाढलेली संख्या आता धोक्याची पातळी ओलांडून पुढे जात असल्यामुळे त्याची कारणे काय आहेत, हे शोधत असताना पुरुषी लैंगिकतेचा प्रश्न सोडवल्याशिवाय किंवा तो समजून घेण्याशिवाय पुढे जाताच येणार नाही.
पुरुषांच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर वयात येण्याचं वय कमी कमी होत जात आहे, ते जसं मुलींच्या बाबतीत होत आहे तसं मुलांच्या बाबतीतही होत आहे. परंतु त्याकडे मात्र आजपर्यंत कानाडोळाच केला गेला, कारण ते दिसून येत नाही. मुलांच्या बाबतीत वयात येताना लैंगिकतेच्या भावनेबरोबरच समाजात मुरलेल्या पुरुषीपणाच्या भावनाही वाढतातच. टीव्हीवरचा चोवीस तास सुरू असलेला नंगानाच, मुलींच्या देहाचं प्रदर्शन मांडणाऱ्या भडक जाहिराती, इंटरनेटने घरातच आणलेले सेक्सविषयक व्हिडिओ गेम्स, काहींच्या बाबतीत तर मोबाइलमध्येच इंटरनेट असल्याने वैयक्तिक स्तरावर काहीही बघता येण्याची मुभा या सगळ्यामुळे एका बाजूला सेक्सचं प्रचंड एक्सपोजर आहे तर दुसरीकडे योग्य वेळी योग्य ते लैंगिक शिक्षण न दिलं गेल्यानं, पालकांशी या विषयावर बोलता येत नसल्यानं होत असणारी कोंडी. त्यातच पुढे मुलीचा वाढता सहवास आणि त्याची मोकळी वागणूक यातूनच विवाहपूर्व आणि विवाहबाह्य़ शरीरसंबंधांच्या प्रमाणात झालेली वाढ या सगळ्यात प्रश्न निर्माण झाला तो मुलांच्या, तरुणांच्या लैंगिकतेचे प्रश्नही या सर्वात महत्वाचे आहेत, म्हणूनच या विषयावर काही पुरुषांनाच बोलतं केलं.
सम्यक संस्थेचे आनंद पवार याबद्दलची मांडणी करताना म्हणतात, ‘‘प्रजनन, लग्न, आणि लैंगिकता या तिन्ही गोष्टींकडे आपण स्वतंत्र विषय म्हणून पाहायला हवे. परंपरेने आपल्याकडे प्रजनन हे विवाहांतर्गत मान्य आहे. आणि लैंगिकता ही केवळ प्रजननापुरती मान्य आहे. पण प्रत्यक्षात लैंगिकतेची सुरुवात वयाच्या १० ते १२ वर्षांपासून सुरू होते, तिचे काय करायचे याचे कोणतेच उत्तर मुलांना कुणीच देत नाही. लैंगिकता प्रशिक्षण किंवा त्याबद्दलचा संवाद नसल्यामुळे लैंगिक अभिव्यक्ती ही दोघांच्या संमतीने, सकारात्मक, दोघांसाठी आनंददायी, अिहसक  असू शकते अशी समंजस मांडणी केली जात नाही. अनेकदा पोर्नोग्राफीमुळे लोक उत्तेजित होत असतील पण त्याची अभिव्यक्ती मात्र सत्तेशी जोडलेली असते. जिची छेड काढली तर फार ओरड होणार नाही किंवा जी गरीब आहे, सत्ताहीन आहे अशाच मुलीची निवड केली जाते. जिथे कुटुंबातील किंवा सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसेल अशा ठिकाणी ही अभिव्यक्ती केली जात नाही. अशा गुन्ह्य़ात गुन्हेगाराला शिक्षा ही झाली पाहिजे. मात्र या गुन्हेगारांना फाशी देऊन किंवा त्यांना नपुंसक करून पुरुषांच्या मनातली पुरुषी सत्ता जाणार आहे का, हा प्रश्न त्या पुरुषी वर्चस्ववादाचा आहे.’’
स्त्री मुक्ती संघटनेशी संबंधित सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ म्हणाले की, ‘‘मुळात सेक्स ही प्रत्येकाची महत्त्वाची गरज आहे हे आधी ठामपणे मान्य केलं पाहिजे. तुम्ही याबाबत कुठे बोलू शकत नाही त्यामुळे काही समस्या आल्या तर त्याचं निराकरण कुठे, कसं करणार हे अनेकांना माहीतच नसतं. समाजात मोठय़ा प्रमाणावर विवाहपूर्व समुपदेशन केंद्रे पाहिजेत. पुरुषांची गोची होते कारण त्यांना प्रश्न विचारायला सुरक्षित जागा नाही. खरं तर डॉक्टर राजन भोसले आणि डॉक्टर विठ्ठल प्रभू यांनी या विषयात पायाभूत काम केले आहे. त्यांच्या कामाचे चळवळीत रूपांतर झाले असते तर आजचे वास्तव वेगळे असते.’’
 सामाजिक कार्यकर्ते आणि मैत्री संस्थेचे कार्यकर्ते अनिल शिदोरे म्हणाले की दिल्लीतील घटना म्हणजे मुळात माणूस माणसापासून तुटत चालल्याचं लक्षण आहे. त्याला स्वत:ला व्यक्त करण्याची संधीच मिळत नाही. त्यातून त्याचं एकाकीपण वाढत चाललं आहे. त्यातून पुरुषांची कोंडी होते आहे. एकीकडे लैंगिकतेची पूर्ती होत नाही तर दुसरीकडे वाढतं एकाकीपण, ती कोंडी हिंसेच्या रूपाने बाहेर पडते. अशी माणसं जर एकत्र आली आणि त्यांना एकाकी स्त्री मिळाली की त्यांच्या समूहमनाचा विवेक शून्य होऊन जातो.  त्यातून सामूहिक बलात्कारासारखे आणि नंतरच्या हिंसेचे प्रकार घडतात. मुळात हिंसा ही मानवाची आदिम प्रवृत्ती आहे. माणसाला स्वत:ला कुठेही व्यक्त होता येत नसेल तेव्हा तो असा हिसेंचा  मार्ग अवलंबतो. त्यासाठी गरज आहे ती सांस्कृतिक पुनरुत्थानाची. सांस्कृतिकदृष्टय़ा एकत्र येण्याची. अन्यथा ही हिंसा सतत वाढत राहील..’’
विजय तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’ या नाटकामधून माणसाच्या मनातील िहसेचे विस्तारित रूप मराठी रंगभूमीवर दाखवणारे दिग्दर्शक श्रीराम लागू या निमित्ताने बोलते झाले.  ते म्हणाले, ‘‘या संदर्भात जगात काय चाललेलं आहे याचे भान माणसांना पाहिजे, कारण हा विषय एका लहान शहराबद्दल नाही, तो स्त्री आणि पुरुष यांच्या नात्याबद्दलचा आहे. लैंगिकता ही संपूर्ण वैयक्तिक बाब आहे आणि लैंगिकता ही निसर्गाची देणगी आहे. अशा दोन टोकांच्या मधला सुवर्णमध्य शोधणे आणि या टोकादरम्यान आपले स्थान निवडणे  हे माणसाचे काम आहे. माणसाने समाजाच्या स्वास्थ्यासाठी नीतिमत्ता शोधून काढली आहे. माणसाच्या समाजातून नीतिबंधने काढून टाकावीत आणि माणूस अंगभूत नीतीने वागेल अशी वेळ अजून आलेली नाही. त्यामुळे बंधने हवीतच. जेव्हा समाज फ्री सेक्सला लायक होईल ती एक आदर्श गोष्ट घडेल असे मी म्हणेन. जेवढी माणसावर बंधने घालणार तेवढे त्याचे भीषण परिणाम दिसणारच आहेत. यात माणसांची कोंडी हा शब्द वापरलात, कारण त्याचा संबंध नीतीशी जोडलेला आहे. फिजिकल प्रोसेसला नतिक मूल्ये लावणार तर त्याच्या फिजिकल भागाचे काय? म्हणजेच माणसामधले जनावर पुरेसे नाहीसे झालेले नाही. जेव्हा माणसाचा सुपर सुपरमॅन होईल तेव्हा हे सगळे प्रश्न सुटलेले असतील. धर्माला नीती आहे तशीच सेक्सलाही आहेच. नियम केले की अडचणी येतातच म्हणून तरुणांना हे समजावून सांगायला पाहिजे की सेक्स हा फिजिकल अ‍ॅक्ट आहे आणि त्याला एक नतिक बाजू आहे. समाजाच्या तात्कालिक रचनेला जुळणारे नियम माणसे तयार करतात. कारण समाजाचे स्थर्य महत्त्वाचे असते. ते स्थर्य डिस्टर्ब होणार नाही असे माणसाचे वर्तन हवे. माणसाची नतिक आणि वैचारिक सुधारणा करणे हा शिक्षेचा मूळ हेतू आहे. माणसाचे कॉम्प्लेक्स समजावून घेणे एवढेच आपल्या हातात आहे असे मला वाटते.’’
 प्रसिद्ध सामाजिक लेखक अनिल अवचट या विषयावर म्हणाले, ‘‘लैंगिकता ही गरज प्रजोत्पादनासाठी आहे. निव्वळ आनंदासाठी नाही. सेक्सचा आनंद श्रेष्ठ मानला गेला व हव्या त्या मार्गाने आनंद मिळवणे उरले. माणसांचा जगण्याचा उद्देश नाहीसा झाला आहे. चेन्नईजवळ नमक्कल नावाचे गाव आहे. ते सगळे गाव ट्रक ड्रायव्हरांचे आहे. त्या गावातील अनेक जण एचआयव्हीग्रस्त आहेत. का तर त्यांना आपण कुटुंबापासून बाहेर काढले आहे. त्यांच्यासाठी आपण काहीच व्यवस्था निर्माण केलेली नाही. ही वाट चुकलेली माणसे आहेत, ती का चुकली याच्या मुळाशी जायला पाहिजे.’’
 मानवी हक्कांच्या जागृती आणि प्रसार यामध्ये काम केलेले, व्यवसायाने वकील असलेले असीम सरोदे हे त्यांच्याकडे आलेल्या केसेसच्या निमित्ताने या विषयावर म्हणाले की ‘‘अनेक लोक टाग्रेट ओरिएण्टेड आहेत. त्यांच्या एन्जॉयमेंटच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. ते शिक्षित असतात पण त्यासाठी जोडीदाराची सहमती हवी हे त्यांच्या गावी नसते, माझी ‘डिमांड’ आहे त्यावर बायकोने ‘सप्लाय’ केलाच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. मग ते फसते. दोघांच्याही आनंदाचा विचका होतो. मग ते स्वत:च्या कृतीचे विश्लेषण करत बसतात. स्वत:च्या  स्वभावाचे विश्लेषण करत नाहीत. संबंधातील आनंद दोघांनी मिळून निर्माण करायचा असतो ते त्यांना कळत नाही. अनेकदा लग्नानंतर बायकोला तुझे आधीचे काही असेल तर सांग, माझे पण सांगतो असे पती सांगतो. पण बायकोने खरे सांगितले तर त्याचा उपयोग बायकोला त्रास देण्यासाठी करणारे भीषण िहसक लोक मला माहीत आहेत.’’
 नव्या जमान्यातील स्त्रियांशी िहसक वागण्याची ही एक ‘आधुनिक’ पद्धत असावी, असाच अनुभव एका सीए फर्ममध्ये काम करणाऱ्या मनीष टेकाळे यांचा आहे. इंटरनेट च्या प्रभावाखाली जन्मलेल्या पिढीतील मनीष त्यांचा स्त्रियांबद्दलचा अनुभव सांगतात. ‘‘शिक्षणात बरोबर असलेल्या मुलींशी आपली स्पर्धा आहे, असेच मला वाटायचे. काही प्रमाणात ती होतीसुद्धा. मुलींवर विजय मिळवला पाहिजे, अशी चर्चा आम्हा मित्रांमध्ये व्हायची आणि म्हणून मुलगी पटवणे आणि ठरवून ब्रेक करणे असेही मित्र करायचे. आता वाटते हे चुकीचे होते.’’
 हीच भूमिका मांडताना पुण्याच्या ‘नारी समता मंच’च्या पुरुष संवाद केंद्राचे समुपदेशक कौस्तुभ जोगळेकर म्हणतात, ‘‘समाजात लैंगिकतेची जाण वाढते आहे पण ती आरोग्यदायी नाही. लोकांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चंगळवादी आहे. आता लोकांना नात्यामधली कमिटमेंट नको आहे, वापरा आणि फेकून द्या, अशी वृत्ती दिसते. इंटरनेट वापर आणि पोर्नोग्राफी पाहणे यामध्ये मिळालेली माहिती तपासून पाहण्यासाठी समाजामध्ये अधिकृत मार्ग नाहीत. स्त्रिया निर्भयपणे वावरत आहेत, हीच पुरुषांची अडचण आहे, असंही दिसतंय. मुलींच्या मोकळेपणी वागण्याचा वेगळा अर्थ लावून त्यांचे शोषण होते. मात्र दोघांनाही मान्य असणारे आरोग्यदायी आणि आनंददायी संबंध असायला हवेत, हे पुरुषांना आधी शिकवण्याची गरज आहे.’’
पुरुष म्हणून आपली दमनकारी प्रतिमा असली पाहिजे, या कल्पनेमधून पुरुषांना सहज बाहेर पडता येत नाही असेच यावरून लक्षात येते. स्त्रियांवर िहसा करणे हे नसíगक आहे, असं मानणारेही अनेक जण आहेत. गावात आणि शहरातही. याबद्दल कवी शेखर सानेकर म्हणाले, ‘‘शहरातील िहसाचार आता अधिक उग्र झाला आहे. कारण एकमेकांना ओळखणारे नसल्याने बदनामीची त्यांना भीती नसते. पुरुषांच्या लैंगिकतेचे अनेक पलू आहेत. घरात स्त्रियांना मिळणारी वागणूक मुलांना बायकांशी कसे वागायचे याची शिकवण देते. ज्या घरातील पुरुष बाहेर आणखी एका बाईशी संबंध ठेवतो त्या माणसाचा मुलगा आपल्या बापाकडून काय शिकेल?’’
व्यवसायाने इंजिनीयर असणारे प्रणव वाव्हळ यांनी वेगळाच मुद्दा मांडला, ‘‘नातेसंबंधामध्ये पुरुष कमी पडतो तेव्हा तो हे कुणाला सांगू शकत नाही. आपण आपल्या पत्नीच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, हे स्वीकारणारे पुरुष नाहीत. त्याऐवजी ते पत्नीलाच दोष देतील. तुझ्याच गरजा जास्त किंवा अवास्तव आहेत असे म्हणतील. मग या इच्छा अपूर्ण राहिलेल्या पत्नीने काय करायचे किंवा पतीने याची जबाबदारी कशी घ्यायची हे न समजल्यामुळे पुरुष गोंधळतो, चिडचिड करतो. मग तो त्यावर िहसक होतो. त्याचे िहसक होण्याचे खरे कारण त्याला सांगता येत नाही आणि त्याला कोणी विचारत नाही. ही पुरुषांची खरी कोंडी आहे.’’
 मात्र तरीही आशा आहे, असं मत अनिल शिदोरे शेवटी व्यक्त करतात. ते म्हणतात, ‘‘आजची स्थिती बदलायची असेल तर समाजात जे सांस्कृतिक उपक्रम कमी झाले आहेत ते वाढवायला हवेत. फेसबुक, ट्विटरसारखी माध्यमं केवळ सुपरफिशल आहेत. प्रत्यक्ष, देहबोलीसह संवाद व्यक्त होणं गरजेचं आहे. व्यक्त होणं, संवाद साधणं त्यातून स्वत:ला शोधणं ही माणसाची गरज आहे. आणि ती पूर्ण होईल कलेच्या आविष्कारातून. माणसांनी आपली कला जोपासायला हवी. आमच्या काळात अड्डे वा कट्टा असायचा. ज्या कट्टय़ावर आम्ही गप्पा मारायचो, अनेक उपक्रम ठरवायचो, प्रत्यक्षात आणायचो. असा प्रत्येकाकडे एक कट्टा हवा आणि प्रत्येकाचं पुस्तकाचं दुकान हवं, जिथे जाऊन तो पुस्तकात रमेल. माझ्या माहितीत असे विविध ग्रुप तयार झालेत. काही जण एकत्र येऊन बासरी शिकतात. एक महिलांचा ग्रुप आहे जे दर आठवडय़ाला फक्त पुस्तकं वाचायच्या निमित्ताने एकत्र येतात. फुलपाखरांचा अभ्यास करणारा एक गट मला माहीत आहे. पाहिलेल्या चित्रपटाचं रसग्रहण करणारा एक ग्रुप आहे. असे सांस्कृतिक कार्यक्रम जसजसे वाढत जातील तसतशे लोक त्यात गुंतत जातील. एकमेकांशी सदृढ संवाद साधला जाईल आणि त्यातूनच निरोगी समाज तयार होईल.’’