नीरजा

स्वातंत्र्यपूर्व काळ ते शहाबानो खटल्याचा निकाल असा भलामोठा, जवळपास पन्नास वर्षांचा राजकीय, धार्मिक, सामाजिक अवकाश पेलणारी ‘माय गॉड इज अ वूमन’ ही लेखिका नूर जहीर यांची कादंबरी शिक्षित, तसंच उच्चशिक्षित मुस्लीम समाजाचं भारतीय स्वातंत्र्यलढय़ातलं योगदान, प्रगतिशील विचारानं समाजाला बदलवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि तर्कनिष्ठ विचार करणाऱ्या पिढीचा सहभाग, याविषयी आपल्याला सांगते. याशिवाय एका आत्मनिर्भर स्त्रीचं आयुष्य मांडणारी ही कादंबरी वाचायला हवी अशीच. 

‘सगळय़ा जगाचं लक्ष एकाच ठिकाणी लागलं होतं. शासन यंत्रणा कमालीच्या तणावाखाली होती. जातीय दंग्याचा भडका कधीही उडू शकतो, अशी शक्यता होती. दंग्याचं कारण तात्कालिक असलं, तरी त्यामागे वर्षांनुवर्ष ठरवलेल्या योजना, आखलेले मनसुबे, करायच्या कृती असतात.. कारण काहीही पुरू शकतं, साधंच. या क्षेत्रात मग लाठय़ाकाठय़ा नसतात. असतात अत्याधुनिक शस्त्रं, बॉम्ब, दारूगोळा. सगळं एखाद्या युद्धासारखं शस्त्रसज्ज! मुसलमानांमध्ये कमालीचा तणाव होता. श्वास रोखून ते वाट पाहात होते. हा फैसला अंतिम. समाजजीवन, समाजशास्त्र यांची रचना पालटवणारा. इतक्या वर्षांच्या जुन्या कायद्यांना मानवी चेहरा देणारा, जगाला आपली नवी ओळख सांगणारा, माणुसकीचा, सामान्य लोकांसाठीचा, कुठलाही भेदभाव न करणारा, आधार देणारा..

नवा कायदा!

मूलतत्त्ववादी आणि त्यांचे पाठीराखे निर्धास्त होते. त्यांच्या कर्मठ तत्त्वांना हात लावायचीही कुणाची शामत झाली नव्हती आणि होणारही नाही, कयामत उठेल. जलजला येईल. हे त्यांना माहीत होतं. पुरोगामी, प्रागतिक विचारांचे पुरस्कर्ते बदलाच्या बाजूनं होते, पण उघड बोलण्याची हिंमत नव्हती. ‘दुसऱ्या कुणी तरी सुरुवात करावी, आमचा पूर्ण पाठिंबा आहे.’ पण पहिलं पाऊल उचलायची हिंमत नाही. तर सर्वसामान्य माणूस पोटापाण्याच्या विवंचनेत. ‘काय ते होऊन जाऊ देत. आम्हाला त्रास नको.’ तोंडात चार घास पडावेत, हीच इच्छा. बाकी सारं व्यर्थ.. असं सारं वातावरण.

.. ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या पारंपरिक काव्यावरील चर्चेत भाग घेऊन घरी परतताना साफियाला हे वातावरण वेगळं असल्याचं भासलंच.. कोपऱ्याकोपऱ्यावर पोलिसांचे जथ्थे तैनात होते. बांबूच्या ढाली, दोरखंड रचून ठेवले होते. सरकार पूर्ण सज्ज आहे म्हणजे कुठलाही धोका पत्करायची तयारी नाही..’ सुप्रसिद्ध लेखिका नूर जहीर यांच्या ‘माय गॉड इज अ वूमन’ या २००८ मध्ये आलेल्या आणि शुभा प्रभू-साटम यांनी ‘माझा ईश्वर स्त्री आहे’ या नावानं मराठीत अनुवादित केलेल्या कादंबरीतल्या अठ्ठाविसाव्या प्रकरणातलं हे वातावरण. शहाबानो खटल्याचा निकाल लागण्याच्या आधीच्या तासाभरातलं. आजच्या काळातही चपखल बसणारं!

  हे असे तणाव भारताला आणि या देशातील लोकांना नवे नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरही झालेल्या धार्मिक ध्रुवीकरणामुळे असे संघर्ष आणि ताण निर्माण केले गेले आणि आजही केले जात आहेत. मुद्दे वेगळे असले तरी अशा संघर्षांना आणि अशा ताणांना सामोरं जात या देशातले सर्वच धर्माचे लोक कायम जगत आले आहेत आणि माणूस म्हणून घडतही गेले आहेत. या कादंबरीतली नायिका साफिया अशाच वातावरणात घडत जाताना दिसते. 

इस्मत चुगताई यांनी सुरू केलेल्या बंडखोरीला सारा अबूबकर, नूर जहीर यांच्यासारख्या अनेक  मुस्लीम लेखिकांनी पुढे नेलं आणि स्त्रीच्या मुक्ततेबरोबर तिच्या प्रगल्भ होण्याचा प्रवास त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून निर्भयपणे मांडला. आजचा बहुतांशी मुस्लीम समाज म्हणजे मागासलेला, स्त्रियांच्या बाबतीत इतर धर्मापेक्षा कठोर असलेला, असा समज निर्माण केला गेलाय. अशा काळात मुक्त आकाशात पंख पसरू पाहणाऱ्या साफियाचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते शहाबानो खटल्यापर्यंतच्या काळाचा प्रवास या कादंबरीत येतो आणि वरील समज दूर करण्याचा प्रयत्न करतो.

या कादंबरीची नायिका आहे साफिया मेहंदी. नऊ वर्षांची साफिया एका बालमासिकासाठी कथा लिहिते. संपादक ती छापतात आणि तिला प्रोत्साहन देणारं पत्र लिहितात. परपुरुषानं लिहिलेलं ते पत्र तिच्या घरातल्या कर्मठ आणि पारंपरिक जगाला धक्का लावणारं ठरतं आणि शिक्षा म्हणून तिला पडद्यात जायला लागतं. कथा वगैरे लिहिणारी आणि स्वतंत्र विचार करणारी मुलगी म्हणजे परंपराप्रिय आईबापाच्या जिवाला घोरच. स्वातंत्र्यपूर्व काळात तर साऱ्याच जातीधर्मात आपापल्या मुलींना जेवढं जमेल तेवढं सांभाळलं वा पोसलं जायचं आणि वयात आल्यावर त्यांचं लग्न लावून दिलं जायचं. साफियाचे आईवडीलही ती वयात आल्याबरोबर तिच्यासाठी ‘स्थळं’ पाहायला लागतात. सतरा वर्षांच्या साफियासाठी योगायोगानं चांगलंच खानदानी रईस घराणं सांगून येतं. उमरावकीचा मान मिळालेल्या आणि अवध इथल्या उच्च न्यायालयात न्यायमूर्ती असलेल्या पित्याच्या बॅरिस्टर मुलाशी- अब्बास जाफरीशी तिचं लग्न ठरतं आणि सुरू होतो साफियाचा आगळावेगळा प्रवास..

अब्बास जाफरी या श्रीमंत बॅरिस्टर मुलाबरोबर लग्न करून एका खानदानी घरात प्रवेश करणाऱ्या साफियाला अब्बासच्या प्रगतिशील विचारांमुळे सुखद धक्का बसतो. अब्बास साम्यवादी पार्टीचा सदस्य आणि एका वादग्रस्त पुस्तकाचा लेखक असला तरी आपली मुलगी त्याला पुन्हा धर्माकडे घेऊन येईल अशी साफियाच्या वडिलांची खात्री असते. पण होतं उलटंच! गृहप्रवेशाच्या वेळीच ‘‘मी साफियाचा मालक नाही, जीवनाचा साथीदार आहे,’’ असं म्हणून अब्बास आपल्या पत्नीला बुरख्यातून मोकळं करतो. जेव्हा त्याची आई म्हणते, ‘‘तुझी बायको अत्यंत खानदानी आणि धार्मिक संस्काराच्या मुसलमान कुटुंबातून आलीय.. तिला हे धर्माविरुद्ध वागणं कधीच पटणार नाही.’’ तेव्हा अब्बास साफियाला बुरख्याबाबतचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतो. ‘‘तू एक स्त्री आहेस आणि त्यासाठी तुला अजिबात लाज वाटता कामा नये,’’ असं सांगणाऱ्या अब्बासचा ठाम सूर साफियाच्या कानावर पडतो आणि बुरखा न घेता ती गाडीतून उतरते, तेव्हा नूर जहीरनं तिच्या मनातली जी खळबळ दाखवली आहे, ती पारतंत्र्यात राहणाऱ्या कोणत्याही स्त्रीला स्वातंत्र्याची हवा अंगावर घेताना जाणवत असेल तशीच आहे. यातली निवेदिका म्हणते, ‘हा क्षण विचित्र होता. तिच्यात आतापर्यंत जे काही संस्कार, मूल्यं, श्रद्धा अत्यंत काळजीपूर्वक रुजवल्या गेल्या होत्या, त्यांच्यावर घाव घालणारा, त्यांना नाकारणारा, खरं तर शरमेचा क्षण म्हणायला हवा. शरम, लज्जा.. शतकानुशतकं पुरुषांनी बायकांवर लादलेली, बांधलेली. पण हाच क्षण होता एक निर्णय घ्यायचा. त्याच परंपरांचं जोखड बाळगून जगायचं की नव्या भविष्याकडे पाऊल टाकायचं? काय ठरवावं? पूर्वाश्रमीचे संस्कार की नव्या आशा? आपला चौदा वारांचा घोळदार घागरा-लेहंगा सावरत साफिया खाली उतरली. एवढं अवजड, भरजरी वधूवस्त्र अंगावर असतानाही तिला एकदम विचित्र वाटत होतं.. संपूर्ण नग्न! पण तिच्या याच कृतीनं अब्बासशी तिचा आंतरिक धागा जुळला. अधोमुख होऊन ती प्रासादाच्या शुभ्र पायऱ्या चढू लागली. काही पायऱ्या चढली आणि एकदम दचकली. अब्बासनं तिला सावरलं नसतं तर ती पडलीच असती. ‘‘अरे बेटा घाबरतेस काय? अगं हे कमलपुष्प आहेङ्घ हे कमळ जसं चमचमत्या निवळशंख पाण्याच्या तलावात राहून त्याचं सौंदर्य वाढवतं, तसंच तूपण माझ्या मुलाच्या आयुष्यात कमलिनी हो.. त्याला खुलवणारी.’’ साफियाच्या नव्या आयुष्यातला भावगर्भ आणि तलम क्षण होता तो. याच वेळी ती आणि न्यायमूर्ती सर सफदर अली जाफरी- तिचे सासरे यांच्या अनोख्या स्नेहबंधनाला सुरुवात झाली. सासरा-सुनेच्या पारंपरिक नात्यापलीकडचं एक वेगळं नातं. पण याच क्षणानं तिच्या नशिबात तिच्या सासूशी अखंड चालणाऱ्या एका भयानक शीतयुद्धालाही जन्म दिला.’

अब्बास जाफरी आणि त्याच्या वडिलांच्या संपर्कात आलेली साफिया आमूलाग्र बदलून जाते. आपलं शिक्षण चालू ठेवते, कॉलेजमध्ये जाते. अब्बास आणि त्याच्या नव्या विचारांच्या मित्रांबरोबर घडत जाते. अब्बासच्या अकाली मृत्यूनंतरही ठामपणे उभी राहाते. आपल्या मुलीला- सिताराला आपल्यासारखीच आत्मनिर्भर बनवते. साफियाचा पारंपरिक स्त्रीपासून एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून होणारा प्रवास तिला आत्मभानाकडे घेऊन जातो.

ही सारी घडण अब्बासच्या मृत्यूनंतर साफियाला जिवंत ठेवतेच, पण तो गेल्यावर त्याच्या आईनं काढलेल्या फर्मानानुसार ती घर सोडून बाहेर पडते आणि मुलीला सांभाळत हळूहळू एक प्रथा-परंपरांविरोधातच नाही, तर अन्यायाविरोधात ठामपणे उभं राहायचं बळ मिळालेली, स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती बनत जाते. पुढे तर काही प्रसंगांत शासनालाच नाही, तर थेट पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याचं धाडस ती करू शकते.

या कादंबरीत नूर जहीरनं उभी केलेली डॉ. जाहिदा, गोविंदराम, अमृता, कात्यायनजी अशी अनेक पात्रं स्वत:ची अशी स्वभाववैशिष्टय़ं घेऊन येतात. अनेक विरोधाभास असलेली ही पात्रं साफियाला वेगवेगळय़ा तऱ्हेनं घडवत जातात. वयानं जवळजवळ अकरा वर्षांनी मोठा असलेला अब्बास आहे साम्यवादी गटातला, समाजवादी विचारसरणी मानणारा, पण राहणीमान मात्र नवाबी थाटातलं. हा नोकरचाकरांच्या गराडय़ात वाढलेला अब्बास, त्याच्यासाठी चहा घेऊन आलेल्या साफियाला म्हणतो, ‘‘नोकरचाकर असताना तू का घेऊन आलीस ट्रे?’’ तेव्हा त्यानं दिलेलं पहिलं पुस्तक- ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ वाचलेली साफिया म्हणते, ‘‘पंडित नेहरू म्हणतात, की जो काम करत नाही त्याला कुठलेही फायदे, सवलती घेण्याचा हक्क नाही. मी माझ्या कामाचा वाटा उचलतेय.’’

अब्बासनं वाचायला दिलेल्या प्रत्येक पुस्तकातल्या एका एका प्रकरणावर चर्चा करणाऱ्या या सतरा वर्षांच्या उत्सुक तरुणीत आणि अठ्ठावीस वर्षांच्या त्या प्रगल्भ तरुणात हळूहळू एक अनामिक नातं दृढ होत जातं. विचारसरणी मानणं आणि ती पूर्णपणे अमलात आणणं यातला फरक या कादंबरीत स्पष्ट होत जातो. स्वतंत्र विचारांच्या अब्बासवर त्याच्या आईचं कितीही प्रेम असलं, तरी ती सरंजामशाहीची प्रतिनिधी म्हणूनच उभी राहते. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या प्रगतिशील, उच्चभ्रू आणि तरीही सरंजामशाहीची सवय असलेल्या श्रीमंत कुटुंबातलं वातावरण नूर जहीर उभं करतेच, पण त्याचबरोबर सर्वसामान्य मुसलमानांची मानसिकता, मुल्लामौलवींचा कर्मठपणा, स्त्रियांच्या बाबतीतल्या त्यांच्या भूमिका याविषयी सविस्तर चर्चा करते. 

अन्यायाविरोधात चिडणारा, तिच्यावर मनापासून प्रेम करणारा अब्बास त्याच्या पार्टीच्या कारवायांमुळे तुरुंगात जातो आणि मग त्याच्या वडिलांच्या- जज्जसाहेबांच्या नोकरीच्या ठिकाणी साफियाची शिक्षणासाठी रवानगी होते. तिथे भेटलेले लोक, चर्चा, यातून आणि पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुटका झालेला अब्बास घरी आल्यावर त्याच्या सान्निध्यात राहून घडत गेलेली आणि कणखर झालेली साफिया आपल्याला भेटत जाते.

अब्बास आणि तिच्यातलं प्रेम प्रगल्भ होत जाणं आणि त्याच्यासोबत साफियाचं घडत जाणं हे मुळातूनच वाचण्यासारखं आहे. अनेक सभा आपल्या भाषणांनी गाजवणारा, जरठ-कुमारिका लग्नासाठी मुलींना दरडावून, रडून-भेकून मन वळवू पाहणाऱ्या मौलवींना ‘तुम्ही कुराणच्या विरोधात जाताय’ असं ठणकावून सांगणारा, मौलवींना प्रश्न विचारणारा, खरा इस्लाम काय आहे हे पुन्हा पुन्हा सांगत राहणारा अब्बास आणि त्याचे सारे मित्र, हे भारतीय प्रगतिशील विचारी लोकांचं प्रतिनिधित्व करतात.

‘इस्लाम हा बुरसटलेल्या जुन्या विचारांचा धर्म नाही’ हे सांगतानाच नव्या भारतात स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्त्व काय आहे, हे या कादंबरीतले पुरोगामी विचारांचे मुसलमान वारंवार सांगत राहतात. एवढंच नाही, तर या स्वतंत्र भारतात आपल्या समाजाला कुठे घेऊन जायचं आहे याची चर्चा करतात. शरीयतमधील कायदे कसे कालबाह्य आणि जुनाट झाले आहेत, स्त्रियांवर अन्याय करणारे आहेत, हे ठामपणे मांडणारा अब्बास त्याच्या पक्षाच्या लोकांकडूनच दुखावला जातो, तेव्हा खचतो. अशा काळात साफिया त्याला साथ देते. नूर जहीर म्हणते, ‘नवऱ्याचा किंवा सहचराचा आत्मविश्वास जेव्हा खचतो, तेव्हा त्याला आधार देणं, आश्वस्त करणं, त्याच्या संतापाला सहन करणं, त्याच्या दु:खाला कुशीत घेणं, त्याला पुन्हा उभं करणं.. बायको किंवा सहचरीचं ते काम. स्त्रीच्या अंगात उपजत असलेल्या सांभाळून घेण्याच्या वृत्तीनं त्यांना ते जमतं.. ती अंधार दूर करणारी ज्योत होणार नाही, पण त्या ज्योतीला सतत तेजस्वी ठेवणारी, विझू न देणारी बाईच असते. तिच्याच बळावर तिमिराचा नाश होतो.. स्त्री विलक्षण सामर्थ्य असलेली.. तिच्यात निर्मितीची शक्ती आहे. तिच्याशिवाय जग अपूर्ण असतं. हिंदुंमध्ये तिला ‘जगतधात्री’ म्हणतात ते उगाच नाही. स्त्री हे अजब रसायन आहे.. ईश्वर जर अस्तित्वात असेल आणि त्या ईश्वराकडून जर निसर्गातले अनेक चमत्कार होऊन त्याचं चक्र अखंड चालू राहत असेल, तर मग ईश्वर नक्कीच स्त्री असणार..’

जगभरातल्या सर्वच धर्मात ईश्वर हा पुरुष म्हणूनच ओळखला जातो. तो ‘अल्ला’, तो ‘गॉड’, तो ‘देव’ आणि तो ‘प्रेषित’, असे पुरुष ईश्वर प्रस्थापित असतानाही नूर जहीर मात्र आपला ईश्वर स्त्री असल्याचं म्हणते, तेव्हा ही लेखिका एक धाडसी पाऊल उचलते. स्वातंत्र्यपूर्व काळ ते शहाबानो खटल्याचा निकाल आणि त्याचे उमटलेले पडसाद असा भला मोठा अवकाश पेलणारी ही कादंबरी शिक्षित, तसंच उच्चशिक्षित मुस्लीम समाजाचं भारतीय स्वातंत्र्यलढय़ातलं योगदान, प्रगतिशील विचारानं समाजाला बदलवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि तर्कनिष्ठ विचार करणाऱ्या पिढीचा सहभाग, याविषयी आपल्याला सांगतेच, पण त्याचबरोबर बहुतांशी मुस्लीम समाज मागासलेला आहे असा जो एक समज निर्माण करून दिला जात आहे त्याला छेदही देते.

बालविवाहापासून ते पोटगीपर्यंत अनेक मुद्दय़ांवर चर्चा करतानाच धर्माला संकुचित करू पाहणाऱ्या लोकांना प्रश्न विचारायचं धाडस या कादंबरीतली पात्रं करतात. स्त्रियांच्या प्रश्नांविषयी बोलतात. ‘सगळे मुस्लीम सारखेच’ असं सरसकट विधान केलं जातं, या पार्श्वभूमीवर नूर जहीर यांनी अत्यंत संयतपणे, पण ताकदीनं उभा केलेला जवळजवळ पन्नास वर्षांचा राजकीय, धार्मिक, सामाजिक काळ आणि त्यातल्या घटना वाचताना या कादंबरीचं महत्त्व लक्षात येतं. 

 प्रगतिशील लेखक मंचाचे संस्थापक सदस्य असलेल्या साजिद जहीर या लेखकाची नूर जहीर ही मुलगी आहे. ती आपल्या धर्मातल्या परंपरा, नीतिनियम आणि त्याच्या काचात बांधल्या गेलेल्या आणि त्याविरोधात उभ्या राहिलेल्या साफियासारख्या स्त्रियांचं जगणं ‘माझा ईश्वर स्त्री आहे’ या कादंबरीत उभं करते आणि या समाजाची एक वेगळी बाजू दाखवते. इतर धर्मीयांनी या धर्मातली प्रबोधनाची ही बाजू समजून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचायला हवी अशीच.

nrajan20@gmail.com