‘न पाळलेले’ प्राणी! न पाळताही ते माझ्याजवळ राहिले. नुसते राहिलेच नाहीत, तर हक्कानं माझं कुटुंब झाले. यातल्या मांजरांनी तर अक्षरश: मलाच पाळलं! अनपेक्षितपणे घरात सोडून दिल्या गेलेल्या दहा श्वानपिल्लांना सांभाळण्यापासून, आईनं टाकलेल्या मार्जारबाळाला आपलं म्हणेपर्यंतचा हा माझा प्राणीप्रेमाचा प्रवास अखंड सुरूच आहे..’’ सांगत आहेत सिने पत्रकार अरूणा अन्तरकर

म्हणे संस्थानं खालसा झाली आणि संस्थानिक नाहीसे झाले. मला विचाराल तर हा शुद्ध गैरसमज आहे. माणसाचे पूर्वज पुढच्या एखाद्या पिढीमध्ये कुण्या ना कुण्या माणसाच्या रूपानं परत येतात, असं म्हणतात; तशी संस्थानिकांची जमात मांजरनामक प्राण्याच्या रूपानं इहलोकात आली आहे! भारतखंड व जगातल्या इतर देशांमध्ये सुखेनैव वावरते आहे. माणसाकडून यथेच्छ सोय करून घेते आहे. याची मी साक्षीदार आहे आणि अनुभवार्थीही आहे.
एक काळ असा होता, कर्वे रोडवरच्या आमच्या घरात माणसांपेक्षा कुत्री अन् मांजरी यांचीच संख्या जास्त होती. या दोन्ही प्राणांच्या पिढय़ांच्या पिढय़ा आमच्याकडे नांदत होत्या. आम्ही कधीही मुद्दाम कुत्रा किंवा मांजर आणून पाळलं नाही. ही मंडळीच आम्हाला बरोबर शोधून काढतात आणि तळ ठोकतात, असा माझा अनुभव आहे. आमचं आडनाव खरं तर ‘मांजरेकर’ असायला हवं होतं! मांजरांना म्हणे सात जन्म असतात. या सर्व जन्मांत आम्ही त्यांचे सोबती असणार! पानशेत धरण फुटलं (१९६१) तेव्हा आमचं नारायण पेठेतलं तळमजल्याचं घर पाण्याखाली गेलं. तेव्हा जीव वाचवण्यासाठी गुडघाभर पाण्यातून वाट काढत आम्ही गच्चीचा आसरा घेतला. तिथे जाण्यापूर्वी हाताला लागलेल्या तीन वस्तू मी आणि माझ्या भावानं हृदयाशी कवटाळल्या. त्याच्या हातात रेडिओ, माझ्या हातात आमचं ‘बिस्कीट’ नावाचं मांजराचं पिल्लू आणि मीनाकुमारीचा फोटो असलेला ताजा ‘फिल्मफेअर’चा अंक! योगायोग म्हणजे पुढच्या आयुष्यात या तीन गोष्टींनी साथसोबत केली आणि जगणं शक्य कोटीतलं केलं.

kids at home
शाळांना सुट्ट्या लागल्या, मुलांना कुठे ठेवायचं? पालकांच्या प्रश्नांची सोपी उत्तरे!
flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

आमच्या ‘हंस’ मासिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या शंकर या कर्मचाऱ्यानं एका सशाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून आमच्या घरी आणलं होतं. पांढराशुभ्र कापसाचा गोळा वाटावा, असा तो गोजिरवाणा ससा साऱ्या घराचा लाडका झाला; पण अण्णांची- माझे वडील (अनंत अंतरकर) आणि त्याची खास मैत्री होती. रात्रीच्या जेवणानंतर अण्णा अंगणात शतपावली करू लागले की गंटुल्या (हे त्या सशाचं नाव) त्यांच्याबरोबर येरझाऱ्या घालायचा. तो दैनंदिन कार्यक्रम बघणाऱ्या अशोकनं- माझा मोठा भाऊ, त्याची गंमत करायचं ठरवलं. एकदा अण्णांचं धोतर नेसून तो अंगणात फेऱ्या मारू लागला; पण गंटुल्या कसला खट! तो जागचा हललासुद्धा नाही. माणूस माणसाला ओळखत नाही, पण प्राणी माणसाला बरोबर ओळखतो, असं म्हणतात, ते खरं असावं. अण्णांचा साहित्यावर जेवढा जीव, तेवढाच प्राण्यांवर! त्यांना सारेच प्राणी आवडायचे. इतके, की ‘हंस’ मासिक काढण्याआधी ते सर्कस काढायचं स्वप्न बघत होते; पण सर्कसमध्ये प्राण्यांना शिकवताना त्यांचे अतिशय हाल केले जातात, हे कळलं, तेव्हा त्यांनी सर्कसचा विचार सोडून दिला. पुण्यात रिक्षा सुरू झाल्या तरी आमचा स्थानिक प्रवास नेहमी टांग्यातून व्हायचा, कारण अण्णांचा जीव टांगेवाल्यासाठी अन् त्याच्या घोडय़ासाठी तुटायचा. टांग्यात बसण्याआधी ते टांगेवाल्याला बजावायचे, ‘घोडय़ाला चाबूक अजिबात मारायचा नाही, सावकाश जावं लागलं तरी चालेल,’ वगैरे. टांग्यातून उतरताना ठरलेल्या भाडय़ापेक्षा दोन-पाच रुपये जास्त टांगेवाल्याच्या हातावर ठेवायचे. घोडय़ाच्या चाऱ्यासाठी आणि पुन्हा एकदा बजावायचे, ‘त्याला भरपूर चारापाणी दे.’ एकदा आम्ही गावाहून परतलो, तेव्हा जवळ सामान होतं. त्यांनी घरातल्या स्त्रियांना टांग्यात बसवलं, पण ओझं वाढू नये म्हणून स्टेशन ते नारायण पेठ हा सात-आठ किलोमीटरचा प्रवास ते पायी चालले.

अण्णांच्या या विलक्षण अश्वप्रेमाची आठवण जपण्याची संधी मला पुढे आकस्मिकरीत्या मिळाली. त्या वेळी मी ‘सांज लोकसत्ता’ या ‘लोकसत्ता’च्या धाकटय़ा भावंडासाठी काम करत होते. मुंबईत नरिमन पॉइन्टला ऑफिस होतं. तिथल्या बस डेपोच्या परिसरात मला एकदा एक घोडा दिसला. तपकिरी-सोनेरी रंग आणि कपाळावर गंध लावल्यासारखी उभी रेघ. अत्यंत देखणा, पण उपासमारीनं खंगलेला. त्याची हलाखी बघून मी कळवळून गेले. डेपोच्या परिसरात एक जेवणाचा स्टॉल होता. तिथून दोन पुरणपोळय़ा घेऊन मी त्याच्या पुढे ठेवल्या. पठ्ठय़ानं त्या एका घासात संपवल्या. दुसऱ्या दिवशी मी बसमधून खाली उतरते, तो अश्वराजांची स्वारी समोर उभी! नंतर तो नित्यक्रमच झाला. रविवारी ऑफिसला सुट्टी. म्हणून मी शनिवारीच स्टॉलवाल्यांना ‘राणा’च्या ‘संडे लंच’चे पैसे देत असे. बघता बघता त्याचे चाहते वाढले. पुढे कुणी तरी त्याची एका स्टड फार्ममध्ये कायमची व्यवस्था करून दिली.

‘गरज सरो वैद्य मरो’ या माणसाच्या नीच वृत्तीमुळे असे बिचारे राणा हकनाक रस्त्यावर येतात. मी गोरेगावमध्ये राहात असताना रोज रात्री एक अपंग गाय कचरापेटीपाशी दिसायची. कचरापेटीत चरताना तिला जीवघेणे कष्ट व्हायचे, एरवी चालतानाही फार त्रास व्हायचा. मी तिला रोज चार पोळय़ा द्यायला लागले. त्या कचरापेटीजवळ एक इमारत होती. माझं बघून तिथले रहिवासीही तिला रोज खाऊ घालायला लागले. सर्वच कष्टकरी जनावरांबद्दल आपण फार निष्काळजी आणि माणुसकीशून्य आहोत.

या सर्व प्राण्यांनी माणसाला त्याची जागा कशी दाखवून द्यावी हे मांजरांकडून शिकावं! या भाग्यवान प्राण्यासारखा स्वत:च्या मर्जीनं जगणारा आणि खऱ्या अर्थी स्वतंत्र प्राणी जगाच्या काय स्वर्गाच्या पाठीवरही बघायला मिळणार नाही. तुम्ही एक वेळ वाघ/ सिंह पाळू शकाल, पण मांजर पाळणं केवळ अशक्य! कारण त्रिकालाबाधित सत्य हेच, की मांजर तुमच्या घरात राहात असलं तरी तुम्ही त्याला पाळत नसून ते तुम्हाला पाळतं. तुमच्या सोयीनं ते कोणतीही गोष्ट करत नाही. त्याची मिजास असते, तोरा असतो, रुबाब तर असतोच. त्याच्या मनात असेल तेव्हाच ते तुमचे लाड करतं किंवा तुम्ही करत असलेले लाड खपवून घेतं. मात्र जेव्हा ते लाडात येतं, तेव्हा त्याच्यासारखं प्रेम कुणी करत नाही. काय ते रेशमी जवळ येणं, बिलगणं अन् पायांना डोकं घासणं. ठेवणीतला आवाज काढून आर्जव करणं. मात्र जेव्हा त्याची इच्छा नसते, तेव्हा मन्या किंवा मनी इतके अलिप्त, निर्विकार असतात म्हणून सांगू! आमच्याकडे ‘डेबू’ नावाचं मांजर होतं. ते ‘नानू’ हे नवीन नाव घेऊन आमच्या शेजाऱ्यांकडेही त्यांची फॅमिली म्हणून राहात होतं. अगदी ‘गेला माधव कुणीकडे’ सिच्युएशन! मी शेजाऱ्यांकडे गेले असताना मला अपघातानंच हे धक्कादायक रहस्य समजलं. मी तिथे होते तोवर डेबूनं मात्र मला ओळख दिली नाही. उलट त्या फसवल्या गेलेल्या माणसानं माझी डेबूशी ‘हा आमचा नानू. या घरात याचाच शब्द चालतो.’ अशी ओळख करून दिली होती आणि त्या वेळी हा ‘तुम्ही कोण, आम्ही कोण’ अशा बेरड नजरेनं माझ्याकडे बघत होता!

असाच डबल रोल खेळणाऱ्या सोन्या या मांजरापायी मला साहित्यिक अनिल बर्वे यांच्याशी भांडायची वेळ आली होती. अर्थात त्या वेळी तो मोठा लेखक नव्हता. आम्ही एकमेकांचे शेजारी आणि सवंगडी होतो. पंचाईत अशी होती, की या सवंगडय़ाचे खेळ भलतेच जहाल व मारक असायचे. तर अनिलला सोन्या हवा होता आणि त्या बाबतीत माझाही ‘मेरी झांशी नहीं दूंगी’ असा कडवा निर्धार होता. मी अनिलच्या हातून सोन्याला काढून घेतलं. मग तो त्याला परत घ्यायला त्वेषानं चालून आला. दरम्यान सोन्यानं शिताफीनं माझ्या तावडीतून सुटका करून घेऊन पोबारा केला. त्यामुळे पुढचा समरप्रसंग टळला! एकदा भावेकाका (सुविख्यात लेखक पु.भा. भावे) घरी आले होते, तेव्हा ज्या खुर्चीवर त्यांना बसायचं ती सोन्यानं आधीच अडवून ठेवली होती आणि काही केल्या ती सोडायला तयार होईना. अखेर माघार घेत भावेकाका म्हणाले, ‘‘बरोबर आहे, त्याचं सिंहासन त्यानं का सोडावं?’’

आमच्या स्वत:च्या नव्या घराला पहिल्यापेक्षा जास्त खोल्या आणि मागे भलंमोठं अंगण होतं. त्यामुळे मांजराबरोबर कुत्र्यांचाही प्रवेश झाला होता. त्यांच्या लुटुपुटुच्या लढाया चालायच्या. बाहेर मांजरं भांडायला लागली की आमचा बँजो (कुत्रा) त्यांना पिटाळून लावायचा. बिशू ही मांजरी कुणालाही पिल्लं झाली की त्या पिल्लांचं ‘बेबी सिटिंग’ करायची. पहिलटकरणीबरोबर बाळांचं हवं नको बघायची. पुढे मोती ही अत्यंत देखणी आणि तितकीच प्रेमळ कुत्री आमच्या विस्तारित कुटुंबामध्ये सहभागी झाली. मग तीही बिशूबरोबर ‘संगोपन-कम-मार्गदर्शना’त सहभागी होऊ लागली. मांजरीची पिल्लं खुशाल मोतीच्या अंगाखांद्यावर बागडायची. त्यांच्या आया त्यांना मोतीवर सोपवून निर्धास्तपणे भटकायला बाहेर जायच्या. आमच्या घराच्या तिन्ही बाजूंना मोठाले मोकळे प्लॉट होते. तिथे आसपासचे हॉटेलवाले रात्री उरलेल्या अन्नाचे ढीग टाकायचे. साहजिकच रात्री तिथे झुंबड उडायची. त्यातूनच जिनी ही, दुर्मीळ निळसर करडय़ा रंगाची एक सुंदर श्वानिका आमच्या अंगणात मुक्कामाला आली. तिचे मागचे दोन्ही पाय अर्धागवायूनं निकामी झाले होते. मोतीची एक कन्या तिच्याशी थोडी कुरबुर करायची, मात्र ती कुंपणातून बाहेर जायला लागली की भुंकून भुंकून आम्हाला सावध करायची. या प्रकारे आपल्या आजारी पाहुणीला ती जपत होती.

कुत्रे मांजरांच्या मानानं खूपच समंजस आणि निरुपद्रवी असतात. आज्ञाधारकही असतात. मोतीला ताना-आलाप घेत सलग १०-१५ मिनिटं भुंकायला फार आवडायचं. ‘अगं, जरा हळू ओरड की’ अशी ताकीद दिल्यावर ती मराठी समजत असल्यासारखी आवाजाचा ‘व्हॉल्युम’ कमी करून खर्जात गुरगुरत राहायची.मी सायनला राहात असताना इमारतीच्या आसपास वावरणाऱ्या एका कुत्र्याशी माझी दोस्ती झाली. माझी ऑफिसमधून परतण्याची वेळ त्याला पाठ झाली होती. सायन बस डेपोमध्ये त्या वेळी तो अचूक हजर असायचा. तिथल्या एका स्टॉलवर स्वारी माझ्याकडून मिल्कशेक वसूल करायची. मी सायनहून हलल्यानंतरही त्याच्याकरिता रोज त्या बसस्टॉपवर उतरत असे. अशात एकदा तो कधी माझ्यामागून सायन स्टेशनवर आला आणि माझ्यापाठोपाठ ट्रेनमध्ये शिरला, कळलंही नाही! ते पाहिलं आणि मी धसकले. पुढच्या स्टेशनला खाली उतरून टॅक्सी केली आणि त्याला बस डेपोमध्ये सोडून आले. पुढेही हा पठ्ठा तीन-चार वेळा असाच माझ्यामागोमाग ट्रेनमध्ये आला. डब्यात साहजिकच हलकल्लोळ व्हायचा. त्याला घेऊन डब्यातून उतरताना माझा जीव वर-खाली व्हायचा. त्याला एक डोळा नव्हता, त्यामुळे उतरताना याचा अंदाज चुकला तर.. असामाझा थरकाप व्हायचा. मग मी सायनला उतरणं सोडून दिलं.

नंतर मी मुलुंडला राहायला गेले, तिथल्या इमारतीच्या आवारात कुत्रीला पिल्लं झाली. काही दिवसांनी महापालिकेची गाडी त्यातल्या दोन पिल्लांना पकडून घेऊन गेली. बिल्डिंगमधल्या बालगोपाळांचे चेहरे कोमेजले, पिल्लांच्या आईनं जेवणखाण टाकलं. बेवारस कुत्र्यांना महालक्ष्मीच्या ‘डॉग पॉन्ड’मध्ये ठेवतात, त्यांना सोडवून आणता येतं, अशी माहिती मला मिळाली. मी एका शेजारी मुलीसह त्या ठिकाणी पोहोचले. तिथल्या परिचारिकेनं दोन दिवसांपूर्वी पकडलेल्या कुत्र्यांच्या पिंजऱ्यापाशी मला नेलं आणि पिल्लं ओळखून घेऊन जा म्हणून सांगितलं. आम्ही चक्रावून गेलो, कारण तिथे तपकिरी रंगांची डझनभर पिल्लं होती. सगळय़ांची चेहरेपट्टी एकसारखी! कापडाच्या एका ताग्यातून अनेक कटपीस काढावे तशी! एकेक पिल्लू पुन:पुन्हा पाहात असताना एकदम चमत्कार झाला आणि त्यातल्या एका पिल्लाच्या कपाळाला सुरकुत्या पडलेल्या दिसल्या. तो जणू ‘ट्रेडमार्क’ होता! त्याला आणि चिकटून बसलेल्या त्याच्या भावंडाला उचलून आम्ही पॉन्डच्या बाहेर पडलो. पॉन्डमध्ये जाणं हा काळजाला पीळ पाडणारा अनुभव होता. पकडलेल्या सर्व कुत्र्यांच्या पिंजऱ्यांमध्ये अन्न ठेवलेलं होतं, पण कुणीही त्याला तोंड लावलं नव्हतं. सगळय़ांच्या नजरेमध्ये मृत्यूची भीती झाकोळली होती. आम्ही बिल्डिंग गाठली आणि पिल्लांनी आईला बघून चीत्कार केला. आईनंही धावत येऊन त्यांना चाटायला सुरुवात केली. सगळीकडून टाळय़ांचा कडकडाट झाला आणि एका छोटय़ा मुलानं येऊन माझ्या हातात गुलाबाचं फूल ठेवलं.

माणसांमध्ये जसं मूल न होणाऱ्या स्त्रीला पूर्वी एकटं पाडलं जात असे, ते मी मांजरांमध्येही पाहिलं. माझ्या एका नातलगांच्या घरी डझनभर माजरं होती. त्यांच्यातल्या एकीला पिल्लं होत नव्हती. तिला त्या मार्जार समाजानं बहिष्कृत केलं होतं. त्या सजेनं की काय, पण त्या मांजरीची वाचा गेली होती. पुढे चमत्कार झाला आणि तिलाही आई होण्याचं सौख्य लाभलं. त्या घटनेनं तिचा आवाज परत आला, हे आम्ही पाहिलं आहे.

एकदा केवळ एका मिनिटासाठी माझ्या फ्लॅटचं दार उघडं काय राहिलं, तर बिल्डिंगमधल्या कुत्रीनं माझा कोच ताब्यात घेऊन तिथे दहा पिल्लांना जन्म दिला! चकलीच्या सोयऱ्यातून चकल्या बाहेर पडतात तसं अक्षरश: एकेक पिल्लू नजरेसमोर येत होतं. त्यांच्या आईनं कोच अडवून बालसंगोपनाचं कार्य सुरू केलं होतं. महिनाभरानं पिल्लं मोठी झाली आणि खूप दंगा करू लागली. तेव्हा मात्र ही कुत्री- लाली वैतागून गेली आणि एक दिवस चक्क तिथून गायब झाली. माझ्या नजरेसमोरचे तारे मावळले आणि काळोख पसरला! ‘त्या पिल्लांना रस्त्यावर सोडा. ती वाढतील बरोबर,’ हा शेजाऱ्यांकडून आलेला सल्ला व्यावहारिक शहाणपणाचा होता, पण ऐन पावसाळय़ाच्या दिवसांत तो अमलात आणण्याचं धैर्य मला होईना. पुढे मला सहा वर्ष त्यांना सांभाळावं लागलं. त्यांना घरं मिळवून द्यायचे माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. दहाच्या दहा पिल्लं काळी कुळकुळीत. त्यातली चार-दोन देखणीही होती. ती दहा पिल्लं मी कुठे तरी सोडून द्यावी, म्हणून माझ्यावर वेगवेगळय़ा प्रकारे दबाव आणला जात होता. माझ्या दाराला बाहेरून कडी लावणं, महापालिकेच्या श्वानपथकाचे कर्मचारी पाठवणं, इथंपासून ते माझ्या घराच्या दाराला मानवी विष्ठा लावण्यापर्यंतचे सगळे हाल मी सोसत होते. त्या दहा जणांना खाऊपिऊ घालण्याकरिता मी अनेक वर्ष लॉकरमध्ये धूळ खात पडलेल्या दागिन्यांची मदत घेतली. तरी ती पुरी पडत नव्हती. भेळ, किलगड, द्राक्षं, केळी, मक्याची कणसं, मॅगी नूडल्स, उकडलेले बटाटे, बीट, टोमॅटो.. बिचारी मी जे देईन ते खात होती. पहाटे ४ ते रात्री १२ पर्यंतचा दिवस मला स्वयंपाक आणि घराची सफाई यांच्यासाठी पुरत नव्हता. तरीही त्यांना रस्त्यावर टाकायचं नाही, त्यांची नीट सोय लावायची, हा माझा निर्धार होता. तीन खोल्यांच्या घरात खरं तर ती अक्षरश: तुरुंगवास भोगत होते, पण माझ्याखेरीज दुसऱ्या कोणत्याच माणसाशी जमवून घ्यायला ती पिल्लं तयार नव्हती. शरीर कुत्र्याचं आणि काळीज सशाचं, अशी त्यांची दशा होती. ‘रो डेव्हलपमेंट’मध्ये मी माझा फ्लॅट बिल्डरला विकून त्या पिल्लांसाठी गावाबाहेर चारी बाजूंनी मोकळी जागा असलेला बंगला भाडय़ानं घेतला; पण ही मंडळी मात्र खूश नव्हती. त्यांच्यासाठी शेड, भलीमोठी कॉट, अशी व्यवस्था केली; पण त्यांना मी असेन तिथेच राहायला हवं असायचं. मी अंगणात गेले की सगळी जण माझ्याभोवती कोंडाळं करून मला चिकटून बसायची. याचं कसं होणार? वयाची सहा दशकं ओलांडलेली मी यांना कुठवर पुरेन? माझ्या मागे यांना बघणार कोण? या विचारानं डोकं भणाणून जायचं. दुसरीकडे घरभाडं, एजंटांचं कमिशन आणि राहण्याची मुदत पूर्ण होण्याआधीच मिळणाऱ्या नोटिसांनी मी हताश झाले होते. त्यांच्यासाठी सगळय़ाच गोष्टींना दुप्पट पैसा मोजावा लागत होता. त्याचं दु:ख नव्हतं, पण त्यांची व्यवस्था लागत नव्हती. माझ्या इच्छाशक्तीचा सहा वर्षांनी विजय झाला आणि भटक्या, बेवारस कुत्र्यांना सांभाळणाऱ्या एका शेल्टरनं त्यांना आसरा दिला. त्यासाठी सज्जड दक्षिणा मोजावी लागली; पण आयुष्य संपण्यापूर्वी, माझ्या निरस जीवनात अमाप आनंद देणाऱ्या आणि एकूण माणूस जमातीवर शतकानुशतकं अतीव उपकार करणाऱ्या मुक्या प्राण्यांसाठी कृतज्ञता म्हणून काही तरी करावं, ही माझी इच्छा अर्धीमुर्धी का होईना पूर्ण झाली.

या अग्निदिव्यातून पार पडल्यावर ‘तीसरी कसम’ चित्रपटातल्या नायकाप्रमाणे मी शपथ घेतली, की आता माझ्याकडे हक्काचं घर नाही, माझ्यापाशी आयुष्यही फारसं नाही, तेव्हा मी कुत्रा आणि मांजर पाळणार नाही; पण एक दिवस खिडकीच्या फुटलेल्या तावदानातून एक खंगलेली मांजरी आली आणि तिचं छोटं पिल्लू आत टाकून जणू हवेत विरून गेली. आईपासून तुटलेल्या त्या पिल्लाच्या पोटाला मोठी जखम होती. त्याची काळजी घेणं मला भाग होतं. या गोष्टीला आता वर्ष होत आलंय. ते पिल्लू आता टगं झालंय. ‘प्रोफेसर’ चित्रपटात शम्मी कपूर दोन रंगांचा कोट घालतो, तसं या पिल्लाचं पोट पूर्ण पांढरं आणि पाठीकडचा भाग काळाभोर आहे. त्यामुळे मी त्याचं नाव ‘शम्मी’ (कधी कधी काळूही म्हणते) ठेवलं आहे. आपल्या नावाला जागून मांजराचा तो अवतार दिवसभर ‘उछलकूद’ करतो. कोणतीही वस्तू सांडणं/ पाडणं/ फोडणं हा त्याचा लाडका खेळ आणि डाव्या हाताचा मळ आहे.
आणखी थोडय़ा दिवसांनी मला हे भाडय़ाचं घरही सोडावं लागेल. तेव्हा काळूचं कसं होणार? ही चिंता आतापासून माझं काळीज कुरतडते आहे; पण धप्पकन काळू कुठून तरी येतो आणि मला रेलून बसतो. माझ्या हाताला डोकं घासतो आणि मी म्हणते, ‘‘जाऊ दे अरुणा! दारुडय़ाला दारू सुटत नाही, तसं तुला मांजरं सुटणार नाहीत. पुढे जे होईल ते होईल. आता तर त्याच्या सोबतीचा आनंद घे!
chaturang.loksatta@gmail.com