डॉ. रोहिणी पटवर्धन

वृद्धांचे प्रश्न वाढत जाणार आहेत, पण ते सोडवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे का? असली, तर किती प्रमाणात आणि जर तेवढी नाही, तर मग हे प्रश्न सुटणार कसे आणि सोडवणार तरी कोण? तर ही जबाबदारी पडणार आहे ती वृद्धांच्या मध्यमवयीन मुलांवर. मध्यमवयातल्या लोकांना आपल्या आई-वडिलांची काळजी घेताना काय काय करावे लागेल, आर्थिक, मानसिक, सामाजिक पातळीवर काय परिणाम होण्याची शक्यता आहे यातले गांभीर्य अजून लक्षात येत नाही. या साऱ्या कचाटय़ामध्ये वृद्ध आणि त्याची मध्यम वयाची मुले दोघांचाही येत्या काळात कस लागणार आहे. जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्ताने खास लेख

sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
Gajanan Kirtikar vs Amol Kirtikar
लोकसभा संग्राम सग्यासोयऱ्यांचा… वडील विरुद्ध मुलगा
ajit pawar warns his siblings
“गप्प बसतोय म्हणून वळवळ करु नका”, अजित पवार यांचे भावंडांना प्रत्युत्तर
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री

दोन बेडरूमचे घर आहे. मुलाचे लग्न करायचे आहे. घरी म्हातारे परावलंबी आजोबा आहेत. कठीण परिस्थितीतून वर येऊन अमरने आणि वडिलांनी घर घेतले आहे. जागेच्या अडचणींमुळे लग्न ठरत नाही. अमर म्हणतो काही दिवस वृद्धाश्रमात ठेवू आजोबांना. वर्षभर नव्या नोकरीत रुळलो की मला कर्ज मिळेल. मग हा ब्लॉक घेऊ या. पण वडील ठाम आहेत. बाबांना वृद्धाश्रमात ठेवणारच नाही, त्यांनी निर्णय घेऊन टाकलाय.

वडिलांचं निवृत्तिवेतन आहे. निवृत्त होऊन पंधरा वर्षे होऊन गेलीत. दोन वेळा खुब्याचे हाड मोडल्याने पुंजी संपून गेली आहे. उच्च रक्तदाब आणि आणि मधुमेह जोडीला आहे. त्यामुळे दर महिन्याला औषधांचा खर्च वाढला आहे. निवृत्तिवेतन मिळते म्हणून आजोबांच्या वागण्या-बोलण्यात खूप ताठा आहे. मुलांची शिक्षणं चालू असल्याने आणि वाढत्या खर्चामुळे मुलगा-सून प्रचंड ताणाखाली आहेत.

एकुलती एक मुलगी म्हणून रसिकाची आई तिच्याकडेच आहे. गेली किमान दहा वर्षे आई तशी आजारी असल्याने तिचे बाहेर जाणे-येणे कमी कमी होत गेलेच होते. आता तर तीन वर्षे आई अंथरुणाला खिळून आहे. त्यामुळे तर आणखीच घरात कोंडल्यासारखे झाले आहे. किमान आठ-पंधरा दिवस वृद्धाश्रमात ठेवावे म्हटले तरी ‘ती आजारी पडेल मग मला आणखीनच त्रास होईल.’ म्हणून तात्पुरते सुद्धा ठेवायची रसिकाची तयारी नाही. मुले, आणि नवऱ्याने आता तिला नाइलाजाने पूर्णच वगळल्याने ती एकाकी झालीए, तिची चिडचिड वाढली आहे आणि एकूणच नकारात्मकता वाढल्याने घराची शांती संपली आहे.

सामाजिक परिस्थिती, राजकीय धोरण यामुळे, नोकरी आणि प्रगतीच्या संधी फारशा नसल्याने अनेकजण परदेशी गेले, त्यापैकी एक स्नेहा. सासू-सासऱ्यांसाठी दोघे आलटून-पालटून वर्षभरामध्ये चार वेळा येऊन गेले. एक इकडे आला की तिकडे एकाची धावपळ होते. दोघे दमूनच गेले आहेत.

ही सारी उदाहरणे देण्यामागचे एक विशिष्ट असे कारण आहे. ते म्हणजे काही प्रश्न ज्येष्ठांमुळे निर्माण झालेले आहेत आणि काही प्रश्न मध्यम वयातल्या व्यक्तींमुळेही निर्माण झालेले आहेत. पण त्यातही एक गोष्ट लक्षात येते आहे, की मध्यात किंवा मध्यमवय असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आयुष्याचा वेगळय़ा दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे.

‘बदल’ हा जीवनाचा स्थायिभाव आहे हे मान्य केले, तरी सध्या ज्या वेगाने परिस्थिती, सर्वच क्षेत्रातली परिस्थिती बदलते आहे, तो वेग अनपेक्षित म्हणावा असा आहे. लहान, मध्यमवयीन, ज्येष्ठ, सारे जण आपापल्यापरीने त्या बदलाला सामोरे जायचा प्रयत्न करत आहेत; पण ते प्रयत्न सर्वानाच करता येत नाहीत. त्यापैकी महत्त्वाचा घटक म्हणजे ‘ज्येष्ठ’. एकीकडे ज्येष्ठांच्या संख्येत सातत्याने, मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. दुसरीकडे वाढलेल्या वेगाबरोबर जाण्याची ज्येष्ठांची शक्ती / क्षमता कमी पडते आहे. परिणामी, ज्येष्ठांच्या प्रश्नांची व्यामिश्रता वाढत चालली आहे. गेल्या वर्षी ‘चतुरंग’ पुरवणीमध्ये ‘संहिता साठोत्तरीच्या’ सदरातून या प्रश्नांना पुढे आणण्यासह त्यावर उपाय सुचवण्याचा प्रयत्न मी केला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यावरून वृद्धकल्याणासाठी प्रयत्नशील असण्याची गरज अधोरेखित झाली, हे निश्चित.

लेख लिहितानाच मनामध्ये एक समांतर विचारधारा तयार होत गेली आणि त्यावर खूप दिवस मनामध्ये आंदोलने उमटत राहिली. रोजच्या वृत्तपत्रातल्या बातम्यांचा कुठे ना कुठेतरी संबंध वृद्धांच्या प्रश्नांशी आहे असे जाणवत राहिले. येत्या दहा वर्षांत मोठय़ा शहरांच्या संख्येत वाढ होणार आहे, या बातमीपासून ते येणाऱ्या काळात वृद्धांची काळजी घेण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत घट होणार आहे इथपर्यंत ‘वृद्ध’ या घटकाशी निगडित अशा बातम्यांचा खोलवर विचार करण्याची गरज जाणवत राहिली. पण यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट जाणवली ती अशी, की प्रश्न वृद्धांचे आहेत, पण ते सोडवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे का? असली, तर किती प्रमाणात आणि जर तेवढी नाही, तर मग हे प्रश्न सुटणार कसे आणि सोडवणार तरी कोण? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतल्यावर जी परिस्थिती लक्षात आली ती म्हणजे, ही जबाबदारी पडणार आहे ती वृद्धांच्या मध्यमवयीन मुलांवर. या मध्यमवयीन मुलांना मी मध्यातली मुले म्हणते. मग या ‘मध्यातल्या मुलां’चा विचार करायला लागले.

‘सनवर्ल्ड’ वृद्ध सहनिवासातल्या वृद्धांची मुले, एमआयटी कनिष्ठ महाविद्यालयात सोळा ते अठरा वर्षांच्या मुलांचे मध्यमवयीन पालक, कुटुंबातल्या, समाजातल्या साधारण

४५-५० वर्षांच्या पुढच्या व्यक्तींशी माझा नियमित-मोठय़ा प्रमाणावर संबंध येतो. त्या मध्यमवयीन व्यक्तींच्या आशा-आकांक्षा, जबाबदाऱ्या, अडचणी, कुचंबणा मी जवळून जाणते. यातून जी परिस्थिती पुढे आली, ती खूप विचार करायला लावणारी आहे असं लक्षात आलं.

मी ‘मध्यानंतरची वाटचाल’ या विषयाचा अभ्यास, चिंतन, मनन करायला सुरुवात केली. तेव्हा एक नवीनच क्षेत्र उघडले, जे आत्तापर्यंत जाणवले नव्हते. त्यातल्या काही मुख्य मुद्दय़ांचा ऊहापोह या लेखाद्वारे करायचा हा माझा प्रयत्न. एका अर्थाने वृद्धकल्याणाच्या प्रयत्नांची दुसरी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. पाश्चिमात्य देशांमध्ये ‘मिडलाइफ क्रायसिस’ या विषयावर बोलले जाते, विचार केला जातो, संशोधन केले जाते. त्यांचे विचार हे या वयातल्या व्यक्तींची मानसिकता, त्यांना जाणवणारी आर्थिक सामाजिक परिस्थिती यांच्याशी संबंधित असतात. त्यामध्ये ज्येष्ठांची काळजी घेण्याच्या जबाबदारीचा खूप खोलवर जाऊन विचार करण्याची गरज त्यांना जाणवत नाही. तिथल्या सामाजिक संकेतांनुसार १८ वर्षांनंतर मुलांनी आपापली जबाबदारी घ्यायची आणि म्हातारपणाची सोय ज्याची-त्याने करायची असे स्पष्ट चित्र आढळते.

पण भारतातली परिस्थिती अगदी उलट आहे. शिक्षण, नोकरी, बायको, घर (बहुतेकदा) साऱ्या जबाबदाऱ्या पालकांच्याच आहेत असं मुळात आधी स्वत: मध्यातल्या व्यक्तींनाच वाटते. त्यांच्या मुलांच्याही त्याच अपेक्षा असतात. यात तो मुलगा आपली पुढे म्हातारपणी काळजी घेईल हे गृहीत धरले होते. ते यापूर्वीच्या २५-३० वर्षांपर्यंत बऱ्यापैकी सिद्ध होत होते. पण सध्या मध्यातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या एका बाजूला २५-३० वर्षांची मुले आहेत. या मुलांच्या इच्छा-आकांक्षा खूप आणि मोठय़ा आहेत. स्वत: पाश्चिमात्य संस्कृतीचा संपूर्ण स्वीकार करून ते स्वयंकेंद्रित वर्तन करीत आहेत, पण त्यांची मानसिक धारणा मात्र सोयीस्कररीत्या भारतीय, म्हणजे आई-वडिलांनी आपल्याला वेळ, पसा याची मदत केली पाहिजे, ते त्यांचे कर्तव्य आहे असे मानणारे आहेत. त्यामुळे नातवंडे सांभाळणे, गरजेच्यावेळी त्यांच्या व्यवसायात मदत करणे आणि अगदी आर्थिकही, या त्यांच्या अपेक्षा मध्यातल्या व्यक्तींकडून आहेत. त्या बऱ्याच प्रमाणात योग्य आहेत असे स्वत: मध्यातल्या व्यक्तींनासुद्धा वाटते आहे. त्यासाठी ते कटिबद्ध असलेलेही दिसतात. प्रसंगी आपले व्यवसाय सोडून, स्वत:च्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालून मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या मध्यातल्या व्यक्तीही काही कमी नाहीत. त्यासाठी आठवडाभर मुलाकडे राहून शनिवार-रविवार स्वत:च्या घरी अशा फेऱ्या मारणाऱ्यांपासून ते पूर्णपणे मुलांसाठी गाव-देश सोडणाऱ्यांपर्यंत उदाहरणे दिसतात.

दुसऱ्या बाजूला त्यांचे आईवडील जे वयाच्या ६५ ते ७० च्या पुढचे आहेत आणि सर्वसामान्यत: हा लेख वाचू शकणारे जे ज्येष्ठ आहेत ते समाधानी आयुष्य जगणारे ज्येष्ठ अजून २० वर्षे तरी किमान जगणार आहेत. जसे जसे दिवस जातील तसे तसे त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे ते मध्यातल्या व्यक्तींनाच. त्यामुळे मध्यातल्या व्यक्तींनी या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची अत्यंत गरज आहे. मध्यातल्या व्यक्तींच्या बाजूने वृद्धांच्या समस्यांचा विचार केला तर काय परिस्थिती आहे यांचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर लक्षात येते की ज्या वेगाने परिस्थिती बदलते आहे. ज्या वेगाने माणसे दूर दूर राहायला गेलेली आहेत त्यांचे परस्पर संबंध विरळ होत चाललेले आहेत. खात्री वाटावी अशी माणसे, अशी नाती कमकुवत होत चाललेली आहेत याची जवळजवळ मुळीच जाण ज्येष्ठांना नाही.

त्यांना वाटते की, त्याच्या ५०-५५ वर्षांच्या मुलांनी काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे ते त्यांनी केले पाहिजे. खरंही आहे, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर काळजी घेण्याची जबाबदारी येते त्याला काय काय करावे लागते. त्यामुळे त्याच्या कशा कशावर बंधने येतात त्याचे परिणाम त्या मध्यातल्या व्यक्तीवर कोणते होतात याची पुरेशी जाणीव (काही अपवादात्मक व्यक्ती सोडता) ज्येष्ठांना नाही, पण ही त्यांची चूक आहे असेही नाही, कारण आत्ताचे जे ७०-७५ च्या पुढचे आहेत त्यांच्यापैकी बहुतेकांचे आई वडील फार वर्षे जगले नाहीत, त्यामुळे तो कालावधी अगदी मर्यादित होता. याशिवाय एकत्र कुटुंबपद्धत होती. भावंडेपण ३-४ तरी सहज होती म्हणून त्यांना आईवडिलांचे ओझे असे फार मोठे आणि फार काळ व्हावे लागलेच नव्हते. त्यांना ही आत्ताच्या पिढीची धावपळ तितकीशी लक्षात येत नाहीय.

शिवाय त्यांच्या मागच्या पिढीच्या अपेक्षाही फारशा नव्हत्या. देव देव करणे, कथा-कीर्तनात रमणे फार तर काशीयात्रा करणे इतक्याच मर्यादित अपेक्षा होत्या, पण आत्ताच्या ज्येष्ठांच्या अपेक्षा खूप आहेत. हिंडणे, फिरणे- त्यांचे मान-अपमान जपणे – तंत्रज्ञानाच्या अज्ञानामुळे निर्माण होणारे त्यांचे प्रश्नही खूप आहेत. वयोमान वाढल्यामुळे आजारपण, ऑपरेशन्स याचाही काल वाढतो आहे. हे सारं त्यांच्या ५५-६० वयाच्या त्यांच्या मुलांना करावे लागत आहे. लागणार आहे. त्यासाठी सुवर्णमध्य काढायचा आहे. तो काढायचा आहे त्याची प्रथमत: मध्यातल्या व्यक्तींनी जाणीव करून घेणे महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे.

या मध्यातल्या लोकांना आणखी एक गोष्ट स्वीकारावी लागते आहे, ती म्हणजे ते स्वत: जेव्हा वृद्ध होणार आहेत त्यावेळी त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी मुले जवळ असण्याची शक्यता जवळजवळ नाही, तरीही या मध्यातल्या पिढीला आई-वडिलांची वृद्धनिवासात सोय करण्याचा विचार मनात अपराधीपणाची भावना निर्माण करतो आहे. एकूणच थोडक्यात असं आहे की ही तारेवरची कसरत सध्या चालू आहे या संदर्भात आणखीही आयाम आहेत. उदा. एकच मूल असणाऱ्या मध्यातल्या व्यक्तींची काळजी ते एकटे मूल घेऊ शकणार का हा प्रश्नच आहे.

पेन्शन नसणारे आणि पेन्शन असणारे वृद्ध यांचीही वेगळी मनोवृत्ती असते. नसणाऱ्यांना आर्थिक परावलंबित्वामुळे थोडेफार समजुतीने घ्यावे लागते, काही प्रमाणात ते थोडे मवाळ आहेत, पण ज्या ज्येष्ठांना पेन्शन आहे त्यांना असं वाटतं आहे की, माझा आर्थिक भार मुलावर पडत नाही म्हणजे त्यांना काहीच त्रास होत नाही. मग त्यांच्या मनासारखे त्या मध्यातल्या लोकांनी वागलेच पाहिजे. मी कोणावर अवलंबून नाही असे ते सांगत असतात.

वृद्धांनी कसे वागावे, काय काळजी घेतली पाहिजे हे तर मी आग्रहानं प्रतिपादन करते, पण याबरोबर मला हेही सांगावेसे वाटते की ‘मध्या’तल्या लोकांनी येणाऱ्या परिस्थितीची चाहूल गंभीरपणे घ्यावी. स्वत: काळजीपूर्वक समविचारी लोकांचा गट निर्माण करायचा प्रयत्न करावा. ज्येष्ठांच्या जबाबदाऱ्या घेताना त्यांना जास्तीत जास्त मानसिकदृष्टीने आणि शारीरिकदृष्टय़ा स्वावलंबी ठेवण्याचा प्रयत्न करावा. स्वत:च्या तरुण मुलांवर विश्वास ठेवून त्यांनाही आपल्या आजी-आजोबांची काळजी घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच सामील करून घेण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत. वृद्ध व्यक्ती आजारी पडल्यास दिवसाकाठी २-४ तास प्रयत्नपूर्वक स्वत:साठी वेगळे काढावेत. लग्नसमारंभासारख्या प्रसंगात सहभागी होण्यासाठी वृद्धांची आधीच विचार करून व्यवस्था करावी. प्रसंगी १-२ दिवस वृद्धनिवासामध्ये राहण्याची सोय करावी. तसे करावे लागले तर स्वत:ला दोषी ठरवू नये. आपल्याला स्वत:ला असा विचार माझ्या मनात आलाच कसा असा बोल लावू नये.

मध्यातल्या व्यक्ती, त्यांच्या समस्या आणि आव्हाने यावर खूप लिहिण्यासारखे आहे. पण तूर्तास येणाऱ्या काळाची चाहूल स्वत: मध्यात असलेल्या व्यक्तींनी घ्यायची गरज आहे, याबाबतची जागरूकता निर्माण करणे हा या लेखाचा मुख्य उद्देश आहे.

एकूण काय तर ज्येष्ठांच्या बाजूने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी किंवा त्यांचे आयुष्य सुरळीत जाण्यासाठी त्यांच्या मध्यमवयीन मुलांना काय काय करावे लागत आहे याबाबत पुरेशी स्पष्टता नाही. आणि मध्यमवयातल्या लोकांना आपल्या आई-वडिलांची काळजी घेताना काय काय करावे लागेल, आर्थिक, मानसिक, सामाजिक पातळीवर काय परिणाम होण्याची शक्यता आहे यातले गांभीर्य अजून लक्षात येत नाही. या साऱ्या कचाटय़ामध्ये वृद्ध आणि त्याची मध्यम वयाची मुले दोघांचाही येत्या काळात कस लागणार आहे हे मात्र माझ्यासारख्या वृद्धकल्याणशास्त्राच्या अभ्यासकाला निश्चितपणे जाणवत आहे.

rohinipatwardhan@gmail.com

chaturang@expressindia.com