‘‘चिडण्यामुळे हवा तो परिणाम मिळत असेल तर मुलांवर चिडावं कधीमधी. पण त्यातून मनस्ताप आणि वादावादीच होत असेल तर तिथला ‘इश्यू’ नव्यानं तपासायला हवा. आणि तुमच्याही त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा चुकीच्या नाहीत, पण अपेक्षा तशाच्या तशा पूर्ण झाल्या नाहीत तर होणारी अतिरेकी चिडचिड, त्यातच अडकून राहणं आणि मुलांना पुन:पुन्हा तेच सांगत राहणं यात गडबड आहे आणि अपेक्षा मुलांच्याही असतात, हेही तुम्ही समजून घ्यायला हवं ना?’’ टीन एजर्स वा पौगंडावस्थेतील मुलांशी वागताना याचं भान हवंच..

‘‘हाय. कसली जोरदार चर्चा चाललीय?’’ कॉलनीतल्या बागेच्या कट्टय़ाजवळ, जोरजोराने हातवारे करत एकमेकांशी बोलणाऱ्या विशाखा आणि मनोजला पाहून मानसीनं विचारलं. तसा मनोज वैतागलेल्या स्वरात म्हणाला,

‘‘या मुलांशी कसं वागायचं तेच कळत नाहीये मानसी. दोघंही सतत मोबाइल नाही तर इंटरनेटवर. आदित्यची पुढच्या वर्षी दहावी, रविवारशिवाय माझ्या मोबाइलला हात लावायचा नाही असा आजच दम भरलाय. त्याच्यात क्षमता आहे, पण अभ्यासाला तासाभराचीही बैठक नाही. सगळं लक्ष खेळात.’’

‘‘अगं, आर्या तर हल्ली पुस्तकंसुद्धा मोबाइलवर वाचते. कशाला डोळे खराब करायचे? स्वयंपाकात मदत शून्य, घरभर पसारा. मुलांच्या अशा वागण्यामुळे सतत वादावादी, शांतता नाहीच. आजही अति झाल्यामुळे बाहेरची थंड हवा खायला आम्ही इथे येऊन बसलो.’’

‘‘पण हवा एवढी गरम होण्याइतकं घडलं काय?’’

‘‘अगं, काल रात्री आर्या उशिरापर्यंत कॉलेजची असाइनमेंट करत होती. मग सकाळी उठायला उशीर. रविवारी घर आवरायचं ठरलेलं, म्हणून हाक मारली, तर ‘रविवारी तरी झोपू दे’ म्हणून माझ्यावर खेकसली. निवांत उठली, गाणी ऐकत, रमतगमत स्वत:चं आवरलं, तेव्हाच माझा पेशन्स संपला होता. मग कपाटातली क्रोकरी पुसायला काढली, तेवढय़ात ‘सरप्राईज पार्टी ठरलीय’ असं सांगत तिची मैत्रीण आली. त्याबरोबर काढलेला पसारा तेवढा फटाफट आवरून बाईसाहेब निघाल्या.’’

‘‘अगं, मुलींनाही रविवारच मिळतो मोकळा. तरी मदतीला आली, काढलेलं फटाफट आवरलं, पुष्कळ झालं की? आणि आदित्य कुठेय?’’

‘‘आदित्य पण थोडासा नाराजीतच खेळायला गेलाय. मागच्या वेळी मित्रांबरोबर हट्टानं जाऊन एक बाही हिरवी, एक पिवळी असले मवाल्यासारखे कपडे आणले, म्हणून आज मी माझ्या पसंतीनं त्याला नवे कपडे घेतले. तो भांडला नाही, पण ‘चम्या’सारखे कपडे म्हणाला. गेलाय ग्राऊंडवर खेळायला..’’ मनोजनं तक्रार मांडली.

‘‘अरे मग छान झालं की. तुम्हाला दोघांना अचानक एक मस्त संध्याकाळ मिळाली भटकायला.’’

‘‘आम्हाला काय पिळतेयस मानसी? तेही एवढे दडपणात असताना?’’

‘‘पिळत नाहीये. मुलं नाराज असूनही या क्षणी मजा करतायत आणि तुम्ही घडून गेलेल्या गोष्टींवर चिडून चिडून बोलण्यात तुमचा मोकळा वेळ वाया घालवताय. ‘या मुलांच्या नादात आम्ही कित्येक र्वष एकमेकांसाठीसुद्धा वेळ दिला नाही’ अशी उद्या तुम्हीच तक्रार कराल.’’

‘‘.. आहे खरं तसं, पण तूच सांग, मुलांचं असं वागणं बरोबर आहे का? आम्ही काही चुकीचं थोडंच सांगतो? मुलांच्या भल्यासाठीच सांगतो ना?’’

‘‘बरोबर की चूक? मध्ये उत्तर शोधलं तर काहीच हाती लागत नाही गं विशाखा. मुलांचं वागणं चुकतंय हे समजा मला किंवा कुणालाही मान्य असल्यामुळे ते बदलेल? की तुझी चिडचिड थांबेल?’’

‘‘म्हणजे त्यांनी कसंही वागायचं आणि आम्ही चिडायचं पण नाही?’’

‘‘चिडण्यामुळे हवा तो परिणाम मिळत असेल तर चिडावं कधीमधी. पण त्यातून मनस्ताप आणि वादावादीच होत असेल तर तिथला ‘इश्यू’ नव्यानं तपासायला हवा. तुम्हाला त्रास देण्यासाठी मुलं मुद्दाम अशी वागतात का?’’

‘‘अंऽ, मुद्दाम नसेल, ती त्यांच्याच नादात असतात हे जास्त खरं.’’

‘‘हे माहितीय तरीही ‘एवढा’ राग?’’

‘‘हजारदा सांगूनही आर्यानं दुर्लक्ष केलं की संताप होतो. घरातलं काहीच कसं करावंसं वाटत नाही तिला? या वयात मी आईला किती मदत करायचे. घर नीटनेटकं ठेवायचे. उद्या हिच्या सासरचे माझाच उद्धार करणार.’’

‘‘अगं, किती काळ एकत्र मिसळतेयस तू! ‘आमच्या लहानपणी..’ म्हणजे भूतकाळ आणि ‘आर्याच्या सासरचे’ म्हणजे भविष्यकाळ. असा गोंधळ केल्याने चिडचिड वाढते, मुद्दा सुटतो.’’

‘‘??’’

‘‘असं बघ, तू तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ज्या पद्धतीनं वागून सगळ्यांचं कौतुक मिळवलंस तसंच आज्ञाधारक, गुणी वागणं तुला बरोबर वाटतं. मुलं त्याकडे दुर्लक्ष करतात, बिनधास्त राहतात, म्हणजे काही तरी चुकतंय, त्यांच्यात काही तरी कमी आहे असं वाटतं ना? मुलं बिघडली, आयुष्यात मागे पडली तर? उद्या ‘लोक’ काय म्हणतील? अशा असंख्य भीती छळतात. मग समजुतीनं घेणं सुटून मुलांवर फटकन टीका करणं घडतं.’’

‘‘म्हणजे आमच्या अपेक्षा चुकीच्या..’’

‘‘नाही, अपेक्षा तशाच्या तशा पूर्ण झाल्या नाहीत तर होणारी अतिरेकी चिडचिड, त्यातच अडकून राहणं आणि मुलांना पुन:पुन्हा तेच सांगत राहणं यात गडबड आहे विशाखा. अपेक्षा मुलांच्याही असतात. या पिढीच्या स्वातंत्र्य, मोकळेपणा, स्मार्टनेसच्या कल्पना वेगळ्या आहेत. त्यांचं जगही आपल्यापेक्षा वेगळं असणार आहे. मोबाइल-इंटरनेटमध्ये त्यांचा भविष्यकाळ आहे. स्वयंपाक येणं, नीटनेटकेपणा हे गुण हवेतच, पण त्या कौतुकापेक्षा नवनवी अ‍ॅप्स शोधून वापरणं त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. पालकांच्या सक्तीमुळे त्यापासून दूर राहावं लागलं तर ग्रुपमध्ये ती मागास ठरतात, मित्र हसतात त्यांना. या वयात ग्रुपमध्ये ‘भारी’ दिसणं फार महत्त्वाचं असतं. तिथे चेष्टा, अपमान चालत नाही. मग अशा ‘नियंत्रक’ पालकांबद्दल मुलांचाही आदर कमी होतो. तीही फटकन उलटून बोलतात.

‘‘हो, आर्याला काही सांगताना, ‘ती नाहीच ऐकणार’ अशी एक खात्री असते मला. त्या वेळी खूप अगतिक, दुर्लक्षित वाटतं.’’

‘‘हो, पण तू तिची आई. वयाने, अधिकाराने मोठी. त्यामुळे लगेच ‘कशी करत नाही तेच पाहते’पर्यंत पोहोचतेस. तुझ्या आवाजातली हुकूमत, अविश्वास, आर्याला जाणवल्यावर, ‘आता नाहीच ऐकणार’ ही तिचीही ताठर प्रतिक्रिया येते आणि तुमचं युद्ध सुरू.’’

‘‘अगदी असंच घडतं. पण हे बदलायचं कसं?’’

‘‘अशा वेळी मुलांना काय वाटत असेल?’’

‘‘आर्या म्हणतेच की, आमचं तुम्हाला काहीच पटत नाही. वाचलं नाही, तरी रागावणार, मोबाइलवर अभ्यासाचं वाचत असले, तरी ऑनलाइन का वाचतेस? रात्री जागून असाइनमेंट पूर्ण केली तर सकाळी लवकर का उठत नाहीस? मित्र-मैत्रिणी उनाड आहेत..’’

‘‘आदित्यही कुरकुरतो, की ‘मी कितीही अभ्यास केला तरी बाबा तुम्ही माझ्या फुटबॉल मॅचला येतसुद्धा नाही’ म्हणून.’’

‘‘विशाखा, तुला जिमला जायला आवडत नव्हतं. मी चार-पाचदा विचारल्यावर एकदा वैतागून सांगितलंस, ‘मला बोअर होतं जिम.’ माझा हेतू तुझ्या भल्याचाच होता ना?’’

‘‘माझं वेगळं आणि आता जिमला येतेय ना मी?’’

‘‘रागावू नकोस पण न्याय सर्वाना सारखा हवा. तुला दुखवायचं नव्हतं, पण मुलांना कसं वाटत असेल त्याची ‘जाणीव’ होण्यासाठी आठवण दिली. आपण जिमला जायला पाहिजे हे तुलाही कळत होतं, पण त्याची आवड आणि प्राधान्य नव्हतं. वजनकाटय़ानं ‘जाणीव’ जागी केल्यावर तुझं प्राधान्य बदललं, नंतर आवडायलाही लागलं. मुलांचंही तसंच होतं. अभ्यास करायला पाहिजे हे आदित्यला कळतं, पण त्याची आवड आणि प्राधान्य खेळ आहे. आर्याला तुला मदत करण्याची इच्छा असते पण तिच्या वयाला तर फारच आकर्षणं असतात. अशा वेळी, मुलांमध्ये जी मूल्यं रुजवायला हवीत, त्याबद्दलची ‘जाणीव’ जागी करण्यावर फोकस हवा. ‘तुम्ही कसे चुकता’वर फोकस जाऊन मुलं ‘टार्गेट’ होतात, दुखावतात. मग बिघडतं सगळं. प्रत्येक गोष्टीवर वारंवार टीकाच झाली की आर्यासारखी बंडखोर मुलं भांडतात, काहीच ऐकेनाशी होतात. आदित्यसारखी साधी सरळ मुलं त्यांच्या फुटबॉलसारख्या कौशल्यालाही कमी लेखलं गेलं की हिरमुसतात, आत्मविश्वास संपतो.’’

‘‘पण म्हणजे वागायचं कसं मानसी?’’

‘‘प्रत्येक प्रसंगात कसं वागायचं ते ज्याचं त्यानं ठरवायचं. पण बदल हवा जुन्या अपेक्षा आणि अप्रोचमध्ये. संवाद, सन्मान, स्पेस आणि सोबत या चार गोष्टींकडे नव्याने पाहायला हवं. मुलांना आपली सोबत हवी, आधार हवा, पण मध्येमध्ये करून ‘आमचंच बरोबर’चा अतिरेकी आग्रह टाळायचा. त्यांच्या आवडी, अभ्यासाच्या, जगण्याच्या पद्धती त्यांनी  अनुभवातून, प्रयोगातून ठरवण्यासाठी ‘स्पेस’ द्यायची. ती त्यांचा रस्ता शोधतील, यावर विश्वास ठेवायचा. कारण विश्वासासारखी मूल्यं आणि संस्कार वागण्यातून रुजवावे लागतात. मुलांकडून गंभीर चुका होऊ  नयेत एवढं लक्ष अवश्य ठेवायचं.’’

‘‘तारेवरची कसरतच आहे.’’

‘‘सवयीनं जमतं रे आणि हो, बहुतेक मुलांना अभ्यास आणि बंधनं आवडत नाहीत हे जागतिक सत्य आहे. त्याबाबत काल्पनिक आदर्शवादात पालकांनी अडकायचं नाही. तरच पालकांशी संवाद करायला मुलांना मोकळेपणा वाटतो.’’

‘‘आणि चांगल्या सवयी?’’

‘‘मुलांच्या आवडींचा थोडा जरी स्वीकार झाला तरी मुलं पालकांचं ऐकण्याच्या मानसिकतेत येतात. तेव्हा योग्य वेळी, मुलांचा पसारा, आळशीपणा, शिस्त, इलेक्ट्रॉनिक गॅजेटसच्या अतिरेकातले धोके या जिव्हाळ्याच्या विषयांबाबत थोडक्यात, नेमका संवाद परिणामकारक होऊ  शकतो.’’

‘‘हं. पचायला अवघड आहे, पण प्रयत्न करून पाहू. नाही तरी असंही आमच्या पद्धतीनं काही बदलत नाहीये. आता तरी मुलांची चिंता सोडून आम्ही सुट्टी एन्जॉय करतो.’’ असं म्हणून हसत विशाखा आणि मनोज भटकायला बाहेर पडले.

Neelima.kirane1@gmail.com