नीरजा

स्त्रीनं कसं असावं, हे समाजानं तिला ठरवून दिलं आणि तिला लहानपणापासूनच त्याचे धडे मिळू लागले. स्त्री-पुरुषांच्या समाजात तिनं दुय्यमत्व सहज स्वीकारलं ते यामुळेच. सिमॉन द बोव्हार या फ्रेंच लेखिकेचं ‘द सेकंड सेक्स’ हे १९४९ मध्ये प्रसिद्ध झालेलं पुस्तक या विषयाचे अनेक पदर उलगडतं. आजही कालसुसंगत असलेलं हे पुस्तक म्हणूनच प्रत्येकानं वाचायलाच हवं. 

ancient time why women are healthy
पूर्वीच्या स्त्रिया एवढ्या निरोगी कशा होत्या? दैनंदिन काम करताना ‘हे’ पाच आसन करीत, पाहा VIDEO
Gandhis idea of ​​equality between men and women
गांधींचा स्त्रीपुरुष समता विचार
smoking, addiction,
धूम्रपानातही स्त्रीपुरुष भेद!
Kerala government schools gender neutrality policy
पाठ्यपुस्तके, गणवेश आणि बरंच काही! केरळने शालेय शिक्षणात राबवलेले लिंगनिरपेक्ष धोरण काय आहे?
maharshi dhondo keshav karve
झोपडीत सुरू केलेली शाळा ते महिला विद्यापीठाचा वटवृक्ष- महर्षी कर्वेंंच्या द्रष्टेपणाची कहाणी
Jitendra Awhad Post Manusmruti Sholkas
“व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव, सहज शृंगार चेष्टेने..”, मनुस्मृतीतली २४ तत्त्वं सांगणारी जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत
nick bostrom points out risk arises from ai
कुतूहल : निक बॉस्त्रॉम्
bold novel on an uncommon subject dubhangalel jivan
अचर्चित विषयावरची धाडसी कादंबरी

१९७५ ला ज्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची घोषणा करण्यात आली, तो दिवस येत्या ८ मार्चला आपण साजरा करतोय. स्त्रियांसाठी असा खास दिवस राखून ठेवण्यासाठीच केवळ नाही, पण त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं या समाजात कायमचं स्थान मिळावं म्हणून जगभरातील अनेक कार्यकर्ते, लेखिका, विचारवंत यांनी स्त्रीच्या शोषणाची आणि या समाजव्यवस्थेत असलेल्या तिच्या स्थानाची मांडणी केलीच, पण सातत्यानं तिच्या आत्मसन्मानाचा, तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मुद्दा लावून धरला. यातली एक महत्त्वाची मांडणी आहे, ती १९०८ मध्ये फ्रान्समध्ये जन्मलेल्या सिमॉन द बोव्हार यांची. ‘द सेकंड सेक्स’ हे त्यांचं पुस्तक १९४९ मध्ये प्रसिद्ध झालं आणि जगभरातील स्त्रियांना प्रथमच त्यांचं असं एक विधान मिळालं.

स्त्रीच्या जीवशास्त्रीय आणि सामाजिक स्थानाचा, तिला दिलेल्या दुय्यमत्वाचा विचार करतानाच लहानपणापासून केलेल्या तिच्या सामाजिक आणि भावनिक जडणघडणीची, तिच्या लैंगिक प्रेरणांबरोबरच तिच्या समलैंगिकतेची अगदी सविस्तर चर्चा सिमॉन या पुस्तकात करतेच, पण त्याबरोबर तिच्या मुक्ततेची झालेली सुरुवातही अधोरेखित करते. या समाजव्यवस्थेनं प्रथम स्थानावर ठेवलेल्या पुरुषाच्या मानसिकतेबरोबर दुय्यम स्थानावर लोटलेल्या स्त्रीच्या ठरवून घडवलेल्या मानसिकतेची, तसंच विविध पातळय़ांवर झालेल्या तिच्या शोषणाची कथा विविध उदाहरणांतून उलगडून दाखवते. स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला आल्यावर या समाजात राहताना झालेली त्यांची जडणघडण कोणत्या प्रकारे काम करत असते याचं नेमकं विवेचन तिनं या पुस्तकात केलं आहे. 

जीवशास्त्रीय फरक सोडला, तर कोणतीही व्यक्ती ‘स्त्री’ किंवा ‘पुरुष’ म्हणून जन्माला येत नाही, तर ही समाजव्यवस्था त्यांना तसं घडवते, याची जाणीव स्त्रीवादाचं ‘बायबल’ समजलं गेलेलं हे पुस्तक संपूर्ण जगभरातील स्त्री-पुरुषांना करून देतं. सिमॉन तिच्या या पुस्तकाची सुरुवात करतानाच म्हणते, की ‘One is not born,  rather becomes,  a woman’. माणसातला जीवशास्त्रीय फरक हा तुमचं लिंग ठरवत असतं.  पण जी स्त्री आणि जो पुरुष आपण पाहतो आहोत, ते या समाजानं, या संस्कृतीनं घडवलेले आहेत, असं सिमॉन म्हणते.

उत्क्रांती आणि संस्कृतीचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं, की आदिम काळात आपल्या विविध भुकांची जबाबदारी घेणारी स्त्री ही मुक्त होती. विवाहसंस्था जन्माला आल्यावर स्त्री एका पुरुषाच्या सोबत राहू लागली. हळूहळू पुरुषानं सारी सूत्रं हातात घेतली आणि स्त्रीला घरात बंदिस्त करून टाकली. हा एका दिवसात झालेला बदल नव्हता. काळाच्या ओघात मातृसत्ताक समाज अस्ताला गेला. काही अपवाद वगळता ज्या ज्या प्रदेशात नागरिकीकरण झालं त्या त्या प्रदेशात पुरुषसत्ताक पद्धती रुजत गेली. सत्तासंघर्ष आणि युद्ध यामुळे पुरुष जास्तीत जास्त आक्रमक होत गेला. आणि स्त्रियांसाठी नवनवे नियम केले गेले. आज जगभरातील जवळजवळ सगळय़ाच संस्कृती या पुरुषप्रधान संस्कृती आहेत. युरोप- अमेरिकेतही एकोणिसाव्या शतकापर्यंत स्त्रीची परिस्थिती वेगळी नव्हती. कधी तरी, कुठे तरी एखादी स्त्री आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करत होती. स्वतंत्र अस्तित्व आपल्यालाही आहे हे ठासून सांगत होती; पण स्वत:च्या अस्तित्वाविषयी प्रश्न विचारणाऱ्या आणि त्याविषयी लिहिणाऱ्या स्त्रिया खूपच कमी होत्या. कधी आपली स्त्री म्हणून असलेली ओळख लपवत, तर कधी स्त्री म्हणून घालून घेतलेल्या आपल्या मर्यादा जपत स्त्रिया लिहीत होत्या. त्या काळात युरोप-अमेरिकेत आत्मभान आलेल्या काही स्त्रिया गुप्तपणे भेटत होत्या आणि आपल्या हक्कांसाठी भांडायलाही लागल्या होत्या. पण स्त्रीच्या शोषणाचा आणि दुय्यमत्वाचा हा प्रवास नेमका कसा झाला याची शास्त्रशुद्ध आणि विस्तृत मांडणी मात्र कोणी केली नव्हती आणि ते काम हाती घेणं त्या काळात तसं कठीणही होतं. मात्र फ्रान्समध्ये जन्मलेल्या सिमॉन द बोव्हारनं या दुय्यम स्थानवर असलेल्या स्त्रीच्या शारीरिक, मानसिक आणि समाजानं केलेल्या पारंपरिक जडणघडणीचा अभ्यास करण्याचं ठरवलं.

‘द सेकंड सेक्स’ या ग्रंथातून सिमॉननं स्त्रीच्या जन्मापासून हा समाज तिला कसा घडवत जातो याची एकूण चार भागांत एक विस्तृत मांडणी केलीच, पण तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचा उच्चारही केला. स्त्रीचं बालपण, तारुण्य, तिच्या लैंगिक प्रेरणा,  लग्नसंस्थेपासून ते वृद्धापकाळापर्यंतची तिची परिस्थिती आणि त्यात असलेलं तिचं स्थान याविषयी ती बोलतेच, पण त्याबरोबरच बाईचं स्वत:च्या प्रतिमेवरचं प्रेम, तिचं आसुसून प्रेमात पडणं, त्या प्रेमाचं गूढ संमोहन, इत्यादीविषयी सांगताना त्याचं समर्थनही करते. या समाजरचनेत स्त्रीला कशा प्रकारे गृहीत धरलं गेलं याविषयी ती बोलतेच, पण तिचं अवमूल्यन करून तिला दुय्यम स्थानावर कसं फेकलं गेलं, हेही विविध उदाहरणं देऊन स्पष्ट करते. स्त्रीनं सुंदर दिसावं, आपल्या पुरुषाला रिझवावं, त्याचा वंश वाढवावा आणि कुटुंब सांभाळावं, अशी अपेक्षा करणाऱ्या पुरुषानं तिच्याकडे एक उपभोग्य वस्तू आणि आपल्या मालकीची गोष्ट म्हणून पाहिलं, हे सांगताना मर्दपणाची अनेक मिथकं, फ्रॉईडसारख्या वेगवेगळय़ा मानसशास्त्रज्ञांची विश्लेषणं, सर्वेक्षणं, मुलाखती आणि संशोधनातून पुढे आलेली उदाहरणं आणि आकडेवारी वापरत ती त्यावर भाष्यही करते. हक्र्युलस, अकिलीस, डेव्हिड, नेपोलियन अशा अनेक ‘मर्दा’समोर एखाद्-दुसऱ्या ‘जोन ऑफ आर्क’ या स्त्रीचं उदाहरण समोर येण्याची कारणं पुरुषी मानसिकतेत ती शोधतेच, पण बालपणातील मुलामुलींच्या मानसिकतेवर बारकाईनं प्रकाश टाकते. मुलामुलींच्या वर्तणुकीत वयाच्या तीनेक वर्षांपर्यंत स्त्री-पुरुष म्हणून कसलाच फरक नसतो, हे निरीक्षण नोंदवतानाच वयात येणाऱ्या मुलामुलींच्या मनात एकमेकांविषयी नेमक्या काय भावना निर्माण व्हायला लागतात आणि त्यात नेमका कोणता फरक असतो, हे सांगताना ती म्हणते, ‘The adolescent boy,  too,  undoubtedly dreams of woman,  he longs for her;  but she will never be more than an element in his life;  she does not sum up his destiny.  But the girl,  since her childhood and whether she intend to stay within or go beyond the bounds of femininity,  has looked to the male for fulfilment and escape;  he is the liberator;  he is rich and powerful;  he holds the key to happiness;  he is Prince Charming… या पुस्तकात सिमॉन स्त्री आणि पुरुषांच्या लैंगिक प्रेरणांविषयी बोलतेच, पण समलैंगिकतेबद्दलही सविस्तर चर्चा करते. ज्या काळात पाश्चात्त्य देशातही यावर चर्चा करणं अमान्य होतं, त्या काळात सिमॉन या विषयांवर लिहीत होती. समलैंगिकतेचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पदर जाणून घेत शास्त्रशुद्ध चर्चा करत होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे,  ‘Homosexuality is an attitude chosen in certain situations-  that is,  at once motivated and freely adopted.  No one of the factors that mark the subject in connection with this choice-  physiological conditions,  psychological history,  social circumstances-  is the determining element,  though they all contribute to its explanation.’ सिमॉनच्या मते, लग्न ही गोष्ट या समाजानं स्त्रीला पारंपरिक पद्धतीनं दिलेलं प्राक्तन आहे. ती म्हणते, ‘Marriage is the destiny traditionally offered to woman by society.’ प्रजननासाठी आणि लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी असलेली ही व्यवस्था प्रेमावर आधारित असतेच असं नाही. अनेक जोडप्यांमध्ये ती नसतेच. फ्रॉइडनं म्हटल्याप्रमाणे नवरा हा अनेकदा ज्या माणसावर आपण प्रेम केलेलं असतं त्याच्या बदल्यात मिळालेला पुरुष असतो, असंही ती सांगते.

बाईचं आई होणं, मुलांमध्ये गुंतणं, त्यातून मोकळं होण्याच्या वेळा आणि मग वृद्धत्वाकडचा प्रवास आणि तिचं सामाजिक आयुष्य, यांचा नेमका वेध सिमॉन घेते. काही वरवरचे बदल झाले असले तरी बाईचं जगणं ना विशेष बदललेलं आहे, ना तिची मानसिकता. ती आजही पुरुषानं तयार केलेली व्यवस्था, त्याचे  नियम स्वीकारून जगते आणि स्त्रीत्वाच्या कोषात सुरक्षित असल्याचं स्वत:लाच पटवून देत असते, असं सिमॉनला वाटतं. आज आजूबाजूला नजर टाकली, तर पूर्वीच्या आपल्या कला, साहित्य, संगीत, आपली एकूणच सांस्कृतिक भूमिका यांत दिसणारी स्त्री ही पुरुषांनी तयार केलेल्या स्त्रीच्या प्रतिमेतली आहे हे लक्षात येतं. त्यामुळे स्त्रीच्या साहित्यात येणारी स्त्रीदेखील पुरुषांच्या प्रतिमेतली स्त्री असते. ती अल्लड प्रेमिका, त्याच्या नुसत्या स्पर्शानं मोहरणारी प्रेयसी,  समर्पणासाठी तयार असणारी पत्नी, निजल्या तान्ह्यावर दृष्टी लावून बसणारी अनंत काळची माता वगैरेच असते. रात्री-अपरात्री घराबाहेर राहणाऱ्या, अधोविश्व पाहणाऱ्या, एखाद्या कॅफेमध्ये किंवा बारमध्ये बसून मित्रांबरोबर गप्पा मारत आपलं दु:ख्खबिख्ख हलकं करणाऱ्या आणि ते सारं आपल्या साहित्यातून किंवा कलाकृतीतून उभं करणाऱ्या पुरुषांसारखं बाईला लिहिता येत नाही, की तशी चित्रं रेखाटता येत नाहीत. त्याला कारण बाई त्या जगापर्यंत पोहोचण्यासाठी उंबरठा ओलांडून बाहेर पडलेलीच नसते. सिमॉन म्हणते, समजा व्हॅन गॉग स्त्री म्हणून जन्माला आला असता तर काय झालं असतं? तो बाई असता तर त्याला बेल्जियन कोळशाच्या खाणींवर पाठवलं नसतं. साहजिकच त्याला तिथल्या खाणकामगारांची वेदना कळली नसती, त्यानंतर आर्लेसमध्ये स्वत:ला एकांतात कोंडून घेणं, कॅफेमध्ये आणि वेश्यागृहात जास्तीत जास्त वेळ घालवणं त्याला जमलंच नसतं आणि मग साहजिकच व्हॅन गॉगनं जी त्याची जगप्रसिद्ध सूर्यफुलांची पेंटिग्स केली आहेत ती त्याच्याकडून झालीच नसती.   

सिमॉनच्या मते जोवर हा समाज स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळख देत नाही, तोवर ना ती व्हॅन गॉग होऊ शकते, ना काफ्का! स्त्रीला जर माणूस बनण्यासाठीच संघर्ष करावा लागत असेल, तर ती सर्जनशील कलाकार कशी होईल? हा रास्त प्रश्न ती विचारते. ती म्हणते, ‘It is difficult indeed for a woman to act on a plane of equality with men as long as this equality is not universally recognised and correctly realized.’ सिमॉनचं हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. स्त्रीला स्वातंत्र्य हवंय म्हणजे नेमकं काय हवंय, तिला स्वत:ची स्वतंत्र ओळख हवी म्हणजे काय हवं, हे पूर्ण विश्वानं नीट ओळखलं नाही आणि ती ओळख तिला दिली नाही, तर बाईला पुरुषांबरोबर समानतेच्या मुद्दय़ावर लढता येणार नाही. आजची जगभरातली परिस्थिती पाहिली, तर सिमॉननं लिहिलेल्या पुस्तकानंतर नेमकं काय बदललं आहे याचा विचार केला, तर आजही जगभरात या समानतेची गरज योग्यपणे लक्षात घेतली नाही असं दिसतं. ती जर लक्षात घेतली असती तर जगभरातील सगळय़ाच देशांतील स्त्री-पुरुषांच्या मनात स्त्रीवादाचं भय पेरून त्याची टिंगल केली केली गेली नसती.

आज सत्तर वर्षांनंतरही या पुस्तकाची गरज वाटते आहे, त्याचं कारण स्त्रीची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जडणघडण त्याच त्या पारंपरिक पद्धतीनं केली जातेय. मुख्य म्हणजे तिच्या इच्छा-आकांक्षा, तिच्या लैंगिक प्रेरणा, तिच्या स्वातंत्र्याचा विचारच आपण फारसा करू शकत नाही. त्यामुळेच आजही असंख्य मुलींना शिक्षण नाकारलं जातं, लग्नाच्या बाजारात तिच्या इच्छेचा विचार न करता कोणत्याही पुरुषाच्या पदरी तिला बांधलं जातं आणि ‘तेच पवित्र मानून घे’ असं तिला सांगितलं जातं. तिच्या लैंगिक प्रेरणांविषयी तर बोललंही जात नाही. त्या तिला नसतातच हे गृहीत धरून त्या दाबून ठेवण्यानंच तू चारित्र्यवान बाई होशील, असं सांगितलं जातं. आणि त्यानंतरही एखादी स्त्री कोणत्याही अधिकारांवर बोललीच, तर ‘उंडारलेली बाई’ म्हणून तिच्या कपाळावर लेबल लावून तिचा एखाद्या अ‍ॅपवरून जाहीर लिलाव केल्याचं दाखवलं जातं. बाईच्या चारित्र्याशी जोडलेली सोईस्कर नैतिकता पाळणाऱ्या ढोंगी समाजात लहानाचे मोठे होत असताना आजच्या तरुणाईने स्त्री सर्वार्थानं समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवंच.

या पुस्तकाच्या समारोपात सिमॉन म्हणते, ‘मुलींना जर लहानपणापासून त्यांच्या भावांसारखंच वाढवलं असतं, मुलग्यांना देतो त्या गोष्टी दिल्या असत्या, स्वातंत्र्य दिलं असतं, त्यांच्यासारखंच भविष्य दिलं असतं, तर कदाचित त्या आजही मासिक पाळीला आणि बाई होण्यालाच ज्या प्रकारे घाबरतात तशा घाबरल्या नसत्या. कारण मासिक पाळी त्यांना बाईपणाच्या कोषात घेऊन जाते आणि तिचं प्राक्तन देते. बाईला यातून मुक्त करायचं असेल, तर ‘Let her have her independent existence and she will continue nonetheless to exist for him also:  mutually recognizing each other as subject,  each will yet remain for the other another’ स्त्री-पुरुषांनी एकमेकांना आपापला अवकाश देत एकमेकांना पूरक म्हणून जगण्याची मजा घ्यायला हवी. असं झालं, तर दोघंही आपापली ओळख जपत एकमेकांसाठी जगतील. ही कल्पनाच किती आशादायी आहे!    ती कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी बाई समजून घ्यावी लागेल आणि ती समजून घ्यायची असेल, तर हे पुस्तक वाचावं लागेल.

nrajan20@gmail.com