नीरजा

..आता मंदिराचा प्रश्न मिटेल. आता सगळं छान होईल. लोक विसरतील दंगे, दंगली. लोक विसरतील एकमेकांच्या मनातली अढी. एकोप्यानं राहातील. मला केलंच आहे त्यांनी पक्षकार, तर यापुढे माझ्याकडेही माणूस म्हणून पाहातील. समजून घेतील शत्रूला. त्याच्यातल्या माणसाला. सन्मान करतील त्याचा.

A five year old boy was molested by minors Pune print news
पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
case against father, father abusing daughter,
मुंबई : पाच वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा
लेख: ही पूर्वनियोजित चकमक कोणाच्या सांगण्यावरून?
Akshay Shinde Hearing
Akshay Shinde Encounter : “पिस्तुल खेचेल एवढी त्याच्यात ताकदच नव्हती”, वकिलांनी दिली कोर्टात माहिती; म्हणाले, “पालकांकडून त्याने ५०० रुपये…”
Aseem Sarode on Badlapur Case
Badlapur Sexual Assualt : “पीडितेच्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न”, असीम सरोदेंचा मोठा दावा
Loksatta editorial Narendra modi statement Karnataka govt arrested ganesh murti congress
अग्रलेख: कर्मभूमीतील धर्मकसोटी!
Pune, girl died drowning pune, water tank pune,
पुणे : पाण्याच्या टाकीत बुडून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

हुश्श! एकदाचा लागला निकाल माझ्या बाजूनं. या देशात माणसं थकून नाही तर मरून जातात कोर्टात फेऱ्या मारून मारून, पण निकाल लागत नाही. उशिरा का होईना, पण माझा मात्र लागलाच एकदाचा. तोही मी पक्षकार झालो म्हणून. आता एवढी वर्ष जपून ठेवलेली एक एक वीट काढून गेली पंचवीस वर्ष रखडलेलं देवळाचं बांधकाम सुरू करतील ते. उभं राहील भव्य-दिव्य मंदिर!

एवढी वर्ष ज्यासाठी झुंजी लागल्या त्या मंदिराचा कळसही चढेल हळूहळू. पायाखाली किती गेले याचा हिशेब विसरूनही जातील लोक; पण ज्या जागेवर माझं घर उभं राहणार आहे त्या जागेवर वास्तू बांधण्यासाठी किती बळी दिले आहेत याचा हिशेब मला ठेवावा लागेलच ना? कायम राहायचं या प्रेतांच्या ढिगाऱ्यावर उभ्या राहिलेल्या घरात म्हणजे अस्वस्थता असणारच मनात.

किती युगं झाली आठवत नाही आता; पण एवढय़ा वर्षांत निवांत बसून नाही केला विचार माझ्या जगण्याचा, लोकमानसावर असलेल्या त्याच्या पगडय़ाचा. मात्र अलीकडे सारखा हाच विचार येतोय मनात. मी कुठे जन्मलो नेमका? इथं की वाल्मिकींच्या मनात? की प्रत्यक्षातला ‘मी’ आणि वाल्मिकींच्या मनातला ‘मी’ यांच्या मिश्रणातून उमटलं माझं पात्र रामायणाच्या पानांवर? खरं तर मी भाग्यवानच. ज्या थोडय़ा राजांना नायक होता आलं एखाद्या कथेचा त्यातला एक महत्त्वाचा राजा होतो मी. वाल्मिकींना लिहायचं होतं महाकाव्य. त्यासाठी हवा होता नायक. नारदानं माझी कथा सांगितली म्हणतात त्यांना. मग काय, झालो नायक या महाकाव्याचा.

किती खुशाललो होतो मी तेव्हा; पण राजा म्हणून मी काय केलं नेमकं? आर्थिकदृष्टय़ा लोकांना सक्षम केलं, शेतीला प्राधान्य दिलं, पर्यावरणाचा समतोल राखला, व्यापार वाढवला, गोरगरिबांची सोय केली, सामाजिक न्याय दिला, की आणखीन काही? या सगळ्याचा तपशील फारसा नाहीच दिलेला या महाकाव्याच्या पानांवर. जसा छत्रपती शिवाजींच्या कार्याचा, रयतेचा राजा असल्याच्या त्यांच्या कर्तृत्वाचा दिला आहे वेगवेगळ्या बखरीत. वाल्मिकींना उभं करायचं होतं नाटय़ या महाकाव्यात. ते बोलत राहिले माझ्या शौर्याविषयी, राक्षसांवर मिळवलेल्या विजयाविषयी. सांगत राहिले माझ्यातल्या वेगवेगळ्या गुणांबद्दल, माझ्यात असलेल्या असामान्य माणसाबद्दल. माझ्यातही काही दोष असतीलच की, पण त्याविषयी नाही बोलले वाल्मीकी काहीच; जसे व्यास बोलले महाभारतातील प्रत्येक पात्राच्या गुणदोषांविषयी. कदाचित त्यामुळेच महाभारतातील पात्रं ही हाडामांसाची माणसं होऊन आली आणि मला देवत्व दिलं गेलं.

या महाकाव्यात माझ्या राजवटीची तुलना नेहमीच चांगल्या, समृद्ध राज्याशी केली गेली. त्यामुळेच कायम चर्चा झाली ती या अशा आदर्श राज्याची; पण पुढे जेवढी चर्चा माझ्या या रामराज्याची झाली तेवढीच चर्चा झाली ती परिटासारख्या सामान्य माणसानं माझ्या पत्नीवर केलेल्या आरोपांची. त्यावर मी घेतलेल्या निर्णयाची. काहींना माझा हा निर्णय एक राजा म्हणून आवडला, तर काही लोकांना तो अजिबात पसंत पडला नाही. पुढे कित्येक वर्ष गावागावांतल्या स्त्रिया जात्यावर पीठ दळताना, विहिरीवर कपडे धुताना एकमेकींना सांगत राहिल्या,

‘राम म्हनू राम नाही सीतेच्या तोलाचा

हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलाचा’

मी खरंच ‘हलक्या दिलाचा’ होतो का? असेनही कदाचित. म्हणून तर दोनदोनदा अग्निपरीक्षा द्यायला लावली मी सीतेला आणि काहीही न सांगता सोडून दिलं अरण्यात तिच्या गर्भारपणाच्या दिवसांत. खरं तर तेच तर दिवस होते तिचं कोडकौतुक करण्याचे, जन्माला येणाऱ्या लव-कुशाला दिसामाजी वाढताना पाहण्याचे, पण नाही केलं मी असं काहीच. स्वत:ला एकपत्नीव्रती म्हणवून घेताना त्या एका पत्नीच्या मनाची पर्वा नाही केली मी. त्यामुळेच असेल, माझ्या एकपत्नीव्रताच्या कहाण्या जशा काहींना मोहित करत राहिल्या तशाच माझ्या या अशा निर्णयाच्या कहाण्या अनेकांना खटकत राहिल्या कायम. विशेषत: स्त्रियांना तर मी नाहीच वाटलो त्यांचा. लोकांच्या मनात हिरकणीचं स्थान मिळवलं सीतेनं आणि मी मात्र उरलो केवळ देवळांत प्रतिष्ठापण्यापुरता.

नेमका कसा होतो मी लहानपणापासून? एक आज्ञाधारक पुत्र, समजूतदार मोठा भाऊ, एकपत्नीव्रती नवरा, प्रजेसाठी जगणारा आणि झटणारा राजा, प्रत्येकाची मनं सांभाळणारा माणूस? दुसऱ्यांची मनं राखताना मला काय हवं होतं नेमकं हे सांगताच आलं नाही का मला? ज्यांच्या धनुष्याला मी प्रत्यंचा लावली त्या परशुरामांनी सांगितलं, ‘दक्षिणेत जाऊन आर्यधर्म वाढव.’ मी त्याच कामाला लागलो. बाबा म्हणाले, ‘चौदा वर्ष वनवासाला जा.’ मी लगेचच गेलो दक्षिणेतल्या वनात. धाकटी आई म्हणाली, ‘राज्य भरताला दे.’ मी दिलं. भरत म्हणाला, ‘तुझ्या पादुका दे.’ मी ठेवल्या त्याच्या हातात. सीता म्हणाली, ‘हरणाच्या कातडय़ाची चोळी हवी.’ मी गेलो हरणाच्या मागे. तो धोबी म्हणाला, ‘परपुरुषाच्या कैदेत राहिलेल्या बायकोला सोडायला हवं.’ मी सोडलं. मला परशुरामांचं ऐकायचं होतं, मला आई-वडिलांचं ऐकायचं होतं, मला भावाचं, पत्नीचं ऐकायचं होतं, प्रजेचं ऐकायचं होतं.. प्रत्येकाचं ऐकताना जे-जे निर्णय घेतले मी ते चूक होते, की बरोबर हा विचार केलाच नाही का कधी? लोक म्हणतील ते ऐकायचं असं ठरवलं आयुष्यभर आणि स्वत:च्या मनानं कोणतेच निर्णय घेतले नाहीत. आज्ञाधारक असण्याच्या साऱ्या सीमा पार केल्या मी. अगदी कलियुगातही.

ते म्हणाले, ‘माझं मंदिर बांधायचं आहे,’ तर मीही काहीही न बोलता बसलो आहे तयारीत कधीपासून त्या मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचण्यासाठी. पाहत राहिलो आजूबाजूला उडालेला विध्वंस. किती मारले गेले, किती पेटवले गेले, किती स्त्रियांच्या गर्भाशयावर तलवारी चालल्या, कोणाच्या सरणावर कोणाची पोळी भाजली गेली.. काही हिशेब नाही.

..आणि बाबर, तोही वाट पाहत होता केव्हापासून या निकालाची. त्यालाही हवी होती त्याच्या काळात बांधली गेली होती तशी मस्जिद आणि मला माझा गाभारा. असं आम्ही नाही, पण बाहेर म्हणत होते सगळेच. पण हे सारं कधी देणार आहेत आणि कोण देणार आहेत हे नव्हते सांगत नेमकं. फक्त आमच्या नावावर खेळत होते खेळ निवडणुकीचे. आज मात्र न्याय झाला म्हणायचा दोघांचाही. या लोकशाही देशाच्या न्यायालयानं माझ्याकडे माणूस म्हणून पाहिलं. मला माझी जागा मिळाली आणि त्याला जमीन त्याच्या नावाची.

आम्ही दोघांनीही राज्य केलं या भूमीवर वेगवेगळ्या काळांत. विस्तारलं होतं आमचं सार्वभौमत्व. तसं पाहिलं तर आमच्या आमच्या काळात आम्ही सम्राट होतो या विशाल भूमीचे. त्या तुलनेनं नेमकं काय मिळालं आम्हाला? मला ही जागा आणि त्याला पाच एकर जमीन.

त्या दिवशी दोघं गप्पा मारत बसलो होतो त्या झाडाखाली. हा वाद सुरू झाल्यापासून इथंच येऊन बसलाय तोही. गेली पंचवीस वर्ष एकमेकांची सोबत करत, गप्पा मारत ढकलतोय दिवस.

बाबर सांगत असतो त्याच्याविषयी, त्यांच्या सत्तेच्या लालसेविषयी. कसे आले ते मजल-दरमजल करत इथवर आणि जिंकत गेले एक-एक प्रांत याविषयी. मग मीही सांगतो अधूनमधून गोष्टी त्याला आमच्या पराक्रमाच्या. कोणत्या टोळ्यांसोबत आले आमचे पूर्वज, कसे शिरलो आम्ही अनार्याच्या राज्यात, कसे मिळवले विजय त्यांच्यावर, मग कशा लिहिल्या कहाण्या सुरासुरांच्या युद्धाच्या, कसे ठरवले त्यांना खलनायक आणि स्वत:ला नायक.

त्या दिवशी बाबर सांगत होता, इथल्या राजांविषयी, त्यांच्या मानसिकतेविषयी. असमाधानी लोक असले कोणत्याही राज्यात किंवा राजकीय पक्षात तर कसे गळाला सहज लावता येतात हे सांगताना म्हणाला, की असे लोक सर्वत्र असतात. त्यांना हाताशी धरून सहज प्राप्त करता येते सत्ता. तेव्हा मीही सांगितल्या गोष्टी असुरांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जिंकलेल्या राज्यांच्या. शुक्राचार्य आणि कचाच्या, मोहिनीसारख्या स्त्रियांच्या मदतीनं संपवलेल्या असुरांच्या.

बाबर म्हणाला, ‘प्रत्येक काळात घडत होत्या अशा गोष्टी. आजही घडताहेत. केवळ इथंच नाही तर जगभरात सगळीकडेच. सत्तेचा झेंडा फडकावण्याची इच्छा प्रबळ झाली, की विध्वंस अटळ असतो. आमच्यातल्या काही लोकांनीही तेच तर केलं. साम्राज्य पसरवायचं होतं आम्हाला संपूर्ण भारतवर्षांवर. म्हणून उद्ध्वस्त केली देवळं, लुटलं लोकांना. दहशत पसरवली लोकांच्या मनात. लोक दहशतीखाली राहिले, की राज्यकर्त्यांना सोपं जातं कोणतेही निर्णय घेणं. घाबरून मान तुकवतात लोक. मनात असलेले विचारही नाही करत व्यक्त.’

मलाही पसरवायचं होतं का तेव्हा माझं राज्य? विस्तारायच्या होत्या त्याच्या कक्षा? म्हणूनच पोचलो का दक्षिणेत? शूर्पणखेचं नाक कापून रावणाला आमंत्रण दिलं का आम्ही युद्धाचं? सीताहरणाचं निमित्त झालं का रावणावर मात करण्यासाठी शोधलेलं? खरं तर बुद्धिमान आणि पराक्रमी होता तोही; पण हरवलं मी त्याला युद्धात वानरांच्या मदतीनं. शेवटी बुद्धिमान लोकांची अशीच शोकांतिका होते का? त्यांच्यासोबत नाही उभे राहत प्राथमिक अवस्थेत असलेले वानर. मग हार अपरिहार्य बनते.

मी जिंकलं रावणाला तरी मनात त्याच्याविषयीचं प्रेम राहिलंच. दर दसऱ्याला त्याची प्रतिमा करून जाळतात ना लोक, त्यानं दुखतं आत खोल. खूप वाईट वाटतं. कधी-कधी वाटतं लोक समजून घेत नाहीत आत खोल तळाशी पोचून माणसांना. वरवरच्या गोष्टींवर बोलत राहतात आणि वरवरच्या गोष्टींनाच खरंही मानायला लागतात. आभासी प्रतिमा तयार करतात नायक-खलनायकांच्या. मनातल्या मनात एक रावण निर्माण करून, त्याला द्वेषाच्या पाण्यानं शिंपून वाढवतात आणि दर वर्षी पेटवून, मनात पेटलेली सुडाची आग शांत करतात.

मी हे बोललो बाबराशी तर म्हणाला, ‘आमच्याकडे काय वेगळं आहे? तीच परिस्थिती. ‘इस्लाम खतरेमें है’ म्हटलं, की आमचे लोकही चालवतातच ना गोळ्या निरपराध्यांवर. आपणच तारणहार आहोत धर्माचे असं वाटत असतं त्यांना. खरं सांगू, लोकांना तसा विशेष काही फरक पडत नाही, ही मस्जिद बांधली गेली काय किंवा नाही बांधली गेली तरी. त्यांच्यासाठी प्रश्न आहे तो त्यांच्या धार्मिक आणि राजकीय अस्तित्वाचा.’

किती खरं बोलला तो. त्यांचा दहशतवाद धर्माच्या नावावर चालतो. आमच्याकडे तर माझ्याच नावावर खपवलं जातं आहे सगळं कित्येक शतकं. अलीकडे तर माझं नाव घ्यायला लावतात लोकांना आणि नाही घेतलं त्यांनी तर खूनही पाडतात त्यांचा. या लोकांना कसं समजवायचं, ‘जय श्रीराम’ बोललं काय किंवा आणखी कोणा देवाचं नाव घेतलं काय, सगळे सारखेच आहेत. प्रश्न मनात असलेल्या भावनेचा असतो. पंधराव्या शतकात कबीर म्हणाला होता,

‘हिंदू कहे मोहि राम पियारा, तुर्क कहे रहमाना,

आपस में दोउ लडी-लडी मुए, मरम ना कोउ जाना.’

देवाचा, धर्माचा अर्थ जाणून न घेता केवळ मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा वगैरे बांधण्याचं, त्यावर आपापल्या अस्मिता जपण्याचं वेड लागलं आहे लोकांना. वर्षांनुवर्ष भांडताहेत आमच्या नावावर हे लोक. अरे, प्रेम आहे ना आमच्यावर, तर मनातल्या मनात आठवा आम्हाला. आम्हाला नाही गरज कोणत्या चर्चची, मशिदीची की मंदिराची. धर्माचे व्यापारी रोज दहा देवळं बांधून कमावताहेत पसा. राजकारणी तर या एका देवळाच्या नावावर सत्तेचा बाजार मांडून बसले होते केव्हापासून. याच जागेवर बांधायचं आहे मंदिर. ते कोणासाठी आणि कधी बांधायचं आहे, हे ना त्यांना माहीत होतं ना मला, ना बाबराच्या खुदाला.

पण आता तो प्रश्न मिटेल. आता सगळं छान होईल. लोक विसरतील दंगे, दंगली. लोक विसरतील एकमेकांच्या मनातली अढी. एकोप्यानं राहातील. मला केलंच आहे त्यांनी पक्षकार, तर यापुढे माझ्याकडेही माणूस म्हणून पाहतील. समजून घेतील शत्रूलाही. सन्मान करतील त्याचा. जसा मी केला रावणाचा, जसा रावणानं केला सीतेचा. जसा मी केला माझ्यावर वनवास लादणाऱ्या धाकटय़ा आईचा. आज मागे वळून पाहताना वाटतं, तसा साऱ्या स्त्रीजातीचा सन्मानच केला मी. शबरीनं दिलेली उष्टी बोरं चाखली, अहिल्येची वेदना समजून घेतली, सीतेवर भरभरून प्रेम केलं.

..पण एक चूक झालीच. तिचा स्त्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून, नाही करू शकलो सन्मान. तेव्हाही असेच काही निर्बुद्ध आणि कोत्या मनाचे लोक होते माझ्या राज्यात. तिचा त्याग करायला मला भाग पाडलं त्यांनी. स्त्रीवर अविश्वास दाखवण्याची त्यांची मानसिकता लादली माझ्यावर. स्त्रियांना जपायचं असतं, मनाशरीरानं. त्यातही आनंद असतो, हे माहीत होतं मला, म्हणूनच मीही जपलं सीतेचं मन; पण शेवटी एका निर्णायक क्षणी बळी पडलो आणि सोडून मोकळा झालो तिला गर्भारपणी. आज ते आठवून-आठवून रडू येतंय मला.

तुम्हाला नाही कळणार माझी वेदना. तुम्ही जमवत राहा विटा, अयोध्येला आणण्यासाठी. पण मी इथेच असेन का? तुम्ही कोणत्या भूमीवर तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी हिंसेचं पीक काढावं, हा तुमचा प्रश्न. मला मात्र बाबराच्या खुदाशीही बोलायचंय. आम्ही दोघं मिळून असं जग तयार करू आमच्यातल्या रामरहीमसाठी, जिथे नसाल तुम्ही कोणीच धर्माचे ठेकेदार..

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com