करोनाकाळातली टाळेबंदी हा परीक्षेचा काळ होता. अचानक काही काळासाठी, चोवीस तास घरात डांबून राहणं खूप जणांना अवघड गेलं. मानसिक प्रश्न निर्माण झाले. मात्र मी या काळात मिळालेल्या निवांतपणाचा फायदा घेत मुलांबरोबर हस्तकला, चित्रकला यांचे भरपूर प्रयोग केले. माती, कागद, टाकाऊ वस्तू, यांपासून विविध वस्तू बनवल्या. आमचा हा वळणवाटेवरचा प्रवास आल्हाददायक झाला, त्यामागची प्रेरणा म्हणजे माझे ‘जवाहर नवोदय विद्यालय, नाशिक’ इथले चित्रकला शिक्षक कनगरकर सर- वामन रामकृष्णराव कनगरकर.

सर मला चित्रकला हा विषय शिकवायचे, तरी त्यांनी फक्त चित्रकला कधीच नाही शिकवली. जीवनात साऱ्या कलांचा आस्वाद घ्यायला शिकवलं. ‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत’ ते ते सरांनी विद्यार्थ्यांच्या झोळीत टाकण्याचा प्रयत्न केला. मग शाळेबाहेर शहरात होणारी प्रदर्शनं असोत, स्पर्धा असोत वा निसर्गाची विविध रूपं असोत. सरांचं शिकवणं आस्वादात्मक असायचं. तळमळीनं शिकवायचे. कोणताही शिक्षक फक्त त्या विषयात, शिकवण्यात निपुण असून चालत नाही, तर शिकवण्यात आत्मीयता, प्रेम हवं. तर ते शिकवणं विद्यार्थ्यांमध्ये झिरपतं, खोलवर जातं आणि रुजतं. हा अनुभव आम्ही घ्यायचो. सरांचा स्वभाव अतिशय शांत आणि हळवा. सहसा ते कधी कुणा विद्यार्थ्यांला मारत नसत, पण एखाद्या वेळी चिडलेच तर मग मागे पुढे न पाहता धू धू धुवायचे! पण नंतर सर पस्तावायचे. फार वाईट वाटायचं त्यांना. स्वत: रडायचे आणि सारं विसरून त्या विद्यार्थ्यांला जवळ घ्यायचे.

survey, mental health, medical students,
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत सर्वेक्षण करणार, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय
loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

हेही वाचा : निवडू आणि वाचू आनंदे..

शिकवणं, चित्र काढणं हे सारं समरसून. चित्र किंवा रंगकामात त्यांची काय तंद्री लागायची! तेव्हा हॉस्टेलमधून गावात जायचं असलं, म्हणजे शिक्षकांची परवानगी घ्यावी लागायची. आम्ही मुलं, सर रंगकामात दिसले की मगच परवानगी मागायला जायचो. सर तंद्रीत ‘हूं’ म्हणायचे.. आणि आम्ही धूम ठोकायचो! गावातून आम्ही परत आल्यावर पुन्हा सर विचारायचे, ‘‘कुणाला विचारून गेला होता रे?’’ कधी कधी तर न विचारताच जायचो आम्ही, अन् नंतर द्यायचो ठोकून.. ‘‘सर तुम्हीच तर हो म्हणालात ते चित्र रंगवत होता तेव्हा!’’

सरांचं स्वत:चं एक कपाट होतं. त्यात त्यांचे रंग, पॅड, साहित्य भरलेलं असायचं. या कपाटाची कवाडं कायम खुली असायची माझ्यासाठी. मी ते पाहिजे तेव्हा, पाहिजे तसं वापरायचो. (की नासवायचो?)
आठवीत असताना मी एकदा अचानक आजारी पडलो. सर रात्री रूमवर आले होते. त्यांनी बघितलं, की मी तापाने फणफणतोय. त्यांनी एका मुलाला मेसमध्ये पाठवून मीठ मागवून घेतलं. रात्रभर उशाशी बसून कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्टय़ा ठेवत होते. माझ्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केलं.

ओशो म्हणतात, ‘शाळा तेव्हाच यशस्वी समजाव्यात, जेव्हा मुलांना शाळा सुटल्याच्या घंटेपेक्षा शाळा भरल्याची घंटा अधिक आनंददायी वाटेल’. मला वाटतं, की शिक्षकांच्या तासाच्या बाबतीतही असंच असावं. मुलं कनगरकर सरांच्या तासाची आतुरतेनं वाट पाहायची. आम्ही तर नशीबवानच; कारण सर आमच्याबरोबर हॉस्टेलच्या क्वार्टर्समध्येच राहायचे. त्यामुळे त्यांचा सहवास दिवसरात्र असे. शाळेच्या वेळेव्यतिरिक्तही सरांचे विविध कलेचे प्रयोग चालायचे आणि त्यात आम्हा विद्यार्थानाही ते सामील करून घ्यायचे. त्यांनी मला जीवनाकडे सकारात्मकतेनं बघण्याचा दृष्टिकोन दिला. त्यांच्यामुळे मी छंद जोपासले, रसिकता अंगी आली. जीवनात मिळणाऱ्या या आनंदाबरोबर मला आतापर्यंत मिळालेली दोन पेटंट्स, दोन कॉपीराइट्स या साऱ्या यशाची मुळं शालेय जीवनातच असावीत.

हेही वाचा : आदले । आत्ताचे: एका पिढीच्या अवस्थांतराची नोंद

आजही बैलपोळा, गणेशोत्सव, दिवाळी, संक्रांत इत्यादी सणांना आम्ही बैलजोडी, गणेशमूर्ती, आकाशकंदील, पतंग घरीच बनवतो. गणेशोत्सवात आठवडाभर आधीपासूनच तयारी सुरू होते. सजावट मी आणि मुलं मिळून घरीच करतो. त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. ‘लोकसत्ता’च्या ‘इको फ्रेंडली गणपती स्पर्धे’तसुद्धा नाशिक विभागातून मला आतापर्यंत तीन पारितोषिकं मिळाली आहेत. ही कला आली सरांकडून. दरवर्षी मी परिसरांतील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्यासाठी, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोफत कार्यशाळा घेतो. सरांनी दिलेल्या कलेचा ठेवा पुढच्या पिढीला देण्याचा हा अल्पसा प्रयत्न. १९९३ मध्ये दहावी झाल्यावर आणि नाशिक नवोदय सोडल्यानंतर २०१५ च्या आसपास नवीन संपर्क साधनांमुळे सरांशी पुन्हा संपर्क साधता आला.

सर एकदा सहकुटुंब नाशिकला आले असताना माझ्या घरी आले, मुक्कामी थांबले. मस्त गप्पांची मैफल जमली, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पुन्हा एकदा कपाटातून वॉटर कलर, ब्रश, पॅड बाहेर काढलं. सरांच्या सहवासानं माझी मुलंही खूश झाली. सरांनी एका नाशिक भेटीत आम्हा ‘नवोदयन्स’च्या ‘बच्चेकंपनी’साठी रंगकामाचं एक छोटं प्रात्यक्षिकही घेतलं. सारी मुलं रंगांत खेळली. सरांच्या प्रेमातच पडली. आजही आधुनिक संपर्क माध्यमांद्वारे सरांचं मार्गदर्शन मिळतं. नवा काही प्रयोग केला, काही उचापत्या केल्या, की ते सरांशी ‘शेअर’ होतं. त्यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप कोणत्याही पुरस्कारापेक्षा जास्त मौल्यवान वाटते. ते निवृत्तीकडे झुकलेले असले, तरी तोच उत्साह, तेच कलेप्रति प्रेम आहे. त्यांची भेट आज जवळपास तीस वर्षांनंतरही पुन्हा नवं चैतन्य देऊन जाते.
mahendra.pangarkar@rediffmail.com