scorecardresearch

Premium

लढा दुहेरी हवा!

‘शारीर बोध’ संस्थेच्या संस्थापिका राजश्री साकळे यांचा (२९ सप्टेंबर ) ‘लढा तीव्र व्हावा’ हा लेख वाचला आणि मनाला प्रचंड यातना झाल्या. मन विषण्ण झाले. त्याचबरोबर स्त्रीची विविध रूपं डोळ्यांसमोर आली.. वात्सल्यसिंधू आई, वेडय़ा बहिणीची माया, टुकीने आणि नेकीने संसाराचा गाडा अविरत ओढणारी अर्धागिनी सखी, सहचारिणी, शेजारीण, ओळखीची, संबंधित, नातेवाईक, सारी.. सारी तिची रूपं दिसली..

लढा दुहेरी हवा!
‘शारीर बोध’ संस्थेच्या संस्थापिका राजश्री साकळे यांचा (२९ सप्टेंबर ) ‘लढा तीव्र व्हावा’ हा लेख वाचला आणि मनाला प्रचंड यातना झाल्या. मन विषण्ण झाले. त्याचबरोबर स्त्रीची विविध रूपं डोळ्यांसमोर आली.. वात्सल्यसिंधू आई, वेडय़ा बहिणीची माया, टुकीने आणि नेकीने संसाराचा गाडा अविरत ओढणारी अर्धागिनी सखी, सहचारिणी, शेजारीण, ओळखीची, संबंधित, नातेवाईक, सारी.. सारी तिची रूपं दिसली..पण या साऱ्याजणींची अजूनही समाजात वंचनाच का दिसून येते? विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या स्त्रियांना नेहमीच छळाला सामोरे जावे लागते, पण कुटुंबात, समाजातही वावरताना तिने ताणतणाव सहन करावे?
लेखिकेला अभिप्रेत असलेला स्त्रियांच्या छळविरोधातला लढा अधिक तीव्र होण्याबरोबरच तो दुहेरी होणेही तितकेच आवश्यक आहे. आज विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कित्येक छचोर, स्वार्थी महिलांना नको असलेले, न मागितलेले सल्ले आपल्या भोळ्या सहकारी महिला कर्मचाऱ्यांना देताना दिसून येतात- यात अगदी बॉसला ‘खूश’ करून प्रमोशन कसे पदरात पाडून घ्यावे, हवे असलेले मिळवायचे असेल तर कसे द्यावे-घ्यावे, पदासाठी असलेले आर्थिक फायदे, रजा इत्यादी खुबीने कसे वरिष्ठांकडून मिळवावे इत्यादी सल्ल्यांचा समावेश असतो. अशा दिल्या जाणाऱ्या गुप्त सल्ल्यामुळे लैंगिक छळाला एकप्रकारे खतपाणीच घातले जाते ना? तेव्हा अशा प्रकरणांची चौकशी करून अशा महिला कर्मचाऱ्यांच्या विरोधात स्त्रियांनीच पुढाकार घेऊन ‘दुहेरी लढा’ उभारावयास हवा! अशा महिलांना बहिष्कृत केले गेल्यास, अगदी जरब बसेल अशा शब्दात खडसावून जाब विचारले गेल्यास, स्त्रियांच्या लैंगिक छळाविरोधातला हा लढा खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. लेखिकेने दोन्ही प्रकारच्या लढय़ाविषयी लिहिणे अपेक्षित होते.
– कीर्तिकुमार वर्तक, वसई

ज्येष्ठांनी स्वीकारावे सहनिवास
१५ सप्टेंबरच्या अंकातील भारती भावसार यांचा ‘शाश्वती सहजीवनाची’ हा लेख वाचला. सदर लेख म्हणजे केवळ एका वृद्धाश्रमाची (नव्हे सहनिवासाची) ओळख नसून सद्यस्थितीत आई-वडील, आजी-आजोबा यांना दिलेला कानमंत्र आहे. आपण अहंपणा बाजूला ठेवून मानसिकता बदलायला हवी. हा लेख वाचल्यावर विवंचनेत असलेले ज्येष्ठ नागरिक अशा ‘सहनिवासात’ राहणे मनापासून स्वीकारतील यात शंका नाही. त्यामुळे समवयस्क मित्र लाभतील, आवडीनिवडीही जोपासता येतील. आपल्या मुलापासून वेगळे राहतोय किंवा राहावयास भाग पाडले असे यत्किंचितही वाटणार नाही. ज्येष्ठ नागरिकांचा सेकंड इनिंगमधला संसार एकाकी भासणार नाही. उर्वरित आयुष्य नक्कीच सुखकर होईल, यात शंका नाही.
– कृष्णा काजरोळकर, विक्रोळी (पूर्व)

हा व्यवसाय कसा?
२९ सप्टेंबरच्या अंकातील पान तीन उघडले. त्यावरील डॉ. आठलेकर यांचा वेश्यांवरील लेख वाचला आणि विचारचक्रे सुरू झाली. देहविक्री करण्याच्या कामाला व्यवसाय का म्हणावे? हा त्यांनी विचारलेला प्रश्न खरोखरीच विचार करायला लावणारा आहे. लेखिकेने र.धों.च्या विचारांना उत्तम रीतीने प्रस्तुत करण्याचे काम केले आहे. एका पुरुषाने स्त्रीच्या भावना समजून आणि तिचे समाजातील स्थान मानाचे व आदराचे व्हावे, यासाठी प्रयत्नशील राहिल्यास बहुधा हा प्रश्न सुधारू शकेल. कारण वेश्यागृहे बंद पाडणे हा त्यावरील तात्पुरता उपाय असावा. आजूबाजूला बघितले तर कित्येक जोडप्यांचे वैवाहिक जीवन समाधानी नसल्याचे दिसते. कुढत, रेटत ते संसाराचा गाडा पुढे नेत राहातात; कधी त्याची परिणती घटस्फोटात होते, तर कोणी व्यसनाच्या अधीन होतात, नाही तर कोणत्यातरी आजाराला जवळ करून घेतात. अशा परिस्थितीत वेश्यागमन करणारे पुरुष आहेत हे नाकारता येणार नाही. पण स्त्रीने जर पर पुरुषाबरोबर मत्री जरी केली तरी तिच्याकडे वाईट नजरेने बघितले जाते. कसा आहे हा समाज?  स्त्रीनेच का म्हणून सर्व सहन करायचे? तिला भावना नसतात का? तिची इच्छा पूर्ण होण्यास तिने काय करावे? इथेच र.धों.म्हणतात की,  पुरुष वेश्या का नाहीत? खरेच हा प्रश्न यथार्थ आहे.
आपल्या देशातही मुली विकण्याचे प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहेत. एका देशातून दुसऱ्या देशात मुलींची आयात-निर्यात होताना साऱ्यांकडूनच कशी डोळेझाक होते का? आता स्त्री-पुरुष लिंगोत्तारेचे प्रमाण १०००-९१० वर आले आहे. ते पाहता या देशात स्त्रियांना किती मानाचे स्थान आहे, हा प्रश्नच निर्माण होतो. लेखातील शेवटचे वाक्य तर अंत:करण ढवळून टाकणारे आहे. ‘या मुलींच्या ठिकाणी आपली मुलगी व आपल्या घरातील वा परिचयातील एखादी स्त्री ठेवून बघावी तेव्हा या दलदलीत ती व्यक्ती फसली आहे, अडकली आहे तिची कल्पना येईल.’ ही वेदना कळू शकेल. खरंच असे वाटते,असा दिवस उगवेल का की स्त्रीला देहविक्रय करावा लागणार नाही. या नरकयातनांमधून तिची सुटका होईल. प्रेम, प्रणय आणि मग मिळणारे शरीर सुख प्रत्येक स्त्री आनंदाने, पावित्र्याने मिळवू शकेल असा दिवस उजाडेल का?
-गौरी गोगटे, नाशिक

‘रंगमगन’ भावले
२२ सप्टेंबरचा ‘चतुरंग’  नेहमीप्रमाने छान आहे. अमृता सुभाष यांचे ‘रंगमगन’ खूप भावले. सुंदर चित्रे काढता येणे कौतुकास्पदच. पण त्याप्रमाणे चित्रे बघता येणे हीसुद्धा कला आहे. हे त्यांनी फार उत्तम प्रकारे लिहिले आहे. अभिनय, चित्रकला आणि रंग यांचे नातेही त्यांनी हळुवार उलगडले आहे. याबद्दल अमृता सुभाष यांचे अभिनंदन. श्रीगणेश उत्सवामधील स्त्रियांचे रंगकाम, आवाज, पौरोहित्य वगेरे मार्गातून बाप्पाला अर्पण केलेली सेवा कौतुकास्पद आहे.
-पुष्पा जोशी, ई-मेलवरून

चिमण्यांनो परत फिरा रे..
माधुरी ताम्हणे यांचा २९ सप्टेंबरच्या अंकातील ललित लेख ‘या चिमण्यांनो..’ अगदी अप्रतिम, भावस्पर्शी लेख असाच होता. खऱ्या अर्थाने सुवर्ण नगरीतला ‘तो’ कांचन मृग किती फोल, किती पोकळ आहे हे जेव्हा त्या कोणाच्या तरी कुडीतला प्राण असणाऱ्या चिमण्या-पाखराला कळेल तेव्हाच अशी चिमणी-पाखरं परत फिरतील..पण खरं सांगायचं तर कांचन नगरीमध्ये पदार्पण केल्यावर चिमण्यांच्या संवेदना गोठून जातात आणि सगळं काही सुवर्णमय दिसू लागतं. त्यात किती निर्जीवता आहे हे कळण्याइतपतही प्राण त्यांच्या भावनांमध्ये उरत नाही ही सुवर्ण नगरीची शोकांतिका आहे आणि त्या शोकांतिकेचा कळस म्हणजे सर्वकाही सोन्याच्या नाण्यांमध्ये तोलणारे हे चिमणे भावना, संवेदना, मनाची स्पंदने, सर्वकाही ‘त्या’ एकाच तराजूने तोलतात. त्यामुळे त्यांना आपल्याच माणसांची आर्त हाक ऐकू येत नाही आणि जिव्हाळ्याची माणसेच अगतिक होऊन बसतात.
-अनामिक, ई-मेलवरून  

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Readers letter readers email

First published on: 13-10-2012 at 10:49 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×