रीतसर स्थळ पाहून ठरविलेल्या विवाहामध्ये मुलं-मुली एकमेकांशी काय बोलत असतील? दोन किंवा तीनदा मिळणाऱ्या तुटपुंज्या भेटीमध्ये आयुष्यभराच्या जोडीदाराचा निर्णय ते कसा काय घेत असतील? त्यांच्या आयुष्यभराच्या स्पष्ट कल्पना, शारीरिक गरजा, मानसिक गरजा याचा आलेख त्यांना मांडता येत असेल का? काय संवाद घडला पाहिजे नेमका त्यांच्यात आणि कसा..
ज्यां चा प्रेमविवाह होत नाही, त्यांना कुटुंबीयांनी ठरविलेल्या लग्नाशिवाय पर्याय नाही. आणि सध्या ज्या प्रमाणात वर्तमानपत्रातील जाहिराती, लग्नविषयक वेबसाइट आहेत ते पाहता ठरवून केलेल्या लग्नांची संख्या कितीतरी अधिक आहे असं वाटतं. आणि मी तर अशा ठरवून लग्न करू पाहणाऱ्या शेकडो मुला-मुलींशी सातत्याने बोलत आले आहे.
अशा रीतसर स्थळ पाहून ठरविलेल्या विवाहामध्ये मुलं-मुली एकमेकांशी काय बोलत असतील हा नेहमीच माझ्यासाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. दोन किंवा तीनदा मिळणाऱ्या तुटपुंज्या भेटीमध्ये आयुष्यभराच्या जोडीदाराचा निर्णय ते कसा काय घेत असतील? त्यांच्या आयुष्यभराच्या स्पष्ट कल्पना, शारीरिक गरजा, मानसिक गरजा याचा आलेख त्यांना मांडता येत असेल का? त्यांना नेमकं काय वाटतं? हे मी कायम तपासत आले आहे. अनेक मुला-मुलींना पाहणं वा बघणं ही प्रोसेस अजिबात न पटणारी! पूर्वी या प्रकारच्या कार्यक्रमांना ‘कांदा-पोहे’ म्हणायचे. आम्ही आता हा कार्यक्रम ओळखीचा / परस्पर परिचयाचा म्हणतो.(आणि इतरांनीही म्हणावं असं आम्हाला वाटतं.)
या कार्यक्रमाबद्दल मी जेव्हा मुला-मुलींशी बोलते तेव्हा असं लक्षात आलंय की अशा भेटींबाबत बऱ्यापकी कॅज्युअल अप्रोच आहे. दोघं एकत्र भेटल्यानंतर फॉर्ममध्ये वाचलेल्या माहितीची खातरजमा करण्यातच बराचसा वेळ जातो. आणि त्यानंतर ठराविक प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण होते. उदा. हॉबीज, भविष्यातले प्लान्स, आवडीनिवडी, जॉब प्रोफाइल, स्मोकिंग, िड्रकिंग, तुझ्या अपेक्षा काय, माझ्या अपेक्षा काय, तुझा पगार, माझा पगार, याच्यापलीकडे गाडी जात नाही. या सगळ्या प्रकारांत देहबोलीला अनन्यसाधारण महत्त्व येतं. सगळे अचानक देहबोलीचे तज्ज्ञ होऊन अर्थ आणि निष्कर्ष काढतात. त्यामुळे या विषयाचा झटकन निर्णय घेण्याऐवजी संवाद करणं चांगलं.
मला आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटत आलंय.. ते म्हणजे एखाद्या मॉलमध्ये कित्येक मुलं-मुली आठ-आठ, दहा-दहा ड्रेसची ट्रायल करताना वारंवार दिसतात. याबद्दलचा त्यांचा चांगला अभ्यास असतो. तसं जोडीदार निवडताना मी कसा / मी कशी, असा ‘माझा’ काही अभ्यास आहे का? मी तो करायला हवा हे मला माहीत आहे का ?
आणि हा अभ्यास मनातल्या मनात नाही करता येत. तेव्हा पुढे काही प्रश्न दिले आहेत, त्यांची प्रामाणिक उत्तरं लिहा किंवा टाइप करून सेव्ह करा.
लग्न ठरवण्यापूर्वी हे जरुरीचं आहे.
* मी कशी आहे / मी कसा आहे हे मला माहीत आहे का?
* माझ्या स्वभावामध्ये लवचिकता आहे का? किती?
* तडजोड (adjustments) आणि समझोता (compromise) यातला फरक मला समजतो का?
* माझ्या अपेक्षा काय आहेत? (अपेक्षा म्हणजे तसं असेल तर उत्तम पण थोडी फार तफावत असेल तर फारसा काही फरक पडत नाही.)आणि मागण्या कोणत्या? (मागण्या म्हणजे स्पष्ट आग्रह. इथं माघार नाही.. जसं प्रिया सांगते, मुलगा पन्नास हजारपेक्षा जास्त कमावणारा हवाच आणि सिगारेट नकोच. )
* काय हवंय मला माझ्या आयुष्याकडून? कुणाच्याही आयुष्यात चढ-उतार असतात / असणार आहेत. त्याला तोंड देणं मला जमेल ना? प्रत्येकाच्या जीवनात केव्हाही काहीही अनपेक्षित घडू शकतं, यावर माझा विश्वास आहे ना? की माझं सगळं जीवन विनासायास गुडी गुडी असेल अशा भ्रामक समजुतीत मी आहे?
* लग्नानंतर काय बदल होणार आहे, माझ्या आयुष्यात? कोणता बदल झालेला आवडेल? कोणत्या बदलांमुळे जीवनाला अर्थ येईल?
* काय असतं सहजीवन म्हणजे?
* शारीरिक संबंध येणार याव्यतिरिक्त काय बदल होणार आहेत?
* जोडीदार समजूतदार असावा म्हणजे नेमकं काय करणारा असावा?
* लग्नानंतर नवीन नातं तयार होणार. कसं हवंय हे नातं मला?
* नातं जोपासायचं म्हणजे काय करायचं? नातं जोपासण्यासाठी माझं योगदान काय असू शकतं?
* एकनिष्ठतेच्या माझ्या कल्पना काय आहेत?
* लग्नानंतर माझ्या मित्र-मत्रिणींचं स्थान माझ्या आयुष्यात किती आणि कसं असणार आहे?
* माझ्या जोडीदाराच्या मित्र-मत्रिणींचं स्थान त्याच्या / तिच्या आयुष्यात कसं असलेलं मला आवडेल?
* माझ्याकडे माझ्या भावी जोडीदाराबाबत स्वामित्वाची भावना आहे का?
* लग्नानंतर माझ्या आणि त्याच्या / तिच्या आई वडिलांचं स्थान काय असणार आहे? दोन्ही बाजूंच्या पालकांनी आमच्या संसारात किती प्रमाणात ढवळाढवळ केली तर ती मला चालणार आहे?
* माझा स्वत:चा शोध घेण्याबरोबरच माझ्या होणाऱ्या जोडीदाराचा शोध घ्यायला मला आवडेल का?
* Whether I am ready to explore my partner ? एखाद्या माणसामध्ये रस घेणं, त्याला समजून घेणं, त्याच्या मानसिकतेचा विचार करणं इथं खरं तर नात्याची सुरुवात होते.
असा विचार करत गेलं तर जोडीदार निवडीची प्रक्रिया रंजक होऊ शकेल आणि मग स्वत:च्या लग्नाचं टेन्शन न येता तो सारा प्रवास एक शोधयात्रा ठरेल. लग्नानंतरचं आयुष्य आश्वस्त व्हायला हवं, निर्भर व्हायला हवं, लग्नानं माझं आयुष्य संपन्न व्हायला हवं. लग्नानं माझ्या आयुष्यात व्हॅल्यू अॅडिशन व्हायला हवी.
ठरवून केलेल्या विवाहापूर्वी किमान तीन भेटी तरी व्हायला हव्यात (एखादी अजून मिळाली तर अधिक छान.)असं माझं ठाम मत आहे. या सगळ्या भेटींची तयारी करायलाच हवी. वर लिहिलेले सगळे प्रश्न स्वतला आधीच विचारायला हवेत आणि मगच मुलाला / मुलीला भेटायला जावं.
भेटायला जाताना किमान गोष्टी पाळण्याची गरज असते. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे वेळ पाळणं. वेळ पाळता आली नाही तर समोरच्या व्यक्तीला अपमानास्पद वाटू शकतं. आपला पेहरावही व्यवस्थित असायला हवा. वागणं सौजन्यपूर्ण असायला हवं. अशा प्रकारच्या भेटींमध्ये बोलण्याचा स्वर (टोन) आवाजाची पट्टी ही खूप महत्त्वाची ठरते. किमान पहिल्या भेटीमध्ये तर ह्या गोष्टींकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
समोरच्या व्यक्तीला गप्पांमध्ये सामावून घेता आलं पाहिजे. प्रत्येक बोलण्याच्या शेवटी ‘तुला काय वाटतं?’ असं विचारलं तर वातावरणातला ताण घालवता येऊ शकतो.
अथर्व आणि शाल्मली प्रथम बाहेरच भेटले. सुरुवातीच्या जुजबी बोलण्यानंतर शाल्मली त्याला म्हणाली, ‘मला काय हवंय याबद्दल मी खूप विचार केलाय. माझ्या होणाऱ्या नवऱ्याने त्याच्या २४ तासांपकी मला रोज अर्धा तास द्यायला पाहिजे. हा वेळ दोघांच्या ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त असेल. तसंच तो बेडरूम व्यतिरिक्तही असेल. याबद्दल तुला काय वाटतं?’
अथर्व आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, ‘का हवाय तुला हा वेळ?’
ती म्हणाली, ‘ मला माझ्या जवळच्या माणसांशी गप्पा मारायला आवडतात. त्यातून तो माणूस कळायला सोपं जातं. रोज गप्पा मारत राहिलं की समोरचा माणूस काय विचार करतो? अमुक एखाद्या प्रसंगात वागायची त्याची पद्धत कशी आहे, याचा अंदाज येतो. त्याच्या जवळची माणसं कोणती ते समजतं. त्यामुळे संवाद, सहवास या माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसंच पती-पत्नी नात्यामध्ये पारदर्शकता असायला हवी, असं माझं ठाम मत आहे. म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्याची एखादी मत्रीण असेल तर त्याने मला ते सांगितलंच पाहिजे. हा माझा आग्रह असेल. लपूनछपून कोणतीही गोष्ट माझ्या नवऱ्याने केली तर मला नाही चालणार. भलेही त्याला १५-२० हजार पगार कमी असला तरी चालेल. तुला काय वाटतं याबद्दल?’
अथर्व म्हणाला, ‘ बापरे, तू किती खोल विचार केला आहेस? मी काहीच असा विचार नाही केलेला. मला परत भेटायला आवडेल तुला. मी माझ्या मनाशी काही विचार करून भेटेन तुला. तुला आवडेल ना परत भेटायला ?’
अशा स्वरूपाची तयारी, अभ्यास केला तर मिळणाऱ्या दोन किंवा तीन भेटीसुद्धा जोडीदार-निवडीसाठी पुरेशा ठरू शकतात. एवढी तयारी झाली की मग आता प्रत्यक्ष स्थळ शोधायची तयारी सुरू करायची. स्थळ शोधणं ही सुद्धा एक कला आहे. पाहूया पुढच्या लेखात (६ एप्रिल) ..!
ज्यांचा प्रेमविवाह होत नाही..
रीतसर स्थळ पाहून ठरविलेल्या विवाहामध्ये मुलं-मुली एकमेकांशी काय बोलत असतील? दोन किंवा तीनदा मिळणाऱ्या तुटपुंज्या भेटीमध्ये आयुष्यभराच्या जोडीदाराचा निर्णय ते कसा काय घेत असतील? त्यांच्या आयुष्यभराच्या स्पष्ट कल्पना, शारीरिक गरजा, मानसिक गरजा याचा आलेख त्यांना मांडता येत असेल का?
आणखी वाचा
First published on: 23-03-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Things you should know before doing arranged marriage