रुचिरा सावंत

समुद्रजीवशास्त्र ही विज्ञानशाखा अजिबातच रूढ अर्थानं लोकप्रिय नाही. या शाखेत शिक्षण कसं घ्यायचं हेही अनेकांना माहीत नसतं. लहानपणीच या शाखेची आपल्या भविष्यासाठी आत्मविश्वासपूर्वक निवड करणाऱ्या डॉ. आभा देशपांडे यांचं काम म्हणूनच जाणून घेण्यासारखं आहे. समुद्री जीवांविषयी शास्त्रीय माहिती मिळवत पुनर्जनन जीवशास्त्राच्या अभ्यासात उतरलेल्या डॉ. आभा यांच्याविषयी..

maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti offer cash reward for predict correctly voting
कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

औरंगाबादच्या ‘शारदा मंदिर’मधील आठवीचा वर्ग. मराठीच्या बाई मुलांना त्यांच्या स्वप्नांविषयी विचारत होत्या. ‘‘मोठं होऊन तुम्हाला कोण व्हायचं आहे?’’ हा सगळय़ा मोठय़ांचा लहानांना विचारण्यासाठीचा आवडता प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला. वर्गातल्या एका चुणचुणीत, हुशार मुलीनं ‘मला समुद्रजीवशास्त्रज्ञ व्हायचं आहे,’ असं सांगून सगळय़ांना अवाक् केलं. समुद्राचा दूपर्यंत संबंधही नसणाऱ्या औरंगाबादसारख्या छोटय़ा शहरातली मराठी माध्यमात शिकणारी ‘आभा’ आपण शास्त्रज्ञ व्हायचं ठरवते हेच ‘हटके’ असताना तिनं ‘समुद्रजीवशास्त्रज्ञ’ ही फारशी प्रचलित नसणारी शाखा अधोरेखित करणं बाईंना वेगळं वाटलं. त्या कौतुकानं हसल्या, पण त्यांनीही मनोमन तिचं आगळंवेगळं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून प्रार्थना नक्की केली असणार! इयत्ता चौथीत असल्यापासूनच आपण शास्त्रज्ञ व्हायचं हे या चिमुरडीचं पक्कं होतं.

लहानपणी पाहिलेली करिअरची स्वप्नं ते जाणत्या वयात आखलेल्या भविष्याच्या योजना यात सर्वसामान्यपणे फार तफावत आढळते; पण या मुलीनं तिच्या पहिल्या स्वप्नालाच ‘लॉक’ केलं आणि चावी समुद्रात फेकून दिली! ही मुलगी म्हणजे शास्त्रज्ञ डॉ. आभा देशपांडे. आई-बाबांची एकुलती एक लाडकी लेक असणाऱ्या आभा यांना शाळा आणि अभ्यासाची सुरुवातीपासूनच आवड होती. भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन पुढे ‘एलआयसी’मधील कामामुळे विमा क्षेत्रात काम करणारी आई रागिणी आणि वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षणासह बँकेत नोकरी करणारे वडील सतीश यांना त्यांच्या मुलीनं कायम निसर्गप्रेम जपताना पाहिलं होतं. ट्रेकिंग करणारे वडील आणि पशू-पक्ष्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांचा अभ्यास करणारी आई यांनी आभा यांना निसर्गाच्या जवळ आणलं.

 आपण वैज्ञानिक होणार, हे लेकीनं घरात जाहीर केल्यानंतर आईवडिलांनी नानाविध विषयांवरची पुस्तकं तिला आणून दिली. त्यात वैज्ञानिकांची चरित्रं, आत्मचरित्रं होती. विज्ञानकथा ते वैज्ञानिक लेखन असं सगळं होतं. घरी सगळे ‘डिस्कव्हरी’ वाहिनी पाहू लागले. आभा यांना स्वप्नं पाहायला प्रेरणा दिली गेली आणि ती पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कुटुंबानं मेहनत घेतली.

आभा सातवीत असताना डॉ. सारंग कुलकर्णी या समुद्रजीवशास्त्रज्ञाच्या कार्याचा आढावा घेणारा एक लेख त्यांनी वाचला. त्यांना त्यांचं ईप्सित गवसलं. ‘‘मला डॉ. सारंग यांच्यासारखंच व्हायचं आहे.’’ हा निर्णय त्यांनी घेतला. मग नुकत्याच घरी आलेल्या संगणकाचा वापर करून बाबांनी या विषयावर अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली. ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी’च्या डॉ. व्ही. के. बनकर यांना त्यांनी मदत व माहितीच्या अपेक्षेनं एक ईमेल धाडला. आपल्या मुलीला या विषयात शिक्षण घ्यायचं झाल्यास असणारी प्रक्रिया, उपलब्ध संधी याविषयी माहिती मागितली. विशेष म्हणजे त्या भल्या माणसानं त्यांच्या शंकांचं निरसन करणारं उत्तर त्यांना तातडीनं पाठवलं. भारतात या विषयात विशेष पदवी अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याचं सांगितलं आणि त्याबरोबर आभा जो रस्ता निवडू शकतील त्याची कल्पनाही दिली. पदवी अभ्यासासाठी जीवशास्त्रातली कोणतीही शाखा निवडून पुढे गोवा विद्यापीठातून या विषयात विशेष पदव्युत्तर शिक्षण घेता येईल, हा पर्याय त्यांनी दिला.

जीवशास्त्राचा अभ्यास करायचाच आहे, तर पदवीदरम्यान जैवतंत्रज्ञानाचा अभ्यास करावा असं ठरलं आणि पुण्यात ‘मॉडर्न महाविद्यालया’तून प्रवास सुरू झाला. जैवतंत्रज्ञान या सर्वार्थानं प्रगत विषयानं आभा भारावून गेल्या; पण त्यांची जीवशास्त्रातल्या मूलभूत संकल्पनांविषयीची ओढ कायम राहिली. वर्गमित्र जीवशास्त्रातल्या प्रगत संकल्पनांवर संशोधन करत असताना आभा यांनी संशोधन प्रकल्पासाठी फुलपाखरांमधली जैवविविधता हा मूलभूत विषय निवडला. सोबतच्या अनेकांना फारसे आकर्षित न करणारे हे मूलभूत विषय अभ्यासणं त्यांना आवडत होतं. इतर कुणी काही करत आहे म्हणून आपणही तेच करावं, असं आभा यांनी कधी केलं नाही. जैवतंत्रज्ञानात अभ्यासाची संधी उपलब्ध असतानाही त्यांनी पुणे विद्यापीठात प्राणिशास्त्र आणि गोवा विद्यापीठात समुद्रजीवशास्त्र या दोन मूलभूत अभ्यासाच्या विषयांची पुढचा पर्याय म्हणून निवड केली. अंतिमत: बालपणीच्या ध्यासानं स्पर्धा जिंकली आणि त्यांचं जहाज गोव्याच्या किनारपट्टीला लागलं!

समुद्रजीवशास्त्राचा अभ्यास करताना आभा रमून गेल्या. समुद्रजीवशास्त्राचा अभ्यास त्यांना अनेक दिशांनी वाहणाऱ्या प्रवाहासारखा वाटला. नव्या पद्धतीची विचारप्रणाली इथे तयार झाली. इथे काहीच स्थिर नसतं. चैतन्यदायी आणि गतिमान जगाचा अभ्यास करणं त्यांनाही प्रवाही करून गेलं. ते वेगळं जग अनुभवत, ते सर्वासमोर उलगडण्यासाठी त्या या काळात सज्ज झाल्या. पदव्युत्तर शिक्षणाच्या काळात आभा यांना एका वैज्ञानिक जहाजावर जाण्याची संधी मिळाली. हे सर्वच विद्यार्थी वैज्ञानिकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्याकडून शिकण्यासाठी त्या प्रवासात सहभागी झाले होते. त्या अनुभवादरम्यान खऱ्या अर्थानं समुद्रजीवशास्त्रज्ञांना जवळून पाहाता आलं.

इथे आभा यांना ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी’ या संस्थेच्या या क्षेत्रातल्या योगदानाविषयी अधिक माहिती मिळाली. आपल्या पदव्युत्तर अभ्यासासाठीचा संशोधन प्रकल्प आपण याच संस्थेतून पूर्ण करायचा असं त्यांनी ठरवून टाकलं. या संस्थेतले सुप्रसिद्ध वैज्ञानिक असणाऱ्या डॉ. नरसिंह ठाकूर यांच्या प्रयोगशाळेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. डॉ. ठाकूर हे जिवाणू ते प्राणी अशा सर्व प्रकारच्या समुद्री जीवांवर काम करत होते. त्यांच्यामधल्या जीवप्रक्रिया समजून घेणं आणि त्याचा वापर कसा करता येईल हे पाहाणं, असं महत्त्वाचं काम ते करत होते. समाजासाठी आपल्याला योगदान देता यावं यासाठी कृतिशील संशोधनावर भर द्यायला हवा, असं आभा यांना वाटलं. या संशोधनाच्या काळात त्यांनी सजीवसृष्टी शास्त्र (ecology) विषयावर लक्ष केंद्रित केलं, जे पुढील काळातल्या संशोधनासाठी त्यांना उपयोगी ठरलं. त्यांच्या पुढील संशोधनासाठीचा तो पाया होता.

 ‘पीएच.डी.’च्या अभ्यासासाठी डॉ. नरसिंह ठाकूर यांनी आभा यांना स्पंज या समुद्री प्राण्यावर संशोधन करण्यासाठी आपल्या प्रयोगशाळेत आमंत्रण दिलं आणि ‘अकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रीसर्च’मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. स्पंजमधील जैविक संयुगांचा अभ्यास त्यांनी करायचं ठरवलं. ही जैविक संयुगं विविध कारणांनी मोठय़ा प्रमाणावर निर्माण करण्यासाठी स्पंजला प्रवृत्त करता येईल का आणि त्यांचा उपयोग विविध उत्पादनांमध्ये, औषधांमध्ये करता येऊ शकेल का, हा विचार घेऊन त्यांनी संशोधनाचा एक प्रस्ताव मांडला. स्पंजला स्वसंरक्षणासाठी मोठय़ा प्रमाणावर रासायनिक आयुधांची गरज असते. आभा यांच्या संशोधनाचा एक भाग म्हणून त्यांनी स्पंजमधील रासायनिक जैविक संयुगांचा अभ्यास केला. त्यासाठी गोव्यातील अंजुना समुद्रकिनाऱ्याचं उदाहरण घेतलं. हा खडकाळ समुद्रकिनारा महिन्यातून एक-दोन वेळा पूर्णत: उघड होतो. त्यादरम्यान तिथल्या खडकांवर त्यांना स्पंजची वाढ दिसली. यामध्येसुद्धा एक गंमत होती. पाण्यापासून जवळच्या भागात असणाऱ्या स्पंजच्या जोडीनं तिथे मृदू प्रवाळसुद्धा वाढत होतं. पाण्यापासून सर्वात दूरच्या भागात स्पंजच्या जोडीनं शैवाल वाढताना दिसलं, तर मधल्या भागात केवळ स्पंजची वाढ होताना दिसली. स्पंजमधील रासायनिक जैविक रसायनांचा अभ्यास करण्यासाठी हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या तीन भागांत वाढणाऱ्या स्पंजचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं, की शेजार लाभलेल्या स्पंजपेक्षा शेजार न लाभलेल्या स्पंजमधला तणाव फार कमी आहे, कारण त्यांना जागेसाठीची स्पर्धा करावी लागत नाही. शेजाऱ्यांमध्येसुद्धा मृदू प्रवाळांच्या शेजारी वाढणाऱ्या स्पंजवर जास्त तणाव आहे, कारण तिथे जागा व अन्न या दोहोंसाठी स्पर्धा आहे. शेवाळाच्या जवळ वाढणाऱ्या स्पंजमध्ये शैवालाबरोबर केवळ जागेसाठी स्पर्धा होत असल्यामुळे तणाव तुलनेनं कमी आहे. आपल्या पीएच.डी. संशोधनाचा काही भाग त्यांनी जर्मनीच्या प्रोफेसर गर्ट वोरहायडं यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे.

सध्या डॉ. आभा स्पंज या प्राण्याचं मॉडेल तयार करण्यात व्यग्र आहेत. त्याचा वापर करून त्याच्या वेगवेगळय़ा गुणवैशिष्टय़ांचा अभ्यास करता येईल. त्यासाठी त्या ह्युमन जीनोम सिक्वेन्सच्या धर्तीवर स्पंजच्या ‘होल जीनोम सिक्वेन्सिंग’नं सुरुवात करणार आहेत. या पद्धतीचा वापर करून स्पंजचं जनुकीय सूत्र ओळखून त्याची रीतसर मांडणी करणं हे क्लिष्ट, पण गरजेचं काम आहे. हे काम त्या बेल्जियममधल्या प्रोफेसर जॉ फ्रॉनस्वॉ फ्लोट या वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहेत.  पुनर्जनन जीवशास्त्राचा अभ्यास करणं हे डॉ. आभा यांचं ‘पोस्ट डॉक्टरल’ अभ्यासक्रमाचं ध्येय आहे. त्यासाठी स्पंजचा नमुना म्हणून वापर त्यांना करायचा आहे. पुढे जाऊन या अभ्यासाचा उपयोग पुनर्जनित औषधांच्या निर्मितीसाठी करण्याचा त्यांचा मानस आहे. समुद्री जीवांचं संवर्धन व शाश्वती हे त्यांच्या कार्याचं अंतिम ध्येय आहे. त्याची पहिली पायरी म्हणून सध्या त्या ‘सी सिक्स एनर्जी’ या संस्थेमध्ये समुद्री शेवाळाची शेती या विषयात संशोधन करताहेत.

आपल्या नुकत्याच सुरू झालेल्या प्रवासाविषयी सांगताना डॉ. आभा या प्रवासात आपल्या पालकांचं, मार्गदर्शकांचं आणि सहकाऱ्यांचं योगदान मोलाचं असल्याचं सांगतात. आपल्या स्वप्नावर आणि क्षेत्रावर जिवापाड प्रेम करणाऱ्या डॉ. आभा इतर तरुणांना आपल्याला जे आवडतंय ते मनापासून आणि संयमानं करण्याचा मूलमंत्र देतात. भविष्याला कवेत घेत वेगळय़ा वाटेवर चालणाऱ्या डॉ. आभा यांना त्यांचं एकाच वेळी मूलभूत व भविष्यवादी असलेलं संशोधन करत राहाण्यासाठी सदिच्छा.

postcardsfromruchira@gmail.com