scorecardresearch

सुखाने भांडू आपण

‘तो’, ‘ती’ आणि ‘ते’ यांच्यात मैत्री होणं किती आवश्यक आहे हे पदोपदी जाणवत राहतं.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘‘‘तो’, ‘ती’ आणि ‘ते’ यांच्यात मैत्री होणं किती आवश्यक आहे हे पदोपदी जाणवत राहतं. मैत्रीमुळे ‘माणूस’ म्हणून आपल्याला एकमेकांना घडवता येईल. आपल्या सगळ्या प्रकारच्या भीती, असुरक्षितता एकमेकांना सांगता येतील. समाजानं ‘पुरुष’ म्हणून तुला दिलेलं जबाबदारीचं ओझं, त्याचं वाटणारं दडपण ‘ती’ कमी करू शकेल. निखळ मैत्रीत भांडलो तरी फरक पडत नाही. मैत्रीत जितका मोकळा आणि निर्भय संवाद होतो तितका कुठेही नाही होऊ शकत.’’ समस्त ‘तो’स ‘ती’चे पत्र. प्रिय समस्त ‘तो’,

पत्रास कारण की, तुझ्याशी संवाद करावासा वाटतो. का करायचा संवाद? कारण तुझ्याशी कुठलाही नफा-तोटय़ाचा हिशेब न ठेवता, उगाचच भावनिक कढ न काढता आणि गोंधळात टाकणारा बुद्धिवाद न मांडता तुझ्याशी मैत्री करायची आहे म्हणून हा संवाद, हे पत्र!

‘तो’, ‘ती’ आणि ‘ते’ यांच्यात मैत्री होणं किती आवश्यक आहे हे पदोपदी जाणवत राहतं. अफाट मैत्री करण्याची ताकद कशी कमवायची याच्यावर आपण विचार केला पाहिजे, असं आजकाल वाटू लागलं आहे. माणसं असतातच वेगवेगळी. त्यांच्या आवडीनिवडी, सवयी वगैरे पण सगळ्यांसोबत राहता येण्याची क्षमता येणं आणि ती अशी कोणाची तरी गुलामी म्हणून किंवा कोणावर तरी सतत सत्ता गाजवून सोबत राहता येण्याची क्षमता नाही म्हणत तर सौहार्दाचं जगणं म्हणते आहे मी!

मैत्रीमुळे ‘माणूस’ म्हणून आपल्याला एकमेकांना घडवता येईल. आपल्या सगळ्या प्रकारच्या भीती, असुरक्षितता एकमेकांना सांगता येतील. कधी कधी बायका नाही त्या आणि नको त्या गोष्टींचे ‘ब्रह्मराक्षस’ करून ठेवतात. ते राक्षस तू टाचणी लावून फुगा फोडल्यासारखे फोडून टाकशील, तर कधी तुला वाटणारी कशाची तरी भीती, समाजानं ‘पुरुष’ म्हणून दिलेलं जबाबदारीचं ओझं, त्याचं वाटणारं दडपण ‘ती’ कमी करू शकेल. कदाचित तुला वाटेल, हे काय एरव्हीदेखील होतंच की, पण त्या होण्याचा जो तळ असतो ना, त्याचा पोत जो असतो तो बरेच वेळा ‘मैत्री’ हा नसतो. तो ‘मैत्री’ नसल्यामुळे त्यातून एकमेकांवर सत्ता गाजवणं, एकमेकांसाठी अर्थहीन ‘पझेसिव्ह’ होणं आणि असं ना काही तरी विचित्र गुंतागुंतीचं आणि हिशेबी बनून जातं.

निखळ मैत्रीत भांडलो तरी फरक पडत नाही, एकमेकांच्या मनाच्या चिंध्या केल्या तरी चालून जातं किंवा दोघांपैकी कोणी एक यशस्वी झालं आणि कोणी नाही झालं तरीदेखील फरक पडत नाही. काहीही झालं तरी शेवटी मैत्रीत रात्री अडीच वाजतासुद्धा एकमेकांना फोन लावता येतो किंवा भांडल्यावरदेखील नंतर एकमेकांना मिठी मारता येते. मैत्रीत जितका मोकळा आणि निर्भय संवाद होतो तितका कुठेही नाही होऊ शकत.

तू कसा ‘तिच्यावर’ वर्षांनुवर्षे अन्याय केला, पुरुषसत्ताक व्यवस्थेने कसं तिला वेठीस धरलं या सगळ्याचं जिथल्या तिथं महत्त्व आहेच, ती म्हणून एक वस्तुस्थिती होतीच आणि आहे पण आता एकमेकांवर आरोप करणं थांबवू या. ‘तिचं’ आणि ‘त्याचं’ असं का झालं, ‘तिचं’ आणि ‘त्याचं’ असं का होत राहतं हे पोटतिडिकीनं ‘एकत्र’ समजून घेऊ या. त्यावर बोलू या, मोकळेपणानं बोलू या. या मोकळ्या संवादाची सध्या ऑक्सिजनसारखी गरज तयार झाली आहे.

आपण बदलत गेलो आहोत, सुज्ञपणानं आणखी सकारात्मकतेच्या दिशेने दोघेही बदलू या. ‘तूच बदल, तूच समजून घे, तूच हट्ट पुरव, तूच सांभाळ’ या एकतर्फी प्रवासाला ताबडतोब ब्रेक लावू या. स्वत:ची जबाबदारी स्वत: घेणं, स्वत: निर्णय घेणं, तो तडीस नेणं, निगुतीनं आपलं काम मन लावून करत राहणं.. आणि काय काय.  पटापट लोक आत्महत्या करतात रे आजकाल. जगायलाच धाडस लागतंय रे. ते ‘धाडस’ वाळूत लपलेल्या थंडगार झऱ्यासारखं आहे. चल, तो झरा शोधू या.

मैत्रीमुळे आपल्याला जगण्याच्या प्रचंड शक्यता अजमावता येतील. जगण्याच्या वेगवेगळ्या शक्यता कळणं, त्या वैतागानं नाही तर समजून उमजून पचवण्याची शक्ती कमावणं खूपच महत्त्वाचं आहे रे! तुलाही हे जाणवत असेल. आपल्यापेक्षा विरुद्ध मत असणाऱ्या, आपल्यापेक्षा भिन्न स्वभाव असणाऱ्या कोणत्याही माणसासोबत आत्मविश्वासानं काम करता येण्याची ‘तिची’ खूप इच्छा आहे तशी ‘तुझी’देखील आहेच की. केवळ इतकंच नाही तर आपल्यापेक्षा पाचपट, दसपट हुशार असणाऱ्या लोकांसोबत न लाजता आपल्याला काम करता आलं पाहिजे असं तुलाही वाटतं ना, मग याचा एकच उपाय आहे तो म्हणजे मैत्री करू या. मैत्रीत नाही फरक पडत, मग की कोण हुशार आणि कोण ढ किंवा मग कोण कसं टेक्नोसेव्ही आहे किंवा नाही ते!

ही कामं बायकांची, ही कामं पुरुषांची याचं पालुपद बंद करून टाकू या आपण दोघं. फार बोअर होतंय ते आता. एकमेकांची आणि एकमेकांसाठीची कामे विनालाज आणि विनाकौतुकाची अपेक्षा आपल्याला करता आली पाहिजेत. आपल्याला बिनदिक्कत एकमेकांकडे येता-जाता आलं पाहिजे. एकमेकांसोबत किंवा एकटय़ानं विनाभीती जगभर भटकता आलं पाहिजे. आपण हे करू या का प्लीज. स्पर्धा नको वाटते. ‘तिच्याशी’, ‘तुझ्याशी’, ‘त्याच्याशी’ कोणाशीच! ‘हेल्दी कॉम्पिटिशन’ वगैरे तर इतका भंपकपणा वाटतो ना! उगा हे मार्केट फोर्सेस चेतवत राहतात तुला आणि मला. काहीही अर्थ नाहीये त्याला, त्यांना म्हणू या आपण मिळून ठामपणे ‘नाही पळणार जा! गेलास उडत!’ तुला हे आदर्शवादी वाटतं आहे का, पण नाही. अरे, खरंच काही गोष्टींना आपण ‘नाही’ म्हणू शकतो. तुझी ‘नाही’ म्हणताना जीभ रेटत नाही ना.. माझं पण होतं तसं, मलासुद्धा खूप भीती वाटते, अरे पण, आपण एकमेकांसोबत असलो, आपणच एकमेकांविरुद्ध धावायला नकार दिला, की बघ काही तरी समाधानाचं होऊ  शकेल.

मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे, खूप मनापासून. तुझ्यावर हक्क गाजवायचा किंवा अधिकार मिळवायचा म्हणून नाही, तर मी एक माणूस आहे आणि तूसुद्धा एक माणूस आहेस म्हणून मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. आपल्याला एकमेकांची गरज आहे, हा ‘विश्वास’ आपल्याला खूप मदत करेल जगणं सहज करायला, सोपं नाही म्हणते मी, सोप्पं काहीच नसतं. अवघड असते परिस्थिती, जवळपास ९५ ते ९७ टक्के आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, स्वत:च्या क्षमता आपण पूर्णपणे वापरत नाही, आळस पोसत राहतो, पण आपण एकमेकांवर विश्वास ठेवला तर थोडी तरी सहजता येईल आपल्या जगण्यात. नुसतं स्वत:वर विश्वास ठेवून नाही होत अरे! पोटात खड्डा पडतो अनेक वेळा.. तुझ्यासुद्धा ना! तुझ्यावर विश्वास ठेवता आला ना, की मला माझ्यावर विश्वास ठेवता येईल, माझ्या भवतालावर विश्वास ठेवता येईल. हा विश्वास आपल्याला जगण्यावर निष्कलंक श्रद्धा मिळवायला मदत करेल. मला बघायची रे त्या बौद्धिक परिपक्वतेतून आलेली श्रद्धा, नम्रता आणि शांत भाव कसा असतो ते, चल ना, दोघेही मिळून बघू या.

मी ‘फ्लेमिश हेवन’ नावाचा एक बेल्जियमचा सिनेमा पाहिला होता अरे. सहा वर्षांच्या एलिन नावाच्या एका मुलीची ती गोष्ट होती. तिची आई आणि आजी हायवेवर एक वेश्यागृह चालवत असतात. एलिनला तिची आई कामाच्या ठिकाणी कधीही घेऊन जात नसते. तिच्या आईचा एक मित्र असतो. त्याचं नाव असतं डिक. तो बस ड्रायव्हर असतो. एलिनसाठी तो काळजी घेणारा, तिच्यावर खूप माया करणारा डिक अंकल असतो. एलिनकडे बघायला आईला जेव्हा वेळ नसतो तेव्हा डिक अंकल तासन्तास एलिनला सांभाळत असतो, तिच्याशी खेळत असतो. तर ती जी एलिन असते तिच्या सहाव्या वाढदिवसाच्या दिवशी स्वत:बरोबर घेऊन जाते. आई तिला कारमध्ये बसवते आणि म्हणते, तू इथेच थांब. मी जरा आत जाऊन येते. ती तिच्या व्यवसायाच्या ठिकाणी येते. इकडे छोटी एलिन कारमध्ये कंटाळून जाते, बाहेर पडून, आई गेली तिथे येते तर तिथे एक पुरुष तिचं लैंगिक शोषण करतो. त्यानंतर.. एलिन घाबरलेली राहते. कोणाजवळच जात नाही. आईनं तिला कितीही जवळ घेतलं तरीही ती घाबरलेलीच राहते. तिच्यावर खूप मनापासून प्रेम करणाऱ्या त्या डिक अंकलकडेदेखील ती जात नाही. तिला पुरुषस्पर्शाची भीती वाटू लागते. तिच्या आईला काय करावं ते कळत नाही. पोटात गोळा आला होता माझ्या ती फिल्म पाहताना. पण खरं सांगू, सिनेमा संपला तेव्हा मला कळलं की, ‘तू’ किती महत्त्वाचा आहेस! कारण सिनेमात शेवटी एलिनची भीती कधी जाते माहितीये, जेव्हा शेवटी अजिबात न घाबरता ती तिच्या डिक अंकलला म्हणते, ‘तू मला थोपटून झोपव.’ एलिनला तेव्हा आईच्या स्पर्शाइतका, किंबहुना त्याहून अधिक उबदार, अधिक आश्वासक डिक अंकलचा, ‘तुझा’ स्पर्श महत्त्वाचा वाटतो आणि ती गोड छोकरी गाढ आणि निर्धास्तपणे झोपी जाते. अशी ही गाढ आणि निर्धास्त झोप मिळवण्याचा आपल्या दोघांनाही अधिकार आहे

आपण एकमेकांवर विश्वास ठेवू या. हा विश्वास, ही आश्वासकता केवळ मैत्रीने शक्य होईल रे..

मैत्री करायची आहे तुझ्याशी.. तू करशील मैत्री?

तुझी

समस्त ‘ती’

madhavi.wageshwari@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व तिच्या नजरेतून तो ( Tichya-najretun-to ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Open letter to my best guy friend