नक्कल करत, चित्रकलेच्या तासाला कंटाळत मोठी होणारी मुलंच मोठी होऊन आपली शहरं विद्रूप करतात. कारण आयुष्यातील कलेचं स्थान समजण्याएवढय़ा संवेदनशील शिक्षणापासून ती वंचितच राहतात. कलाशिक्षणाचा गाभा केवळ वरून तात्पुरता सौंदर्याचा मुलामा चढवून नाही साध्य होणार. मुलामा गळूनच पडणार आहे. त्यामुळे कलेची खोली संवेदनक्षम शिक्षकांनी समजून घेऊन मुलांसाठी नवनवीन प्रयोग करून शोधून काढली पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलेतून मूल स्वत:ला शोधतंही आणि हरवतंही. वयाच्या विविध टप्प्यांवर करून बघावा असा एक सुंदर चित्रउपक्रम आहे. याला मी ‘ओळख मुखवटा’ असं नाव दिलंय. स्वत:ची ओळख सांगणारे दोन किंवा तीन शब्द शोधायचे, लिहायचे. स्वत:चा चेहरा फक्त रेषांनी कागदावर काढून घ्यायचा. त्या शब्दांतून व्यक्त होणारी स्वत:ची ओळख चित्ररूपाने त्या मुखवटय़ावर उतरवायची. स्वत:ची ओळख शोधणं आणि त्यातून स्वत:च्या अस्तित्वाला अर्थ देणं हे मानवी स्वभावाचं वैशिष्टय़. ही ओळख थेट चित्रात उतरवण्याने मुलांनाच काय पण मोठय़ांनाही काही गोष्टींची स्पष्टता येते. आरशात दिसणारे आपण आणि चित्रात दिसणारे आपण, यात फरक असतो. रूपाचं कौतुक करण्यापेक्षा गुणांचं कौतुक मुलं सहज करू लागतात. विशिष्ट वयात विशिष्ट आवडीनिवडी कशा बदलत जातात हेही चित्ररूपात जतन होतं. एका दहा वर्षांच्या मुलीला अभ्यासाचे विषय खास आवडत नाहीत, पण ती पाण्यात उतरली की मासळीसारखी सुंदर पोहते. तिचं हे पाण्याचं प्रेम ओळख मुखवटय़ातही उतरलं. संपूर्ण चेहरा निळ्या रंगाच्या छटांनी तिने रंगवला आणि त्यात पोहणारी ती. एका बारा वर्षांच्या मुलाला पुस्तकंच वाचायला आवडतात, तर त्याने पुस्तकाचेच आकार थोडे बदलून डोळे, नाक, तोंड दाखवलं. मी पहिल्यांदा हा मुखवटा केला सोळा वर्षांपूर्वी. तेव्हाच्या वयानुरूप तुकडय़ांत वाटली गेलेली मी दाखवण्यासाठी चक्क कागदाचे तुकडे एकमेकांना चिकटवून मुखवटा तयार केला होता. परदेशात राहात असणारी भारतीय मुलगी म्हणून भारत देशाचा आकार, तिरंगा असे काही मातृभूमीचा वियोग दाखवणारे घटक होते. आता नुकताच केलेला ओळख मुखवटा आहे, त्यात डोळ्यांच्या जागी माझी दोन मुलं आहेत आणि चित्रकार असल्याने चेहऱ्यावर अनेक रंग आहेत. दर काही वर्षांनी हा ओळख मुखवटा केला तर आपली बदललेली ओळख आपल्यालाच अचंबित करेल.

मराठीतील सर्व सृजनरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beautiful picture activities for kids children paintings city kids painting
First published on: 25-02-2017 at 02:20 IST