साताऱ्यातील पडीक जमिनीवर दोन हजार झाडांची ‘हिरवाई’ लावत त्याखाली ज्ञानार्जनाचा अखंड मेळा भरवणाऱ्या, असंख्य वनराई बंधारे बांधत जिल्ह्य़ात सुमारे ३० हजार झाडं लावून त्यांना मातेच्या मायेनं जोपासणाऱ्या प्रा. संध्या चौगुले यांच्या असंख्य चांगल्या-वाईट अनुभवांची ही कथा. २१ मार्चच्या जागतिक वन दिनानिमित्ताने..
साताऱ्यात राहणाऱ्या प्रा. संध्या चौगुले, वीकेंड संसार सांभाळत मुलांना वाढवणाऱ्या, महाविद्यालयातल्या प्राध्यापक. सरळ-निर्धोक आयुष्य जगणाऱ्या. रोज महाविद्यालयात जात असताना आजूबाजूला दिसणारी पडीक जमीन त्यांना अस्वस्थ करू लागली. यावर झाडं लावली तर? विचार चमकून गेला. नवरा प्रा. चौगुले आणि मुलांनीही त्यात होकार भरला आणि म्हणता म्हणता तिथं उभं राहिलं सुमारे दोन हजार झाडांचं पाचूचं हिरवंगार बेट- ‘हिरवाई’! महाविद्यालयाच्या मार्गावरचा तो सुस्त, उदास रस्ता आता उत्साहाने सळसळतो आहे. त्याचं हिरवंकंचपण अनेकांच्या आयुष्यात पहाट फुलवतं आहे. कारण याच झाडांखाली आता मुलांसाठी विनामूल्य संस्कार वर्ग भरवले जातात. यातले विद्यार्थी आहेत, आदिवासी, कातकरी आणि झोपडपट्टीतील असंख्य मुलं.
झाडं लावणं आणि ती वाढताना बघणं हा संध्याताईंचा छंदच आहे. त्यातूनच महाविद्यालयाच्या या परिसराला हिरवंगार करायचं त्यांच्या मनानं घेतलं. त्या सांगतात, ‘‘रस्त्याच्या कडेनं झाडं लावण्याचं काम सुरू केलं. मी स्वत:, पती, मुलंदेखील रस्त्यावर खड्डे खोदायचे. आतापर्यंत ज्या ज्या गावांतून काम केलं होतं तिथले सगळे सहकारी न सांगता मदतीला धावले. भाकरी फडक्यात बांधून स्वत:च्या खर्चानं ते तिथं यायचे आणि झाडं लावायला मदत करायचे. त्यांनी खड्डे खणले, साफसफाई केली. झाडं लावली. कुंपण केलं. तिथल्या कातकरणी तर आपल्या पोराबाळांना घेऊन यायच्या. दिवस दिवस राबायच्या. या सगळ्यातून जन्मली ‘हिरवाई’!’’
सदर बझारमधल्या दरुगधीयुक्त डिम्पग ग्राउंडच्या पावणेदोन एकरांत उभं राहिलेलं हे दोन हजार झाडांचं हिरवंगार बेट! उन्हाळ्याच्या दिवसांतही ही झाडं कोमेजू नयेत म्हणून संध्या आणि त्यांचं सगळं कुटुंब आणि सहकारी खूप काळजी घ्यायचे. त्या सांगतात, ‘‘२००५ मध्ये आम्ही ‘हिरवाई’ची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने सातारा शहराच्या आसपासच्या गावांमध्ये झाडं लावण्याचा संकल्प हाती घेण्यात आला. यासाठी गावकऱ्यांची मदत घेतली. वेळप्रसंगी पदरमोडदेखील केली. माझा दिवस सुरू व्हायचा तो ‘हिरवाई’त आणि मावळायचा तोदेखील ‘हिरवाई’तच. यासाठी अनेकदा आíथक चणचणही सहन करावी लागली. पण स्वप्न आकार घेत होतं..’’
‘‘ही नुसतीच झाडं नाहीत तर सिद्धू (सिद्धार्थ) आणि धनू (धनंजय) सारखीच ही माझीच मुलंच आहेत.’’ संध्याताई त्यांच्या ‘हिरवाई’तील आणि आज सातारा जिल्ह्य़ातील विविध ठिकाणी लावलेल्या सुमारे तीस हजार झाडांबद्दल अगदी सहजतेनं सांगतात.. आज त्यांची ओळखच ‘झाडंवाल्या बाई’ असा होतो तेव्हा ती त्यांच्यासाठी आनंदाचीच नाही तर अभिमानाची गोष्ट असते.
पण अर्थातच दिसली जागा आणि लावली झाडं इतका हा साधा-सोपा प्रवास नाहीच. उलट अस्वस्थ करणारा, प्रसंगी मनस्ताप देणारा आणि माणसांच्या निदर्यी प्रवृतीचा पावलापावलावर प्रत्यय देणाराही अनुभव होता. एका बाजूला मदत करणारे असंख्य लोक होते, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर आरोप करणारे, लावलेली झाडं तोडून टाकणारे, पळवून नेणारे तर होतेच, पण त्यांच्या चारित्र्यावरही घाला घालणारे लोकही होते. त्यांचे पती प्रा. पांडुरंग चौगुल्यांचा विश्वास आणि बळ हेच या सर्व प्रवासात त्यांच्या आधाराला होतं..
एका रात्री ‘हिरवाई’तली अनेक झाडं कुणी तरी निष्ठुरपणे उपटून टाकली. संध्याताई आजही त्या आठवणीने अस्वस्थ होतात. त्या सांगतात, ‘‘माझ्या बाळांना असं निर्घृणपणे उद्ध्वस्त झालेलं पाहून डोळ्यातले अश्रू आवरतच नव्हते. मनात प्रचंड संताप दाटून आला होता. चौगुलेही कामानिमित्तानं बाहेर गेले होते. मी आणि माझी मुलंच फक्त घरात होतो. पण या चिडीतूनच मी त्याच दिवसभरात ‘हिरवाई’ उभी करण्याचा निर्धार केला. मी ज्या ज्या गावांमध्ये काम केलं होतं, तिथल्या गावकऱ्यांना हाक दिली. सगळ्यांनी मिळून एका दिवसात ‘हिरवाई’ पुन्हा उभी केली..’’ तो अनुभव त्यांना एकाच वेळी माणसातल्या दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्तीचा प्रत्यय देऊन गेला. हिरवाई पुन्हा बहरल्याचा आनंद त्यांना अधिकाधिक झाडं लावण्यास प्रवृत्त करीत गेलाच, पण त्यांच्या मुलांमध्येही तो उतरला याचं त्यांना समाधान आहे.
परिसरातल्या एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी झाडं लावली होती. काही झाडांची काळजी घेण्याचं काम त्यांची मुलं सिद्धू आणि धनूनं स्वत:कडे घेतलं. त्या सांगतात, ‘‘एक दिवस धनू शाळेतून परत येत असताना काही लोक ती झाडं तोडत असताना दिसले. त्याने जमेल तसं त्यांना अडवायचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. धनू लहान होता. हातात पैसेही नव्हते. त्यानं जवळच्या दुकानात जाऊन दुकानदाराकडून एक रुपया उधार घेतला आणि आम्हाला फोन करून बोलवून घेतलं. आम्ही तिथं जाईपर्यंत त्या माणसांनी ते झाड बुंध्यापासून तोडून टाकलं होतं. आम्ही पोहोचलो तेव्हा धनू अक्षरश: ढसाढसा रडत होता.’’ त्याच्याबरोबरीने संध्याताईंनाही आपले अश्रू आवरले नाहीत. पण त्यांनी त्याच क्षणी पण केला, आणखी झाडं लावायची, परिसर हिरवागार करायचा. निसर्ग वाचवायचा.. आणि तो सार्थही केला.
अर्थात हे लोक त्यांच्या एका हाकेसरशी धावत येतात त्यामागेही खूप मोठी कहाणी आहे. ज्याची सुरुवात झाली २००१ मध्ये. प्रा. चौगुल्यांच्या पुढाकाराने साताऱ्याजवळच्या इंगळेवाडीतच कॅम्प भरला होता आणि त्यातच ग्रामस्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला. इंगळेवाडी, बेबलेवाडी, ठोंबरेवाडी आणि हनुमाननगर ही चार गावं संध्याताईंनी चक्क झाडू हातात घेऊन स्वच्छ केली. त्यासाठी घरोघरी जाऊन महिलांना ग्रामस्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं होतं. त्याचा योग्य परिणाम झालाच, गाव ‘निर्मल’ आणि ‘निर्धूर’ झालं. बायका बचत गटात सामील झाल्या. त्यांना पर्यावरणाचं महत्त्व पटू लागलं. त्यानंतरच्या पाच वर्षांच्या काळात अनेक गावांमधून त्यांनी असंख्य वनराई बंधारे बांधले. त्यासाठी सरांचे एन.एस.एस आणि एन.सी.सीचे विद्यार्थी आणि संध्याताईंचेही विद्यार्थी आले. शेकडो माणसांचा स्वयंपाक तिथं व्हायचा. स्वत: चौगुले सर स्वयंपाक करायचे. टेपवर गाणी लावून द्यायचे. नाचत, गाणी गात काम व्हायचं. अक्षरश: शेकडो एकर जमीन ओलिताखाली आली. हजारो झाडं वाढू लागली, बहरू लागली. मोठी होत होत जगाला सावली देत राहिली..
अर्थात संसार आणि प्राध्यापकी यामुळे सगळ्याच ठिकाणी संध्याताईंना जाणं शक्य नाही. त्यातच प्रा. चौगुलेंचंही अचानक (२००९) निधन झालं आणि हा वसा पुढे नेण्यासाठी त्यांनी मदत घेतली त्या त्या परिसरातल्या लोकांची. परिसरातले लोकच आता या झाडांची काळजी घेतात.आज ‘हिरवाई’त वर्षांतून एकदा ‘हिरवाई निसर्ग यात्रा’ भरते. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत दहा हजारांहून अधिक मुलं सहभागी होतात. त्या वेळी पर्यावरण संवर्धनाचे संस्कार करणारं प्रदर्शनही भरवलं जातं. हिरवाईच्या शीतल छायेत चाललेलं तिथल्या गरीब मुलांसाठीचं ज्ञानदानाचं कार्य म्हणजे या डवरलेल्या वृक्षांना आलेली रसाळ फळं गोमटीच म्हणावी लागतील.
आज जेव्हा कधी कुणा गावकडची एखादी त्यांच्यासारखी झाडवेडी मत्रीण येते आणि संध्याताईंच्या ओंजळीत चाफ्याची फुलं टाकते आणि सांगते, ‘‘बघ ताई, तू लावलेल्या चाफ्याची ही फुलं..’’ तर कधी कुणी झाडप्रेमी शेवग्याच्या शेंगा घेऊन येतो आणि सांगतो, ‘‘बाई, तुम्ही लावलेल्या शेगटय़ाच्या झाडाच्या शेंगा खास तुमच्यासाठी..’’ तेव्हा त्या फुलांचा सुवास आणि शेंगांची गोडी जरा अंमळ जास्तच जाणवते…
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2013 रोजी प्रकाशित
‘हिरवाई’तलं ज्ञानार्जन
साताऱ्यातील पडीक जमिनीवर दोन हजार झाडांची ‘हिरवाई’ लावत त्याखाली ज्ञानार्जनाचा अखंड मेळा भरवणाऱ्या, असंख्य वनराई बंधारे बांधत जिल्ह्य़ात सुमारे ३० हजार झाडं लावून त्यांना मातेच्या मायेनं जोपासणाऱ्या प्रा. संध्या चौगुले यांच्या असंख्य चांगल्या-वाईट अनुभवांची ही कथा. २१ मार्चच्या जागतिक वन दिनानिमित्ताने..

First published on: 16-03-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of sandhya chougule