अर्जुनदेव अंत:करणाने मृदू, श्रद्धामय संत होते. पण परिस्थितीनं त्यांना कणखर, लढाऊ आणि निडर बनविलं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ते उभय विशेष शीख संप्रदायाचेही विशेष ठरले आणि भारतीय भक्तिपरंपरेत त्या संप्रदायाचं ते वेगळेपण अखंड उमटून राहिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भक्तिसंप्रदायांचा इतिहास हा सर्व काळ, सर्व प्रांतांत प्रेमानं आणि शांतीनं भरलेला इतिहास नाही. तो अनेकदा, अनेक प्रदेशांत उग्र संघर्षांचा, लढायांचा, रक्तलांच्छित इतिहास आहे. शीख संतांनी तर शांतीच्या संदेशाला शिरोधार्य करण्यासाठी अनेक वेळा तलवार हाती धरली आहे.
भारतात शक, हूण, अफगाण, मोगल आक्रमक आले ते उत्तरेकडून, पंजाबच्या भूमीतून खाली उतरले. पंचनद्यांच्या दुआबाचा तो समृद्ध, सजल-सुफल प्रदेश परकीयांच्या अत्याचारांनी वारंवार चिरडला आहे आणि या प्रदेशाची संपन्न, सुखी शांतता पुन्हा परत आणण्यासाठी शीख गुरूंनी वारंवार अशांतीचा, अराजकाचा, आक्रमणांचा सामना केला आहे.
गुरू अर्जुनदेव हे याच संतमालिकेतलं एक प्रातिनिधिक नाव आहे. गुरू नानकांनंतर गादीवर आले ते गुरू अंगद आणि नंतर अमरदास. अमरदासांचा नातू आणि गुरू रामदासांचा धाकटा मुलगा अर्जुनदेव. शिखांचे ते पाचवे गुरू. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोईंदवाल नावाच्या गावी अर्जुनदेवांचा जन्म झाला आणि लाहोरमध्ये सतराव्या शतकाच्या अगदी प्रारंभीच त्यांचा मृत्यू झाला. अवघं त्रेचाळीस वर्षांचं आणि तेही अत्यंत संघर्षमय आयुष्य त्यांना मिळालं.
असं सांगितलं जातं की, अर्जुनदेवांच्या आईनं – बीबी भानीनं आपले पती – शिखांचे चौथे गुरू रामदास यांच्याजवळ एक वर मागितला होता. संप्रदायाचं गुरुपद आपल्याच घराण्याकडे अखंड राहावं, असा वर. त्यावर रामदासांनी तिला म्हटलं होतं की गुरुपद राहील; पण त्यामुळे आपल्या वंशजांना मात्र पुढे अखंड यातना सोसाव्या लागतील. आपल्या मुलाला गुरूच्या गादीवर बसलेलं बीबी भानीनं पाहिलं असेल, आनंदानं पाहिलं असेल, अभिमानानं पाहिलं असेल पण अर्जुनदेवांपासूनच गुरू रामदासांचे शब्दही खरे ठरत गेल्याचं इतिहासानं निर्मम कठोरपणे दाखवलं आहे.
अर्जुनदेव हा रामदासांचा धाकटा मुलगा होता. त्याला उत्तराधिकारी म्हणून मान्यता मिळाल्याचा राग पृथीचंद आणि महादेव या त्याच्या वडीलभावांना आला. विशेषत: पृथीचंदानं अर्जुनदेवांना आयुष्याच्या अखेपर्यंत सतत त्रास दिला. जोडीला चंदूशाह नावाच्या आणखी एका द्वेष्टय़ाची भर पडली. व्यक्तिगत कारणाने अर्जुनदेवांचा द्वेष करणाऱ्या चंदूशाहने अकबर आणि जहांगीर या दोघांनाही अर्जुनदेवांविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न केला.
अकबर उदार धर्मकारणी असल्यामुळे अर्जुनदेवांना त्यानं धक्का लावला नाही. मात्र जहांगीरनं त्यांना इस्लामविरोधक ठरवून गुरू ग्रंथसाहिबातली इस्लामविषयक वचनं वगळण्याची सूचना केली. अर्जुनदेवांनी ती मागणी साहजिकच अमान्य केली. कारण ग्रंथसाहिबात असा कोणताही गैरमजकूर नव्हताच. मग सुरू झाला त्यांचा अतोनात छळ. जहांगीरच्या आज्ञेनं अर्जुनदेवांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांच्यावर भयंकर अत्याचार केले गेले. पाच दिवसांच्या नरकयातना सोसल्यानंतर रावी नदीत स्नानासाठी अर्जुनदेवांना आणण्यात आलं आणि तिथेच या महान गुरूनं देहत्याग केला.
फुटो अंडा भरमका
मनहि भइउ परगासु।
काटी बेडी पगह ते
गुरि कीता बंदि खलासु।।

मराठीतील सर्व संतसंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on guru arjan dev
First published on: 05-12-2015 at 01:18 IST