|| सिद्धी महाजन
‘हवामानबदलाचं संकट ही माझ्यासाठी आणीबाणी आहे. हा शून्य प्रहर आहे. म्हणजेच मानवाच्या अस्तित्वासाठी चाललेल्या लढाईतल्या विजयासाठीची शेवटची आणि एकमेव संधी.’ संकटाचं असं नेमकं  भान असलेल्या जेमीनं शालेय वयातच ‘अर्थ क्लब’ स्थापन करून पर्यावरणविषयक जागृती करायला सुरुवात के ली होती. मात्र त्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरणं आवश्यक आहे हे लक्षात आल्यावर तिनं ‘झीरो अवर’ या राष्ट्रीय पातळीवरील चळवळीची स्थापना केली. पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठी आजच्या पिढीला जागरूक करणाऱ्या १८ वर्षांच्या जेमी मार्गोलिनविषयी.     

कल्पना करा, जेव्हा तुमची मुलं तुम्हाला विचारतील, ‘हवामानबदलाचे संकेत थोपवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवाक्यातील शक्य तितके सर्व प्रयत्न केले आहेत का?’ तुम्ही त्यांच्या नजरेला नजर देऊन तुमचं उत्तर सांगू शकाल का? काय असेल ते उत्तर?

Ed Action Jharkhand
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराच्या घरी कोट्यवधींचं घबाड; काँग्रेसच्या दाव्याने प्रकरणात मोठा ट्विस्ट!
Ed Action Jharkhand
मंत्र्यांच्या नोकराच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही चक्रावले!
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक

१८ वर्षांच्या जेमी मार्गोलिनला हे उत्तर तिच्या लहान वयातच सापडलं होतं. शाळेतल्या मधल्या सुट्टीत जेमी कोटावर लावायच्या ‘सेव्ह द अर्थ’ असं छापलेल्या  पिना आपल्या शाळेतल्या इतर मुलांना ती देत असे. ‘वसुंधरेला वाचवायचं असेल तर माझ्या विचारांना पाठिंबा द्या,’ असं त्यांना कळकळीनं सांगत असे. तिला निसर्गाविषयी आणि विज्ञानाविषयी लहानपणापासूनच फार कुतूहल होतं. याच कुतूहलापोटी पर्यावरणविषयक आणि विज्ञानविषयक माहितीपट पाहात मोठी झालेल्या तिला वैज्ञानिक दृष्टिकोनाची बैठक मिळाली ती कायमचीच. या विषयावरचे वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेताना तिला आता गरज भासत होती प्रत्यक्ष सहभागाची, काहीतरी स्वत: करून पाहाण्याची. वयानं लहान असलेल्या या मुलीची आदर्श होती, कर्तृत्ववान मोठी माणसं. जसजसं तिच्या अनुभवाचं क्षेत्र विस्तारलं, तसतसं शाळेत स्वत: पुढाकार घेऊन ‘अर्थ क्लब’ स्थापन करणाऱ्या या मुलीला हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ या दोन ज्वलंत समस्यांवर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज भासू लागली. पर्यावरण संवर्धनासाठी पुढे होऊन कार्यवाही करण्याची गरज भासू लागली. कारण आता अधिकाराच्या पदावरची हीच ‘कर्तृत्ववान’ मोठी माणसं आपल्या निष्काळजी वागण्यामुळे फक्त वसुंधरेचा नव्हे, तर पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाचा जीव धोक्यात घालत आहेत हे तिला जाणवू लागलं.

जेव्हा जेमी मार्गोलिनं उच्च शिक्षणासाठी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा तिनं ‘प्लांट फॉर द प्लॅनेट’ या संस्थेसाठी काम करायला सुरुवात केली. ही संस्था जगभरातील तरुणाईला हवामानबदलावर आणि एकूणच पर्यावरणीय प्रश्नांवर मत प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहन देते. २०१७ मध्ये कॅनडामध्ये लागलेल्या वणव्यानं पश्चिमोत्तर पॅसिफिक किनारपट्टीचा सारा भाग काळ्याकुट्ट धुरानं वेढून टाकला. त्या विषारी धुरानं अनेकांना कोंडल्यासारखं झालं, काहीजण आजारीही पडले. तेव्हा जेमीला आपल्या हक्कांची खऱ्या अर्थानं जाणीव झाली. ‘अवर चिल्ड्रन्स ट्रस्ट’ आणि काही संस्थांच्या मदतीनं तिनं राज्य सरकारवर खटला दाखल केला. हा खटला होता नागरिकांना जगण्यासाठी योग्य असं शुद्ध पर्यावरण आणि वातावरण नाकारण्यात येत आहे, अशी बाजू मांडणारा एकमेवाद्वितीय लढा. जेमी आणि तिच्याबरोबर काम करत असलेल्या बारा तरुणांनी वॉशिंग्टन स्टेट सरकारला त्यांचं जीवन मोकळेपणाने जगण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे, अशा प्रकारचं निवेदन दिलं. सरकारच्या बेपर्वा वृत्तीनं हवामानबदलाचं संकट जास्तीत जास्त तीव्र झालं आहे आणि असं करून त्यांना घटनेनं बहाल केलेलं हे अमूल्य स्वातंत्र्य नाकारण्यात आलं आहे, अशा प्रकारची ही तक्रार दाखल केली गेली. घटनेनं त्यांना बहाल केलेले स्वच्छ आणि शुद्ध पर्यावरणाचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत आणि नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे, असं त्यांचं म्हणणं होतं.

निकाल काहीही असो, पण या लढ्यामुळे  तावूनसुलाखून निघताना तिच्यात तयार झाली होती, एक लढवय्यी कार्यकर्ती. आत्तापर्यंत राजकारणी आणि कारखानदार आपल्या स्वार्थासाठी आयुष्यभर जे काही लोकांच्या गळी उतरवत आले, ते आता ती खरं मानणार नव्हती. सत्य तिला खुणावत होतं, अन् त्यासाठी ती जंग जंग पछाडणार होती. तिच्या चिंता काही मिटत नव्हत्या. तिला या पृथ्वीवर राहाणाऱ्या प्रत्येक जिवाबद्दल काळजी वाटत होती, पृथ्वीवरच्या तिनं भेट दिलेल्या अथवा न दिलेल्या प्रत्येक सुंदर ठिकाणाबद्दल तिला काळजी वाटू लागली होती. निसर्गाच्या प्रत्येक सुंदर निर्मितीच्या टिकण्या-न टिकण्याबाबत तिला काळजी वाटू लागली होती. जर मानवजातीचा तथाकथित विकास या प्रकारच्या वेगानं वाटचाल करत असेल, तर आपण सगळे कसे जिवंत राहाणार आहोत?, ही चिंता तिला हतबल करून गेली. या सर्व चिंतांनी ही  मुलं इतकी त्रस्त झाली, की त्यांनी स्वत:ला जणू कोंडून घेतलं. येणाऱ्या सर्वनाशाच्या कल्पनेनं तिला अन् तिच्या साथींना जणू

नैराश्यानं घेरलं.

२०१७ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिका पर्यावरणपूरक अशा पॅरिस करारामधून काढता पाय घेणार असल्याचं जाहीर केलं. या निर्णायक पावलामुळे या मुलांच्या सहनशक्तीचा जणू अंत झाला. जेमीनं हवामानबदलावर जालीम उपाय शोधण्यासाठी आणि त्यावर अधिक संशोधन करण्यासाठी एका मोठ्या गटाचं सदस्यत्व घेतलं. अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अल गोर यांच्या ‘क्लायमेट रिअ‍ॅलिटी प्रोजेक्ट’अंतर्गत तीन दिवसांचं प्रशिक्षण घेतलं. नेतृत्वगुण अंगी बाणवून घेण्याचा सराव केला. त्यांनी हवामानबदलाचा, त्यामागे असलेल्या वैज्ञानिक कारणांचा सखोल ऊहापोह केला आणि त्यावर उत्तरं शोधण्यासाठी आपल्या परीनं एक मोठं पाऊल उचलण्याचं ठरवलं. जेमी म्हणते, ‘मी माझ्या स्थानिक पातळीवरची चळवळ आता अधिक सजग करण्याचं, अधिक व्यापक करण्याचं ठरवलं. राष्ट्रीय स्तरावर नेण्याचं ठरवलं. मला अधिकाधिक तरुणाईला रस्त्यावर उतरलेलं पाहायचं आहे. पर्यावरण सुरक्षेची मागणी करताना एक मोठी चळवळ उभारलेली पाहायची आहे. मी ते साध्य करून दाखवणारच आहे. कारण आमच्याकडेच काय, कुणाकडेही फार वेळ नाही.’

‘झीरो अवर’ या राष्ट्रीय पातळीवरील चळवळीची स्थापना केली, तेव्हा जेमी मार्गोलीन फक्त पंधरा वर्षांची होती. तिनं जगभरातील कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि सिएरा क्लब , ३५०.ङ्म१ॠ सारखे प्रायोजक मिळवले. तिच्या संस्थेचं उद्दिष्ट होतं, लोकांना हवामानबदलाबद्दल अधिकाधिक जागृत करणं. बदल घडवण्याची चेतना अनेक हृदयांत जागृत करणं. २०१९ मध्ये ‘झीरो अवर’नं मायामी, फ्लोरिडा इथे एका मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं. या सभेला देशभरातून शेकडो तरुणांनी हजेरी लावली होती.

२५ वर्षांखालील तरुणांना या सभेत भाग घेणं नि:शुल्क असावं यासाठी जेमी आणि तिच्या साथीदारांनी निधी गोळा करायला सुरुवात केली.

तिला माहीत होतं, जर तरुण मुलं मोठ्या प्रमाणात एकत्र आली, तर त्यांना मतदानाचा हक्क नसतानाही त्यांचे विचार मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ घडवू शकतात. या मुलांचाच आवाज अधिकाधिक प्रखर आणि मोठा असेल. या सगळ्या प्रवासाबद्दल जेमीनं एक पुस्तकदेखील लिहिलं आहे. ‘यूथ टू पॉवर- युअर व्हॉईस अँड हाऊ टू यूझ इट’ हे तिनं लिहिलेलं पुस्तक जून २०२० मध्ये प्रकाशित झालं. ‘झीरो अवर’नं आतापर्यंत पंचवीसहून अधिक शहरांमध्ये मोर्चे आयोजित केले असून अनेक कायदेपंडितांचा परामर्श घेत आपल्या पुढील प्रवासाची आखणी केली आहे.

जेमीचा प्रवास कसा आहे? तो एकमार्गी नाही, तर अनेक सामाजिक प्रश्नांचा पाठपुरावा करत आहे. जेमी स्वत:ची वैयक्तिक ओळख ‘जेंडर क्वीअर’ किंवा ‘वेगळ्या लैंगिक जाणिवा असणारी’ अशी सांगते. अल्पसंख्य असलेल्या ‘एलजीबीटीक्यू’ या व्याख्येतली तिची ‘क्वीअर’ ही ओळख प्रचलित लिंगओळखीत न सामावणारी आहे. लॅटिन आणि ज्यू समुदायाशी वांशिक नातं सांगणारी जेमी तरुणाईसाठी ‘एलजीबीटीक्यू लॅटिना ज्यू’ रोल मॉडेल बनू पाहाते आहे. तिची ओळख समाजाच्या बंदिस्त चौकटीत सामावणारी नसल्यामुळे ती तिच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनली आहे. ही ओळख ती अभिमानानं मिरवते आणि तिच्यासारखी ओळख बाळगणाऱ्या सर्वांनी आजूबाजूच्या समाजविरोधाला बळी न पडता पुढे यावं असं तिला वाटतं. भेदाभेद आणि शोषणाच्या कहाण्या तिला व्यथित करून जातात. त्यावर ती आपल्या खुमासदार लेखनशैलीतून व्यक्त होते. जेमीनं ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘टाइम मॅगझीन’, ‘सीएनएन’ आणि ‘द गार्डियन’साठी लेखन केलं आहे.‘टीन व्होग’ मासिकानं तिची निवड २१ वर्षांखालील उल्लेखनीय २१ तरुण स्त्रियांमध्ये केली होती.

जेमी तिच्या एका लेखात लिहिते, ‘माझ्यासाठी ही आणीबाणी आहे. अस्तित्वासाठी चाललेली लढाई आहे. हा शून्य प्रहर आहे. म्हणजेच मानवजातीला स्वत:ला वाचवण्यासाठी मिळणारी शेवटची आणि एकमेव संधी. याचाच अर्थ असा, की आपणा सर्वांच्या जगण्याला कधी नव्हे असा ऐतिहासिक संदर्भ आला आहे. काळानं त्याला नवनवे पैलू बहाल केले आहेत. आपण सारे एका महत्त्वाच्या बदलाचा भाग होऊ पाहात आहोत. म्हणूनच प्रत्येकानं आपल्याला जमेल तसं, काहीतरी करायचं आहे.’

ती असंही म्हणते, की ‘हे सारं करायचं, पण कशासाठी? कारण माझी पिढी अशी शेवटची पिढी आहे, जी यासाठी कायमचा उपाय शोधून काढू शकते. आज जिवंत असलेल्या प्रत्येकाला मानवजातीचं पुढच्या दहा हजार वर्षांचं भवितव्य आपल्या हस्ताक्षरात लिहून ठेवण्याची संधी मिळते आहे. हा वेळ कमी आहे, जोवर पृथ्वीचं भवितव्य पुढच्या पिढीच्या हातात सोपवलं जात नाही, तोपर्यंतच हा वेळ मिळतो आहे.  प्रत्येक रात्री मी अंथरुणावर आडवी होते, तेव्हा मला हे स्वप्नरंजन भुरळ घालतं. हवामानबदलाचे संकट टळल्यानंतरच्या साजिऱ्या पृथ्वीचं रूप नेहमी माझ्या स्वप्नात येतं. दर दिवशी सकाळी मी झोपेतून उठते, ती या स्वप्नाला हातभार लावण्याच्या आशेनं.’

जेमीच्या म्हणण्याप्रमाणे हा लेख वाचत असलेल्या प्रत्येकाच्या हातात ही बदलाची ताकद आहे. शून्य प्रहराचे टोले पडत असताना, तुमच्या मुलांच्या नजरेला नजर भिडवून योग्य ते उत्तर देण्यासाठीच्या वाटचालीत, तुमची पहिली कृती कोणती असेल?…

snmhjn33@gmail.com