पालखीच्या कडेवर मस्तक टेकवून श्रीधरबुवा ध्यानमग्न झाले. क्षणभर स्थिरावलेली पालखी  पुढं जायला हलली आणि..
एक प्रतिष्ठित कीर्तनकार म्हणून श्रीधरबुवांचा लौकिक सुगंधासारखा पसरला होता. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त राममंदिरात, दत्तजयंतीला दत्तमंदिरात, नवरात्रात जोगेश्वरीच्या आवारात बुवांची सुश्राव्य कीर्तनं व्हायची. भाविकांची अलोट गर्दी जमायची. बुवांची वाणी प्रासादिक, आवाज गोड आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व श्रोत्यांना खिळवून ठेवायचं. कीर्तनातली पदं त्यांनी स्वत: रचलेली. पदांना आधुनिक चाली लावलेल्या. श्रोते तल्लीन व्हायचे. आरतीचं तबक नाण्यांनी शिगोशीग भरायचं. बुवांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा योगक्षेम जनता जनार्दनच चालवायचा.
माधव त्यांचा एकुलता एक मुलगा. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर बुवांनी त्याला देवस्थानच्या प्रमुख विश्वस्थांच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये कारकुनाची नोकरी लावून दिली. फावल्या वेळात त्यानं पेटी वाजवायला शिकावं, कीर्तनात आपल्याला साथ करावी आणि हळूहळू कीर्तनाचे धडे घेऊन आपली गादी पुढं चालवावी अशी बुवांची प्रामाणिक इच्छा होती, पण देवापुढं भक्तिभावाने फोडलेला नारळ नासका निघावा तसं घडलं. सोसायटीत अफरातफर करणाऱ्या चिटणीसाला सामील असल्याच्या आरोपावरून माधवची नोकरी गेली. बुवांचा राग अनावर झाला. माधवला ते म्हणाले, ‘यापेक्षा माझ्या डोक्यात धोंडा घालून माझे प्राण घेतले असतेस तर बरं झालं असतं. माझी नामुष्की केलीस. कीर्तनांतून लोकांना नीतीचे धडे देणारा मी एक भोंदू बुवा ठरलो. लोक म्हणतील स्वत:च्या मुलाला नीतीमार्गानं नेऊ शकत नाही तो आम्हाला कसला उपदेश करणार? तुझा जन्मदाता म्हणवून घ्यायला शरम वाटते मला. जा, चालू लाग. काळं कर इथून. फिरून तुझा चेहरा पाहायचा नाही मला..’
‘मी फक्त चिटणीस सांगतील तसंच..’
‘आता सारवा-सारवी करू नकोस.’ बुवांचा आवाज शिगेला चढला. फक्त नोकरीच गेली हे नशीब, नाहीतर तुरुंगातच जायचास.’
‘एक वेळ क्षमा करावी त्याला. त्याच्याकडून चूक झाली,’ सावित्रीबाईंचं आईचं मन कळवळून बोललं.
‘तुला एवढा पुळका येत असेल तर तूही चालू लाग त्याच्याबरोबर. एकुलता एक असला, तरी असला अवलक्षणी कार्टा नकोय मला. यापेक्षा तो जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं!’
मागं वळूनही न पाहता ताडताड निघून जाणाऱ्या माधवकडं पाहून सावित्रीबाईंना तो आघात सहन झाला नाही. त्या जागच्या जागी कोसळल्या. सोसाटय़ाच्या वाऱ्यानं केळीचं झाड मुळापासून उन्मळून पडावं तशा.. त्या दुर्दैवी क्षणापासून त्यांनी अंथरूणच धरलं. साऱ्या जबाबदाऱ्या बुवांवरच पडल्या. स्वत:च्या नशिबाला दोष देत ते मनाशीच म्हणाले, ‘स्वये आपण कष्टावे। बहुतांचे सोशीत जावे। झिजोनी कीर्तीस उरावे नाना प्रकारे।।
अशी बरीच वर्षे गेली. एके वर्षी आषाढीला आळंदीहून पंढरीला निघालेली पालखी शहरात मुक्कामाला येणार म्हणून पालखीचं सहर्ष स्वागत करणारे फलक, भगवी निशाणं आणि पताका फडफडू लागल्या. वारकऱ्यांच्या श्रमपरिहारासाठी खाद्यपदार्थाची केंद्रं आणि पाणपोया उभारल्या. मनोभावे दर्शन घडावं म्हणून श्रीधरवुवा चौकाच्या कोपऱ्यावर जाऊन तिष्ठत उभे राहिले. पालखी जशी जवळ आली तसे ते तीरासारखे गर्दीत घुसले. पोलिसांच्या बंदोबस्ताला न जुमानता त्यांनी पालखी गाठली. पालखीच्या कडेवर मस्तक टेकवून ध्यानमग्न झाले. क्षणभर स्थिरावलेली पालखी पुढं जायला हालली आणि त्या भीमकाय गाडीचं लोखंडी धावेच चाक बुवांच्या दोन्ही पावलांना रक्ताच्या थारोळ्यात जमीनदोस्त करून पुढं सरकलं. एक कर्कश्श किंकाळी फोडून बुवा जागच्या जागी कोलमडले.. बेहोष झाले.
हॉस्पिटलच्या कॉटवर बुवा नामस्मरण करीत निवांत पडले होते. सकाळच्या काळातली नर्स आली. तिनं बुवांची नाडी तपासली. थर्मामीटर लावून ताप पाहिला. दंडात इंजेक्शनची सुई खुपसली.
मला एक मुक्तीचं इंजेक्शन दे मुली..’
‘म्हणजे गुंगीचं का?’
‘गुंगीचं आणि त्या गुंगीतच सारा कारभार आटोपण्याचं. आता हे नाही सहन होत. हे पांगळेपण घेऊन जगण्यात तरी काय अर्थ?’
‘तुमच्या पांडुरंगानंच तुम्हाला असं पांगळं बनवलंय.’
‘नाही नाही, असं म्हणू नकोस. हे प्रारब्धाचे भोग भोगूनच संपवावे लागतात.’
‘मग यातून मुक्ती कशाला मागता? रामनाम घेत स्वस्थ पडून राहा.’
बुवा स्वत:शीच पुटपुटले.
‘तुका म्हणे कारे धरियेला कोप।
सरले नेणो पाप पांडुरंगा।।’
अंगावरची चादर ओढली जाताच बुवांची समाधी भंग पावली. मुका वॉर्डबॉय डय़ुटीवर आला होता. त्या मुक्याच्या ममताळू स्वभावामुळं बुवांचं त्याच्याशी आपुलकीचं नातं जडलं होतं. ते बोलत असताना मुका फक्त ‘हुं.. हं..’ करीत प्रतिसाद द्यायचा.
‘मी एखाद्या वेळी माझे दोन्ही पाय गुडघ्यापासून कापले गेल्याचं विसरून जाईन, पण मुकुंदा, तुला मात्र जन्मभर स्मरत राहीन.. अरे या ओबडधोबड शरीरासाठी इतक्या खस्ता आजवर कुणीसुद्धा खाल्या नव्हत्या! मुकुंद दीनदुबळ्यांची सेवा म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचीच पूजा!! मी दीन आहे रेऽऽ आणि दुबळा पण!!..’ बुवांना माधवची आठवण झाली.
तो जर त्या भ्रष्टाचारी फंदात पडला नसता, नीतीनं राहिला असता तर आज त्याचा आपल्याला केवढा आधार वाटला असता! आपल्याला आणि आपल्या या अवस्थेत सावित्रीलाही. सावित्री! स्वत:ला सावरलं असेल का तिनं? का अजूनही पडूनच आसेल अंथरुणावर?’
पुढच्याच आठवडय़ात हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. मुकुंदाच्या पाठकुळी बसून ते घरी आले. सावित्रीबाई खडखडीत बऱ्या झालेल्या होत्या. त्यांनी लगबगीनं बुवांसाठी अंथरूण टाकलं. बुवा म्हणाले, ‘आधी थोडा चहा ठेव. कपभर चहा आणि खायला काहीतरी या मुक्याला दे. त्यानं माझी सेवा अगदी मनापासून केली. अगदी पोटच्या पोरासारखी!’
‘मग हा कोण आहे तर, आपल्या माधवला ओळखलं नाहीत?’
‘आई, सांभाळ आता बाबांना. मी निघालो. नोकरी महत्त्वाची!!’ आणि तो लगबगीनं निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या मूर्तीकडं पाहत बुवा म्हणाले, ‘माता-पित्याची मनोभावे सेवा करणारा सुपुत्र भ्रष्टाचारी असूच शकत नाही, याची खात्री पटली.
चित्तवृत्ती नसते स्थिर।
नसतो भल्याचा विचार।
काही घडते अनिष्ट।
म्हणुनि का बालक दुष्ट?