लेखिका, विचारवंत, सामाजिक ऋण मानून काम करणारी बंडखोर स्त्री म्हणजे मालतीबाई बेडेकर. १ ऑक्टोबर १९०५ हा त्यांचा जन्मदिवस, त्याला ११० र्वष होत आहेत, मालतीबाईंचं लेखन आजही कालबा झालेलं नाही, हेच त्यांचं श्रेष्ठत्व.

मालतीबाई बेडेकर, जन्म १ ऑक्टोबर १९०५, मृत्यू ७ मे २००१. लेखिका, विचारवंत, सामाजिक ऋण मानून काम करणारी बंडखोर स्त्री म्हणजे मालतीबाई. मराठी साहित्याच्या अभ्यासकांना त्यांना डावलून पुढे जाता येत नाही. सामाजिक अभ्यासकांना त्यांचं लेखन मार्गदर्शक ठरतं तर वैचारिक पातळीवर त्यांचा अभ्यास हा विस्मयकारक वाटावा असा आहे. कौटिल्याचं अर्थशास्त्र, वात्सायन, भारतीय संस्कृतीमध्ये असलेले स्त्रियांचे उल्लेख, वेदांपासून स्मृतींपर्यंत केलेलं वाचन, अलंकार मंजूषा हा प्रबंध असं अफाट लेखन व अभ्यास!

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
caribbean writer maryse conde profile author maryse conde information zws
व्यक्तिवेध : मारिस कॉण्डे

मालतीबाईंचं मूळ नाव बाळुताई खरे. शिक्षण त्या काळाच्या मानानं खूप होतं. याचा एक महत्त्वाचा दाखला द्यायचा तर मालतीबाईंचे वडील खरे मास्तर यांनी ठरवलं होतं तसं केलं. जेव्हा मालतीबाई आजोळी जन्माला आल्या, तेव्हा त्यांच्या आजोबांनी खरे मास्तरांना कळवलं की, ‘‘माझ्या मुलीला दुसरी मुलगी झाली याचं वाईट वाटतं.’’ (पहिली मुलगी प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ कृष्णाबाई मोटे) खरे मास्तरांनी लगेच कळवलं, ‘‘मला मुलगी झाल्याबद्दल आनंद आहे. मी मुलींना उच्च शिक्षण देणार आहे.’’ त्या काळातली ही क्रांतिकारी अशी घटना आहे. मालतीबाई बी.ए.,बी.टी.,एम.ए. झाल्या.

त्या पुण्यात कन्याशाळेत संस्कृत, इंग्रजी, मराठी शिकवीत. पुण्याच्या गुलटेकडी भागात सायकलनं जाऊन गरीब वस्तीत स्वच्छतेचे धडे देत. वारजे गावात जाऊन प्रौढशिक्षणाचे वर्ग घेत. यामागे वडील खरे मास्तर आणि शिक्षक व प्रसिद्ध लेखक श्री. म. माटे यांची प्रेरणा होती. नंतर मालतीबाई अण्णा कर्वे यांच्या हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेत नोकरी करीत होत्या. स्त्रियांची स्थितिगती, त्यांचे प्रश्न त्यांना तिथे जवळून पाहता आले. इथेच त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली. महात्मा गांधी अण्णा कर्वेची संस्था पाहायला आले होते. संस्थेच्या प्रमुख अधिकारी म्हणून मालतीबाई गांधीजींना माहिती देत होत्या. गांधीजींनी अचानक विचारलं, ‘‘अस्पृश्यता पाळता की नाही?’’

मालतीबाई उत्तरल्या, ‘‘नाही.’’

पुढचा प्रश्न, ‘‘पंगतीला बसता..?’’

‘‘हो.’’

हा प्रसंग सांगून मुलाखत देताना मालतीबाई म्हणाल्या होत्या, ‘‘मी घरात अनेक मुलंमुली सांभाळली; त्यांची शिक्षणं, लग्नं करून दिली. पण कुणाला कधी जात विचारली नाही.’’ याचं कारण अर्थात त्यांच्या वडिलांची तशी शिकवण होती.

त्या काळातला आणखी एक प्रसंग त्यांनी सांगितला. एक आश्चर्य घडलं. त्या रेल्वेतून प्रवास करीत असताना पुस्तक वाचत होत्या. (ते १९२०/२१ वर्ष असेल.) आणि डब्यातले लोक कुजबुजायला लागले. ‘एक तरुण मुलगी आम्हा पुरुषांसमोर पुस्तक वाचते म्हणजे काय?’ मालतीबीईंनी तिकडे लक्ष दिलं नाही. पण म्हणाल्या, ‘मनावर एक खोल चरा उमटला.’ हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेत स्त्रियांची समाजातली स्थिती पाहून त्या चऱ्यातून जखमा निर्माण झाल्या. मनात वादळं घोंघावू लागली. ते १९३४ साल होतं. मालतीबाईंची प्रतिभा जागृत झाली. स्त्रियांची दु:स्थिती पाहून त्यांच्या प्रश्नावर त्यांनी ‘कळ्यांचे नि:श्वास’ हा कथासंग्रह आणि ‘हिंदोळ्यावर’ ही कादंबरी लिहिली. समाजाच्या मानसिकतेच्या विरुद्ध, परंपरेविरुद्ध हे लेखन होतं. स्त्रियांचं स्वातंत्र्य, त्यांची हतबलता. समाजाने त्यांच्यावर लादलेली बंधनं, स्त्रीकडे पाहण्याचा हीन दृष्टिकोन याचे वास्तव चित्रण या कथांमध्ये होतं. पण मालतीबाईंनी टोपण नावाने हे लेखन केलं. नाव घेतलं ‘विभावरी शिरुरकर’. त्याआधीही श्रद्धा, बी के, कटुसत्यवादिनी, एक भगिनी, बाळुताई खरे या नावाने लेखन केलं होतं. पण विभावरी शिरुरकर या नावाने महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर प्रचंड खळबळ माजली. त्यांची ही पुस्तकं ह. वि. मोटे या त्यांच्या मेव्हण्याने म्हणजे कृष्णाबाईंच्या पतीने प्रकाशित केली. १९३३ ला प्रकाशित झालेल्या ‘कळ्यांचे नि:श्वास’ या पुस्तकाला श्रीधर व्यंकटेश केतकर या प्रकांड पंडिताची प्रस्तावना होती. पण त्यांनाही विभावरी कोण हे ठाऊक नव्हतं.

स्त्रियांच्या प्रश्नाला वाचा फोडणारं लेखन त्यात होतं. ‘बाबांचा संसार माझा कसा होणार?’ असं प्रौढ कुमारिकेने जाहीरपणे प्रथमच विचारलं. ‘वाकडं पाऊल’ पडलेली स्त्री वाईटच का? तिला त्या परिस्थितीत लोटणारा पुरुष संभावित कसा? मुलगी परक्याचं धन तिला कशाला शिकवायचं? तिने उंबऱ्याच्या आत राहावं. विधवा स्त्री म्हणजे अशुभ. तिला गुराढोरासारखं वागवावं. स्त्रीला बुद्धी, भावना, विचार असतात हे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेलं ढळढळीत सत्य मालतीबाईंनी कथा, कादंबरीद्वारे मांडलं. आणि आजच्या भाषेत बोलायचं तर वैचारिक बॉम्बस्फोटाची मालिकाच सुरू झाली जणू. या झंझावातात समाजमन तळापासून ढवळून निघालं.

विभावरींची ही पुस्तकं, हे लेखन अश्लील आहे म्हणून ‘त्यावर बहिष्कार घाला, त्याची होळी करा’ असा वाद सुरू झाला. कोण ही विभावरी? तिची अंत्ययात्राही पुण्यात काढली गेली. मालतीबाईंनी कर्मठ समाजाला गदागदा हलवून जागं केलं. पण पुरुषप्रधान समाज त्याविरुद्ध गरळ ओकू लागला. त्यानंतर वृत्तपत्रं, साप्ताहिकं, मासिकं यातून विभावरीविरुद्ध आघाडी उघडली गेली. इतके टीका लेख प्रसिद्ध झाले की, त्याची पृष्ठसंख्या दोन हजार छापील पानं एवढी भरली. ‘विश्ववाणी’मध्ये ना. र. आळेकर यांनी दहा लेखांक लिहिले. ‘विविध वृत्ता’चे संपादक रामचंद्र काशिनाथ तटणीस यांनी विभावरीविरुद्ध मोठी आघाडी उघडली. विभावरीवर खटला भरा. तिची बी.ए. पदवी खोटी आहे वगैरे यथेच्छ निंदा केली गेली. विभावरी ही कोण असेल म्हणून खूप तर्क लढवले गेले. पण तरीही लोकांना ती कोण? हे कळू शकलं नाही. ‘विभावरीचे टीकाकार’ हे पुस्तक १९३९ साली द्वा. भ. कर्णिक व ब्रह्मानंद नाडकर्णी यांनी संपादित केलं. दोन हजार पृष्ठांतून दोनशे पृष्ठांचा मजकूर त्यांनी दिला. पण त्या वेळच्या प्रभात, त्रिकाळ इत्यादी नऊ  दैनिकांतला मजकूर उपलब्ध झाला नाही. तात्यासाहेब केळकर, व्यंकटेश केतकर, आचार्य अत्रे हे विभावरींच्या बाजूने होते. आचार्य अत्रे यांनी दोन व्याख्यानं देऊन विभावरींच्या लेखनाचं महत्त्व पटवून दिलं. ही व्याख्यानं पुणे, मुंबई इथे झाली.

पुढे अनेक वर्षांनी मालतीबाईंना विचारण्यात आलं की, ‘टोपण नावाने का लिहिलंत?’ त्या म्हणाल्या, ‘मी खरं नाव लावलं असतं तर मला लोकांनी गाडून टाकलं असतं. माझी नोकरीही गेली असती.’

नंतर दहाबारा वर्षांनी (१९३३ नंतर) ‘साखरपुडा’ या चित्रपटाची कथा मालतीबाईंनी लिहिली. तेव्हा शेवटी सही केली – मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर. तेव्हा हे रहस्य अचानक लोकांसमोर आलं. पण तोपर्यंत मालतीबाईंचं सामजिक कार्य, हे प्रथम नोकरीतून नंतर स्वत: अभ्यास करून त्यांनी मांडलेल्या निष्कर्षांतून समोर आले होते. आणि वाद थंड पडले होते. १९३७ साली सोलापूर इथे ‘क्रिमिनल ट्राइब्स सेटलमेंट’ यांच्या वेलफेअर आणि शिक्षण विभागासाठी मुख्य अधीक्षकांचं पद भरायचं होतं. कम्युनिस्ट नेत्या गोदावरी परुळेकर यांनी सरकारला मालतीबीईंचं नाव सुचवलं. मालतीबीईंचं माहेरचं नाव बाळुताई खरे. त्याच नावाने त्या सोलापूरला हजर झाल्या. भटक्या जमातींना तिथे सरकारने घरं दिली होती. त्यांना रोज हजेरी द्यावी लागे. त्या भटक्यांचं, स्त्रियांचं, मुलांचं पुनर्वसन हा मोठा प्रकल्प होता. या लोकांना गुन्हेगार म्हणून ओळखलं जाई. खऱ्या अर्थाने बाळुताईंना पददलित लोकांमध्ये काम करायला मिळालं. त्या वेळी त्या महाराष्ट्रातील सर्व रिमांड होमच्या प्रमुख होत्या. तिथल्या अनुभवावर  ‘बळी’ नावाची कादंबरी लिहिली. तीही गाजली.

त्याआधी १९३४ ला मुंबईत बी.टी. करीत असताना प्रसिद्ध लेखक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांच्याबरोबर त्यांची ओळख झाली. त्याचं रूपांतर १९३८ मध्ये विवाहात झालं. तेव्हा बाळुताई खरेच्या त्या मालतीबाई बेडेकर झाल्या.

१९४० साली मालतीबाईंना मुलगा झाला. मग त्यांनी नोकरी सोडली. पण त्या लेखन आणि सामाजिक काम करीत राहिल्या. महिला सेवाग्राम या अनाथ स्त्रियांच्या आश्रमात त्या विनावेतन काम करायच्या. इथलं त्यांचं काम हे त्यांच्या मनातल्या स्त्रीविषयक जाणिवांना आव्हान होतं. मालतीबाईंनी वेद, ऋग्वेद, पुराण, श्रुती, मिताक्षरा हा हिंदू कायद्याचा ग्रंथ यांचा अभ्यास केला असल्याने पूर्वी स्त्रियांना कसं वागवलं जाई आणि आज कसं वागवलं जातं याची तुलना त्या करीत आणि त्यांना खंत वाटे. कारण स्त्री-पुरुष दोन्ही स्खलनशील आहेत. पण फक्त स्त्रीला शिक्षा व्हावी आणि पुरुषांना नको असं अन्याय्य वर्तन पूर्वीच्या शास्त्रकारांचं नव्हतं. वेदांपासून स्मृतींपर्यंत कोणीही उन्मार्गी स्त्रीला निराधार करावी असं म्हटलेलं नाही. पण पुढे एक काळ असा आला की, स्त्रीला नकळत झालेल्या पापापासून किंवा बळजबरीने ती भ्रष्ट झाली तर तिला शुद्धीचा मार्गच ठेवला नाही, इतकंच काय ‘स्त्री’ला एक न्याय व पुरुषाला एक न्याय इथपर्यंत समाजाची मजल गेली.

अनेक ग्रंथांच्या आधारे स्त्री बंधनात कशी पडत गेली हे लिहिताना मालतीबाई म्हणतात, ‘संस्थेत आलेल्या स्त्रियांचे अनुभव विदारक होते. स्त्रियांच्या पतनाला जबाबदार माहेर-सासरचे नातेवाईक, घरातल्यांची स्नेहीमंडळी आणि परके लोक आहेत, हे ढळढळीत सत्य माझ्यासमोर आलं.’ हे मालतीबाईंनी मांडलेलं निरीक्षण आजही शंभर टक्के खरं आहे. मालतीबाई इथेच थांबल्या नाहीत तर १३० जातींतल्या ५००० स्त्रिया त्यांनी अभ्यासल्या. आश्रमातल्या स्त्रियांचं पुनर्वसन करतानाही त्यांना प्रत्येक केसमधे आव्हान वाटे. नातलगांच्या, पालकांच्या ताब्यात मुली दिल्यावर दारिद्रय़ हा भयंकर शाप असल्याने त्या मुली परत तरी येत, नाहीतर वेश्या व्यवसायाकडे तरी वळत. मन विदीर्ण करणाऱ्या घटना घडत. मालतीबाई अस्वस्थ होत असत. निराधार स्त्रियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यांना खंतावत असे. त्यावर त्यांनी ‘घराला मुकलेल्या स्त्रिया’ हे पुस्तक लिहिलं. त्यात आपलं अस्वस्थ मन मोकळं केलं. एकदा मालतीबाईंनी महागाईविरोधी मोर्चात भाग घेतला म्हणून त्यांना एक महिना येरवडय़ाला तुरुंगात काढावा लागला. स्त्रियांना कायद्याचा आधार किती? हे तपासण्यासाठी त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. त्या वेळी त्या ८/९ ठिकाणी स्तंभलेखन करीत होत्या. सहा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, सहा प्रबंध, प्रौढसाक्षरांसाठी चार पुस्तकं, पाच नाटकं त्यातलं ‘हिरा जो भंगला नाही’ याचा प्रयोग १६ जून १९६९ साली रवींद्र नाटय़ मंदिरात झाला. दिग्दर्शन होतं विश्राम बेडेकरांचं, प्रमुख भूमिका सतीश दुभाषींची होती, याचे २५ प्रयोग झाले.

चित्रपट कथा, पाच इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे इतकी ग्रंथसंपदा आज त्यांच्या मागे आहे, हे वाचकांचं भाग्यच. लेखिका संमेलन आणि अखिल भारतीय स्त्री परिषदा पाच ठिकाणी भरल्या त्याच्या त्या अध्यक्ष होत्या. धर्म परिषद, राम मनोहर लोहिया यांची इंग्रजी हटाव परिषद याच्याही त्या अध्यक्ष होत्या. महाराष्ट्रात त्यांनी दिलेल्या स्त्रीविषयक व्याख्यानांची संख्या दोन हजारांवर झाली आहे. त्यांच्या पुस्तकांना अनेक पारितोषिकं मिळाली.

आणि दोन विलक्षण घटना घडल्या.

१९५१ साली मालतीबाई पुण्यात असताना प्रथम काँग्रेसने त्यांना निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून विचारलं. पण काँग्रसची धोरणं त्यांना पसंत नव्हती. म्हणून त्या नाही म्हणाल्या. मग प्रजासमाजवादी पक्षातर्फे नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी यांनी त्यांना सभासदत्व दिलं आणि त्या विधानसभेसाठी उभ्या राहिल्या. मतदान झालं. आणि गंभीर व गमतीदार गोष्ट म्हणजे मालतीबाईंना एकही मत मिळालं नाही. मालतीबाई सांगत होत्या. ‘इतकंच काय स्वत:चं मतही त्या पेटीत नव्हतं.’ तेव्हा पुन्हा यात पडायचं नाही हे त्यांनी ठरवून टाकलं.

१९८१ साली अकोला इथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मालतीबाई उभ्या होत्या. पण अवघ्या सात मतांनी त्यांचा पराभव झाला गोनीदा निवडून आले. त्याच वर्षी अकोला संमेलनात मंत्र्यांनी हस्तक्षेप केला. व महाराष्ट्र सरकारने तीन पुस्तकांना बक्षिसं नाकारली म्हणून शासनाच्या निषेधार्थ त्याच वर्षी मुंबईत समांतर साहित्य संमेलन भरलं. डिसेंबर १९८१ साली. हे संमेलन लेखक व पत्रकारांनी भरवलं होतं. या समांतर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मालतीबीईंकडे चालून आलं. त्यांचं अध्यक्षीय भाषण फार गाजलं. त्यातील शेवटची काही वाक्यं अशी, ‘आपण कुठेही कितीही लपून बसलो, तरी लोभाच्या, लाचारीच्या, लांगूलचालनाच्या या सध्याच्या साथीपासून आपला बचाव होणे कठीण आहे. ही लागण आणखी पसरली की, कमी-जास्त लाभासाठी सत्तेपुढे शेपटय़ा हलविणारे प्राणी बघण्याची लोकांना सवय झाली, तर न जाणो, उद्या एखादा प्रतिभावंत नाटककार पुढे येईल आणि तो घरातील पाळीव प्राण्यावर नाटक लिहील! तेही फार यशस्वी होईल अशी मला भीती वाटते. कारण माणसांचे रूपांतर भराभर पाळीव प्राण्यात होत आहे.’  साहित्य म्हणजे जीवनाचा पडसाद हे खरेच आहे, पण तो माणसांच्या जीवनाचा पडसाद असतो.  साखळीला बांधलेल्या पाळीव प्राण्यांच्या जीवनाचा नव्हे,’ असा इशारा त्यांनी बुद्धिमंतांना दिला.

१९८६ मधे मालतीबाई व विश्राम बेडेकर वरळीला भल्या मोठय़ा घरात राहत असत. ‘लोकसत्ता’साठी त्यांची मुलाखत मी घेतली त्या निमित्ताने त्यांच्या भेटी वाढल्या.

आजच्याप्रमाणे तेव्हाही वृत्तपत्रांतून स्त्रियांवरच्या वाढत्या अत्याचाराच्या बातम्या येत, त्या वाचून ८१ वर्षांच्या मालतीबाई संतप्त होत. मला म्हणत, ‘तुम्ही स्त्रियांनी या विरोधात रान उठवायला हवं.’ वृद्धपणातही त्यांचा बंडखोरपणा कायम होता. त्या वेळच्या सद्यस्थितीवर त्यांनी मुलाखत दिली. त्या लेखाचं शीर्षक त्यांनीच दिलं होतं. ‘स्त्रिया या चुलखंडाच्या नागरिक’ ती मुलाखत तेव्हा खूप गाजली होती. स्त्री कितीही कर्तृत्ववान असली, शिकली तरी तिचं स्वयंपाकघर सुटत नाही.

मालतीबाई आणि विश्राम बेडेकर या दांपत्याचं त्याही काळात लेखन चालू होतं. मालतीबाई ‘खरे मास्तर’ लिहीत होत्या तर विश्राम बेडेकर ‘टिळक आणि आगरकर’ नाटक आणि स्वत:चं आत्मवृत्त लिहीत होते. एकुलता एक मुलगा अमेरिकेत आणि दोघं आपल्या वैचारिक, आणि साहित्यविषयक लेखनात मग्न असत. मालतीबाई, बेडेकरांना ‘काका’ म्हणत तर बेडेकर त्यांना ‘बाळुताई’ म्हणत. मालतीबाईंचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी होमीओपॅथी या शास्त्राचा अभ्यास केला होता. त्या परिचयातल्या लोकांना नेहमी औषधही देत.

बोलताना स्त्रीविषयक मुद्दा असेल तर त्या परखडपणे बोलत, पण एरवी त्यांच्यात वत्सलता काठोकाठ भरलेली असे; एक विलक्षण पण वैचारिक पातळीवरचं ९६ वर्षांचं आयुष्य त्या जगल्या. मृत्यू ७ मे २००१.  विश्राम बेडेकर १९९८ सालीच गेले होते.

यंदा त्यांच्या जन्माला ११० र्वष होत आहेत, तरीही त्यांचं लेखन अजिबात कालबाह्य झालेलं नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यांच्या स्मृतीला प्रणाम.
– मधुवंती सप्रे (madhuvanti.sapre@yahoo.com)