scorecardresearch

अडाणीपणा की मजबुरी?

शिक्षण सर्वासाठी

(संग्रहित छायाचित्र)

रजनी परांजपे

रस्तेबांधणीचे काम करणाऱ्या मजुरांची मुले हा शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांचा एक गट. जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे रस्त्याची कामे करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी आम्ही वर्ग लावतो. एका जागी फार दिवस वास्तव्य नाही, ही या मजुरांची मुख्य समस्या. मात्र तरीही जेव्हा हे रस्त्यावर काम करणारे मजूर त्यांच्या मुलांसाठी धडपडणाऱ्या, शाळा चालवणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणतीही कल्पना न देता निघून जातात तेव्हा याचा अर्थ काय लावायचा? त्यांची बेपर्वाई, अडाणीपणा की मजबुरी?

जवळजवळ वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यामध्ये त्या वेळेस स्पायसर कॉलेजच्या रस्त्याचे काम चालू होते. त्या बाजूला आजच्याइतकी रहदारी नव्हती. त्यामुळे रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांच्या झोपडय़ा रस्त्यालगतच पडलेल्या होत्या. साधारण पंधरावीस झोपडय़ा असतील. पंधरावीस झोपडय़ा म्हणजे पंधरावीस कुटुंबे आणि त्यांची पंचवीसतीस मुले हे ओघानेच आले. या मुलांसाठी आम्ही तेथे वर्ग लावत असू. त्या वर्गाची ही गोष्ट.

ठिकाण रस्त्यावरतीच असल्याने वर्ग लावण्यासारखी जागा आजूबाजूला नव्हती म्हणून आमच्या ‘स्कूल ऑन व्हील्स’च्या (फिरती शाळा) बसमध्ये वर्ग भरत असे. मुले जिथे सापडतील तेथे तेथे जाऊन वर्ग लावणे हे आमचे धोरण; पण प्रत्येक ठिकाणीच वर्ग लावण्यासारखी जागा मिळेल असे होत नाही. अशा वेळेस उपयोगी पडावी या दृष्टीने आम्ही बसच्या आत वर्गासारखी व्यवस्था म्हणजे बसायला जागा, पाठय़पुस्तके ठेवण्याची सोय, पिण्याचे पाणी आणि लिहिण्यासाठी फळा राहू शकेल अशी व्यवस्था करून घेतो आणि ‘फिरती शाळा’ तयार होते. अशीच ‘फिरती शाळा’ स्पायसर कॉलेज रस्त्यावर नेऊन आम्ही वर्ग सुरू केला. वर्ग साधारण अडीचतीन तास चाले. लहानमोठी सर्वच मुले वर्गात येऊन बसत. आईवडील जवळच काम करीत असल्याने त्यांचेही मुलांवर लक्ष असे. लहान भावंडांना सांभाळण्याचे काम मुलांकडे असले तरी तिथल्या तिथेच सर्व असल्याने एकीकडे अभ्यास आणि एकीकडे लहान भावंडांना बघणे अशी दोन्ही कामेही मुले करू शकत.

वर्ग रोज लागे. मुलेही आनंदाने येत. एकूणच सर्व व्यवस्थित चालले होते. मुलांना एका जागी बसण्याची सवय लागली, बऱ्यापैकी अक्षरओळख झाली, की मग त्यांना जवळच्या शाळेत दाखल करायचे, गरज असल्यास त्यांना नेण्याआणण्याची व्यवस्था करायची आणि शिक्षित आईवडील ज्याप्रमाणे आपल्या मुलांचा घरी अभ्यास करून घेतात त्याप्रमाणे शाळेत घातल्यानंतरही मुलांना शिकविण्याचे काम चालूच ठेवायचे अशी आमची पद्धत. येथेही आम्ही तेच केले असते; पण तसे झाले नाही. एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे बस ठरलेल्या जागी जाऊन थांबली; पण बघतात तो आजूबाजूला सामसूम! मुलेही नाहीत आणि मोठी माणसेही नाहीत. एखाद्या मूक साक्षीदाराप्रमाणे झोपडय़ा मात्र जागच्या जागी उभ्या!

अचानक काय झाले काहीच कळेना. मोबाइलचा जमाना अजून यायचा होता. नाही तर ताबडतोब फोनाफोनी करून खुलासा झाला असता, पण तसे झाले नाही. दोनचार दिवस असेच गेले. शेवटी एक दिवस लवकर सकाळी जाऊन बघायचे असे ठरवले आणि त्याप्रमाणे केलेही. सकाळच्या वेळेला माणसे भेटली. त्यांची कामाला जाण्याची लगबग होती. त्यांना कामावर घेऊन जाणारा ट्रकही तेथे उभाच होता; पण प्रत्यक्ष भेटल्यामुळे खुलासा झाला. स्पायसर कॉलेजच्या रस्त्याचे काम जवळजवळ होत आले होते. त्यामुळे ठेकेदाराने त्यांना दुसऱ्या कामावर हलवले ते काम हडपसरला होते. रोज लवकर सकाळी ट्रक यायचा आणि त्यांना घेऊन जायचा. संध्याकाळी काम संपल्यावर आणून सोडायचा. आम्ही म्हटले, तुम्ही जा, पण मुलांना कशाला नेता? त्यांच्याजवळ या प्रश्नाचे उत्तर होते, अगदी सयुक्तिक. ‘‘तुम्ही तर मुलांना दोनतीन तासच बघता आणि आम्ही तर दिवसभर बाहेर असतो, मग मुलांना कोणाच्या जिवावर सोडावं? तुम्ही सांभाळा दिवसभर, ठेवतो आम्ही त्यांना मागे.’’

आता आमच्यापुढे प्रश्न, आता काय करायचे? मुलांना दिवसभर सांभाळायचे तर तशी आमच्याकडे सोय नाही. बरे शाळेत घालायचे म्हटले तरी ती अर्धवेळच. मुलांच्या आईवडिलांची अडचणही खरीच! आम्ही त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना मोठमोठय़ा गप्पा मारल्या आणि आता वेळ आल्यावर ‘हे आमच्या नियमात बसत नाही’ असे म्हणून मोकळे होणेही मनाला पटेना. काय करावे, आम्ही विचारात पडलो.

मुलांच्या पालकांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले. ‘आम्ही बारक्या पोरांना बरोबर नेतो. तुम्ही शिकती पोरे घेऊन जा. त्यांना जेवणही बांधून देतो,’ असा प्रस्ताव त्यांनी आमच्यापुढे ठेवला. आता आम्हाला पाय मागे घेणे शक्य नव्हते. आमचे ऑफिस तसे जवळच होते. शिकणारी म्हणजे सहा वर्षांवरची दहाबारा मुले होती. त्यांना आमच्या ऑफिसमध्येच घेऊन यायचे आणि दिवसभर ठेवून संध्याकाळी आईवडील आल्यावर त्यांच्या स्वाधीन करायचे असे ठरवले आणि मुलांच्या पालकांनी मांडलेल्या प्रस्तावाला ‘हो’ म्हटले.

दुसऱ्या दिवशी मुलांना ऑफिसमध्ये घेऊन आलो. आमचे ऑफिसही फार मोठे नाही. जेमतेम दोन खोल्या, त्यामुळे धाकधूक होती. मुले कशी वागतील? ऑफिस एका खासगी बंगल्यात होते. बंगल्याभोवती थोडी बाग, बागेत झोपाळा. मुले बागेतील फुले तोडतील का? झोपळ्यावर धुडगूस घातला तर मालक काय म्हणतील? बाथरूम कशी वापरतील, अशा अनेक शंकाही होत्या; पण यातले काहीच घडले नाही. मुले दिवसभर गुपचूप बसून असत. आम्ही काही चित्र काढायला कागद, खडू वगरे दिले तर त्यात रमत, ऊन उतरले की गच्चीत जाऊन रस्त्याकडे बघत, आणलेला डबा मुकाटय़ाने खात. भांडणतंटा काही नाही. डब्यांचीसुद्धा गंमतच. पहिल्याच दिवशी मुले डबे घेऊन आली तेव्हा काय आणले, कसे आणले हे बघायची उत्सुकता होतीच. खरं वाटणार नाही, पण बघितलं तर सर्वाचे डबे कोरे करकरीत, एकसारखे स्टेनलेस स्टीलचे, डबलडेकर, त्यात सर्वानी भात आणलेला आणि भाताबरोबर काही तोंडीला लावणे. पालकांनी मुलांना डबा देण्यासाठी मुद्दाम केलेली खरेदी!

पुढे काही दिवसांनी पालकांची बदली हडपसरहून परत औंधला झाली. मंडळी परत स्पायसरच्या कामावर रुजू झाली. मुलांची बसमधली शाळा परत सुरू झाली. मार्च महिन्यात मुलांना परीक्षेला बसवू, असे आमचे बेत सुरू झाले. त्या दृष्टीने जवळच्याच शाळेत जाऊन, मुख्याध्यापकांशी बोलून तयारीही केली आणि परत एक दिवस सकाळी जाऊन बघतो तर जागेवर कोणीच नाही! न माणसं न झोपडय़ा! कुठे गेली याबद्दल चिठ्ठीचपाटी, निरोप, काही नाही. मुलांना शिकवणाऱ्या आमच्या शिक्षिका खूप हळहळल्या; पण करणार काय, आमच्याजवळ त्यांचा पाठपुरावा करावा अशी काहीच माहिती नव्हती. ‘कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन’ असे म्हणून स्वस्थ बसणे एवढेच आपल्या हातात.

पण हा अनुभव खूप शिकवून गेला. रस्तेबांधणीचे काम करणाऱ्या मजुरांची मुले हा शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांचा एक गट. त्याची ओळख झाली. त्यानंतर जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे रस्त्याची कामे करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी आम्ही वर्ग लावतो. एका जागी फार दिवस वास्तव्य नाही, ही या मजुरांची मुख्य समस्या; किंबहुना काम जसजसे पुरे होते तसतसे पुढे पुढे सरकावेच लागते. स्पायसर कॉलेजचा रस्ता तरी भर वस्तीत होता; पण रस्त्यांची कामे वस्तीबाहेर, वस्तीपासून दूर असण्याची शक्यता जास्त. तिथून शाळा जवळ नसतात. राहण्याचे ठिकाणही जरा आतल्या बाजूला, जेथे जाण्यायेण्याचा रस्ता कच्चा, खडबडीत आणि पावसाळ्यात चिखलमय असा असतो. अशा मुलांना कसे शिकवायचे?

हे पालक जसे वागले त्यावरून आपल्याला त्यांची मुलांना न शिकवण्याची इच्छा दिसते किंवा कसे? आम्हाला न सांगता गेले याचा अर्थ काय लावायचा? त्यांची बेपर्वाई, अडाणीपणा की मजबुरी?

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shikshan sarvansathi article about rajni paranjape

ताज्या बातम्या