मंजुला नायर – responsiblenetism@gmail.com
आपल्या १३ वर्षांखालच्या मुलांना समाजमाध्यमं स्वतंत्रपणे हाताळण्याची परवानगी देणं म्हणजे एका अर्थी त्यांना प्रौढ व्यक्तींसाठीचा चित्रपट पाहण्याची किंवा मोटारसायकल चालवण्याची परवानगी देण्याइतकंच गंभीर आहे. मुलं ऑनलाइन जगतात जो आशय पाहत असतात त्याचा त्यांच्या विचारांवर, वर्तनावर परिणाम होत असतो. समाजमाध्यमांवरच्या आपल्या वावराशी सुरक्षिततेसंबंधीचे अनेक मुद्दे जोडलेले असतात. पालकांनी आधी स्वत: त्याबद्दल जाणून घेऊन मुलांना त्याची योग्य प्रकारे ओळख करून द्यायला हवी.
‘‘मी एक ‘इन्स्टाग्राम सेलेब्रिटी’ आहे. माझे ३० हजार फॉलोअर्स आहेत. आता माझं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. मी काय करू?..’’ एका रात्री आमच्या हेल्पलाइन नंबरवर घाबऱ्याघुबऱ्या आवाजात एका मुलीचा फोन आला. तिच्याशी बोलताना, ‘या समाजमाध्यमाचा वापर करताना तू सुरक्षिततेसाठी कोणतं सेटिंग वापरलं होतंस?,’ असं आम्ही तिला विचारलं. त्यावर तिनं जे उत्तर दिलं त्याचा थोडक्यात अर्थ होता, शून्य. तिनं कोणतीही काळजी न घेतल्यानं तिचं अकाउंट हॅक झालं होतं.
आपण जेव्हा एखादं समाजमाध्यम (सोशल मीडिया) वापरत असतो, तेव्हा आपल्या खासगी आयुष्यातल्या जवळजवळ सगळ्याच गोष्टी तिथे टाकत असतो. जगभरातल्या लोकांसमोर त्या अकाउंटच्या माध्यमातून आपण आपली एक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. मग अशा वेळी आपलं अकाउंट किंवा आपलं ‘प्रोफाइल’ सुरक्षित आहे की नाही हे पाहण्याची आपली स्वत:चीच जबाबदारी नाही का?
इंटनेटवरची सुरक्षितता आणि ते वापरताना घेण्याची काळजी याकडे लोक फारसं लक्ष देत नाहीत. त्यांना या गोष्टी फार महत्त्वाच्या का वाटत नाहीत, हे बघून चकित व्हायला होतं. कदाचित आपल्या बाबतीत कधीच, काहीच वाईट घडणार नाही, असंच प्रत्येकाला वाटत असावं. जेव्हा काही घडेल तेव्हा बघून घेऊ, असा लोक सहसा विचार करतात. एखादी वाईट गोष्ट घडल्यावर मग ऑनलाइन सुरक्षिततेबाबत माणूस काळजी घ्यायला लागतो. मुळातच प्रतिबंधात्मक सुरक्षितता बाळगलेली नसल्यानं अशी संकटं ओढवलेली असतात. अनेकदा यामुळे जबरदस्त मानसिक धक्का बसतो. त्याचे दुष्परिणामही दीर्घकाळ टिकून राहतात. बेजबाबदार ‘ऑनलाइन वर्तना’मुळे आपल्याला कोणत्या प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं हे जाणून घेतलं तर प्रत्येकाला आपल्या ‘ऑनलाइन वर्तना’मध्ये आधीच बदल करता येईल.
समाजमाध्यमं आज अत्यंत शक्तिशाली बनलेली आहेत. जगभरातल्या लोकांशी संवाद साधायला,आपले विचार मांडायला, भावना व्यक्त करायला ती मदत करत असतात. फोटो, व्हिडीओ आणि पोस्ट यांच्या माध्यमातून आपल्या स्मृती साठवून ठेवायला ती मदत करतात. आज शहरातील बहुतेकांच्या हातात स्मार्टफोन आहे, आणि प्रत्येक जण स्वतंत्रपणे आशयनिर्मिती करू शकतो. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आणि सर्व जगापुढे विचार मांडण्याची शक्ती सर्वाकडे आहे खरी, मात्र जगासोबत ‘शेअर’ करण्याच्या गोष्टी कुठल्या थरापर्यंत न्याव्यात याबाबत घोर अज्ञान आढळतं. दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणून किंवा इतरांना त्रास देऊन जर एखाद्याची ऑनलाइन जगतात अभिव्यक्ती होत असेल, तर मग अशा व्यक्तीनं कायदेशीर परिणाम भोगायची तयारी ठेवली पाहिजे. मला विचाराल तर डिजिटल साक्षरतेमध्ये इंटरनेट वापराबद्दलची काळजी, सुरक्षितता व जबाबदारी यांबद्दलचं शिक्षणही समाविष्ट केलं पाहिजे. ऑनलाइन आशयाची निर्मिती जबाबदारपणे कशी करावी, हे प्रत्येकानं शिकून घेणं आवश्यक आहे.
कुठल्याही समाजमाध्यमाचा वापर करण्याआधी प्रत्येकानं त्या संकेतस्थळानं किंवा ‘अॅप’नं घालून दिलेले नियम पाळले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते समाजमाध्यम वापरकर्त्यांच्या वयानुरूप योग्य आहे की नाही, हे ठाऊक असलं पाहिजे. बहुसंख्य समाजमाध्यमं किमान १३ र्वष आणि त्यापुढच्या वयाच्या मुलांनी ती वापरावीत अशी पूर्वअट घालत असतात. ती फारशी पाळली जात नाही. जर १३ वर्षांखालच्या मुलांनी निर्माण केलेल्या आशयाकडे बारकाईनं पाहिलं, तर बऱ्याचदा तो पालकांना चिंता वाटायला लावेल हे निश्चित. मुलं इतरांनी पोस्ट केलेला जो आशय ऑनलाइन जगतात पाहत असतात त्याचा त्यांच्या विचारांवर आणि वर्तनावरही परिणाम होत असतो. जर एखादा पालक आपल्या १३ वर्षांखालच्या मुलाला समाजमाध्यमं स्वतंत्रपणे हाताळण्याची परवानगी देत असतील, तर ते एका अर्थी त्या मुलाला प्रौढ व्यक्तींसाठीचा चित्रपट पाहू देणं किंवा मोटारसायकल चालवण्याची परवानगी देण्याइतकंच गंभीर आहे. मुलांच्या वयानुरूप आशय दाखवला जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पालकांनी आपल्या मुलांना समाजमाध्यमांचा वापर काळजीपूर्वक करायला शिकवणं जरुरीचं आहे. खुद्द पालकांनीही आपल्या १३ वर्षांखालील मुलांचे फोटो किंवा व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकूच नयेत अशी मी त्यांना विनंती करेन. आपल्या स्वत:च्या ‘फॅन्स’च्या संख्येत वाढ करण्यासाठी अनेक पालक मुलांचा समाजमाध्यमांवर एक साधन म्हणून वापर करून घेतात. याचाही मुलांच्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे जागरूक राहा, संवेदनशील बना आणि पुढील मार्गदर्शक सूचना जरूर अमलात आणा.
समाजमाध्यमांवर मुलांच्या वयानुरूप योग्य आशय पाहिला जात असल्याची खात्री करून घ्या.
एखाद्या अॅपच्या किंवा संकेतस्थळाच्या नियम व अटी बिनदिक्कत व झटपट मान्य करून टाकण्याआधी त्या जरूर वाचा. त्यामुळे ते संकेतस्थळ किंवा अॅप कोणकोणत्या प्रकारची माहिती तुमच्याकडून घेत आहे, याबद्दल तुम्हाला कल्पना येईल.
कोणतंही अॅप तुमच्या वैयक्तिक आणि खासगी माहितीचं नेमकं काय करतं याबद्दल जाणून घ्या.
तुम्ही कोणतंही अॅप वापरत असलात तरी तुम्ही शेअर करत असलेला मजकूर, फोटो, व्हिडीओ, मतं इत्यादींबद्दल जागरूक राहा.
इंटरनेटवर जे काही पोस्ट कराल ते लगेच ‘डिलीट’ केलं तरीदेखील ते नेटवरून कायमचं कधीही घालवता येत नाही, हे लक्षात ठेवा.
तुमच्या डिजिटल जगातल्या पाऊलखुणांमुळे प्रसंगी तुमच्या करिअरच्या संधीही हातच्या जाऊ शकतात हे ध्यानात घ्या. अनेक ठिकाणी नोकरी किंवा शिक्षणासाठी अर्ज केल्यानंतर तुमच्या ऑनलाइन वर्तणुकीची छाननी केली जाते.
आपलं नाव ‘गूगल सर्च’मध्ये शोधून पाहा. त्यात कुठली माहिती येते ती तपासा. डिजिटल जगतात आपल्याबद्दल कोणकोणती माहिती आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
समाजमाध्यमांवर फोटो शेअर करताना शक्य तेवढय़ा कमी ‘रेझोल्यूशन’चे फोटो शेअर करा.
समाजमाध्यमांवर तुम्ही पोस्ट केलेल्या गोष्टींना जे ‘लाइक्स’ मिळतात त्यांचा तुमचा वास्तवातल्या जगण्याशी फारसा संबंध नसतो. तुम्ही ऑनलाइन जगतात फारसे लोकप्रिय नसलात तरी तुमच्या कुटुंबात, नातलगांमध्ये, मित्रमैत्रिणीत तुम्हाला किंमत आहे, त्यांचं तुमच्यावर प्रेमही आहे, हे ध्यानात ठेवा.
आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या दबावामुळे सध्याच्या काळात ऑनलाइन जगतात प्रोफाइल निर्माण करणं आवश्यक झालेलं आहे. मात्र वास्तव आणि आभासी जगतातला फरक ओळखायला शिका.
प्रत्येक समाजमाध्यमासाठीची सेटिंग्ज नीट तपासून पाहा. ‘प्रायव्हसी सेटिंग्ज’चा बारकाईनं अभ्यास करून ती योग्य सेट करा.
समाजमाध्यमावर आपण कुणाला ‘फॉलो’ करतो आणि आपल्याला कुणी ‘फॉलो’ करावं याची काळजीपूर्वक निवड करा.
आपल्या ‘फॉलोअर्स’ची संख्या वाढवण्याचा मोह टाळा. या हावरटपणामुळे तुम्ही अनोळखी लोकांच्या ‘फ्रें ड रिक्वेस्ट’ना संमती देत राहता. असे लोक धोकादायक असू शकतात.
आकर्षक दिसणाऱ्या प्रोफाइलकडे लक्ष खेचलं जाणं साहजिकच आहे. मात्र अनेकदा अत्यंत आकर्षक प्रोफाइल्स खोटीही असू शकतात. त्या व्यक्तींचं खरं रूप कोणतं आहे, किंवा तुमच्याशी मैत्री करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे हे तपासणं कठीण आहे.
वयाच्या १३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी आपल्या समाजमाध्यमांवरील अकाउंटस्चा मर्यादित वापर करावा. अनोळखी लोकांना त्यांनी ‘फ्रेंडलिस्ट’मध्ये घेऊ नये.
ऑनलाइन जगतात तुम्ही कुणाशी मैत्री करता याबद्दल नेहमीच जागरूक राहा.
एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून तुम्हाला जर धमक्या मिळत असतील तर सावध व्हा. उदा. दादागिरी करणं, एखादी गोष्ट मागणं किंवा आपले फोटो, व्हिडीओ, चॅट हे शेअर करायला सांगणं. मुलांनीही अशा प्रकाराची घरातल्या प्रौढ व्यक्तीला ताबडतोब कल्पना दिली पाहिजे. असं वर्तन थांबलं नाही किंवा ते वाढलं तर यावर ताबडतोब कृती करा. त्याकरता तुम्ही http://www.cybercrime.gov.in या पोलिसांच्या संकेतस्थळावर किंवा आमच्या responsiblenetism@gmail.com वर आमच्याशी संपर्क साधू शकता.
प्रत्येक समाजमाध्यमासाठीच्या तक्रार यंत्रणेबद्दल जाणून घ्या. मुलांच्या बाबतीतल्या ऑनलाइन गुन्ह्य़ांची संख्या वाढत असल्यामुळे बहुसंख्य समाजमाध्यमांनी अशा तक्रारींचं निराकरण करण्याची सक्षम यंत्रणा बनवलेली आहे.
एखाद्याला समाजमाध्यमावर ‘ब्लॉक’ कसं करावं किंवा एखाद्या आशयाबद्दल तक्रार कधी करावी, याबद्दल जाणून घ्या.
मुलांना अनोळखी व्यक्तीसोबत ‘इन्स्टंट मेसेजिंग’ किंवा ‘ग्रुप चॅट’ करू देऊ नका.
नेहमीच तुम्ही वापरत असलेल्या सर्व समाजमाध्यमांवर व ई-मेल खात्यांवर सुरक्षिततेसाठीचं दोन टप्प्यांचं म्हणजेच ‘टू फॅक्टर ऑथेन्टिकेशन’ सेट करा. तुमचं अकाउंट कुणी हॅक करण्याचा प्रयत्न केला तर ‘टू फॅक्टर ऑथेन्टिकेशन’मुळे तुम्हाला लगेच त्याचा ‘अलर्ट’ येईल. हे सुरक्षिततेचे उपाय प्राथमिक वाटले तरी तुमच्या प्रोफाइलची सुरक्षितता चांगली राहते.
मुलांना एखादी आक्षेपार्ह गोष्ट समाजमाध्यमावर दिसली किंवा त्यांना कशाचा त्रास होत असेल, तर त्याबद्दल त्यांना तक्रार करण्यास सांगा.
ऑनलाइन चॅटिंगमध्ये कधीही फोटो शेअर करू नका. यातून त्रास देण्यासाठी अश्लील चित्रफिती तयार करणं, ‘मॉर्फि ग’ करणं किंवा पैसे उकळणं, असे प्रकार घडू शकतात.
दर वेळी काम झाल्यावर प्रत्येक अकाउंटमधून ‘लॉगआउट’ करा. एखाद्या ठिकाणी तुमच्याखेरीज अन्य व्यक्तीनं ‘लॉगइन’ केल्याचा तुम्हाला संदेश आला तर सावध व्हा.
समाजमाध्यमावर ‘टॅगिंग’ची सुविधा उपलब्ध आहे का ते तपासा आणि कुणी ‘टॅग’ करावं यावर नियंत्रण घाला.
समाजमाध्यमांवर कुणी तुमचं ‘फेक अकाउंट’ तयार केलेलं आहे का हे तपासा. तुम्हाला तशी काही अकाउंट्स सापडली तर त्या समाजमाध्यमाकडे तक्रार करा. यासोबतच आपल्या जास्तीतजास्त मित्रमैत्रिणींना अशा फेक अकाउंटबद्दल तक्रार करण्यास सांगा.
तुम्ही स्वत: कधीही फेक अकाउंट्स तयार करू नका. तो सायबर गुन्हा आहे.
आपल्या अकाउंटचा ‘पासवर्ड’ मित्रमैत्रिणींना कधीही देऊ नका. कुठल्याही परिस्थितीत अन्य मित्रमैत्रिणींना तुमचं समाजमाध्यमांवरचं अकाउंट उघडू देऊ नका. हे अत्यंत धोकादायक आहे.
अकाउंटचे पासवर्ड गुंतागुंतीचे, भक्कम आणि इतर कुणाला सहज ओळखता येणार नाहीत असे ठेवा. त्यामध्ये अंकांचा, ‘कॅपिटल’ व ‘स्मॉल’ अक्षरांचा आणि ‘की-बोर्ड’वरील विविध ‘स्पेशल कॅरॅक्टर्स’चा वापर करा. प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा पासवर्ड ठेवा.
दर काही दिवसांनी आपला पासवर्ड आवश्य बदला. समाजमाध्यमांच्या खात्यांशी अन्य अॅप्स जोडू नका.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही गोष्ट इंटरनेटवर पोस्ट करण्याआधी किंवा शेअर करण्याआधी नीट विचार करा. तुमच्या ऑनलाइन वर्तनाचे कोणते परिणाम होऊ शकतात हे आधी जाणून घ्या.
सायबर जगतात इतरांशी सौजन्यानं व आदरपूर्वक वागा.
या मार्गदर्शक सूचनांचं पालन करूनदेखील तुमचं अकाउंट हॅक झालं किंवा तुम्हाला कुणी त्रास देत असेल तर मात्र ते खरोखरच दुर्भाग्यपूर्ण म्हटलं पाहिजे. सायबर जगतातले त्रास देणारे लोक आपल्यापेक्षा कितीतरी अधिक हुशार असतात ही बाब आपण ध्यानात घ्यायला हवी. स्वत: आणि मुलं यांकरता सगळ्याच डिजिटल यंत्रणा सुरक्षित असल्याची आपण खात्री करून घ्यायला हवी. मुलांना ऑनलाइन जगतात सक्षमपणे आणि जबाबदारपणे वागायला शिकवा. असं केल्यास त्यांच्यासोबत कुणी वाईट वागत असेल तर ती लढा देऊ शकतील. शिवाय आपण सारेच जण पालक म्हणून या डिजिटल जगतात एकत्रितपणे आपल्या मुलांच्या मागे समर्थपणे उभे राहू आणि त्यांचं संरक्षण करू.
अनुवाद – सुश्रुत कुलकर्णी