एक दशक म्हणजे दहा

लहान शिशूचा वर्ग. दुसऱ्या सत्राचे जानेवारी- फेब्रुवारीचे दिवस

गणितामधली दशक संकल्पना मुलांना त्यांच्या स्वत:च्या अनुभवातून अवगत करावयाची होती. पारंपरिक पद्धत वापरून उपयोग नव्हता. कारण दहा मिनिटांतच दशक मोजायला मुलं कंटाळतात. मग एक वेगळीच गंमत करायचं ठरवलं आणि मुलं दशक तर शिकलीच पण त्याचं एक पुस्तकही तयार झालं, ‘एक दशक म्हणजे दहा’.

लहान शिशूचा वर्ग. दुसऱ्या सत्राचे जानेवारी- फेब्रुवारीचे दिवस. स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा, सहल असे सगळे आटोपून आता फक्त अभ्यास करण्याचे दिवस. मुलांची मस्ती मस्तपैकी वाढलेली असते. बाईंशी छानपैकी गट्टी झालेली असते. मुळातच मराठी माध्यमातील मुलांना भाषेचा अडसर नसल्याने त्यांना आपल्या बाईंशी छान संवाद साधता येतो आणि दिवसेंदिवस तो अधिक दृढ होत जातो आणि त्यामुळे वर्गात काहीही सांगायला लागलं की खूप बडबड आणि मग बाईंची चिडचिड पण प्रेमाने.
गणितामधली दशक संकल्पना मुलांना त्यांच्या स्वत:च्या अनुभवातून अवगत करावयाची होती. लहान गटात शेवटी शेवटी दशक संकल्पनेवर भर दिला की मुलांना आपोआपच मोठय़ा शिशूमध्ये अंक कसे तयार होतात हे समजायला सोपे जाते. एखाद्या अंकातील दशक व सुटे ती सहजपणे सांगू शकतात. एरवी लहान शिशूमध्ये अंक ओळख फक्त १ ते १० इतकीच असते आणि मोजणीही १ ते १० इतकीच असते. त्यामुळे १ ते १० मोजून त्याचा गठ्ठा करायचा व त्याला १ दशक म्हणायचे हे त्यांना समजले की दशक संकल्पना समजली असे अनुमान काढले जाते.
पारंपरिक पद्धतीने वर्गामध्ये विविध वस्तूंची दशक मोजणी झाली. वर्गात दशकाची चित्रे चिकटवून झाली. दशक संकल्पना तर खरी म्हणजे पूर्ण झाली होती. पण मुले आपल्याला नेहमीच नवनवीन कल्पना देत असतात, याचा परत एकदा प्रत्यय आला. मधलाच कुठला तरी दिवस होता. मुले हळूहळू वर्गात येत होती. सकाळची वेळ असल्याने हालचाली जरा संथ होत्या. पण तेवढय़ात आमच्या वर्गातील वादळ, स्वयम् सुसाट आला. डोळे चमचमणारे. इतरांना काही तरी विलक्षण अनुभूती देणार असा भाव चेहऱ्यावर झळकत होता. दोन-तीन दिवसांनी हे साहेब शाळेत आले होते. कुठे बाहेरगावी गेले होते. स्वारीने खिसा माझ्यासमोर रिकामा केला आणि सगळ्यांच्या मुखातून आनंदाचा एकच चित्कार उमटला. खिशातून जणू खजिनाच बाहेर पडला. माझ्यासमोर छोटय़ा छोटय़ा शंख-शिंपल्यांचा सडा पडला होता. स्वयम् एकीकडे आम्हाला भरभरून सांगत होता की मामाच्या लग्नाला गेलो होतो, तेव्हा एका दादाबरोबर समुद्रावर फिरायला गेलो होतो, तेव्हा मी हे गोळा केले. मला त्याचे खूप कौतुक वाटले. तो खरोखरीच आमच्यासाठी अमूल्य भेट घेऊन आला होता. अनायासे आमची दशक संकल्पना चालू होतीच, त्यामुळे दिवसभर सगळी मुलं एक दशक शंख-शिंपले मोजत होते आणि ते मोजताना अजिबात कंटाळत नव्हते हे थोडय़ा वेळाने माझ्या लक्षात आले आणि एकदम गंमत वाटली. कारण दहा मिनिटांनंतर दशक मोजायला कंटाळा करणारी मुले आज दिवसभर एक दशक शंख शिंपले मोजत होते.
दुसऱ्या दिवशी मी मुलांना घेऊन आमचे शाळेचे मैदान गाठले. आमच्या शाळेला एक छान विस्तीर्ण असे मोकळे, सुरक्षित, प्रेमळ मैदान आहे. मैदानाच्या भोवती विविध झाडे आहेत. त्या झाडांच्या वाळलेल्या काडय़ा, पाने, फुले, बारीक बारीक दगड, असे मुलांना आकर्षित करणारे आणि त्यांचे खिसे तुडुंब भरणारे, खूप काही कडेकडेने पडलेले असते. तिथे एक छानसा कट्टा आहे. मी म्हटले, ‘‘मंडळी, आज आपल्याला..’’ आणि माझे पुढचे वाक्य मुलांनी पूर्ण केले, ‘‘.. एक गंमत करायची आहे.’’ कारण एव्हाना त्या चतुर मुलांना चांगलंच पाठ झालं होतं की, ‘मंडळी, आज आपल्याला’ असे बाईंनी म्हटलं की ‘गंमत करायची आहे’, असंच वाक्य पूर्ण होणार. मला मनापासून हसू आले. मुलांची नस आपल्याला ठाऊकअसते, असा व्यर्थ अभिमान कोणाही शिक्षकाने बाळगू नये, कारण मुलांनाही शिक्षकांची नस चांगलीच ठाऊक असते. मी त्यांना कट्टय़ाजवळ घेऊन गेले आणि म्हटले, ‘‘आज आपल्याला इथे, या कट्टय़ावर दशक प्रदर्शन मांडायचे आहे. काल कसे आपण छान शंख-शिंपले एक दशक मोजले तसे, आज आपण मैदानावरच्या कोणत्याही दहा गोष्टी गोळा करायच्या म्हणजेच त्याचा दशक करायचा आणि कट्टय़ावर मांडायचा. दहाच पाहिजेत याची मात्र खबरदारी घ्यायची. कमी किंवा जास्त आणल्यात तर मांडू देणार नाही. चला करू या सुरुवात.’’
हा हा म्हणता मुले चारी दिशांना पांगली. मी मगाशी म्हटले तसे शाळेचे मैदान अगदी सुरक्षित आणि प्रेमळ आहे. त्यामुळे मैदानदादाच्या अंगावर कुठेही मुले हुंदडली तरी काळजी नसते. थोडय़ाच वेळात वेगवेगळे दशक जमा होऊ लागले. दगड, वाळलेल्या काडय़ा, वाळलेली फुले, वाळलेली पाने. दहा या संख्येकडे मी कटाक्षाने लक्ष ठेवून होते. गोळा केलेल्या गोष्टी मोजूनच कट्टय़ावर मांडल्या जात होत्या. गोष्टी त्याच त्याच असल्या तरी दशक असणे महत्त्वाचे होते. थोडय़ा वेळाने सगळा कट्टा दशकांनी भरून गेला. प्रत्येकाचा एक दशक होता. ज्यांचा मोजण्याचा वेग जास्त होता त्यांनी तीन-तीन वेगवेगळे दशक आणले होते. कोणी कितीही वेळा आणू शकत होते. अट मात्र एकच, दशक व्हायला पाहिजे. दशक गोळा करण्याची वेळ संपली असे जाहीर केले आणि आम्ही आमचेच प्रदर्शन बघायला लागलो. अप्रतिम! हो अप्रतिमच. हा एकच शब्द माझ्या तोंडून बाहेर पडला. सगळे दशक दगड, पाने, फुले आणि काडय़ा या चार घटकांचेच होते, तरी त्यात नावीन्य होते, विविधता होती, कल्पकता होती. कारण प्रत्येकाचे दगड वेगळे, प्रत्येकाच्या पानांचे आकार वेगळे, गोळा केलेल्या काडय़ांची लांबी व त्यांचे बाक वेगवेगळे आणि प्रत्येकाच्या वाळलेल्या फुलांच्या पाकळ्या वेगवेगळ्या, तुटलेल्या. खरंच किती ही विविधता आम्ही सगळे अनुभवत होतो. प्रत्येकाचे दशक वेगळे. एव्हाना मैदानावर खेळायला आलेली इतर मुले प्रदर्शनाला प्रेक्षक म्हणून मिळाले. आता डबा खाण्याची वेळ झाली होती, पण प्रत्येकाला जमवलेल्या दशकाची काळजी होती. तेवढय़ात आमचे मैदानाचे वॉचमन, जाधवमामा, त्यांनी आमची समस्या ओळखली आणि मी प्रदर्शनाची काळजी घेईन, असे सांगून आम्हाला निर्धास्त केले.
दुसऱ्या दिवशी वर्गात आल्यावर प्रदर्शनाच्या इथे जायची सगळ्यांना कोण घाई झाली होती. माझी आजची योजनाही काही वर्गात थांबायची नव्हतीच, कारण आज त्या मोकळ्या आकाशाखाली अजून एक गंमत करायची होती. आज त्यांना म्हटले, ‘‘सगळ्यांनी एक पाटी आणि आपली कम्पास बॉक्स बरोबर घ्या. मंडळी आज आपल्याला अजून एक..’’ सगळे एका सुरात म्हणाले, ‘‘..गंमत करायची आहे.’’ मावशींनी आमच्यासाठी मैदानात जायला खास आमच्या विभागातून जाणारा दरवाजा, ज्याला आम्ही ‘जादूचे गेट’ म्हणायला लागलो होतो, तो उघडला होता. गेले वर्षभर मुलांना विविध शैक्षणिक क्रियाकृतींसाठी जास्तीत जास्त वेळा बाहेर मैदानात घेऊन जाण्यावर माझा भर होता. त्यामुळे मुले एका हातात पाटी आणि एका हातात कम्पास घेऊन सराईतप्रमाणे मैदानात पोहोचली. आमची सोय म्हणून आम्ही एक नियम ठरवला होता की, हातात काही साहित्य असेल तर आधी आमचे एका झाडाखाली बसण्याचे ठिकाण आहे तिथे जायचे. त्याप्रमाणे तिथे जाऊन आधी सगळे छान गोल करून बसलो. सगळ्यांनाच कट्टय़ावर मांडलेल्या वस्तू बघायच्या होत्या. आमच्या पाटय़ा वगैरे ठेवून सगळ्यांनी कट्टय़ाकडे धाव घेतली. जाधवमामांनी आमच्या प्रदर्शनाची छान काळजी घेतली होती. आता मुलांना म्हटले की, ‘‘मी आज चित्र काढायला प्रत्येकासाठी एक कागद आणला आहे. आपल्या जागेवर जाऊन प्रत्येकाने आपापल्या दशकाचे चित्र काढायचे आहे.’’ कागद मिळाल्यावर मुलांनी आपापल्या दशकाचे सुंदर चित्र काढले. त्यांच्या दशकाखाली मी त्यांचे नाव लिहिले आणि कागद माझ्याकडे जमा केले. आता काम मला करायचे होते. सगळ्या कागदांना छान बॉर्डर काढून पानांना त्या त्या मुलाचे दशक पान म्हणून नाव दिले. जसे, सिद्धार्थचे दशक, गार्गीचे दशक. चाळीस पानांचे एक छान घरगुती, सुंदर पुस्तक तयार झाले. वर्गात पुस्तक दाखविले तेव्हा आपापली दशक चित्रे बघून प्रत्येकाला ते आपले स्वत:चे पुस्तक असल्याचा आनंद झाला होता आणि त्या आनंदात आमच्या वर्गाच्या पहिल्यावहिल्या पुस्तकाचे आम्ही नाव ठेवले- ‘एक दशक म्हणजे दहा’.
ratibhosekar@ymail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व शिकू आनंदे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Study and education of children

ताज्या बातम्या