scorecardresearch

Premium

संशोधिका : देशसेवेसाठी विज्ञान

‘भाभा अ‍ॅटॉमिक रीसर्च सेंटर’ येथून सुरुवात करून देशातल्या संशोधन कार्याचा पाया रचणारं मूलभूत संशोधन करणाऱ्यांपैकी एक म्हणजे डॉ. देवकी रामनाथन.

डॉ. देवकी रामनाथन
डॉ. देवकी रामनाथन

रुचिरा सावंत

‘भाभा अ‍ॅटॉमिक रीसर्च सेंटर’ येथून सुरुवात करून देशातल्या संशोधन कार्याचा पाया रचणारं मूलभूत संशोधन करणाऱ्यांपैकी एक म्हणजे डॉ. देवकी रामनाथन. धातूंच्या पृष्ठभागावरील अभिक्रियांचा अभ्यास करण्यासाठी लागणारं ‘फील्ड एमिशन मायक्रोस्कोप’ या साधनाची निर्मिती असो, अणुभट्टीमधील किरणांच्या धातू आणि इतर पदार्थावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय बनावटीच्या ‘अ‍ॅटोमिक रीझोल्युशन फील्ड आयन मायक्रोस्कोप’च्या निर्मितीमधलं योगदान असो, ‘इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड रीसर्च’च्या संशोधनातील महत्त्वपूर्ण भूमिका असो, की अणू विज्ञानाच्या क्षेत्रात उपयोगी  साधनांच्या निर्मितीचं काम असो. डॉ. देवकी यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. त्यांचा हा परिचय.

AI killing tech jobs
AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार? आयबीएम इंडियाचे प्रमुख काय म्हणतात नक्की वाचा!
prabhakar devdhar
इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचे शिल्पकार
ARI Pune recruitment 2024 what is the last date of application check out
ARI Pune recruitment 2024 : आगरकर संशोधन संस्थेमध्ये ‘शास्त्रज्ञ’ पदासाठी भरती सुरू; अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या
Researcher industrialist Prabhakar Deodhar
संशोधक उद्योगपती प्रभाकर देवधर

स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मदुराईच्या एका सुसंस्कृत आणि पारंपरिक विचारपद्धती असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाच्या परिवाराची ही गोष्ट. अन्नामलाई विद्यापीठातून ‘एम.ए.’ झालेल्या आपल्या मुलानं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर छानशी नोकरी पत्करावी, असं सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्वप्न त्याच्याही पालकांनी पाहिलं होतं. पण या तरुणाचं देशप्रेम इतकं, की चांगलं शिक्षण मिळवल्यावर सरकारी नोकरी न करता त्यानं स्वातंत्र्यलढय़ात उडी घेतली. प्रसंगी तुरुंगवास भोगला. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर माहिती व प्रसारण मंत्रालयात माहिती अधिकारी म्हणून ते रुजू झाले आणि कामानिमित्त दिल्लीत राहू लागले. त्यांना सात मुलं. पाच मुली आणि दोन मुलगे. त्यातल्या चौथ्या अपत्याचं नाव देवकी. याच मुलीनं पुढे डॉ. देवकी रामनाथन म्हणून विज्ञान क्षेत्रात नाव मिळवलं.   

 देवकी यांचा जन्म मदुराई येथे झाला असला तरी वडिलांच्या नोकरीमुळे त्यांनी दिल्ली हे शहर, तिथलं वातावरण बालपणी अनुभवलं होतं. त्या सातवी-आठवीत असताना वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यांचं बिऱ्हाड दिल्लीहून पुन्हा मदुराईला स्थलांतरित झालं. देवकी दहावीत असताना त्यांचं पितृछत्र हरपलं. हवाई दलात कार्यरत असणाऱ्या मोठय़ा भावाशिवाय परिवाराची आर्थिक जबाबदारी घेणारं इतर कुणी तेव्हा कुटुंबात नव्हतं. देवकी यांची आईही बुद्धिमान. स्वातंत्र्यपूर्व काळात राजाकडे वकील म्हणून सारे कायदेशीर काम पाहणारे वडील त्यांना लाभले होते. विद्वत्तेचं महत्त्व जाणणारी कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही त्या वेळी गावात मुलींना प्राथमिक शिक्षणापलीकडे शिकवण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे देवकींच्या आईला पुढचं शिक्षण पूर्ण करता आलं नव्हतं. तरीही पतीनिधनानंतर अपत्यांच्या शिक्षणाची आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी आईनं आपल्या मोठय़ा मुलाच्या मदतीनं खांद्यावर घेतली.

‘मुलींना शिक्षण देऊन काही फायदा नाही बरं! त्या लग्न करून परक्या घरी जाणार आहेत. हा पैशांचा आणि वेळेचा अपव्यय आहे,’ असं सांगणाऱ्या माणसांना देवकींच्या आईनं ठणकावून सांगितलं, ‘‘मला माझी मुलं त्यांच्या पायावर उभी राहिलेली पाहायची आहेत. त्यांना स्वबळावर त्यांच्या आयुष्यात मोठं होताना पाहायचं आहे. मी ज्या गोष्टींना आणि पर्यायानं संधींना मुकले, त्या मला माझ्या मुलींना उपलब्ध करून द्यायच्या आहेत. मग भलेही त्या जगाच्या पाठीवर कुठेही जावोत.’’ पारंपरिक विचारसरणी असणाऱ्या आणि चालीरीती पाळणाऱ्या त्या घरातल्या पाच बहिणींना समाजात फार मोकळेपणानं वावरता येत नसलं, तरी वडिलांनी जगभरातून जमवलेल्या पुस्तकांचा आधार त्यांना होता. वडिलांच्या वाचनालयातल्या विविध विषयांवरच्या शेकडो पुस्तकांनी त्यांच्या बालपणात रंग भरले. चरित्रात्मक आणि विज्ञानविषयक पुस्तकांचा देवकींना लळाच लागला. ‘विज्ञान स्वत:पुरतं शिकून उपयोगात आणणं पुरेसं नसून ते समाजासाठी आणि देशहितासाठी वापरात आणलं पाहिजे,’ असा संदेश देणारा लुई पाश्चर नावाचा हिरो त्यांना त्या वाचनालयात भेटला. देवकींच्या धमन्यांतूनही स्वातंत्र्यसैनिकाचंच रक्त वाहत होतं. ‘देशसेवेसाठी विज्ञान’ या कल्पनेनं त्या भारावून गेल्या. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून इंग्रजी विषयात पदवी मिळवायची आणि पत्रकार व्हायचं हा पर्याय खरंतर त्यांनी विचारात घेतलाही होता. पण त्यांच्या ताईनं त्यांना विज्ञानप्रेमाची जाणीव करून देत, विज्ञान विषय घेऊन देशसेवा निश्चितच करता येईल, असा विश्वास दिला.

मदुराईच्या फातिमा महाविद्यालयातून देवकी यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ‘अ‍ॅटॉमिक एनर्जी ट्रेनिंग स्कूल’विषयी फारशी माहिती नसतानाही प्रयत्न करून तर पाहू, असा विचार करत त्यांनी तिथे आपलं नाव नोंदवलं. त्या वर्षी मुलाखत घेणाऱ्या समितीमध्ये भारतीय अणू प्रकल्पाच्या उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले दस्तुरखुद्द डॉ. पी. के. अय्यंगार सहभागी होते. मुलाखतीनंतर बालसुलभ साधेपणानं खोलीतून बाहेर पडत असतानाच दादाला ओरडून आपली निवड झाल्याचं सांगणाऱ्या देवकी यांचा भाबडेपणा त्यांनी जाणला. पुढे ‘बीएआरसी’मध्ये (भाभा अ‍ॅटॉमिक रीसर्च सेंटर) वैज्ञानिक म्हणून जबाबदारी मिळवल्यानंतरही डॉ. अय्यंगार गमतीत त्यांना या प्रसंगाची आठवण कायम करून देत असत. १९६२ ते १९६३ या एका वर्षांच्या काळात अभ्यासक्रमाच्या सहाव्या तुकडीचा त्या भाग झाल्या. त्या वेळी भौतिकशास्त्र विषयाच्या गटामध्ये निवड झालेल्या एकूण ५६ विद्यार्थ्यांमध्ये यांच्यासहित केवळ चारच मुलींचा सहभाग होता. हा असा काळ होता, की जेव्हा या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या मुलींच्या राहण्यासाठी वसतिगृहाची व्यवस्थाही संस्था करत नसे. आपल्या निवासाची व्यवस्था मुलींना स्वत:च करावी लागे. चर्चगेटच्या ‘एक्सप्रेस टॉवर्स’ इमारतीमध्ये तेव्हा हे अभ्यासवर्ग भरत. ‘बीएआरसी’, ‘टीआयएफआर’मधील (टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रीसर्च) वैज्ञानिक या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येत. खऱ्या अर्थानं समृद्ध करणारा काळ म्हणून देवकी या वर्षांकडे पाहतात. त्या वर्षभरात अभ्यासाबरोबरच खोडय़ा करत, एकमेकांकडून शिकत त्यांनी अनेक अनुभव गाठीशी जमवले.

तांत्रिक भौतिकशास्त्र या विषयात काम करण्यासाठी रुजू झालेल्या देवकी यांना डॉ. अंबाशंकरन नेतृत्व करत असलेल्या वैज्ञानिकांच्या समूहाचा भाग होता आलं. इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन विभागाचे प्रमुख असणारे प्रोफेसर डॉ. फडके या विभागाचं आणि या विषयासंदर्भातल्या साऱ्या संशोधनाचं नेतृत्व करत होते. तो काळ अगदी सुरुवातीचा असल्यामुळे इथे काम करत असतानाच्या काळात भारतीय अणू विज्ञान प्रकल्पाला एक वेगळी दृष्टी देणाऱ्या महनीय व्यक्तिमत्त्वांचा सहवास त्यांना लाभला. भारतीय अणू विज्ञानाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. होमी भाभांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांबरोबर होणारे सहज संवाद आणि त्यांनी वैज्ञानिक म्हणून आत्मनिर्भर होण्यासाठी दिलेले धडे, या साऱ्याचाच एक महत्त्वाचा भाग आहेत. आपली प्रयोगशाळा स्वत: स्वच्छ करण्यापासून ते बिघडलेला दिवा दुरुस्त करण्यापर्यंत वैज्ञानिकांनी आपल्या कामाच्या ठिकाणांची जबाबदारी घेऊन त्यासाठी कुणाही परक्या व्यक्तीवर विसंबून न राहाण्याचा धडा डॉ. भाभा यांनी या नव्या फळीच्या वैज्ञानिकांना दिला.

‘बीएआरसी’मध्ये काम करू लागलेल्या देवकींना त्यांचे भावी पती (पी.के.रामनाथन) याच ठिकाणी भेटले. ते तिथे अभियंता म्हणून रुजू झाले होते. याच आवारात देवकींची प्रेमकहाणी बहरली, जीवनसाथीबरोबर आणि आपल्या आवडत्या विषयाबरोबरही! ‘व्हॅक्युम फिजिक्स’ हा त्यांच्या संशोधनाचा मूळ विषय होता. साधारण १९६३-१९६६ या सुरुवातीच्या दिवसांतलं त्यांचं संशोधन होतं ‘व्हॅक्युम गॉज’विषयीचं. म्हणजे निर्वात पोकळीच्या निर्मितीनंतर निर्माण होणाऱ्या दाबाची मोजणी करण्यासाठी तयार केलेलं उपकरण. संस्थेत रुजू झाल्यानंतर भारतीय बनावटीच्या महत्त्वाच्या तंत्रज्ञान निर्मितीत त्यांनी अशा प्रकारे योगदान दिलं आणि आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. निर्वात पोकळी कशी तयार करता येईल यासाठी त्यांचा चमू निरनिराळे प्रयोग करत होता. निर्वात पोकळी तयार करण्यासाठी केवळ आपल्याला त्यातले वायू बाहेर काढायचे नसतात, तर त्यासाठी वापरण्यात आलेल्या सामग्रीच्या भिंतींमधील वायूही शोषून घेणं गरजेचं असतं.

 हे मुळीच सोपं नसतं. त्यानंतर १९६६ ते १९६९ या कालावधीत त्यांनी ‘अल्ट्रा हाय व्हॅक्युम टेक्नोलॉजी’विषयी (यू.एच.व्ही.) संशोधन सुरू केलं. संपूर्ण काचेच्या बनावटीची यू.एच.व्ही. यंत्रणा उभारून  ~10 -9 torr  इतका दाब निर्माण करू शकणारी ती आपल्या देशातली पहिली यंत्रणा ठरली. डॉ. विजेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली वैज्ञानिकांच्या या समूहानं हे संशोधन केलं.

पुढे त्यांनी ‘यू.एच.व्ही.’ तंत्रज्ञान वापरूनच ‘फील्ड एमिशन मायक्रोस्कोप’ हे एक साधन विकसित केलं. दीर्घ आयुर्मान असणारी ही साधनं होती. त्यांचा उपयोग धातूंच्या पृष्ठभागावरील अभिक्रियांचा अभ्यास करण्यासाठी होतो. अणुभट्टीमधील किरणांच्या धातू आणि इतर पदार्थावर होणाऱ्या परिणामांचा, अभिक्रियांचा रीतसर अभ्यास करण्यासाठी भारतीय बनावटीच्या ‘अ‍ॅटोमिक रीझोल्युशन फील्ड आयन मायक्रोस्कोप’च्या (एफ.आय.एम.) निर्मितीमध्येही त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. ‘बीएआरसी’चीच शाखा असणाऱ्या ‘इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड रीसर्च’ येथे आणखी एका ‘एफ.आय.एम.’च्या स्थापनेत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. १९८३ मध्ये ‘पीएच.डी.’ मिळवल्यानंतर त्यांनी अणू विज्ञानाच्या क्षेत्रात उपयोगी पडेल अशा संशोधनासाठी खास करून साधनांच्या निर्मितीसाठी झोकून देऊन काम सुरू केलं. ‘इंडक्टिव्हली कपल्ड प्लाझ्मा मास स्पेक्ट्रोमीटर’च्या (आय.सी.पी.एम.एस.) निर्मिती समूहाचा त्या भाग झाल्या. ‘नॅशनल जिओफिजिकल रीसर्च लॅब’ येथील १५ वर्ष जुन्या आणि बिघडलेल्या अवस्थेत असणाऱ्या ‘आय.सी.पी.एम.एस.’च्या तपासणीसाठी नियुक्त केलेल्या वैज्ञानिकांपैकी त्या एक होत्या. नवं साधन घेतलं तर जवळपास एक कोटी रुपये इतका खर्च येणार हे स्पष्ट असताना वैज्ञानिकांच्या त्या समूहानं ते जुनं साधन पुन्हा सुरू करून देशांतर्गत निर्मिती व दुरुस्ती या विषयावरही प्रकाश टाकला. अणुभट्टीमधील ‘अल्ट्रा प्युअर मटेरियल’च्या निवडीसाठी मदत होईल अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करण्याइतकी प्रगती उपलब्ध तंत्रज्ञानात व्हावी यासाठी त्यांनी त्यांच्या निवृत्तीपूर्व काळात कार्य केलं. मे २००२ मध्ये एकोणचाळीस वर्षांच्या दीर्घ संशोधनानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मुलाबाळांमध्ये, नातवंडांमध्ये त्या रमल्या.

तीसहून अधिक संशोधन लेख प्रकशित केलेल्या डॉ. देवकी यांनी ‘नेचर’सारख्या महत्त्वाच्या जर्नल्समध्ये आपले संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. निवृत्तीनंतर ‘इंटरनॅशनल विमेन सायंटिस्ट असोसिएशन’ (आयडब्ल्यूएसए) या संस्थेसोबत त्या संलग्न झाल्या. २०१५ ते २०१७ या कालखंडात त्या ‘आयडब्ल्यूएसए’ येथे अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. २०२० पासून त्या संस्थेच्या ‘बोर्ड ऑफ ट्रस्टीज’च्या सदस्य म्हणून काम पाहतात. या संस्थेअंतर्गत अनेक प्रयोग आणि उपक्रम त्या राबवत असतात. घरी आणि कामाच्या ठिकाणी विविध भूमिका निभावत असताना या भूमिकांना योग्य तो न्याय देता येणं त्यांना सन्मानाचं वाटतं. या प्रवासात साथ देणारा पती, परिवारातले सदस्य, सध्या आपापल्या क्षेत्रात उच्च स्थानावर पोहोचलेले त्यांचे दोन मुलगे आणि एक मुलगी, नातवंडं यांच्याविषयी त्या खूप प्रेमानं सांगत राहातात.

‘‘विज्ञान आणि संशोधन हे कदाचित प्रसिद्धी देणारं क्षेत्र नाही. पण आत्यंतिक समाधान मिळवून देणारं क्षेत्र नक्कीच आहे.’’ असं अधोरेखित करतात. देशाच्या एका फार महत्त्वाच्या विज्ञान आणि संशोधन संस्थेचा पाया रचणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक होता येण्याचा अभिमान त्यांना आहेच, पण यात मिळालेलं समाधान हे त्याहून अधिक आहे. एखादं खूप वेगळं, जगात मोठा बदल घडून येणारं, खूप चर्चिलं जाणारं संशोधन आपल्या हातून झालेलं नसलं, तरी देशाच्या संशोधनाचा पाया रचणारं मूलभूत संशोधन आपल्याला करता आलं, त्या समूहाचा भाग होता आलं, एक संस्था उभी राहताना पाहता आली आणि त्या उभारणीत योगदान देता आलं हा आनंद कित्येक पटींनी मोठा आहे हे त्या सातत्यानं सांगतात. वैज्ञानिक होऊ पाहणाऱ्या तरुणांना लौकिकापेक्षा समाधानाची निवड करण्याचा संदेश देतात. त्यांच्याशी गप्पा करताना त्यांचा विज्ञानाप्रती असणारा उत्साह आणि नम्रपणा कळत नकळत आपल्यात रुजावा अशी प्रार्थना आपण करतो. स्वत:ची ओळख करून देताना सातत्यानं ‘मी आजन्म विद्यार्थी आहे’ असं सांगत असताना त्यांच्यातली जिज्ञासू वैज्ञानिक आपल्याला भेटत राहते.

postcardsfromruchira@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanshodhika author ruchira sawant science basic research ysh

First published on: 18-06-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×