नीरजा

महापुरुषांच्या बायकांची वेदना आपल्याकडे तशी नाहीच मांडली गेली विशेष. त्यांच्या चिडचिडीची, त्यांच्या भांडकुदळपणाची, कजागपणाची, त्यांच्या कायम तक्रार करण्याची निर्भर्त्सना केली गेली. तरल कविमनाला, विचारवंतांना, कर्तृत्ववान पुरुषांना या बायका समजू शकल्या नाहीत. आवली जाऊन बसली असती तुकारामांबरोबर कुठंतरी डोंगरावर तर काय झालं असतं तिच्या मुलाबाळांचं, या सगळ्याच बायकांच्या मनातला कल्लोळ जर उतरवला गेला असता कागदावर तर कदाचित रखुमाईच्या एकटेपणाचा, शकुंतलेच्या प्रेमाच्या अपमानाचा, सीतेच्या आत्मसन्मानाचा अर्थ आपल्याला आणखी खोलात जाऊन जाणून घेता आला असता. आषाढ- एक निमित्त ठरलं या विचारांसाठीचं..

Koyna dam, Satara,Water reservoirs,
सातारा : कोयना धरण निम्म्यावर; जलसाठे भक्कमस्थितीत
Dnyaneshwar Maharaj, palanquin,
सोलापूर : हरी नामाचा गजर, फुलांची उधळण करून माउलींच्या पालखीचे स्वागत, पहिले गोल रिंगण उद्या पुरंदवडे येथे
Vasant More News
शिवसेनेत कुठली जबाबदारी? वसंत मोरे म्हणाले, “उद्धव ठाकरे मला…”
Mahabaleshwar 50 inches of rainfall
महाबळेश्वर येथे हंगामातील ५० इंच पावसाची नोंद, दाट धुके आणि वर्षा पर्यटनाची पर्यटकांना भुरळ
Bench of High Court in Kolhapur
उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, पुण्यासाठीचा अशासकीय ठराव अनावधानाने : आ. विश्वजित कदम
Palkhi ceremony of Sri Sant Dnyaneshwar Maharaj in Satara on Saturday
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा शनिवारी साताऱ्यात
Welcoming Saint Dnyaneshwar by blowing up Bhandara in Jejuri Nagar of Khanderaya
खंडेरायाच्या जेजुरी नगरीत भंडारा उधळून माउलींचे स्वागत
Demand for stone idols of Vitthal Rukmini
आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या दगडी मूर्तींना मागणी, पंढरपूरमधली बाजारपेठ सजली

आषाढ सुरू झाला की महाराष्ट्राला वेध लागतात ते एकादशीचे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचे. याच महिन्याच्या पहिल्या दिवशी साहित्य व नाटय़क्षेत्राला आठवण होते ती महाकवी कालिदास यांची. आपल्या सांस्कृतिक आयुष्यातील या दोन महत्त्वाच्या घटना एकाच महिन्यात असाव्यात यासारखा दुग्धशर्करा योग नाही. अर्थात पंढरपूरच्या विठ्ठलाचा आणि वारीचा जेवढा बोलबाला होतो तेवढा ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’, ‘मेघदूत’, ‘ऋतुसंहार’, ‘अभिज्ञान शाकुंतल’ इत्यादी अजरामर नाटकं लिहिणाऱ्या कालिदासांचा आणि त्यांच्या या नाटय़कृतींचा होत नाही हे खरं असलं तरी साहित्यिक आणि नाटय़प्रेमी मात्र याची दखल घेतातच.

फारसा गाजावाजा न होता ‘महाकवी कालिदास दिन’ नुकताच पार पडलाय आणि पुढच्या आठवडय़ात वारकरी पंढरपूरला पोचून दरवर्षांप्रमाणं विठ्ठलाच्या चरणावर आपला माथाही टेकतील.

जाऊ देवाचिया गावा । देव देईल विसावा।।

देवा सांगो सुखदुख । देव निवारील भूक ।।

घालू देवासी च भार । देव सुखाचा सागर  ।।

राहों जवळी देवापाशी । आता जडोनी पायांसी ।।

तुका म्हणे आम्ही बाळे । या देवाची लडिवाळें ।।

( १८७१)

संत तुकारामांसारखी प्रत्येकालाच ओढ लागते या विठ्ठलाची. देवाची ही लडिवाळ बाळं एक तरी वारी अनुभवावी म्हणून वेळात वेळ काढून वारीत सहभागी होतात. वारीला नियमित जाणाऱ्यांसाठी तर हे दिवस म्हणजे सणासुदीचे दिवस असतात. अलीकडे ‘दूरदर्शन’ आणि इतर वाहिन्यांवरही याचं थेट प्रक्षेपण केलं जातं. परदेशातून लोक येतात ते विठ्ठलासोबतच वारकऱ्यांच्या भक्तीचं दर्शन घ्यायला. या वारीचा उपयोग कधी प्रबोधनासाठी तर कधी आपले विचार पोचवण्यासाठीही केला जातो. सामाजिक कार्यकत्रे, लेखक, कवी, या निमित्तानं वारीत आपला डेरा टाकतात.

लहानपणी आषाढी एकादशीचा उपवास करायचो आम्ही. तो करताना उपवासाचे पदार्थ खायला मिळणार याचा आनंद जास्त असायचा. तेव्हा ‘ज्ञानोबा माऊली.तुकाराम माऊली’ म्हणत एका लयीत चालणाऱ्या लोकांच्या कहाण्या सांगितल्या जायच्या. एखाद दुसऱ्या चित्रपटातून ही लयीत चालणारी पावलं नजरेला पडायची आणि आतून अगदी दाटून यायचं. ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम यांच्यासारख्या संतांसोबतच मुक्ताबाई, जनाबाईंसारख्या कवयित्रींचे अभंग ऐकत मोठं होताना या समृद्ध परंपरेचं अप्रूप वाटायचं. कधीतरी या विठ्ठलाला प्रत्यक्ष पाहून यावं, त्याला उराउरी भेटावं असं वाटत राहायचं. पण नाहीच जमलं. पुढं पुढं कामू, पिंटर, बेकेट यांच्या लेखनाच्या प्रभावानं मीही निर्थकाच्या घोडय़ावर स्वार झाल्यानं कोरडी होत गेले. नाही ठरवून वेळ काढला या विठ्ठलासाठी. आयुष्याची पन्नास वर्षे गेली तरी पंढरपूरला जाण्याचा योग आला नव्हता. आठएक वर्षांपूर्वी कधीतरी एका कार्यक्रमाला सोलापूरला गेलेले असताना प्रथमच पंढरपूूरला गेले. गेली अनेक शतकं लोकांना आणि त्या लोकांतूनच नावारूपाला आलेल्या आपल्या अनेक संतांना भारावून टाकणारा तो काळा सावळा विठ्ठल पाहिला आणि आपला अत्यंत जवळचा सखा भेटल्याचा आनंद झाला. पण त्याच्या सोबतीनं रखुमाई कुठं दिसली नाही. आपल्याकडे अनेक जोडय़ांची जी मिथकं आहेत त्यातलंच विठ्ठल-रखुमाई हे एक मिथक. या जोडय़ांतील स्त्रीपुरुषांची नावं अनेकदा एकत्र घेतली जातात. इतकी वर्ष विठ्ठल रखुमाईच्या जोडीची प्रतिमा मनात होती. लहानपणी काही देवळांत त्यांना एकत्र एकमेकांच्या बाजूलाच कर कटीवर घेऊन उभं असलेलं पाहिलं होतं. पण इथं ते एकत्र नाही दिसले. मागच्या बाजूला कुठेतरी रखुमाई दिसली एकटीच. अस्वस्थ वाटलं. जसं ज्येष्ठ कवी अरुण कोलटकर यांना वाटलं होतं. त्यामुळे लगेचच त्यांची ‘वामांगी’ ही कविता आठवली.

‘देवळात गेलो होतो मधे

तिथं विठ्ठल काही दिसेना

रख्माय शेजारी

नुस्ती वीट..

जाता जाता सहज रख्मायला म्हणालो,

विठू कुठं गेला

दिसत नाही

रख्माय म्हणाली

कुठं गेला म्हणजे

उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला..’

नाकासमोर पाहाण्यात आयुष्य गेलेल्या रखुमाईला विठ्ठल बाजूला उभा असेल याची खात्रीच वाटत होती. निवांत उभी होती ती विठू आपल्या शेजारीच उभा असेल असा विश्वास ठेवून. दगडाची मान वळवता आली नाही तिला आणि नाही पाहता आलं कुठं गेला तो नेमका ते. तिनं विचारही केला नव्हता तो कुठं जातो काय करतो याचा. पण जेव्हा या कवीनं जाणीव करून दिली तेव्हा रख्माय म्हणाली,

आषाढ कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही?

हा प्रश्न विचारतानाच एकदम व्यथित झाली ती आणि म्हणाली, ‘आज एकदम भेटायला धावून आलं, अठ्ठावीस युगांचं एकटेपण.’

ही कविता लिहिताना कोलटकरांना नेमकं कोणाविषयी लिहायचं होतं? केवळ रखुमाईविषयी की आपल्या नवऱ्यावर विसंबून राहणाऱ्या, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या साऱ्या बायकांविषयी? खरं तर स्त्रीपुरुषांतील सारीच नाती ही विश्वासावर आधारलेली असतात. मग ते आईमुलाचं नातं असो, बापमुलीचं असो, बहिणभावाचं असो, मित्रमत्रिणींचं असो की नवराबायकोचं असो. पण या नात्यातला विश्वास संपला की सारंच विसकटून जातं. जसं एकमेकांवर संशय घेतल्यामुळं हे नातं विसकटून जातं तसंच अनेकदा एकमेकांना गृहीत धरण्यानंही ते विसकटून जातं. एकमेकांचा आदर न करण्यानं किंवा एकमेकांच्या भावना, प्रेम समजावून न घेण्यानं किंवा या नात्याकडेच गंभीरपणं न पाहण्यानंही या नात्याला विराम मिळू शकतो. आणि मग त्यातून मिळालेलं एकटेपण कधी दोघांनाही तर कधी दोघांतल्या एकाला निमूटपणे सोसावं लागंत. अनेकदा ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो, विश्वास ठेवतो तो माणूस आपल्या इतर व्यवधानात, आपल्या भक्तगणांत किंवा आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांत इतका रमून जातो की आपण त्याच्या आयुष्यातून हद्दपार होऊन जातो आणि आपल्या ते लक्षातही येत नाही. जसं ते रखुमाईच्या लक्षात आलं नाही, जसं ते शकुंतलेच्या लक्षात आलं नाही.

कोलटकरांच्या ‘वामांगी’मध्ये जसं रखुमाईचं एकटेपण आपल्यासमोर येतं तसंच कालिदासानं लिहिलेल्या ‘शाकुंतल’ या नाटकात  दुष्यंतावर भरभरून प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या मुलाची आई होणाऱ्या शकुंतलेचं एकटेपणही समोर येतं. ‘अभिज्ञान शाकुंतल’ हे नाटक महाभारतातील कथेवर आधारित आहे. अत्यंत उत्कट, रोमँटिक प्रेमाची कथा कालिदास उलगडून दाखवतातच पण त्यातली वेदनाही आपल्यासमोर आणतात. या मूळ कथेत दुष्यंताचं प्रेम किती खरं होतं आणि किती तकलादू होतं याविषयी आजच्या काळात हिशेब नाहीच मांडता येणार. कारण या कथेप्रमाणे त्याला विस्मृतीचा रोग जडला तो दुर्वास ऋषींच्या शापामुळे. आणि शाप का तर शकुंतला दुष्यंताच्या आठवणीत रमल्यानं आश्रमात आलेल्या दुर्वासांकडे तिचं दुर्लक्ष झालं म्हणून. म्हणजे शेवटी दोष दुष्यंताचा नाहीच तर तो शकुंतलेचाच दाखवला गेला. शकुंतला बिचारी बाहू फैलावून साद घातली त्यानं म्हणून विसावली होती निश्चिंत मनाने तर हा विसरून गेला सहज अंगठीचा बहाणा करून.

अशा प्रकारे एखाद्या सुंदर स्त्रीला आपल्या प्रेमात पाडून नंतर वेगवेगळे बहाणे करून तिला विसरणारे अनेक राजेच नाही तर सामान्य माणसंही त्या काळात होतीच. आजही आहेतच. राजासाठी तर जीव टाकतातच मुली. थोडय़ा वेळासाठी आपल्या खेळाचं साधन सहज बनवलं जातं त्यांना आणि विसरलंही जातं. दुष्यंतानंही त्या काळात कदाचित तेच केलं असावं. पण जेव्हा तुम्ही एखाद्या कथानकाचे नायक होता तेव्हा तुम्हाला खलनायकाचे गुण नाही देता येत. त्यामुळेच त्या काळातल्या लेखकांकडून शापउशापाचे खेळ खेळले जात होते. अनेक कथांमध्ये ते आलेले आहे. पण विचार करणारा कोणताही सर्जनशील लेखक या अशा कथांकडे कथा म्हणून नाही पाहू शकत. तर तो त्या त्या कथानकातील पात्रांच्या मनोव्यापारांचाही विचार करतो. तळाशी जाऊन शोध घेतो माणसाच्या वागण्याचा. जसा कोलटकरांनी रखुमाईचा विचार केला. जसा सुप्रसिद्ध मल्याळी कवी के. सच्चिदानंदन यांनीही शोध घेतला अनेक मिथकांमागच्या आतल्या गोष्टींचा. कोलटकरांनी त्यांच्या ‘चिरीमिरी’ आणि ‘भिजकी वही’ या संग्रहात ज्याप्रमाणे अनेक मिथकं आणि पुराणकथांत (मग त्या भारतीय असोत की ग्रीक) आलेल्या स्त्रीच्या प्रेयसी म्हणून, आई म्हणून वेदना दाखवल्या आहेत तशाच व्यथा सच्चिदानंदन यांनी त्यांच्या वेगवेगळ्या कवितेतून दाखवल्या आहेत. त्यांच्या ‘शाकुंतल’ या कवितेत ते म्हणतात,

‘प्रत्येक प्रियकराला असतो शाप

विस्मृतीचा, अगदी थोडय़ा वेळासाठी तरी,

त्याच्या स्त्रीला विसरण्याचा : स्मृतिभ्रंशाची नदी

गिळून टाकते त्याचं प्रेम.

प्रत्येक प्रेयसीला असतो शाप

कुणीतरी तिला विसरून जाण्याचा

जोवर तिची गुपितं पकडली जात नाहीत

स्मृतीच्या जाळ्यात.’

हा असा शाप खरंच असतो का प्रत्येक प्रियकराला किंवा प्रेयसीलाही? झोपेतल्या यशोधरेला सोडून गेला बुद्ध, तेव्हा यशोधरेला कोणाचा शाप लागला होता? बापाच्या खुनाचा बदला घेणाऱ्या हॅम्लेटनं कुठं केला होता विचार ऑफेलियाचा? ती वेडय़ासारखं करत राहिली प्रेम या वेडय़ा ‘टु बी ऑर नॉट टू बी’ म्हणत आयुष्यात कोणताही निर्णय घेऊ न शकलेल्या माणसावर आणि तो घेऊन आला फुलं तिच्यासाठी ती गेल्यानंतर तिच्या प्रेतावर वाहण्यासाठी.

प्रत्यक्ष आयुष्यात असे अनेक प्रेमिक, मग ते पुरुष असोत की स्त्रिया, आपापल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला विसरत असतील किंवा त्यांना गृहीतही धरत असतील. पण पुराणकथा, मिथकं आणि त्यावर आधारलेल्या कथा, कादंबऱ्या, काव्य, नाटकं यात आजवर जी पात्रं आली आहेत त्यात बऱ्याचदा बाईलाच विसरलं गेलं आहे पुरुषांकडून. त्यांनाच झाल्यात वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा कधी प्राक्तन म्हणून तर कधी चारित्र्यावर संशय म्हणून. मग ती अहिल्या असेल की रेणुका. सीतेला सोडून दिलं रामानं प्रजेच्या दबावाखाली. द्रौपदीची परवडच झाली पाच पांडवांच्यात विभागलं गेल्यानं. तुकोबाच्या आवलीलाही कजाग बाई म्हणून फटकारलंच लोकांनी. ‘संगीत देवबाभळी’ या नाटकात तुकोबाची आवली आणि विठ्ठलाची रखुमाई या आपापल्या नवऱ्यांबद्दल प्रेम दाखवतानाच त्यांनी केलेल्या परवडीचीही चर्चा करतात तेव्हा वाटतं किती साठलं असेल त्यांच्या आत आत.

महापुरुषांच्या बायकांची वेदना आपल्याकडे तशी नाहीच मांडली गेली विशेष. त्यांच्या चिडचिडीची, त्यांच्या भांडकुदळपणाची, कजागपणाची, त्यांच्या कायम तक्रार करण्याची निर्भर्त्सना केली गेली. तरल कविमनाला, विचारवंतांना, कर्तृत्ववान पुरुषांना या बायका समजू शकल्या नाहीत असंच म्हटलं गेलं. मग ती सॉक्रेटिसची बायको असो, तुकारामाची बायको असो की आजच्या काळातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कलाकारांच्या बायका असोत. या बायकांना नवऱ्याबरोबर सारा कुटुंबकबिला सांभाळायचा होता, आर्थिक गणितं सोडवायची होती. आवली जाऊन बसली असती तुकारामांबरोबर कुठंतरी डोंगरावर तर काय झालं असतं तिच्या मुलाबाळांचं, आणि दिवसरात्र चौकात जाऊन चर्चा आणि वादविवाद करत बसलेल्या सॉक्रेटिसला घरात दोन वेळा अन्न लागतं गिळायला हे सांगितलं नसतं त्याच्या बायकोनं तर काय झालं असतं त्याच्या कुटुंबाचं याचा विचार आपण करत नाही. या सगळ्याच बायकांच्या मनातला कल्लोळ जर उतरवला गेला असता कागदावर तर कदाचित रखुमाईच्या एकटेपणाचा, शकुंतलेच्या प्रेमाच्या अपमानाचा, सीतेच्या आत्मसन्मानाचा अर्थ आपल्याला आणखी खोलात जाऊन जाणून घेता आला असता.

आज आषाढाच्या निमित्तानं सहज आठवली वारी, त्याच्या निमित्तानं विठ्ठल आणि त्याची रखुमाई. सहज आठवला कालिदास, त्याची नाटकं, त्यातलं शाकुंतल आणि त्यातली शकुंतला. आणि त्यांच्यासोबत या सगळ्या बायकांची एकटेपणाची वेदनाही.

‘तू पाहात राहिलास

बाहेरच्या जगातले सूर्यतारे

आणि त्याबरोबर येणारा प्रकाश,

भोगत राहिलास

मोकळ्या वाऱ्याचा स्पर्श, साठवत गेलास हजारो रंग जगण्याचे

मी मात्र अडकून पडले कायमची काळोखाच्या कपारीत.’

या काळोखाच्या कपारीत अडकलेल्या माझ्या सख्यांची आठवण सर्जनशील मनांमध्ये वसतीला असतेच. पण तुम्हा आम्हा सगळ्यांच्या मनात या सगळ्याजणी वसतीला येवोत आणि  वारीच्या धामधुमीत विठ्ठलाच्या बरोबरीनं रखुमाईलाही एक घट्ट मत्रीची मिठी पडो. एवढंच!

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com