प्रभा गणोरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅना प्रथम मनाविरुद्ध कादंबरीकार फ्योदोर दोस्तोयवस्कीकडे जायचे ठरवते, पण काही दिवसांच्या सहवासात त्याचे सारे दोष कळूनही त्याचे मोठेपण तिला जाणवू लागते. त्याचे उद्ध्वस्त वैवाहिक जीवन, त्याच्या पूर्वायुष्यातील प्रियतमा, त्याला भोगावे लागलेले प्रेमभंग-  त्याचा सरळ, निष्कपट स्वभाव आणि त्याच्यातली दैवी प्रतिभा, मधूनमधून त्याला येणारे नराश्याचे झटके.. अ‍ॅनाला तो उमजू लागला होता. ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती..

विख्यात रशियन कादंबरीकार फ्योदोर दोस्तोयवस्की ज्या वेळी ‘द गॅम्बलर’ ही कादंबरी लिहीत होता, त्या वेळी त्याचे लेखन उतरवून घेण्यासाठी स्टेनोग्राफरची त्याला गरज आहे असे कळल्याने अ‍ॅना ही तरुणी त्याच्याकडे आली. दोस्तोयवस्की ख्यातनाम कादंबरीकार होता आणि त्याची ‘क्राइम अ‍ॅण्ड पनिशमेंट’ ही कादंबरी तिने वाचली होती, त्याचे इतरही लेखन वाचलेले होते. आपण एका प्रसिद्ध लेखकाकडे स्टेनोचे काम करायला जातो आहोत या कल्पनेने ती भारावून गेली होती. तिने त्याच्या दारावर टकटक केली. दार उघडले गेले. समोर जी व्यक्ती उभी राहिली तिला पाहून अ‍ॅना चार पावले मागे सरकली..

मध्यम उंचीचा, तांबूस केस असलेला, डोळ्यांची खोबण आणि त्यांत बसवलेले खिन्न उदास डोळे, त्यातही एक तपकिरी, दुसरा काळा.. खोलीत तिने नजर फिरवली तर भिंतीवर जुनाट घडय़ाळ, टेबलावर पुस्तकांचा ढीग, एक सोफा आणि लिहिण्याचे टेबल आणि खुर्ची. सारे अस्ताव्यस्त. त्याने तिची चौकशी केली. त्याच्याकडे काम करणाऱ्या फेदोसियाने त्याच्यासाठी काळा चहा आणला, तिलाही दिला. एखादे कडू औषध प्यावे तसा तो तिने गिळला. चहा घेतल्यावर फ्योदोरने सिगरेट शिलगावली. वास आवडत नसूनही तिने तसे दाखवले नाही.

दोस्तोयवस्की तिच्याशी बोलत होता तेव्हा तिला जाणवले की, प्रथम पाहिले त्या वेळी वाटला तेवढा तो बोलताना वयस्क वाटत नाही. उलट तरुणच वाटतो. आपल्याला लवकरात लवकर एक कादंबरी पूर्ण करायची आहे, त्यासाठी स्टेनोची मदत हवी आहे, असे तो म्हणाला. त्याने ‘क्राइम अ‍ॅण्ड पनिशमेंट’मधल्या उताऱ्याचे डिक्टेशन तिला दिले तेव्हा, ‘किती हळू लिहितेस, एखाद्या गोगलगाईचा वेग आहे तुझा,’ असे खेकसलाही, शब्दाशब्दांत चुका काढल्या, अनुस्वार कुठे आहेत, एक अख्खे वाक्य तू गाळलेस..’  त्याच्या या वागण्याने ती वरमून गेली. आपण कसे काय याच्याकडे काम करणार असे तिला वाटू लागले. ती निघून जाते आहे असे पाहून तो तिच्या पाठोपाठ आला, म्हणाला, ‘‘अ‍ॅना, कृपा करून गैरसमज करून घेऊ नकोस. तुला कदाचित माझ्याबद्दल माहिती नसेल, मला मधूनमधून अपस्माराचे झटके येतात. काल रात्रीच मला जोरदार फीट आली होती.’’

ही कादंबरी जेवढी अ‍ॅनाची आहे तेवढीच दोस्तोयवस्कीचीदेखील आहे. त्याचा चंचल स्वभाव, भावनांचे चढउतार, त्याचे जुगाराचे व्यसन, त्याचा कर्जबाजारीपणा, कमालीची हलाखीची स्थिती आणि त्यात, त्याला प्रकाशकाने घातलेली अट. त्याने हाती घेतलेली ‘गॅम्बलर’ कादंबरी जर येत्या २६ दिवसांत पूर्ण केली नाही तर त्याच्या सर्व पुस्तकांचे हक्क प्रकाशकाकडे जाणार, ही निर्वाणीची अट. या साऱ्यांनी तो इतका क्षुब्ध झालेला असतो की, त्याचे जुगार खेळणे आवाक्याबाहेर जाते. कुणाहीकडून तो पैसे उसने घेतो आणि हरतो. रात्ररात्र तो कॅसिनोच्या अड्डय़ावर जातो, नंतर भटकत राहतो, गुत्त्यात जाऊन उधारीवर दारू पितो. त्याचे सेंट पीटर्सबर्ग हे शहर, नेवा नदीच्या काठाने त्याने घालवलेल्या रात्री, तिथली चच्रेस, संगमरवरी महाल, चांदण्यात उभी असलेली झाडे.. हे सारे स्वप्नासारखे वाटू लागते. आपल्या या भणंग स्थितीचा विचार करताना त्याला त्यात ईश्वरी हेतू दिसतो. स्वत:च्याच नव्हे तर एकूण मानवाच्या दु:खाचा तो विचार करू लागतो. माणसाचे वर्तन, त्याच्या हातून घडणारी वाईट, दुष्ट कृत्ये, पापे या साऱ्यांचा ईश्वराशी काहीच संबंध नाही का? मानवाकडून घडणाऱ्या पापांची जबाबदारी ईश्वरावरही तेवढीच नाही का? कारण त्यानेच तर हे दुबळे मन निर्माण केले ना? दोस्तोयवस्कीचा ईश्वराशी सतत सुरू असलेला मनोमन संवाद, स्वत:च्या आयुष्याबद्दलची कणव, मानवी जीवन,

महान मानवांनादेखील भोगावी लागणारी दु:खे आणि वेदना, आत्मनिर्भर्त्सना आणि आत्मकरुणा यात हेलकावणारे त्याचे मन.. या साऱ्यांचे उत्कट, झपाटून टाकणारे वर्णन, दोस्तोयवस्कीची स्वगते आणि त्याचे तीव्र आवेग यांचे आविष्कार या कादंबरीत आहेत.

अ‍ॅना प्रथम मनाविरुद्ध त्याच्याकडे जायचे ठरवते, पण काही दिवसांच्या सहवासात त्याचे सारे दोष कळूनही त्याचे मोठेपण तिला जाणवू लागते. त्याचे उद्ध्वस्त वैवाहिक जीवन, त्याच्या पूर्वायुष्यातील प्रियतमा, त्याचा सरळ, निष्कपट स्वभाव आणि त्याच्यातली दैवी प्रतिभा, मधूनमधून त्याला येणाऱ्या फीट्स, नराश्याचे झटके.. तो जुगाराविषयी आणि कॅसिनोविषयी बोलायचा तेव्हा त्याच्यात एकदम उत्साह संचारे. त्याला भोगावे लागलेले प्रेमभंग.. अ‍ॅनाला तो उमजू लागला होता.

त्याच्याविषयीचे समाजातले प्रवाद तिला ठाऊक होते. त्याचा सबेरियातला तुरुंगवास आणि मृत्यूच्या हद्दीत पाऊल टाकण्याआधी झालेली सुटका.. जगणे आणि मरणे यांत काहीही अंतर नसण्याचा क्षण अनुभवतानाची स्थिती.. त्याने स्वत:च तिला हे सारे सांगितले होते.. त्याचे बोलणे ऐकताना अ‍ॅना स्तिमित होई. दोस्तोयवस्कीच्या कादंबरीतली पात्रे, त्यांची दु:खे, वेदना, हृदयभंग, त्यांना अनुभवावे लागलेले अपमान, त्यांची स्वप्ने, नराश्य, जुगार खेळतानाचा हर्ष आणि दुसऱ्या क्षणीचे नराश्य, हताशा हे त्याच्या जगण्यातून आलेले होते. पॉवलिना सुस्लोवा या त्याच्या आयुष्यातल्या स्त्रीतूनच ‘गॅम्बलर’मधली नायिका अवतरली होती.

दोस्तोयवस्की अनवरतपणे मजकूर सांगत असे. तासन्तास ते लिहिण्यात मग्न असत. त्याच्या लेखनाबद्दल आणि एकूण जीवनाबद्दल दोघे चर्चा करीत. माणूस नावाचे गूढ समजून घ्यायचे असेल त्याला माझ्याच शोधात यावे लागेल, असे तो म्हणे, ती केवळ आत्मस्तुती नव्हती. काळ हीच लेखकाचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारी कसोटी आहे. त्याच्यासंबंधी लिहिणाऱ्या टीकाकारांना महत्त्व देण्याची गरज नाही, असे त्याचे म्हणणे होते.

अ‍ॅनाला त्याचे बोलणे, लिहिण्याचा ओघ आणि वेग, त्याचे इतरांशी वागणे आवडू लागले होते. त्याच्या घरात अष्टौप्रहर काम करणाऱ्या फेदोसियाकडून तिला त्याच्यासंबंधी खूप काही कळत होते. त्याच्या जुगाराच्या नादाविषयी तिने त्याला समजवावे असे अ‍ॅनाला वाटे; पण परिस्थितीमुळे, दु:खभोगांमुळे तो या व्यसनांकडे वळला होता. विशेषत: त्याचा उद्ध्वस्त झालेला संसार. सबेरियातून सुटल्यावर मारिया त्याला भेटली त्या वेळी ती विवाहित, आठ वर्षांच्या मुलाची आई होती. खरे तर दुसऱ्या माणसाच्या बायकोवर प्रेम करणे म्हणजे दु:खाला निमंत्रणच; पण एखाद्या वाळवंटातल्या प्रवाशाला तहानेने कोसळण्यापूर्वी तळे सापडावे तशी ती त्याला भेटली. तिचा नवरा मृत्यू पावल्यावर त्याने तिच्याशी लग्न केले आणि नंतर त्याला तिचे दुसऱ्या पुरुषाशी चोरटे संबंध आहेत हे कळल्यावर पायाखालची जमीन दुभंग झाल्यासारखे त्याला वाटले. मग भांडणे सुरू झाली.

त्यातच मारियाला गंभीर दुखणे जडले. दारिद्रय़ आणि दुर्दैवाचे आघात यांनी जर्जर झालेल्या दोस्तोयवस्कीवर कर्जाचे डोंगर वाढले. माणसे त्याला टाळू लागली, पण तरीही मारियावरच्या प्रेमापोटी मॉस्कोला घर भाडय़ाने घेऊन त्याने तिला तिथे ठेवले; परंतु ती जगली नाही. सगळीकडून त्याला अपयश येत होते, नकार मिळत होते. हे सारे ऐकून अ‍ॅनाचे मन सहानुभूतीने भरून गेले. त्याला फीट कशी येते हे एकदा तिने पाहिले, तेव्हा भयाने तिचा थरकाप उडाला; पण आपला हा आजार ही देवाची कृपाच आहे, असे त्यावर त्याचे म्हणणे होते.

या काळात अ‍ॅनाला दोस्तोयवस्कीची खरीखुरी ओळख पटली. त्याचे शांत असणे, एकदम उसळून संतापणे, तिने अनुभवले होते. जुगार खेळण्याचेदेखील त्याला झटके येत. मध्येच ‘गॅम्बलर’चे काम थांबवून ‘ब्रदर्स कारामॉझाव’ची कल्पना त्याला सुचली आणि ताबडतोब ‘द पझेस्ड’ ही कादंबरी लिहावी असेही त्याला वाटू लागले; पण त्याने ‘गॅम्बलर’ पूर्ण करावी म्हणजे त्याचा प्रकाशक त्याचे हक्क हिरावून घेणार नाही या विचाराने अ‍ॅना झपाटल्यासारखे काम करू लागली.

त्याच्या पूर्वायुष्यातल्या आठवणी तो सांगे. मारियाचा मुलगा, त्याच्या भावाची बायको मधूनमधून येऊन त्याला त्रास देत. त्याचे एकाकीपण तिला कळत असे. तो प्रेमाचा भुकेला होता; पण ईश्वराने मला जे दिले ते मी निमूटपणे स्वीकारले आहे, या त्याच्या जीवनविषयक जाणिवेने ती भारावून गेली. या काळात तिने त्याला जपले, प्रोत्साहन दिले. त्याच्या द्विधा मन:स्थितीतून त्याला बाहेर काढले. लोक त्याच्याबद्दल वाईट बोलत; पण तो आपल्याशी किती सभ्यपणे वागतो हे तिला कळत होते. त्याच्यातल्या माणुसकीची, अथांग स्वभावाची, त्याच्यातील प्रतिभासामर्थ्यांची ओळख तिला पटत गेली.

एके दिवशी आपल्या स्वप्नाबद्दल सांगताना त्याने अचानक तिला विचारले, ‘‘अ‍ॅना, तू प्रेम करशील का माझ्यावर?’’ त्यावर ती शांतपणे म्हणाली, ‘‘होय. आयुष्यभर मी तुमच्यावर प्रेम करीत राहीन.’’ आपला निर्णय तिने आईला, भावाला, धाकटय़ा बहिणीला सांगितला आणि त्या सर्वानी संमती दिली. आपल्या लेखनाबद्दल तो आत्मविश्वासाने बोलत असे. ‘क्राइम अ‍ॅण्ड पनिशमेंट’बद्दल तो एकदा म्हणाला होता, ‘‘या कादंबरीइतके अत्युच्च शिखर जागतिक वाङ्मयात कुणालाही गाठता येणार नाही.’’ पण स्वत:बद्दल बोलताना आपला भूतकाळ, आपला अनिश्चित भविष्यकाळ आणि रोजची हलाखीची स्थिती यामुळे त्याचे मन मागेपुढे होत होते. अजूनही त्याला आपण अ‍ॅनाचा गुन्हेगार आहोत असे वाटत असे. अ‍ॅनाने त्याला आश्वस्त केले. तिच्या निर्णयावर ती ठाम होती.

सव्वीस दिवसांची मुदत संपली. पूर्ण झालेली कादंबरी प्रकाशकाला देण्यासाठी दोस्तोयवस्की त्याच्याकडे गेला तेव्हा तो गायब झालेला होता. अ‍ॅनाने वकिलाचा सल्ला घेऊन ते हस्तलिखित कोर्टात सादर करायचे ठरवले, पण कोर्ट बंद झाले होते. तेथल्या कारकुनाने ते पोलिसांच्या स्वाधीन करायला सांगितले. पोलिसांनी ते हस्तलिखित स्वीकारले. दोस्तोएवस्की दूर उभा होता. एका अधिकाऱ्याने तिला विचारले, ‘‘तुम्ही कोण?’’ अ‍ॅना म्हणाली, ‘‘मी यांची पत्नी आहे.’’

पोलीस स्टेशनातून अ‍ॅना बाहेर आली तेव्हा दोस्तोयवस्कीला वाटले, हा दैवी क्षण आहे. रस्त्याने जाताना दोस्तोयवस्कीने अ‍ॅनाला अनावर आवेगाने जवळ घेतले. दु:खाच्या आणि मृत्यूच्या खोल विवरातून एखादा आत्मा मुक्तव्हावा आणि अमरत्वाच्या फांदीवर आपल्या जोडीदाराला भेटावा तसा तो क्षण होता.

अ‍ॅनाचं फ्योदोरवर निरपेक्ष प्रेम आहे. ती हळूहळू त्याच्यात गुंतत जाते, पण त्याही पेक्षा त्याला समजून घेऊन कशी कशी सावरत जाते याची ही कथा असल्याने अ‍ॅनाची व्यक्तिरेखा खूप महत्त्वाची ठरते.

मल्याळम भाषेतील प्रसिद्ध लेखक पेरुपदवम श्रीधरन यांनी लिहिलेल्या ओरु संकीर्तनम पोळैया कादंबरीत अ‍ॅना ही व्यक्तिरेखा आहे. या कादंबरीने वाचकप्रियतेचा आणि खपाचा उच्चांक गाठलेला आहे. १९९३ मध्ये ती प्रथम प्रकाशित झाली. त्यानंतर तिच्या ८० आवृत्त्या निघाल्या आणि सुमारे अडीच लाख प्रती विकल्या गेल्या. ए.जे. थॉमस यांनी या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद (लाइक अ साम) केला, तो २०१७ मध्ये प्रकाशित झाला. मूळ मल्याळी कादंबरी वाचकांप्रमाणेच समीक्षकांनीही गौरविली आहे आणि तिला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व स्त्रीत्वाचे रूपबंध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna snitkina loyal wife of fyodor dostoyevsky
First published on: 22-09-2018 at 01:01 IST