विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अपंग आणि दुर्बल घटकातील स्त्रिया आणि मुलींसाठीच्या योजनांची माहिती.

सामाजिक न्यायातून स्त्रियांचा समतोल विकास या मागील लेखात सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील स्त्रियांसाठी आणि मुला-मुलींसाठी राबविण्यात येणाऱ्या काही योजनांची माहिती आपण घेतली. आज दुसऱ्या भागात याबरोबरच विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अपंग आणि दुर्बल घटकातील स्त्रिया आणि मुलींसाठीच्या योजनांची माहिती आपण घेणार आहोत.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थी-विद्याíथनींना निम्न आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठात प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते अशा विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांच्यातील गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आणि पीएच.डी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश मिळाला आहे अशा ५० विद्यार्थ्यांना (पीएचडी-२४/ पदव्युत्तर २६) या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी विद्याíथनी किंवा विद्यार्थी हा अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे वय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाकरिता ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे तर पीएचडी अभ्यासक्रमाकरिता ४० पेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे. पालकांचे उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे तर विद्यार्थ्यांनी क्यूएस रँक ३०० मधील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. यामध्ये विद्यापीठाने प्रमाणित केलेली पूर्ण शैक्षणिक फी व इतर खर्च मंजूर करण्यात येतो. विद्यार्थ्यांस वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी १४ हजार यूएसए डॉलर तर यूकेसाठी ९ हजार पौंड याप्रमाणे देण्यात येतो. विद्यार्थ्यांना आकस्मिक खर्चासाठी यूएसए व इतर देशांसाठी १३७५ यूएसडी तर यूके साठी १ हजार पौंड इतके अर्थसाहाय्य देण्यात येते. यात पुस्तके, अभ्यास दौरा यांसारख्या खर्चाचा समावेश आहे. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांस परदेशात जाताना आणि अभ्यासक्रम झाल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च तिकीट सादर केल्यानंतर मंजूर करण्यात येतो.

यासाठी जाहिरातीद्वारे दरवर्षी मे महिन्यात अर्ज मागविण्यात येतात. यासाठी आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे संपर्क करावा लागतो.

पुस्तकपेढी योजना

वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय, सीए, एम.बी.ए पाठय़क्रम असणाऱ्या महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी योजनादेखील राबविली जाते. यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असणे तसेच त्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळालेली असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत दोन विद्यार्थ्यांमागे एक संच याप्रमाणे वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठी ७५००, कृषीसाठी ४५००, पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ५०००, तंत्रनिकेतनसाठी २४००, सीए, एमबीए आणि विधि अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांस एक संच याप्रमाणे ५००० रुपयांचे अनुदान दिले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्य़ाचे साहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडे संपर्क साधावयाचा असतो.

सबलीकरण व स्वाभिमान योजना

दारिद्रय़रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतमजूर कुटुंबाच्या उत्पन्नाचे स्रोत वाढावा, त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी यासाठी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविली जाते. यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील असणे, तो किंवा ती दारिद्रय़रेषेखालील भूमिहीन शेतमजूर असणे आवश्यक आहे. लाभार्थी हा १८ ते ६० वयोगटातील असावा. योजनेचा लाभ देताना विधवा तसेच परित्यक्तांना प्राधान्य आहे. योजनेमधून लाभार्थ्यांस ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर बागायती जमीन देण्यात येते. जमीन खरेदीसाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान व ५० टक्के बिनव्याजी कर्ज देण्यात येते. कर्ज परतफेडीची मुदत १० वर्षांची असून कर्जाची परतफेड कर्ज मंजुरीनंतर २ वर्षांनी सुरू करण्यात येते. योजनेच्या अटी आणि शर्ती संबंधित जिल्ह्य़ाचे साहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयात कळू शकतील.

निर्वाह भत्ता

व्यावसायिक पाठय़क्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन योजना राबविली जाते. यामध्ये चार ते पाच वर्षांचे अभ्यासक्रम जसे वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुवैद्यकीय आणि वास्तुशास्त्र यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यात १० महिन्यांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रति महिना ७०० रुपये निर्वाह भत्ता मिळतो. दोन ते तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी जसे की अभियांत्रिकी पदविका, एमबीए, एम.एस.डब्ल्यू यांसारख्या अभ्यासक्रमांसाठी १० महिन्यासाठी प्रति विद्यार्थी प्रति महिना ५०० रुपयांचा निर्वाह भत्ता मिळतो. दोन किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी निर्वाह भत्ता ५०० रुपये प्रति विद्यार्थी प्रति महिना १० महिने असाच आहे.

जे विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश मिळण्यास पात्र आहेत, पण त्यांना वसतिगृहाबाहेर राहावे लागते त्यांना चार ते पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी १ हजार रुपये प्रति महिना १० महिन्यांसाठी, दोन ते तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ७०० रुपये प्रति महिना १० महिन्यांसाठी आणि दोन किंवा त्यापेक्षा कमी वर्षांच्या कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी ५०० रुपये प्रति महिना १० महिन्यांच्या कालावधीसाठी याप्रमाणे निर्वाह भत्ता मिळतो. योजनेच्या लाभासाठी संबंधित जिल्ह्य़ाचे साहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे संपर्क साधावा लागतो.

शिष्यवृत्ती

माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती- यात ५ वी ते ७ वीमधील तसेच ८ वी ते १० वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिल्या दोन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. ५ वी ते ७ वीमधील विद्यार्थ्यांना ५० रुपये दरमहा याप्रमाणे १० महिन्यांसाठी आणि आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना १००रुपये दरमहा १० महिन्यांसाठी अशी शिष्यवृत्ती मिळते. ही शिष्यवृत्ती जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून मंजूर होते. यासाठी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक तसेच सबंधित जिल्ह्य़ाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे संपर्क साधावा लागतो. योजनेतील अटी आणि शर्तीचे पालन करणे आवश्यक.

* दहावीपूर्व शिष्यवृत्ती योजना-

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ही योजना राबविली जाते. ही योजना शासकीय मान्यताप्राप्त शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू आहे. यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही. पालकांची उत्पन्नाची मर्यादा वार्षिक २ लाख रुपये इतकी असणे आवश्यक आहे. वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा १५० आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ३५० रुपये दहा महिन्यांसाठी दिले जातात. पुस्तके आणि इतर गोष्टींसाठी वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक ७५० तर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना १ हजार रुपये वार्षिक दिले जातात. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्य़ाचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे तर बृहन्मुंबईसाठी समाजकल्याण अधिकारी वर्ग दोन यांच्याकडे संपर्क साधावा लागतो.

याशिवाय विभागाच्या काही महत्त्वाच्या योजना खालीलप्रमाणे आहेत.

* औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना

* गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे

* अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे

* वृद्धाश्रम/ मातोश्री वृद्धाश्रम योजना

*  विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती योजना

*  इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदान योजना

*  इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेतलेल्या आणि १२ वी मध्ये शिकणाऱ्या विमाप्र प्रवर्गाच्या मुला-मुलींना राजर्ष छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना

* व्यावसायिक पाठय़क्रमाशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील व शासकीय वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या परंतु वसतिगृहात प्रवेश मिळण्यास पात्र असलेल्या विजाभज/विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना

* इयत्ता ८ वी ते १० मध्ये शिकणाऱ्या विजाभज/ विमाप्र प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

*  माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विजाभज/ विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व गुणवत्ता शिष्यवृत्ती

*  माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विजाभज/विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण फी व परीक्षा फी प्रदान योजना

* औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विजाभज/ विमाप्र प्रवर्गाच्या प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन योजना

* विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी कनिष्ठ महाविद्यालय योजना

* शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून विजाभज आणि विमाप्र प्रवर्गाच्या उमेदवारांना व्यावसायिक प्रशिक्षण (मागेल त्याला प्रशिक्षण) योजना

* शालांत पूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

* दहावीनंतर शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

* स्वंयरोजगारासाठी दिव्यांग व्यक्तींना वित्तीय साहाय्यक (बीजभांडवल)

* दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधनांचा पुरवठा. दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके

* कौशल्य विकासाच्या योजना

याशिवाय महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत ही शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि वित्तीय साहाय्याच्या योजना राबविल्या जातात. यासाठी संबंधित आस्थापनांकडे संपर्क साधावा लागतो.

डॉ. सुरेखा मुळे  drsurekha.mulay@gmail.com