scorecardresearch

बदललेल्या भूमिका

हळवेपणा ही कमजोरी नसते तर ती तुमची ताकद असते आणि नाते घट्ट बनवते हे मी त्यादिवशी अनुभवले.  

(संग्रहित छायाचित्र)

मानसी होळेहुन्नूर

‘‘पुरुष हा स्त्रीपेक्षा उच्च असला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत; अशा समजात आणि समाजात वाढलेले आपण दोघे. पण तू हे ओझं सहजपणे खाली टाकून दिलंस. मलाही अर्थात पारंपरिक स्त्रीपण झुगारून समाजाच्या अर्थानं पुरुषत्व स्वीकारावं लागलं, पण ते तुलनेनं सोपं होतं. असं ‘भूमिका बदलून’ जगण्याची स्वप्न पाहणारे खूप जण असतात, परंतु या भूमिका फार काळ करणं बहुतेकांना शक्य होत नाही.’’

कॉलेजचे शेवटचे वर्ष होते ते, मी अगदी प्रेमात बुडून वगैरे गेले नव्हते, पण तू आवडत होतास आणि तू नाही म्हणालास तरी चालणार होते, पण तुला विचारलेच नाही, असे व्हायला नको म्हणून मी आपले विचारून टाकले तर तू आपला उगाच भाव खात बसलास. त्यावर तुझे म्हणणे की, तू बघत होतास की मी माझ्या निर्णयावर ठाम आहे ना. तेवढंच नाही, भेटल्यावर पण पहिला अर्धा तास तू मला ऐकवत होतास, ‘‘मी नोकरी करणार नाही, मला भरपूर फिरायचे आहे, कदाचित मी स्वत:ची ट्रॅव्हल एजन्सी काढेन, माहीत नाही, तू काय करायचे हे तू ठरव, पण माझ्यावर विसंबून संसाराची स्वप्ने बघशील तर अपेक्षाभंग नक्कीच होईल. पण तू घर चालवलंस तर मला काही प्रॉब्लेम नसेल.’’ त्याचक्षणी माझ्या तोंडून बाहेर पडले ‘‘दॅट्स माय बॉय.’’

मग काय त्यानंतर सगळ्याच गमतीजमती होत्या, म्हणजे दोन वर्ष मी पीजी केलं आणि लगेच नोकरी धरली, पैसे बरे मिळायचे. त्यामुळे कुठेही गेलो तरी खर्च मीच करायचे. बरं हे सगळे होत असताना तुझा मेल इगो दुखावला असेल असे मला कधीच वाटले नाही, कारण माझ्याच समोर तू एकदा माझ्या बाबाना सांगितले होतेस, ‘काका ती माझ्यापेक्षा जास्त कमावते याचा मला त्रास नाही आनंद होतो. तिच्यात तेवढी क्षमता आहे म्हणून ती माझ्यापुढे आहे. केवळ एक पुरुष म्हणून मी तिला आवरणे हा तिच्यावर अन्याय असेल. आता राहिला तिने माझा खर्च करायचा तर मी घर सांभाळेन, ती घराबाहेरचे सांभाळेल. आम्ही जरा आमच्या भूमिका बदलतोय एवढेच.’

योगायोग हे आपल्या आयुष्याचा भाग आहेत, असं मानणारी मी आणि ‘इट जस्ट हॅपन्स’ म्हणणारा तू कसे काय एकाच वर्षी एकाच कॉलेजात आलो रे? मी सायन्सची विद्यार्थी आणि तू आर्टसवाला. तू ६ फूट उंच आणि मी

५ फूट २ इंचावर समाधानी. रंग म्हणशील तर तो मात्र दोघांचा जवळपास सारखा होता. आपण प्रथम भेटलो ती भेटसुद्धा गमतीशीर होती. पार्किंगमधून गाडी काढता काढता तुझ्या गाडीच्या धक्क्याने एक बाईक पडली आणि तू तुझी बाईक बाजूला लावून ती पडलेली बाईक नीट ठेवत होतास, तेव्हाच नेमकी मी तिथे आले. पडलेली बाईक माझीच होती आणि मला वाटले की तू ती घेऊन चालला आहेस. मग काय, माझ्या फुल रावडी स्टाईलमध्ये मी पहिले थेट शिव्याच घातल्या. तू काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होतास, पण समोरच्याला बोलू देईन ती मी कसली! पण तू माझ्यापेक्षाही महान. जोरात ओरडलास, ‘अहो ताई, तुमची पडलेली गाडी उचलून ठेवत होतो, ती तशीच खाली पडून राहू देऊ की उचलून ठेवू? ५ सेकंद विचार करा आणि उत्तर द्या.’ तुझ्यासारख्या हँडसम मुलाच्या तोंडून ‘ताई’ ऐकून सिनेमात ओरडतात तसे दोन्ही कानांवर हात ठेवून ‘नहीऽऽऽ’ असे जोरात ओरडावेसे वाटले, पण मी ‘उचलून ठेव’ एवढेच काहीसे कसेबसे पुटपुटले. त्यानंतर माझा चेहरा कसा झाला होता मला माहिती नाही. परंतु तिथून निघायच्या आधी तू स्वत:हून माझी ओळख करून घेतली, हात पुढे करून, मग येता जाता दिसलोच तर हसायचो. हे प्रकरण पुढे कसे न्यायचे हा मला पडलेला प्रश्न होता, तुलाही तो पडला होता, असे तू नंतर मागाहून सांगितलेस, पण मला काही ते खरे वाटत नाही. मला तुमच्या ट्रेकिंग ग्रुपबद्दल कळले आणि मी घुसलेच त्या ग्रूपमध्ये आणि नंतर तुझ्या आयुष्यातही. मीच तुला लग्नाबद्दल विचारले. तुझ्या मित्रांनी त्यावरून तुला चिडवले, पण तू त्यांना शांतपणे म्हणालास, ‘प्रत्येक वेळी मुलानेच विचारले पाहिजे असा काही नियम आहे का?’ आपल्या लग्नाविषयी आपल्यापेक्षा इतरांनाच जास्त प्रश्न होते. लग्नाच्या दिवसापर्यंत तुझे तुलाच नक्की ठरवता येत नव्हते काय करायचे आहे. लग्नात कोणीतरी तुला चिडवले, ‘अरे काय हे, लग्न करतोयस, पण नोकरीचा पत्ता नाही.’ त्यावर तू हसून म्हणालास, ‘अरे बाबा, म्हणून तर कमावती बायको केली ना. स्त्रीला दुय्यम लेखून पुढे जाण्यात पुरुषार्थ नसतो, स्त्रीबरोबर पुढे जाण्यात असतो.’ आपल्यामध्येही तू मलाच पुढे ढकललंस आणि स्वत: मागून चालत राहिलास. खंबीरपणे. लग्नाच्या एक आठवडा आधी तू तुझ्या-माझ्या आईबाबांना जेवायला बोलावलं होतंस. स्वत:च सगळा स्वयंपाक केला होतास आणि त्यानंतर सगळ्यांच्या समोरच मला विचारलं होतंस, ‘तुला अजूनही माझ्याशी लग्न करायचे आहे ना?’ तुला नोकरी नव्हती आणि आधीच्या छोटय़ा मोठय़ा असाईनमेंटमधून मिळालेल्या पैशातले २ लाख रुपयांचे सेव्हिंग एवढीच काय ती तुझी इस्टेट होती. एक बाईक, महागडा-मोलाचा कॅमेरा, लॅपटॉप असे काही सामान होते. आईबाबांचे राहते घर होते, पण ते तुझ्या खिजगणतीतही नव्हते. माझ्या निर्णयाचा मला पश्चात्ताप होत नाहीयेना, मी अजूनही माझ्या निर्णयावर ठाम आहे, हे बघून माझ्यापेक्षा तुला झालेला आनंद माझ्यापर्यंत न सांगताच पोचला. खरं तर माझ्यापेक्षाही जास्त हळवा तू होतास. हळवेपणा ही कमजोरी नसते तर ती तुमची ताकद असते आणि नाते घट्ट बनवते हे मी त्यादिवशी अनुभवले.

लग्नानंतर आणि आधी असा मला काहीच फरक जाणवला नाही. आईच्या सावलीतून मी अलगद तुझ्या हाती आले होते. मी नोकरी करते म्हणून तू स्वत:च काही कामे स्वत:कडे ओढून घेतली होती, त्यातले महत्त्वाचे होते स्वयंपाकाचे. मला खरेच कधीच स्वयंपाक करायला आवडले नाही, तुला मात्र त्याचा कधीच कंटाळा नाही. नाही म्हणायला, लग्नानंतर काही काळ तू एक नोकरी पकडली होतीस. तेव्हा मी तुला म्हणायचेसुद्धा, आता तू पण नोकरी करतोस तर दोघे मिळून स्वयंपाक करू. त्यावर तू फणकाऱ्याने म्हणाला होतास, ‘मदत करायचीच असेल तर बाकीच्या गोष्टींमध्ये कर, स्वयंपाकघर माझे आहे, त्यात तू लुडबुड केलेली मला आवडणार नाही.’ आवडत नसूनही तू जवळपास दोन-अडीच वर्ष नोकरी केलीस. मी कधी विचारलं नाही तुला, पण तुझं तुलाच वाटत होतं का, आपण पुरुषासारखे पुरुष असून बायकोच्या जीवावर जगतो.. समाजानं परंपरेनं दिलेलं पुरुषपण सोडणं सहज नसतं म्हणूनच मी तुला कधीही त्याबद्दल विचारलं नाही. पण मनाविरुद्ध स्वीकारलेलं हे औटघटकेचं पुरुषपण तू संधी मिळताच झुगारून दिलंस. पिल्लू जन्माला आलं आणि पिल्लाचं कारण पुढे करून गळ्यातली नोकरीची धोंड बाजूला सारलीस.

डॉक्टरांनी जेव्हा कापडात गुंडाळलेला तो एवढासा जीव तुझ्या हातात दिला तेव्हा तू चक्क रडलास. काही मिनिटांनी मला पहिलं फीड करायचे होते, तेव्हा माझ्यासमोर बसून उशी लावून पिल्लाला धरून होतास, हाताला रग लागली तरी एका अक्षरानेही बोलला नाहीस.  पुरुष हा स्त्रीपेक्षा उच्च असला पाहिजे प्रत्येक गोष्टीत, अशा समजात आणि समाजात वाढलेले आपण दोघे. पण तू हे ओझं सहजपणे खाली टाकून दिलंस. मलाही अर्थात पारंपरिक स्त्रीपण झुगारून समाजाच्या अर्थानं ‘पुरुषत्व’ स्वीकारावं लागलं, पण ते तुलनेनं सोपं होतं. असं ‘भूमिका बदलून’जगण्याची स्वप्न पाहणारे खूप जण असतात, परंतु या भूमिका फार काळ करणं बहुतेकांना शक्य होत नाही. घेतला वसा टाकून देणारेच अधिक असतात. पण या सगळ्यातून तुला स्त्री कळली आणि मला पुरुष कळला, जे पारंपरिक पती-पत्नीच्या नात्यात कधीच शक्य होत नाही.

लोकांना काय वाटेल? याची पर्वा न करता, नोकरीच्या बंधनात न अडकलेलं, वाटेल त्या गोष्टी करण्यासाठी भरपूर वेळ असलेलं आणि कमावण्याच्या सक्तीचं ओझं नसलेलं आयुष्य तुला हवं होतं. मी ते तुला देऊ शकले, यात मला समाधान आहे. तू खूप भटकलास, फूड ब्लॉग लिहिलास, जगभर तुझ्या ब्लॉग्सचे चाहते तयार झाले तरीही तुला घरच्या जबाबदाऱ्या अजूनही तेवढय़ाच महत्त्वाच्या वाटतात. पिल्लूला तूच वाढवलंस.. आणि या सगळ्या धबडग्यात पुरुषाची भूमिका करता करता मी ‘पुरुष’ झाले नाही याचं श्रेयही तुलाच आहे. तुझा धक्का लागून पडलेली माझी मोटरसायकल तूच नीट लावून दिली होतीस..!

manasi.holehonnur@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व तिच्या नजरेतून तो ( Tichya-najretun-to ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mansi holehunnur article on women role in life

ताज्या बातम्या