कृष्णाई

उषाताईंचं सोळाव्या वर्षी लग्न झालं. कृष्णभक्ती वाढत होती.

उषाताईंचं सोळाव्या वर्षी लग्न झालं. कृष्णभक्ती वाढत होती. सासुरवास खूप वाटय़ाला आला त्यांच्या आणि अखेर माहेरी कायमची पाठवणी झाली. कृष्णभक्तीनं निर्भयता आली होती. त्या प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. आता शाळेत शेकडो ‘बाळकृष्ण’ अवतीभवती होते. अशाच एकदा पंढरपूरला गेल्या असताना एका पितळी कृष्णमूर्तीनं चित्त वेधून घेतलं. जत्रेत हरवलेल्या मुलानं आईला हाक मारावी तसा तो कान्हा जणू पाहात होता! झालं.. बावरलेल्या कृष्णाला त्याची आई आणि आईला आजन्म सावरणारा तिचा कृष्ण मिळाला..त्या कृष्णाच्या आई झाल्या.

‘‘तुम्ही गोंदवल्याला गेलात ना, तर कृष्णाच्या आईला अवश्य भेटा!’’ कुणाचे तरी हे उद्गार मनात होतेच. पण ‘कृष्णाच्या आई’ हे काय प्रकरण आहे, हे काही समजत नव्हतं. असेल कुणीतरी कृष्ण नावाचा मुलगा, असंच वाटलं होतं. त्या काळी मी महिन्यातून एकदा गोंदवल्यास जात असे. अगदी दोन-तीन तासांसाठी का होईना, पण जायचंच, हा निर्धार असायचा. एक खरं की, गोंदवल्यास दर पौर्णिमेला प्रचंड गर्दी असते आणि मला गर्दी आवडत नसल्यानं मी अमावास्येलाच बरेचदा जात असे! त्यामुळे कधी तरी भेटू या ‘कृष्णाच्या आई’ना, असं वाटे..

मग कुठूनसं कळलं की, हा ‘कृष्ण’ म्हणून कुणी हाडामांसाचा मुलगा नाही. कृष्णाच्या एका मूर्तीला आपल्या लेकरागत जपणारी ही बाई आहे! ऐकलं आणि वाटलं वेडेपणाच तर नाही का हा! आजच्या काळात दगडी मूर्तीला कवटाळून जगणाऱ्या अशा कुणाला भेटून काय करायचंय.. अध्यात्माकडे वळलो होतो, पण कधीकाळच्या स्वयंघोषित बुद्धिवादाचे संस्कार काही लगोलग पुसले गेले नव्हते.. त्यामुळे भेटीच्या अनेक संधी येत होत्या, पण योग लांबत होता..

पण एकदाचा तो दिवस उजाडला.. किंवा रात्र उजाडली म्हणा! संध्याकाळ उलटली होती. बाहेर पावसाळी वातावरण होतं. तेव्हा गोंदवल्यात फारशी वर्दळही नसे. त्यामुळे बाहेर तसं सुस्तावलेलं वातावरण होतं. मी आणि माझा मित्र प्रसाद मंदिराच्या पायऱ्यांवर गप्पा मारत बसलो होतो. जीवनातल्या अडीअडचणी, प्रतिकूलता यावर चर्चा सुरू होती आणि अचानक प्रसाद म्हणाला, ‘‘चला, कृष्णाच्या आईंकडे जाऊ या!’’ आणखी दोघंही तयार झाले. तेवढेच पाय मोकळे होतील, असा विचार मनात डोकावला आणि मीही होकार भरला. त्यांचं घर शोधत निघालो. तोच गावातले दिवे गेले. सगळीकडे मिट्ट अंधार पसरलाय, हे क्षणात उमगलं. एका तीनमजली इमारतीत तळमजल्यावर त्या राहतात, असं कळलं होतं. इमारत तशी रिकामीच असावी, पण तळमजल्यावर एका खोलीतून कंदिलाचा प्रकाश व्हरांडय़ात आम्हाला जणू बोलवत होता. आम्ही दाराशी गेलो. ‘‘कृष्णाच्या आई आहेत का?’’ हा प्रश्न ठोठावला.

‘‘या ना..’’ एक शांतगंभीर प्रसन्न चेहऱ्याची माउली म्हणाली आणि लगेच लहानशा पाळण्यातून एक मूर्ती उचलून हळू आवाजात म्हणाली, ‘‘रे कृष्णा, बघ तुला भेटायला कोण आल्येत ते!’’

मी थोडा अवघडून गेलो होतो. त्यांनी मात्र लहान मुलाला पाहुणे दाखवावेत तसं आम्हाला दाखवलं. मग त्याला अलगद पाळण्यात ठेवलं, थोपटलं आणि आम्हाला बसायला सांगितलं. दोन लहान खोल्यांचं घर होतं. आतली खोली स्वयंपाकाची असावी. आम्ही तिघं-चौघं बसलो तरी खोली भरून गेली होती. आई उंबरठय़ालगत बसल्या. तरी त्यांचं सारं लक्ष पाळण्यात ‘निजलेल्या’ कृष्णाकडे आहे, हे जाणवत होतं. कंदिलाच्या सौम्य प्रकाशात एकदा त्यांना पाहिलं. त्यांचा चेहरा सात्त्विक होता आणि बोलणं अगदी प्रेमळ.. जणू कान्ह्यची बासरीच वाजत आहे.. एकजण म्हणाला, ‘‘आई, जीवनात खूप दु:ख आहे..’’ आई सौम्य हसल्या आणि उंबरठय़ाबाहेर हात पसरवीत म्हणाल्या, ‘‘इथून सगळीकडे दु:खच दु:ख तर पसरलं आहे!’’ बाहेर पसरलेला गडद अंधार पाहताना त्या क्षणी आम्हालाही खरंच वाटलं की, हो.. सगळीकडे दु:खच तर आहे! सगळा अज्ञानाचा अंधार.. मीपणाचा अंधार.. प्रत्येकाला सुख हवं आहे आणि त्यासाठी दुसऱ्याला दु:खी करायलाही तो तयार आहे! चित्तात ज्ञानाचा प्रकाश असला तर आतच खरं सुख आहे..

थोडा वेळ बोलणं झालं. तिथून बाहेर पडलो. मनात संभ्रमही होता आणि त्या खोलीत भरून असलेल्या अनामिक तृप्तीचा संस्कारही होता! कुणीच काही बोलत नव्हतं. त्या तृप्तीनं सगळे जणू नि:शब्द झाले होते. नंतर जेव्हा जेव्हा गोंदवल्यास जाणं होई तेव्हा अधेमधे ‘कृष्णाच्या आई’कडे पावलं वळत. तो कृष्णही आता मूर्तीपलीकडे अधिक काही वाटू लागला होता. त्यांच्याकडून जो बोध ऐकला, जी रूपकं ऐकली ती माझ्या लिखाणात अनेकदा आली आहेत. एकदा आईंना म्हणालो, ‘‘उपासनेचं प्रेम कसं लागेल? किंवा उपासनेचंच प्रेम मनात आहे, हे कसं ओळखता येईल?’’ आई हसून म्हणाल्या, ‘‘पूर्वीच्या काळी मोठे वाडे असत. नवीन लग्न झालेलं जोडपं समजा वरच्या मजल्यावर आहे आणि खाली कुणी पाहुणे आले तर त्यांना खाली भेटायला बोलावलं जाई. ते येत. नमस्कार करीत. हसऱ्या चेहऱ्यानं आणि अगदी अदबीनं बोलत. पण मनात मात्र असे की, कधी हे म्हणताहेत, आता जा वर म्हणून! म्हणजे कधी एकांतात जातो, असं व्हायचं त्यांना. तसं जगात वावरताना वाटतं का आपल्याला? सगळी कर्तव्यं पार पाडत असताना आणि चेहराही हसरा ठेवून इतरांसोबत वावरत असताना मनात येतं का की, कधी मी एकांतात जातो आणि उपासनेला बसतो ते! का मन खालीच घुटमळतं?’’

एकदा म्हणाल्या, ‘‘नातीगोती, मित्र-शत्रू यात अडकून काय करायचं हो? तुम्ही असंच माना की, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई हीच तुमची भावंडं आहेत! जगात तुम्ही केवळ कुणाचा भाऊ असल्याचं, कुणाचा मुलगा असल्याचं, कुणाचा मित्र असल्याचं नाटक करता आहात! मग उत्तम अभिनय करा म्हणजे कर्तव्यदक्ष राहा, पण मोहात फसू नका. कसलेला नट पेल्यात पाणीच ओततो आणि दारू पीत असल्याचा अभिनय असा वठवतो की जणू दारूच्या धुंदीत पूर्ण बुडाला आहे.. पण आतून पूर्ण शुद्धीवर असतो ना? आपण खरे कोण आहोत, हा प्रयोग संपल्यावर कुठं जायचं आहे, हे सर्व त्याला पक्कं माहीत असतं ना? असं साधलं ना तर मग लोकांच्या वागण्याचा मनावर विपरीत परिणाम होणार नाही.’’

मी ऐकलं, पण ते साधलं नाही कधी.. कारण त्यासाठी त्यांच्याकडे जो विशुद्ध भाव होता तो माझ्याकडे कुठे होता? पण या आईनं मन वेधून घेतलं होतं खरं. त्यामुळे जे कुणी गोंदवल्यास जात त्यांना मी सांगत असे की, वेळात वेळ काढून कृष्णाच्या आईंना भेटून या बरं का!

रामकृष्ण परमहंसांच्या अनन्य भक्त असलेल्या ‘गोपलेर माँ’ म्हणजे ‘गोपाळची आई’ जेव्हा पुस्तकातून भेटली तेव्हा ‘कृष्णाच्या आई’च आठवल्या. तत्त्वचिंतक विमला ठकार यांच्या घरीही अशाच एक ‘कृष्णाच्या आई’ वास्तव्याला होत्या. लहानग्या कृष्णमूर्तीवर त्या वात्सल्याचा जो वर्षांव करीत तो पाहून विमलाताईही भारावून जात. हे ऐकलं आणि वाटलं तर्कनिष्ठ जे. कृष्णमूर्तीपासून भावतन्मय ‘कृष्णाच्या आई’पर्यंत अशी दोन टोकांची भावविश्वं विमलाताईंनी अनुभवली. तर जेव्हा जेव्हा अशा गोष्टी कानावर येत तेव्हा तेव्हा गोंदवल्याच्या लहानशा घरात पूर्ण तृप्त अवस्थेत राहणाऱ्या ‘कृष्णाच्या आई’च डोळ्यांसमोर उभ्या राहात. त्या ‘कृष्णाच्या आई’ कशा झाल्या? त्यांचं आधीचं आयुष्य कसं होतं? हे प्रश्न मनात क्वचित उमटलेही होते, पण त्यांना कधीच विचारावंसं वाटलं नव्हतं. ‘‘सगळं जग पाहिलं, पण महाराजांनी आधार दिला,’’ असं त्या एकदा म्हणाल्या. पण त्या बोलण्यात कणमात्रही द्वेष वा विशाद नव्हता. कृतज्ञताच भरून होती. त्यामुळे त्यांचं ते जग कधी उमगलंच नव्हतं. त्यांचं खरं नावही माहीत नव्हतं. अलीकडे कित्येक वर्षांत त्यांची भेटही घडली नव्हती, त्यामुळे हे प्रश्नही विस्मृतीत गेले होते..

.. आणि अचानक परवा नारळी पौर्णिमेला मोबाइलवर एक संदेश आला.. ‘‘गेल्या शनिवारच्या ‘चतुरंग’च्या लेखात उल्लेखलेली कृष्णाची आई म्हणजे माझी बेबी आत्याच का? ती संध्याकाळी साताऱ्यात निधन पावली आहे!’’ खाली नाव होतं इंदूरच्या एक सुहृद स्वातीताई परदेशी-शिवणेकर यांचं. मला आश्चर्यच वाटलं. गेल्या कित्येक वर्षांत त्यांचा-माझा संपर्क नव्हता. पण तो लेख वाचून आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी नातेवाईकांकडून माझा क्रमांक मिळवला होता. संपर्क होण्याआधीच कृष्णाईच्या आठवणींचा बांध असा फुटला होता! कृष्णाच्या आईंचे अमेरिकेत असलेले भाचे गोपाळ कुलकर्णी यांचा एक लेख आणि शाहीर साबळे यांची कन्या वसुंधरा दत्त यांचा ‘फेसबुक संदेश’ही स्वातीताईंनी पाठवला. साताऱ्यात साबळे कुटुंबीय वास्तव्यास असताना ‘कृष्णाच्या आई’ आणि साबळे कुटुंबाचा कसा घरोबा निर्माण झाला आणि तो अखेपर्यंत कसा टिकून होता, हे सारं वसुंधराताईंनी सविस्तर लिहिलंय. या सगळ्या गोष्टींमुळे ‘कृष्णाच्या आई’ हळूहळू स्पष्ट साकार होऊ लागल्या.

कृष्णाच्या आई यांचं नाव उषा कुलकर्णी. जन्म १९४२चा, साताऱ्यातला. घरात सुबत्ता भरपूर. वडिलांची तीन दुकानं होती. मात्र गांधी हत्येनंतर झालेल्या जाळपोळीत सारं काही भस्मसात झालं. दारिद्र्याचे चटके वाटय़ाला आले. घरात भक्तिमय वातावरण मात्र होतं. आईबरोबर कीर्तनं, भागवत सप्ताह ऐकायला उषाताई जाऊ लागल्या आणि कृष्णभक्तीचं बीज तिथंच रुजलं. त्या काळी मुलींच्या शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नसे. त्यामुळे सोळाव्या वर्षीच लग्न झालं. कृष्णभक्ती मात्र वाढतच होती. सासरी ती कुणाला पटेना की मानवेना. सासुरवास खूप वाटय़ाला आला आणि अखेर माहेरी कायमची पाठवणी झाली. कृष्णभक्तीनं मनात निर्भयता मात्र आली होती. जिद्दीनं शिक्षण पूर्ण करून त्या डी.एड. झाल्या आणि सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. आता शाळेत शेकडो ‘बाळकृष्ण’ अवतीभवती होते. त्यांच्यावर मातृवत प्रेम करता आलं. अशाच एकदा पंढरपूरला गेल्या असताना एका दुकानातल्या पितळी कृष्णमूर्तीनं चित्त वेधून घेतलं. जत्रेत हरवलेल्या मुलानं आईला हाक मारावी तसा तो कान्हा जणू पाहात होता! झालं.. बावरलेल्या कृष्णाला त्याची आई आणि आईला आजन्म सावरणारा तिचा कृष्ण मिळाला..

नोकरी संपली. सहज दर्शनाला गोंदवल्यात आल्या आणि समाधीवरच्या कृष्णानं जणू सांगितलं, आई आता दगदग पुरे झाली. इथंच राहा आता! मग स्वकमाईतून एक लहानशी जागाही घेतली आणि गोंदवल्यातही कान्ह्यचं गोकुळ नांदू लागलं.. माहेरचं सातारा तसं हाकेच्या अंतरावर होतं, पण शेकडो साधकांना हक्काचं आणखी एक माहेरही मिळालं. मला आठवतं.. त्यांच्या घरात पहिलं पाऊल ठेवताना मला वाटलं होतं की, या वेडय़ाच आहेत! आज जाणवतं, त्या नव्हे, जगच वेडं आहे.. त्या वेडेपणाला काही सीमाही उरलेली नाही.. मान, सन्मान, प्रतिष्ठा, मोठेपणा या पोकळ गोष्टींना खरं मानून आम्ही नाही का अखेपर्यंत धडपडत? त्या बेगडी, खोटय़ा गोष्टींना खरं मानून त्यासाठी ज्यांचे प्राण कासावीस होतात त्यांना ‘कृष्णाच्या आईं’ना दिसणारा कृष्ण खोटाच वाटणार, यात नवल ते काय?

मनात येतं, आई तर गेली..पण आईविना पोरक्या झालेल्या त्या गोंदवल्याच्या कान्ह्यचे डोळे कुणी पुसले असतील का?

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विचार पारंब्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chaitanya prem loksatta chaturang marathi articles part

ताज्या बातम्या