scorecardresearch

सोयरे सहचर : अद्भुत जंगल सफारी

ताडोबानं मला केवळ वाघाच्याच नव्हे तर इतर वन्यजीवांच्याही खूप जवळ नेलं. गेल्या वर्षी करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मी ३७ दिवस ताडोबात होतो.

(संग्रहित छायाचित्र)

‘‘काँक्रीट आणि माणसांनी बुजबुजलेल्या शहरात आता माझं मन रमत नाही. जंगलातला निसर्ग आणि त्या निसर्गाशी इमान राखणारे वन्यजीव हेच मला माझे खरे ‘सोयरे सहचर’ वाटतात. त्यांचं नुसतं दर्शन मनाला सुखावतंच, पण कधी फिरस्तीच्या, तर कधी कामाच्या निमित्तानं मिळणारा सहवास अविस्मरणीय जीवनानुभव देऊन जातो. मग तो खंडय़ासारखा देखणा पक्षी असो, हातावर येऊन बसणारी घार असो, माकडाची पिल्लं असोत, की ‘परफेक्ट जंटलमन’सारखा वागणारा वाघ असो..’’ सांगताहेत ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प’ येथील कम्युनिकेशन्स ऑफिसर आणि ‘इंडियन इकॉलॉजिक फाऊंडेशन’चे प्रकल्प प्रमुख अनंत सोनवणे.

रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यात माझी शेतजमीन आहे. रूढार्थानं ती आंबा-काजूची बाग असली, तरी ते एक छोटेखानी जंगलच आहे. आंब्याच्या फांद्या काजूत घुसल्यात, काजूनं फणसाच्या झाडावर घुसखोरी केलीय, तर कुठे फणस जांभळावर रेललाय, असा मस्त बेशिस्त कारभार आहे. वीसेक प्रकारची तीनशे-साडेतीनशे झाडं, कथित जंगली झाडांसह एकमेकांशी दंगा करत उभी आहेत. जमीन कायम पाना-काडय़ांनी आच्छादलेली. फालतू साफसफाई नाही. खतं, औषधांचा मारा नाही. आमच्या शेताचं नाव आम्ही ठेवलंय, देवराई. 

   इथे अनोळखी मनुष्यप्राणी सोडून सर्व वन्यजीवांना मुक्त प्रवेश आहे. इथली वाळवीची वारुळं वर्षांनुर्वष तशीच उभी आहेत. रानडुकरं बऱ्याचदा रात्री वस्तीला असतात. माकडांचा गदारोळ वर्षभर सुरू असतो, तर काजूच्या हंगामात साळींदर गुपचूप भेट देऊन जातात. कधी भेकर चरायला येतात, तर कधी बिबटय़ाही चक्कर टाकतो. दिवसभर खारूताई, विविध प्रकारच्या पाली, सरडे, कोळी, पावसाळय़ात बेडूक, गोगलगायी आणि खेकडे स्वच्छंद विहरताना दिसतात. कधी विषारी-बिनविषारी सापही त्यांचं सळसळतं अस्तित्व दाखवून देतात.

माझी देवराई गावापासून दूर आहे. कुणाचा शेजार नाही. पण पश्चिम घाटात आढळणारे बरेचसे पक्षी इथे माझे शेजारी आहेत. आजवर माझ्या घराच्या व्हरांडय़ात बसून मी पन्नासेक प्रजातींची नोंद केलीय. इथे दिवस उजाडण्याआधीच रानकोंबडय़ांचा गजर सुरु होतो. सकाळी सहा वाजता शीळकरी कस्तूरच्या मधुर शिट्टीनं दिवसाची संगीतमय सुरुवात होते. मग मोर, बुलबुल, दयाळ, हळद्या, तांबट, शिंपी असे अनेक गायक आपापले सूर आळवत या ऑर्केस्ट्रात सहभागी होतात. सुतार किंवा हॉर्नबिल कधी उडता-उडता आपल्या आगमनाची वर्दी देतात. जास्वंदीवर सूर्यपक्ष्यांची लगबग सुरू होते. उन्हं तापू लागली, की आकाशात तुरेवाला गरुड घिरटय़ा घालताना दिसतो. कधी शिकारीसाठी देवराईत येतो. मागची चार-पाच दशकं बाजूच्या देशमुख बागेतल्या उंच रानभेंड झाडावर त्याचं घरटं होतं. सकाळी साडेसहा-सात वाजता तो घरटय़ाच्या बाहेर येऊन ऐटीत बसायचा. विणीच्या हंगामात घरटय़ात पिलांची लगबग असायची. २०२० मधल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळात ते झाड उन्मळून पडलं आणि गरुडासह पोपट, कोतवाल, मधमाश्या वगैरे अनेक सखे बेघर झाले.

देवराईत झाडांवर लाकडी घरटी टांगलेली आहेत. दयाळ आणि शामा पक्ष्यांनी पिलांना जन्म देण्यासाठी या घरटय़ांचा वापर केलाय. खास पक्ष्यांसाठी मातीच्या तसंच दगडी उथळ भांडय़ांमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे. सकाळी आणि संध्याकाळी पाणी प्यायला आणि आंघोळीला पक्षी पाण्यावर येतात. सांज उतरू लागली की या पक्ष्यांची लगबग थंडावते. मग घुबडांचे घूत्कार आणि रातव्यांच्या एकसुरी संगीतानं दिवसाची सांगता होते. या सगळय़ाच वन्यजीवांचं इथे प्रेमानं स्वागत होतं. पण एक छोटू मात्र आमचा सगळय़ात लाडका आहे.

सात वर्षांपूर्वी एका पावसाळय़ात मी आणि माझी बायको सुरेखा असे दोघंच देवराईत होतो. सुरेखा पायरीवर बसून सभोवारची हिरवाई न्याहाळत होती. मी घरात काहीबाही करत होतो. अचानक ती ओरडली, ‘‘लवकर बाहेर ये!’’ तिच्या आवाजात प्रचंड उत्साह होता. मी धावतच बाहेर आलो आणि तिनं दाखवलेल्या दिशेनं पाहिलं. अगदी समोरच्या फांदीवर तो बसला होता आणि आमच्याकडेच पाहत होता! त्याला पाहताच माझीही अवस्था सुरेखासारखीच झाली! आम्ही दोघांनी अत्यानंदानं एकमेकांना टाळय़ा दिल्या आणि देवाचे लाख-लाख आभार मानले. तो पक्षी होता तिबोटी खंडय़ा. ‘किंगफिशर’ची सर्वात छोटी आणि सर्वात देखणी प्रजाती. उंची १४ सेंटीमीटर, वजन ४० ग्रॅम. उडण्याचा वेग तुफान. म्हणून त्याला बुलेट म्हणतात. रंग तर असे झळझळीत की नजरबंदी व्हावी! जणू कलर बॉम्ब! हा चिमुकला देखणा जीव दक्षिण भारतातल्या सदाहरित गर्द वनांमध्ये राहतो. जून ते सप्टेंबर या काळात तो पश्चिम घाटात प्रजननासाठी येतो. तिबोटी खंडय़ाची जोडी माझ्या देवराईत दरवर्षी न चुकता येते आणि माझ्या घरापासून अवघ्या दहा फुटांवर असलेल्या एका खड्डय़ाच्या भिंतीत घर करते. दोघंही आळीपाळीनं मातीच्या भिंतीत कोरीवकाम करत राहतात. माझ्या व्हरांडय़ात बसून मी त्यांची ती लगबग पाहत राहतो. प्रजनानाचा काळ जवळ येतो तसं त्यांचं प्रणयाराधन सुरू होतं. नर सरडे, कोळी, छोटे बेडूक पकडून आणून मादीला भरवतो. एकदा मी दोन माद्यांचा नरासाठी सुरू असलेला संघर्षसुद्धा पाहिलाय. मादी तीन किंवा चार अंडी घालते. पिल्लं अंडय़ाबाहेर आली की नर-मादी दोघंही दर दहा-पंधरा मिनिटांनी पिलांसाठी खाऊ आणतात आणि आळीपाळीनं भरवतात. या काळात तिथल्या कामगारांना त्यांच्या घरटय़ाच्या आसपास फिरकायला मनाई असते. घराचा व्हरांडासुद्धा शेडनेट लावून बंद केला जातो. पण काही वेळा हा खटय़ाळ खंडय़ा त्याच्या बुलेट वेगानं व्हरांडय़ातून चक्कर मारतो किंवा आपलं लक्ष नसेल तर चक्क दोन फूट अंतरावर येऊन बसतो. निसर्गानं असं कोणतं ‘जीपीएस’ बसवलंय याच्या इवल्याशा मेंदूत की तो शेकडो किलोमीटरचा प्रवास करून बरोबर देवराईत येतो, असा विचार आमच्या मनात वारंवार येतो! पिल्लं मोठी झाली की सगळं कुटुंब परतीच्या प्रवासाला निघतं आणि आम्ही त्यांच्या पुढच्या भेटीची वाट पाहू लागतो.

नोकरीनिमित्त मी शहरात असतो त्या काळात मी माझ्या ‘इंडियन इकॉलॉजिक फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या कामात लक्ष घालतो. डोंबिवलीजवळ डायघर इथं वन विभागाचं वन्यजीव ट्रान्झिट सेंटर आहे. ठाणे-मुंबईत सुटका केलेल्या किंवा जप्त केलेल्या वन्यजीवांना इथे आणून योग्य उपचार दिले जातात. नंतर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं जातं. आजच्या घडीला इथे १७० पशुपक्ष्यांचा सांभाळ केला जातो. माझ्या संस्थेतर्फे या पशुपक्ष्यांना अन्न पुरवलं जातं. त्या निमित्तानं त्यांच्याशी जवळीक साधता येते. एकदा या केंद्रात ठाणे शहरातून एक माकड आलं होतं. विजेच्या धक्क्यानं त्याच्या शरीरावरची संपूर्ण कातडी जळून गेली होती. उपचारांनी ते पूर्ण बरं झालं, पण मानसिक धक्क्यातून बाहेर यायला बराच काळ लागला. एक घार तर इतकी लाघवी होती, की तिला चिकन द्यायला गेल्यावर ती हातावर येऊन बसायची. एक पाय मोडलेला बगळा मुक्त केल्यानंतरसुद्धा जेवणाच्या वेळी बरोबर पिंजऱ्याबाहेर येऊन कल्ला करत राहायचा.

शहरी जीवनातून सुटी आणि संधी मिळते तेव्हा मी देवराईत असतो किंवा एखाद्या जंगलात. कुठल्याही जंगलात जाणं हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो आणि जंगलातून शहरात परतणं हा अतीव दु:खाचा. काँक्रिट आणि माणसांनी बुजबुजलेल्या शहरात आता माझं मन रमत नाही. जंगलातला निसर्ग आणि त्या निसर्गाशी इमान राखणारे वन्यजीव हेच मला माझे खरे सोयरे सहचर वाटतात. त्यांचं नुसतं दर्शनसुद्धा मन सुखावतंच, पण कधी फिरस्तीच्या, तर कधी कामाच्या निमित्तानं मिळणारा सहवास अविस्मरणीय असा जीवनानुभव देऊन जातो.

साधारणत: पंधरा वर्षांपूर्वी माझ्या जंगल भ्रमंतीला सुरुवात झाली, ती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून. मी आणि सुरेखा, आम्ही दोघंच गेलो होतो. त्या पहिल्यावहिल्या भेटीनं आम्हाला जंगलाचं वेड लागलं. त्या वेळी वाघ दिसला नाहीच, पण वाघाचं पहिलं दर्शन व्हायला चार र्वष लागली. मध्य प्रदेशातल्या कान्हा जंगलात पहिलं व्याघ्रदर्शन झालं. तेव्हापासून आजवर अनेकदा वाघाला जवळून अनुभवत आलो. त्याचा स्वभाव, त्याच्या सवयी यांचा अभ्यास करत आलो. जंगलखुणा आणि अलार्म कॉल्सच्या आधारे वाघाचा मागोवा घेणं शिकलो. व्याघ्रगणनेसाठीचं कॅमेरा ट्रॅपिंग करताना, ‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स’बरोबर पॅट्रोलिंग करताना, वनमजुरांबरोबर संरक्षण कुटींवर रात्र जागवताना, वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर चर्चा करताना वाघ समजून घेण्याचा प्रयत्न केला. वाघाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करू लागल्यापासून तर त्याच्यावरचं प्रेम आणखीनच वाढलं. आता ताडोबाच्या माया, सोनम, लारा, तारा, मधू, माधुरी वगैरे वाघिणी आणि वाघडोह, रुद्र, ताला, मटकासूर आदी वाघ हे मला माझे कुटुंबीयच वाटतात. ताडोबात असलो की संधी मिळेल तेव्हा मी त्यांच्या दर्शनाला जातो आणि मुंबईत असलो तरी सहकाऱ्यांकडे कोणत्या वाघिणीला किती पिल्लं झाली, कोणी आपली ‘टेरिटरी’ बदलली अशा चौकशा सुरूच असतात. 

आपल्या हिंदी सिनेमांनी ‘माणसांची शिकार करणारं हिंस्र जनावर’ असंच वाघाचं चित्रण कायम केलं आहे. वन्यजीव-मानव संघर्षांच्या घटना वरचेवर घडत असतात. पण वाघ किंवा अन्य वन्यजीव सहसा माणसावर भक्ष्य म्हणून हल्ला करत नाहीत. विशेषत: वाघ तर मला ‘परफेक्ट जंटलमन’ वाटतो. ताडोबातल्या माझ्या निवासादरम्यान एकदा सकाळी मी फिरायला बाहेर पडलो. गावाच्या हद्दीजवळ पोहोचलो, तर एक पूर्ण वाढ झालेला वाघ जंगलातून बाहेर रस्त्यावर आला. माझ्यापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर. एकदाच त्यानं वळून पाहिलं आणि शांतपणे त्या डांबरी रस्त्यावरच, पण माझ्या विरुद्ध दिशेनं चालू लागला. मीसुद्धा कोणतीही हालचाल न करता तो दिसेनासा होईपर्यंत पाहत राहिलो आणि मागे फिरलो. जंगलातही अनेकदा वाघ गाडीच्या अगदी जवळ आलाय. एकदा सफारीदरम्यान माया वाघीण इतकी जवळ आली, की गाडीतून हात बाहेर काढला असता तर तिला स्पर्श झाला असता! तिनं क्षणभर नजरेला नजर भिडवली तेव्हा काळजाचा चुकलेला ठोका मला लख्ख आठवतो. ‘कोणताही अविचार करू नकोस’ अशी जरब त्या नजरेत होती. पण कोणत्याही वाघानं कधी हल्ला करण्याचा प्रयत्नसुद्धा नाही केला. आपण मर्यादा ओलांडून त्याला असुरक्षित वाटेल इतक्या जवळ न गेल्यास तो आक्रमकता दाखवत नाही आणि त्याच्या इशाऱ्याच्या गुरकावण्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय हल्लाही करत नाही.

   वाघाला माणसात तर अजिबात रस नसतोच, पण पोट भरलेलं असेल तर तो त्याच्या आवडत्या भक्ष्याकडेसुद्धा ढुंकून पाहत नाही. एकदा सफारी गाइड्सच्या तोंडी परीक्षा आटोपून आम्ही जंगलातून येत होतो. एका पाणवठय़ावर सहज चक्कर टाकली, तर पाण्यात एक सांबर उभं होतं. एक सहकारी म्हणाला, ‘‘हे इतकं निवांत उभं आहे, म्हणजे आसपास वाघ नाही.’’ तिथून निघण्यासाठी ड्रायव्हरनं गाडी वळवली तसा मला गवतात बसलेला वाघ दिसला. नुकताच वयात आलेला बछडा होता तो. नीट पाहण्यासाठी आम्ही पाणवठय़ाच्या दुसऱ्या बाजूला गेलो, तर आणखी एक बछडा काठावर विसावलेला दिसला. थोडय़ा वेळानं लक्षात आलं, की त्या बछडय़ांची आई वर बांधावर बसलीय आणि शांतपणे आमच्याकडे बघतेय. तिसरा बछडाही तिच्यासोबत होता. म्हणजे एकूण चार वाघ अवघ्या काही फुटांवर होते, तरीही ते सांबर आपली तहान भागवून सुरक्षितपणे जाऊ शकलं.

ताडोबानं मला केवळ वाघाच्याच नव्हे तर इतर वन्यजीवांच्याही खूप जवळ नेलं. गेल्या वर्षी करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मी ३७ दिवस ताडोबात होतो. त्या वेळी माझा मुक्काम मोहर्ली गावातल्या ‘तेलीया कुटी’ या सरकारी घरात होता. या घरात तेव्हाचे ताडोबाचे प्रमुख नॅचरलिस्ट अनिरुद्ध चावजी, माझे सहकारी सुधेंद्र सोनवणे आणि मी, अशा तीन मनुष्य प्राण्यांव्यतिरिक्त दोन-तीन बेडूक, डझनभर पाली, उंदरांचं एक कुटुंब आणि काहीशे मुंग्या असे सारेजण गुण्यागोविंदानं राहत होतो. परसात एक घोरपड होती. अंगणातल्या झाडांवर विविध पक्षी येऊन जायचे, तर गवत खायला एक ससा रोज रात्री यायचा. चावजी आणि मी मॉर्निग वॉकला निघालो की रॉकी आणि आणखी दोन कुत्रे आमच्या पुढे चालायचे. पण जुनोना सफारी गेटच्या थोडं पुढे गेल्यावर एका विशिष्ट टप्प्यावर मात्र ते थांबायचे आणि आम्हाला पुढे चालू द्यायचे. कारण तिथे बिबटय़ाच्या मूत्राचा वास असायचा. आमच्या घराच्या परसापासून बफर जंगल सुरू व्हायचं. स्वयंपाकघराच्या दरवाजात उभं राहिलं की मोहर्ली तलावातले पाणपक्षी, काठावर चरणारी हरणं, रानडुकरं दिसायची. परसात एक लोखंडी मचाणसुद्धा होती. कामातून वेळ मिळाला की आम्ही या मचाणीवर बसून पक्षीनिरिक्षण करायचो. रात्री हरणांचे अलार्म कॉल्स ऐकू आले, की मी टॉर्च घेऊन मचाणीकडे धावायचो. एकदा संध्याकाळी आम्ही स्वयंपाकघराच्या पायरीवर बसलो असताना सातभाई पक्ष्यांचा विचित्र कलकलाट ऐकू आला. पाहिलं, तर सहजी न दिसणारं रानमांजर कुंपणाजवळच्या झाडाखाली आलं होतं. त्यालाच घाबरून सातभाईंनी कल्ला चालवला होता.

 देवराई आणि ताडोबातला मुक्काम माझं जीवन असं समृद्ध करतो. वन्यजीवांच्या सहवासातलं तिथलं जगणं मला आपण निसर्गाचा एक भाग असल्याची अनुभूती देतं. शहरी जगण्याला आवश्यक इतकी ऊर्जा आणि आठवणींची शिदोरी सोबत घेऊन मी मुंबईत परत येतो. पण तिथल्या सहचरांची आठवण आली की मी पुन्हा बॅग भरून ठेवतो, त्यांच्याकडे परतण्याच्या संधीची वाट पाहत!

शिकार

मी आणि सुधेंद्र दोघंच ताडोबाच्या जंगलात राहायला गेलो होतो. एके दिवशी सकाळी सातच्या सुमारास मी माझा वॉक संपवून घरी आलो आणि स्वयंपाकघराचा दरवाजा उघडला. सुधेंद्र त्याच्या खोलीत खिडकीजवळ ब्रश करत उभा होता. एकाच वेळी दोघांच्याही नजरेनं टिपलं, की आमच्या घराच्या कुंपणाजवळून एकामागोमाग एक तीन रानकुत्रे दुडक्या चालीनं जात होते. मी माझी दुर्बीण आणि सुधेंद्र त्याचा कॅमेरा आणायला पळालो. कुंपणाच्या भिंतीवर चढून आम्ही पाहू लागलो. रानकुत्र्यांनी जंगलाकडे न जाता तलावाकडे मोर्चा वळवला तसं मी म्हटलं, ‘‘ते शिकारीच्या मूडमध्ये आहेत!’’ त्यांनी तलावाकाठच्या हरणांच्या दिशेनं चाल केली, तशी हरणं सैरभैर होऊन आमच्या दिशेनं पळत सुटली. ते आता हरणांच्या मागे येतील, असं गृहीत धरून आम्ही घरासमोरच्या काँक्रिट रस्त्यावर येऊन बसलो. तेवढय़ात कुत्र्यांचा विशिष्ट आवाज ऐकू आला. मी सुधेंद्रला म्हणालो, ‘‘त्यांनी शिकार केलीय! पळ लवकर!’’ आम्ही धावतच बाजूच्या बांधकाम सुरू असलेल्या रिसॉर्टच्या मागच्या बाजूला पोहोचलो, तर रानकुत्र्यांनी कळपापासून वेगळय़ा झालेल्या हरणाच्या पिल्लाला पकडलं होतं आणि जिवंतपणीच त्याचे लचके तोडायला सुरुवात केली होती. थोडय़ा वेळानं त्यातला ‘अल्फा मेल’ रानकुत्रा तलावाच्या पाण्यातून पलीकडच्या काठावर गेला आणि एका झाडाखाली दडवलेल्या आपल्या पिलाला घेऊन परत आला. काही मिनिटांतच सर्वानी भक्ष्याचा फडशा पाडला. आम्ही स्तंभित होऊन हे नाटय़ पाहत होतो. हा संपूर्ण काळ सुधेंद्रच्या तोंडात ब्रश तसाच होता आणि आम्ही घराचे दोन्ही दरवाजे सताड उघडे ठेवून आलो होतो!

sonawane.anant@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Soyre sahachar article amazing jungle safari akp

ताज्या बातम्या