scorecardresearch

नात्यांच्या बंधातला अस्तित्वाचा लढा

पर्यावरण संरक्षण हा खरंतर जागतिक विषय. आक्रसणारी जंगलं, हत्तींची होणारी अनिर्बंध शिकार, जंगलाची काळजी घेणाऱ्या, पण वेगानं नष्ट होणाऱ्या वनवासी जमाती अशा अनेक गोष्टी मानव आणि प्राणी यांच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारणाऱ्या.

the elephant whisperers
‘द एलिफंट व्हिस्पर्स’ मधील घनिष्ठ कुटुंब – बोम्मन, बेल्ली, अम्मू आणि रघू.(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

डॉ. स्मिता दातार

पर्यावरण संरक्षण हा खरंतर जागतिक विषय. आक्रसणारी जंगलं, हत्तींची होणारी अनिर्बंध शिकार, जंगलाची काळजी घेणाऱ्या, पण वेगानं नष्ट होणाऱ्या वनवासी जमाती अशा अनेक गोष्टी मानव आणि प्राणी यांच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारणाऱ्या. या गंभीर समस्येला तितक्याच नाजूक वात्सल्यनात्याच्या उत्कट गोष्टीतून उलगडणारा ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ हा लघुमाहितीपट आणि तो तरलपणे जगापुढे मांडणाऱ्या, भारताच्या मातीतला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस आणि निर्माती गुनीत मोंगा यांच्या या माहितीपटाविषयी..

‘अँड द ऑस्कर गोज टू इंडिया..’ हे शब्द ऐकायला अधीर झालेल्या भारतीय मनांवर ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या लघुचित्रपटाला मिळालेल्या ऑस्कर पुरस्कारानं कौतुक आणि अभिमानाची मोहोर उमटवली आहे. याच महिन्यात झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या पार्श्वभूमीवर निर्माती गुनीत मोंगा आणि दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस या दोन भारतीय स्त्रियांना हा पुरस्कार मिळाला याचं महत्त्व वेगळं आहे. हातातली ऑस्करची बाहुली उंचावत गुनीत मोंगा ऑस्करच्या मंचावरून भारतीय स्त्रियांना उद्देशून म्हणाल्या, ‘आपण स्त्रियाच आपला भविष्यकाळ आहोत आणि हाच तो उज्ज्वल भविष्यकाळ!’  गुनीत मोंगा या ३९ वर्षांच्या निर्मातीनं या आधीदेखील ऑस्कपर्यंत मजल मारली आहे. ‘पीरियड- एंड ऑफ सेन्टेंस’ हा त्यांनी विदेशी निर्मातीबरोबर केलेला महितीपटही २०१९ मध्ये ऑस्करचा मानकरी ठरला होता. या माहितीपटात त्यांनी उत्तर प्रदेशातल्या हापूरमधल्या खेडय़ात सॅनिटरी पॅडसाठी ग्रामीण स्त्रियांनी उभारलेली चळवळ, पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडची गरज, ते त्याची निर्मिती असा प्रवास चित्रित केला होता. त्याआधी आलेल्या ‘कवी’ या भारतातल्या वेठबिगारीवर भाष्य करणाऱ्या लघुचित्रपटासाठी त्यांना अकॅडमी अ‍ॅवॉर्डच्या यादीत नामांकन मिळालं होतं. ‘गँग्ज ऑफ वासेपूर- २’, ‘मसान’, ‘पगलाईत’ या सामाजिक आशयाच्या  लोकप्रिय ठरलेल्या चित्रपट निर्मितीतसुद्धा त्यांच्या ‘सिख्या एन्टरटेनमेंट’ या कंपनीचा सहभाग होता. ‘पेडलर्स’ हा त्यांचा चित्रपट ‘आंतरराष्ट्रीय क्रिटिक वीक’साठी निवडला गेला होता आणि त्यानं गुनीत मोंगा या संघर्ष करून मोठय़ा झालेल्या भारतीय निर्मातीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. ‘मान्सून शूटआऊट’, ‘द लंचबॉक्स’ हे त्यांचे दोन चित्रपटसुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिटिक वीकसाठी निवडले गेले आणि ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये मिडनाइट स्क्रीनिंगसाठी दाखवले गेले. ‘द हॉलीवूड रिपोर्टर’नं ‘चित्रपटांच्या नव्या लाटेतली विश्वासार्ह निर्माती’ म्हणून गुनीत यांची प्रशंसा केली आहे. भारतीय चित्रपट आणि परदेशी चित्रपट वितरक यांच्यातली दरी थोडी कमी व्हायला यामुळे मदतच झाली.

मोठी स्वप्नं पाहणाऱ्यांना ती साकार करणारेही भेटतात, तसंच कार्तिकी आणि गुनीत एकमेकींना भेटल्या. कार्तिकी गोन्साल्विसला एकदा बंगळूरुहून तिच्या उटीच्या घरी जाताना वाटेत मदुमलाईच्या जंगलात रघू या हत्तीच्या पिल्लाला मायेनं आंघोळ घालणारा बोम्मन दिसला. त्या निष्पाप प्राण्याचं आणि निसर्गाच्या जवळ असणाऱ्या माणसाचं गोड नातं बघून कार्तिकीला त्या विषयाची भूल पडली. आधुनिक जग जंगलांपासून, प्राण्यांपासून किती दूर जातंय याची जाणीव असलेल्या कार्तिकीनं हत्तींचा सांभाळ करणाऱ्या बोम्मन आणि बेल्ली या दोघांना बोलतं केलं. माणूस आणि प्राण्यांचं सहजीवन पृथ्वी वाचवण्यासाठी किती आवश्यक आहे, हे ती तिच्या कॅमेऱ्यातून सांगू इच्छित होती. या प्रयत्नांतून गुनीत मोंगा निर्मित आणि कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित लघुपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ जन्माला आला.

 हा लघुमाहितीपट फक्त हत्तींचा सांभाळ करणाऱ्या माणसांचा नाहीये, तर तो निसर्ग, माणूस आणि प्राणी या साखळीवरचा आहे. वेगानं ढळणारा पर्यावरणाचा समतोल, आक्रसणारी जंगलं, हत्तींची होणारी अनिर्बंध शिकार, मानव-प्राणी संघर्ष, जंगलाची काळजी घेणाऱ्या पण वेगानं नष्ट होणाऱ्या वनवासी जमाती, अशा अनेक समस्यांना स्पर्श करत हा चित्रपट आपल्याला अंतर्मुख करतो. या चित्रपटातल्या रघूची- अर्थात हत्तीच्या पिल्लाची आई जंगलात हत्तींची शिकार करण्यासाठी पसरवलेल्या विजेच्या उघडय़ा तारांमुळे गतप्राण होते. हत्तींचा कळप जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळतो आणि त्यात छोटा रघू कळपापासून वेगळा पडतो. अनाथपण त्याच्या वाटय़ाला येतं. इतर प्राणी त्याला जखमी करतात. जंगलात हत्तींचा सांभाळ करण्याची पारंपरिक पद्धत अवगत असलेली, कट्टूनायकन ही वनवासी जमात वन विभागाला मदत करत असते. त्यांच्यातल्या बोम्मन आणि बेल्लीकडे वन विभागातले कर्मचारी जंतुसंसर्ग झालेल्या आजारी रघूला सुपूर्द करतात आणि सुरू होतो एक निरागस वात्सल्याचा प्रवास.. त्या निरागस जीवाला वात्सल्याच्या स्पर्शाने नवसंजीवनी मिळते.

 बोम्मन आणि बेल्ली पोटच्या पोरासारखी रघूवर माया करतात. सुरुवातीला नाठाळपणा करणारा रघू अगदी लहान मुलासारखं फक्त त्याच्या आवडीचं खातो आणि नको असलेलं तोंडातून बाहेर काढतो. त्याला कधी लटकेच रागे भरणारे, चिऊकाऊचे घास भरवणारे, जोजवणारे, त्याच्यासाठी रात्री जागरण करणारे, त्याचे आई-बाप झालेले बोम्मन आणि बेल्ली बघताना आपणसुद्धा नकळत रघूमध्ये गुंतत जातो. हिरव्यागार, घनदाट जंगलाची पार्श्वभूमी आणि दिसामासी मोठा होणारा रघू यांना बघताना न बोलता फक्त चित्रपटाच्या फ्रेम्समधून निसर्गाचं आणि प्राण्यांचं महत्त्व, त्यांचं साहचर्य प्रेक्षकांच्या मनावर ठसत जातं.

या लघुमाहितीपटाला ऑस्कर का मिळालं याची महती हा चित्रपट बघतानाच पटते. कारण या चित्रपटाला अनेक पदर आहेत. चित्रपटाची सुरुवातच कट्टूनायकनच्या (बोम्मनच्या जमातीचं नाव) ओळखीनं होते. कट्टूनायकन या शब्दाचा अर्थ आहे जंगलाचा राजा. जी जमात जंगलाचा राजा म्हणवली जाते, ती आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कारण आता हत्तींचा सांभाळ करणाऱ्या या जमातीतली फक्त १७०० माणसं शिल्लक आहेत. गेल्या आठ वर्षांत सुमारे ५०० हत्ती मुद्दाम वीजेच्या धक्क्यानं ठार मारले गेले. हे असंच चालू राहिलं तर हत्तीही भविष्यात भारतातून नामशेष होण्याचा धोका आहे. माणूस आणि प्राणी दोघांच्या अस्तित्वाचा हा लढा बोम्मनच्या कहाणीतून प्रेक्षकांसमोर येतो. बोम्मन आपल्यापरीनं निसर्गातला दुवा होण्याचा प्रयत्न करतोय.   

बेल्ली रघूचं लालनपालन करून पोटची लेक वारल्याचं दु:ख विसरू पाहते आणि रघूवरच वात्सल्याचा वर्षांव करते. रघूमुळे जवळ आलेले बोम्मन आणि बेल्ली लग्न करतात. रघूसारख्याच अनाथ असलेल्या अम्मू या आणखी एका हत्तीच्या पिल्लामुळे बोम्मन, बेल्ली आणि रघूचं कुटुंब पूर्ण होतं. सुरुवातीला रघूनं अम्मूला न स्वीकारणं, हट्ट करणं, रघूच्या डोक्यावर बोम्मन आणि बेल्लीनं तेल घालून केस विंचरणं, पालापाचोळा ओरबडून खाताना काटेही खाणाऱ्या रघूच्या जिभेवरचे काटे त्याच्या मित्राने, कृष्णाने त्याच्या सोंडेनं काढणं, थोरल्या अंगाचा रघू पावसात भिजू नये म्हणून बोम्मननं त्याच्या अंगावर इवलीशी छत्री धरणं, रघूचं वन विभागातल्या माणसांबरोबर परत जायला नकार देणं हे सगळे हळवे प्रसंग पेरून दिग्दर्शिकेनं प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला आहे.

तिथल्या प्रचलित कथेनुसार हत्ती तीन आंधळय़ांना प्रत्येकी कसा दिसतो, ही गोष्ट बेल्ली नातीला सांगते. या प्रसंगातून निसर्ग आणि प्राणी यांच्याकडे बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन वेगळा कसा असतो, हे नकळत ती सांगून जाते. इथे आपल्याला एक चपराक बसते. दोन हत्तीची बाळं सांभाळून स्वत:चा शोध घेणारी, नातीला हत्तीची काळजी घ्यायला शिकवणारी बेल्ली हातात दिवा घेऊन एकटीच रस्ता कापत जाते आणि स्वत:ला ‘हत्तीची आई’सुद्धा म्हणवून घेते. पुढची पिढी हत्तीला नक्की सांभाळेल, असं म्हणणारा बोम्मन, निसर्ग आणि प्राणी वाचतील हा आशावाद जिवंत ठेवतो. हा चित्रपट माणूस आणि प्राण्यांचं साहचर्य आणि त्याचं महत्त्व विशद करताना त्यांच्यातल्या नात्यांचे अनेक पापुद्रे अलगद उलगडून दाखवतो. 

‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’ आणि ‘डिस्कव्हरी’साठी फोटो आणि चित्रीकरणाचं मोठं काम केलेल्या ३६ वर्षांच्या कार्तिकीनं या लघुचित्रपटासाठी तब्बल ४०० तासांचं चित्रीकरण केलं. त्यातून तिनं ४० मिनिटांचा हा माहितीपट बनवला. हा माहितीपट तिनं तिच्या ‘गो प्रो’ आणि ‘डीएसएलआर’ कॅमेऱ्यावर शूट केलाय हे सांगूनही खरं वाटणार नाही. जंगलातली मुक्तता, प्रसन्नता कार्तिकीनं लेन्समधून उत्कटतेनं पकडलीय. सहा वर्ष या एकाच विषयाचा पाठपुरावा करणारी दिग्दर्शिका कार्तिकी सांगते, ‘आपली पृथ्वी समजून घेतलीत, तंत्राच्या या गराडय़ात जरा थांबलात, मागे वळून बघितलंत, तर पृथ्वी वाचेल.’ कार्तिकीला ‘सोनी’नं ‘कल्पनेतल्या  भारताची शिल्पकार’ हा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला आहे.

‘द एलिफंट व्हिस्पर्स’ हा  नितांतसुंदर चित्रपट देणाऱ्या या दोघी आज भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ऑस्करवर कोरून आल्या आहेत. गुनीत मोंगानं ऑस्कर स्वीकारताना स्त्रियांना उद्देशून सांगितलं, की ‘कुणासाठी थांबू नका. तुम्हाला कुणी टेबलवर बसायला जागा दिली नाही तर तुमचं टेबल तुम्ही निर्माण करा आणि बसा.’ डोळस मेहनत केली तर फक्त ऑस्करच नाही तर सर्वच क्षेत्रांतल्या आंतरराष्ट्रीय सन्मानांवर भारताचं नाव आणि त्यातही भारतीय स्त्रियांचं नाव कोरलं जाईल यात शंका नाही.

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 00:09 IST