सिद्धी महाजन snmhjn33@gmail.com

‘संपूर्ण भवताल गिळंकृत करण्यासाठी निघालेली वैश्विक तापमानवाढ ही जागतिक समस्या आहे. हवामानबदलामुळे जे पोळले जात आहेत, त्यांचा लढा उलटा झिरपत आज उबदार घरटय़ात असलेल्यांच्या जगण्याला स्पर्श करेल, पण तेव्हा खूप उशीर झाला असेल. म्हणून आत्ताच जागे व्हा,’ असं कळकळीनं सांगणाऱ्या, अ‍ॅमेझॉन जंगलातील आदिवासींचं, तिथल्या नष्ट होत चाललेल्या निसर्गाचं दु:ख समजून घेणाऱ्या आणि येणाऱ्या प्रलयसदृश आपत्तीशी सामना करण्यासाठी लोकांचे मनोबल तयार करण्यास धडपडणाऱ्या बेल्जियमच्या अनुना डी वेव्हरची ही कहाणी.                  

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

जागतिक हवामानात मोठय़ा वेगानं होणारे बदल आणि त्यामुळे बदलत जाणारे ऋतू. वरचेवर निर्माण होणारी वादळं, पूर, दुष्काळ आणि त्यामुळे होणारं कोटय़वधींचं नुकसान. समुद्राचं आणि भूपृष्ठाचं वाढत जाणारं तापमान आणि त्यामुळे वेगानं होणारा जीवजंतूंचा प्रसार. या सर्व गोष्टी वरवर दिसायला वेगवेगळ्या वाटल्या तरीही यामध्ये एक समान असा, सहजासहजी दिसून न येणारा दुवा आहे, तो म्हणजे जागतिक तापमानवाढ!

जागतिक तापमानवाढ हेच वरील समस्यांचं मूळ कारण आहे. ही वैश्विक समस्या आता भविष्याची काळजी करण्यापुरती उरली नसून, त्यात वर्तमानाचे अनेक कंगोरे समाविष्ट झाले आहेत. ‘दबकी दबकी पावलं टाकत पुरा भवताल गिळंकृत करण्यासाठी निघालेली वैश्विक तापमानवाढ ही जागतिक समस्या आहे. तुम्ही राहात असलेल्या उबदार घरटय़ाबाहेर, तुमच्या सुखकोषाबाहेर अनेक माणसं आणि सजीव वर्तमानाशी झगडा देत आहेत. आपलं रोजचं जगणं सावरण्यासाठी धडपडत आहेत. त्यांचा लढा सामाजिक आणि आर्थिक स्तरांतून उलट झिरपत झिरपत तुमच्या जगण्याला स्पर्श करणार आहे. त्यानंतर तुम्ही त्यावर बघ्याची भूमिका घेऊन तक्रार करू शकणार नाही, तर प्रत्यक्ष अनुभवामुळे फार आतून कासावीस व्हाल आणि या कासावीस होण्याला तेव्हा फार उशीर झालेला असेल.. तरीही आशा आहे, की आपण हे बदलू शकू. पृथ्वीवरील सर्व सजीवांना नवं जीवन देऊ शकू. हे करण्यासाठी आपल्याकडे फारच कमी वेळ आहे आणि म्हणूनच आपल्यातल्या प्रत्येकानं बंड उभारलं पाहिजे. सुरक्षित भविष्यासाठी अक्षरश: निकराचा लढा  ही काळाची गरज बनली आहे.’ हे उद्गार आहेत एका एकोणीस वर्षांच्या बेल्जियममधल्या मुलीचे, अनुना डी वेव्हर हिचे.

२०२० च्या ऑक्टोबर महिन्यात जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या ३६ प्रतिनिधींनी रेजिना मारिस या जहाजातून प्रशांत महासागरातून एक अनोखा प्रवास सुरू केला. हा प्रवास होता अ‍ॅमेझॉनच्या जंगलाची नव्यानं ओळख करून घेण्यासाठी; संयुक्त राष्ट्रसंघाच्या चिली देशात भरणाऱ्या जागतिक हवामान परिषदेत पुन्हा नव्यानं जागृत झालेल्या संवेदनशीलतेनं सहभागी होण्यासाठी. हा प्रवास एकूण सहा आठवडे चालला. सहा आठवडे त्यांना जमिनीचं दर्शन झाले नाही.  या आधुनिक दर्यावर्दीना एका वेगळ्याच मानसिक अवस्थेला सामोरं जावं लागत होतं. त्या सफरीवर त्यांनी वेगवेगळ्या समस्यांचा अभ्यास केला, चर्चा केल्या. संयुक्त राष्ट्रसंघानं मांडलेल्या शाश्वत विकासाच्या ध्येयांपैकी एक लक्ष्य आहे ते पाण्याखाली वसलेल्या जीवांचं संवर्धन करणं. त्यावर या प्रवासात काही महत्त्वाच्या चर्चा झडल्या.

अ‍ॅमेझॉन जंगल हे जगातील सुमारे पन्नास टक्के उरल्यासुरल्या हरितवनांचं प्रतिनिधित्व करतं. जैवविविधतेनं समृद्ध असं हे अ‍ॅमेझॉन वनक्षेत्र इथल्या आदिवासी समाजानं जपलं आहे. अनुना आणि तिच्या साथीदारांनी या रहिवाशांशी संवाद साधला. तेव्हा तिथे त्यांना वातावरणबदल या व्यापक समस्येची तीव्रता सर्वात जास्त जाणवली. त्यामुळे लोकांच्या आयुष्यावर खोलवर होणारे दुष्परिणाम प्रत्यक्ष अनुभवता आले. जंगल सुकत चालले आहे अन् नद्या प्रदूषित होत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नदीच्या जवळ खोदल्या जाणाऱ्या सोन्याच्या खाणींमुळे या प्रदेशाला जबरदस्त किंमत चुकवावी लागत होती. पनामा कालवा खोदतानासुद्धा जेवढय़ा मातीचं उत्खनन करण्यात आलं नव्हतं, तेवढी माती खोदून तयार केल्या गेलेल्या अवाढव्य अशा बेलो मॉन्ट जलविद्युत प्रकल्पामुळे अ‍ॅमेझॉन नदीची लागलेली वाताहत स्वत:च्या डोळ्यांनी त्यांनी पाहिली. चिली देशात घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे ती परिषद प्रत्यक्षात तिथे घडू शकली नाही, तिचं स्थान बदलण्यात आलं. मात्र हे सारे अनुभव जोडून, अनेक वैज्ञानिक आणि विचारवंतांशी सल्लामसलत करून या प्रतिनिधींना नवी नजर मिळाली होती, जी अनुनासारख्या वयानं लहान, पण हजार हिकमती लढवू पाहाणाऱ्या मुलीला बरंच काही शिकवून गेली होती.

हा अनुभव अनुनाला समृद्ध करणारा होता, तसंच व्यथितही करणारा होता. बेल्जियममधील अँटवर्प शहरातील त्या एका सामान्य शाळकरी मुलीला अगदी दोन-तीन वर्षांपूर्वी एक रस्ता सापडला होता. देशात सक्रिय असणाऱ्या मुख्य प्रवाहातील पर्यावरण संवर्धन चळवळीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिला जी ऊर्जा मिळाली होती, त्या ऊर्जेच्या स्रोताचे सार या अनुभवात दडलेले होते. बेल्जियम देशातील पर्यावरणविषयक कायदे बदलवण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याची गरज तिला जनतेच्या मनात ठसवावीशी वाटली आणि जगाच्या विचारसरणीत बदल घडवून आणण्याचा हा प्रयत्न तिला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला. त्या उंचीवर आदर होता, आव्हानंही होती. राजकीय हेव्यादाव्यांमध्ये पर्यावरणाची अक्षम्य हेळसांड होत होती. तिला कळून चुकलं की, राजकीय व्यवस्था तिला जे हवं ते साध्य करण्यास कोणतंही साहाय्य करणार नाही;  पण त्यामुळे ती ना गप्प बसली, ना तिनं तक्रार केली. तिनं आपले प्रयत्न युरोप आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक व्यापक केले. त्यामुळे तिला प्रसंगी टीकेलाही सामोरं जावं लागलं; पण सामान्य माणसांचे प्रश्न समजून घेऊन, त्यांचं निरसन शोधण्याची जी धडपड तिला इथे घेऊन आली, ती मुळीच थांबणार नव्हती.

डिसेंबर २०१८ मध्ये बेल्जियमनं पोलंडमधील कॅटोविस येथे झालेल्या ‘सीओपी २४’ शिखर परिषदेत हवामानबदलासंबंधी नवीन करारावर स्वाक्षरी करण्याचं टाळलं. त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी लोकांचा प्रतिसाद मिळवण्याची रणनीती आखत असतानाच अनुना डी वेव्हर हिला शाळकरी मुलांनी केलेल्या संपांची माहिती समजली. याच आधारावर तिनं सामान्य जनतेला संबोधित करून ब्रुसेल्सच्या रस्त्यांवर जे जनजागरण उभं केलं, ते पुढे जगभर पसरत जाणार होतं. त्यात सर्व स्तरांतील सामान्य माणसांना सामावून घेतलं गेलं होतं, त्यांचा आवाज समजून घेतला गेला होता. यामुळे तिला अफाट प्रसिद्धी मिळाली, तसंच अनेक संकटांचा सामनाही करावा लागला. पर्यावरण संवर्धनाच्या समस्येला राजकीय रंग देऊन तिला डावं-उजवं ठरवण्याचे प्रयत्न झाले. काही आव्हानात्मक क्षणही आले. बेल्जियमच्या वार्षिक ‘पुक्कलपॉप’ संगीत महोत्सवात अनुना डी वेव्हरला बोलण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं. सहकारी हवामान कार्यकर्ते निक बाल्थझार यांच्यासमवेत भाषण देताना तिला एका समूहानं आपल्या आक्रमक टीकेचं लक्ष्य केलं. ती आणि तिच्या सहकाऱ्यांवर हल्लाही करण्यात आला. अठरा वर्षांच्या अनुनाला ‘ती कुठे आहे, आम्हाला तिला ठार मारायचं आहे,’ अशा धमकीवजा घोषणा ऐकू येत होत्या. एका अठरा वर्षांच्या मुलीसाठी हे ऐकून घेणं सोपं नक्कीच नव्हतं. मात्र ही नकारात्मकता तिला थांबवणार नव्हती. ती चळवळीचं काम करणाऱ्या कुणालाच थांबवणार नव्हती. स्वत:ची काळजी घेणं हे तिच्यासाठी नक्कीच प्राधान्यस्तरावर नाही. निवारा, अन्न, शिक्षण, औषधोपचार, स्वच्छताविषयक वस्तू यांसारख्या सर्व मूलभूत गरजेच्या गोष्टी तिच्याकडे आहेत, म्हणूनच तिला त्यांच्यासाठी काम करायचं होतं, ज्यांच्यासाठी या गरजा म्हणजे चैन होत्या. विशेषाधिकार लाभलेल्या काहीं लोकांच्या बेपर्वा वागण्याची शिक्षा भोगणाऱ्या, जगाच्या कानाकोपऱ्यात राहाणाऱ्यांच्या बाजूने ती लढते.

कायरा गँटोइस आणि एडलेड चार्लियर यांच्यासह डी वेव्हर बेल्जियममधील हवामान चळवळीच्या शाळेच्या संपामधील अग्रगण्य व्यक्ती बनली. त्यांनी फेब्रुवारी ते मे २०१९ पर्यंत ‘एचयूएमओ’ मासिकात साप्ताहिक स्तंभलेखन केलं. अनुनाची ओळख ‘नॉन बायनरी’ म्हणजेच रूढ पारंपरिक लिंगओळख न मानणारी, अशी आहे. ती या वेगळ्या ओळखीचं महत्त्व अधोरेखित करताना लिंगाधारित ओळखीवर अल्पसंख्य मानल्या जाणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटते आहे. २०१९ मध्ये अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलनं युवा हवामान प्रतिनिधी अनुना डी वेव्हर आणि अ‍ॅडलेड चार्लियर यांना त्या वर्षीचा अेुं२२ं१ि ऋ१ ूल्ल२्रूील्लूी हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. जवळजवळ पंधरा हजार लोकांना एका वेळी आपल्या संपात सहभागी करून घेणाऱ्या या दोघी आज बेल्जियन तरुणाईचा चेहरा बनल्या आहेत.

संकट घेऊन येणाऱ्या काळाची चाहूल लागणं तसं सोपे नाही, कारण त्यालाच ही चाहूल खुणावते, ज्याची ती कटू अथवा गोड परिस्थिती स्वीकारण्याची तयारी असते. म्हणूनच की काय, अनुनासारखी जागृत तरुणाई येणाऱ्या संकटांच्या परिणामांविषयी आंधळेपणानं निष्क्रिय राहून सकारात्मकतेचा डांगोरा पिटत नाही. मात्र ही पिढी या अरिष्टाचा परिणाम टाळण्यासाठी आशावादी आहे. मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे. अतिशय दूरच्या भविष्यात नव्हे, तर नजीकच्या वर्तमानात ओढवणाऱ्या प्रश्नांची व्याप्ती समजण्यासाठी ही पुसटशी सीमारेषा ओढत, कामाला प्राधान्य देणं, ही पिढी आत्मविश्वासानं करते. त्यांच्यावर राजकीय इच्छाशक्तीचा पगडा आहे, असा आरोप त्यांच्यावर केला जातो.

अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचा वैचारिक निर्बंधांचा पगडा साफ मोडून काढणाऱ्या व्यक्तींना ‘न्यू फ्लेमिश मॅगझिन’चे संपादक मंडळ ‘आर्क प्राइज ऑफ द फ्री वर्ड’ हा प्रतीकात्मक पुरस्कार देऊन सन्मानित करतं. मे २०१९ मध्ये तो अनुना डी वेव्हर हिला मिळाला. हा पुरस्कार आर्थिक रकमेत मोजला जात नाही, तर पुरस्कार विजेत्यांची नावं संग्रहालयात ठेवलेल्या ‘नोहाज् आर्क’ प्रतिमेवर कोरली जातात

आणि अशा प्रतिमा के वळ प्रतीकं  उरत नाहीत. ती पाहिल्यावर जहाजातून प्रवास करणारी, अ‍ॅमेझॉन जंगलातील आदिवासींचं, तिथल्या नष्ट होत चाललेल्या निसर्गाचं दु:ख समजून घेणारी, पर्यावरण संवर्धनासाठी आपलं आयुष्य वेचणारी, लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आणि येणाऱ्या प्रलयसदृश आपत्तीशी सामना करण्यासाठी मनोबल तयार करण्यास धडपडणारी अनुना आणि तिच्यासारख्या अनेक मुली आठवतात.. नोहाच्या गोष्टीप्रमाणे या जगाचं रक्षण व्हावं अशी इच्छा मनी बाळगणाऱ्या  नोहाच्या वारसदार!