कृपाछाया

आजीही मग तिच्या कपाटातल्या एखाद्या डबीत त्या नोटांचं गुंडाळं काळजीपूर्वक ठेऊन द्यायची.

ritual of Grandmother and father
प्रतिनिधिक छायाचित्र

आजी-आजोबांच्या कृपाछाया आज नाहीत पण त्यांच्या सावलीत झालेल्या संस्कारांचे ठसे अमीट आहेत.. प्रत्येकाच्या जीवनात अशा आजी-आजोबांच्या संस्कारांचा वाटा असेल.. आपणही त्या मुळांचं स्मरण करू या आणि त्यांच्या प्रेरक स्मृतींतून अविरत वाहत असलेला तत्त्वसंस्कारांचा जीवनरस पुन्हा शोषून घेऊ या.. दिनदर्शिकेवर उद्याचा, एक ऑक्टोबरचा दिवस ‘जागतिक वृद्ध दिना’ची छापील नोंद करतो म्हणून नव्हे.. तर कृतज्ञता म्हणून त्या मुळांचं स्मरण करू या..

आजीचा आणि जगाचा आर्थिक संपर्क तुटून कैक वर्ष उलटली होती. तसंही शतकभरापूर्वीचा विचार केला, तर स्त्रीला तेवढं आर्थिक स्वातंत्र्यही नव्हतं.. नव्हे, ‘आर्थिक स्वातंत्र्य’ असा काही शब्दही घराच्या उंबरठय़ाआड कधी पोहोचलाच नव्हता. त्यातही घरातला माणसांचा संख्यात्मक पसाराही मोठा. मागल्या पिढीतली पिकलेली, पण न गळलेली एखाद्-दोन बुजूर्ग माणसं, बायको, मुलं-मुली, शिक्षणासाठी आलेली एखाद्या आप्ताची मुलं, आश्रयाला असलेला एखादा नातलग अशी खाणारी तोंड दहा-पंधरा आणि कमावणारा एकजण; हे वास्तव लक्षात घेतलं, तर आर्थिक स्वातंत्र्य अवघ्या घरालाच फारसं नसायचं.. या आजीचं म्हणजे माझ्या आईच्या आईचं, जसजसं वय होऊ  लागलं तसतसं तिची मुलं तिलाही वरखर्चाला म्हणून पैसे देऊ  लागली. आजी म्हणायची, ‘‘मला काय करायचेत पैसे? मी मोठय़ा लेकाकडेच तर राहात्ये. ना कुठे बाहेर जाते ना काही विकत घेते.. शेवटी तुम्हीच तर माझं सारं करता.. तुम्हीच ठेवा ते.’’

मुली म्हणत, ‘‘राहू देत.. कधी कुणी ओळखीचं आपल्या चिमुकल्याला दाखवायला म्हणून आलं, तर त्याच्या हातावरही टेकवता येतील..’’

आजीही मग तिच्या कपाटातल्या एखाद्या डबीत त्या नोटांचं गुंडाळं काळजीपूर्वक ठेऊन द्यायची. तिच्या काळातल्या हिशेबाप्रमाणे तिला हे पैसे फार वाटत. नातवंडं शाळेला आणि मुलगा-सून नोकरीला गेली की कधी कधी ही डबी उघडून आजीबाई आपल्या ‘खजिन्या’चा हिशेब करी.. कित्येक वर्षांपूर्वीची आठवणही जागी होई. त्या काळी मानपान, दक्षिणा आणि जेवणावळीसकट मोठय़ा मुलाची मुंज सदोतीस रुपयांत झाल्याचं आजोबांचं टिपण त्यांना स्मरत असे.. एक महिन्याचा निम्मा पगार त्या मुंजीत खर्चल्यानं झालेली ओढाताण आठवत असे.. त्यापुढे ही रक्कम तिला फार वाटे.. तसे काही खर्च तिच्या डोळ्यांना दिसत नसत असं नव्हे.. कधी लहानगी नात रिक्षातून घराजवळच्या मंदिरात नेऊन आणायची त्यातच येऊन-जाऊन खर्च विसेक रुपये व्हायचा.. पण तसंही तिच्या काळी रिक्षा नव्हतीच म्हणून तिला हा खर्च जास्तीच वाटला, तरी चूक आहे की बरोबर, हे नेमकं कळत नव्हतं. तिला लागणारा कपडालत्ता, औषधपाणी मुलगा किंवा सूनच करीत असल्यानं ते खर्चही तिला समजत नव्हते. त्यामुळेच तिच्या लाडक्या नातवाला नोकरी लागल्याबद्दल तिनं कौतुकानं त्याला काहीतरी द्यायचं ठरवलं.. योगायोगानं घरगुती समारंभानिमित्त अनेक नातेवाईक जमले होते.. तेव्हा आजीनं नातवाला मोठय़ा प्रेमानं जवळ बोलावलं आणि त्याच्या हाती साठ रुपये ठेवत म्हणाली, ‘‘याचा एखादा छानसा शर्ट घे!’’

एक नातलग स्त्री ते पाहून हसून म्हणाली, ‘‘अहो यात आजकाल तीन चांगले रुमाल आले तरी खूप! शर्ट काय शर्टाची बाहीसुद्धा यायची नाही..’’

हे ऐकून आजीचा चेहरा एकदम पडला. नातू मात्र म्हणाला, ‘‘आजी ही गंमत करत्ये.. अगदी थोडेच रुपये टाकून छान शर्ट येईल गं.. मी आणीन आणि दाखवीन तुला..’’

मग आजी काही कारणानं स्वयंपाकघरात गेली तेव्हा नातू त्या बाईंना म्हणाला, ‘‘तुम्ही असं बोलायला नको होतं..’’

ती म्हणाली, ‘‘मी खोटं काय बोलले?’’

‘‘पण चुकीचं तर बोललात ना? मी आणला असता माझ्याच पैशानं एखादा शर्ट आणि तिला कौतुकानं दाखवून तिनं दिलेला म्हणून तिच्या हातनं घेतला असता तो! मला काहीतरी दिल्याचा आनंद तिला किती सुखानं भोगता आला असता.. तिचे साठ रुपये मी तिची आठवण आणि तिचा आशीर्वाद म्हणून जपून ठेवले असते..’’

आजीनं आणि आजोबांनीही खरं पाहता सर्वासाठीच खूप काही केलं होतं.. या ‘सर्वा’मध्ये केवळ नात्यागोत्याचेच होते, असं नव्हे, तर अगदी अपरिचितही असत.. आजोबा म्हणजे आईचे वडील अगदी ऋषीतुल्य होते. स्वातंत्र्य चळवळ जोरात असतानाच पुण्यात राष्ट्रीय बाण्याच्या एका वृत्तपत्रात ते पत्रकार म्हणून सक्रिय होते. पुण्याच्या हवेतच तेव्हा व्यासंग, तत्त्वनिष्ठा, त्याग मिसळला होता.. त्यामुळे पगारापेक्षा ध्येयाला अधिक मोल होतं.. महिनाअखेरीस पगार झाला नाही तरी ध्येयाच्या दिशेनं वाटचाल केल्याचा आनंद मिळायचा.. पण त्या आनंदात दहा-बारा जणांची पोटं थोडीच भरणार? बरं हे एवढय़ावरच थांबायचं नाही! रात्री कामावरून परतताना लकडी पुलावर किंवा आणखी कुठे कुणी निराश्रित भुकेजलेला माणूस दिसला तर त्याला ते थेट घरी घेऊन येत.. मग एखाद्-दोन दिवस तो घरी राहात असे आणि मग भरल्या मनानं जात असे.. एकदा एक निराश्रित स्त्री आपल्या लहान मुला-मुलींसह रात्री रस्त्यावर बसून होती. चौकशी करता कळलं की तिचा नवरा जाऊन काही महिने उलटले होते. जवळचं कुणी नाही आणि पाच-सहा महिने भाडं थकल्यानं घरमालकानंही घराबाहेर काढलेलं.. वणवण फिरण्यात दिवस तर सरला, पण आता काय करावं हे न कळून लहानग्यांसह भेदरून बसली होती.. हा सगळा कुटुंबकबिला आजोबांसह वाडय़ात आला. आजीनं गरम पिठलं-भात करून वाढला.. दिवसभर उपास घडलेल्या क्षुधाग्नीत तो भर्रकन ‘स्वाऽहा’ही झाला.. कित्येक दिवस ते कुटुंब वाडय़ातच राहात होतं.. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आजोबांनीच बराचसा केला. ताईही लहान-मोठी कामं करून हळूहळू स्वबळावर उभ्या राहिल्या. घरातल्या खाणाऱ्या तोंडांमध्ये अशी अनाहूत भर पडली की आजी मात्र काहीसा त्रागा करीत असे. ‘‘तुम्ही अशी कोण कोण माणसं बेलाशक आणता पण हातातोंडाचा घास पुरवावा लागतो मला,’’ असं काहीसं ती आजोबांना म्हणायची. पण एक मात्र पक्कं की हा त्रागा आश्रयाला आलेली व्यक्ती काही कामानिमित्त घराबाहेर गेली असली, तरच कधीतरी व्हायचा. त्या व्यक्तीसमोर कधीही ना कृतीतून ना बोलण्यातून त्या त्राग्याची किंचितशी छटाही कधी उमटली. जो काही क्षीणसा विरोधी सूर उमटे तो फक्त आजोबांसमोरच. त्याचा शेवटही, ‘‘तुम्हाला सांगून तरी काय उपयोग आहे. जशी रामाची इच्छा!’’ असाच व्हायचा. त्या काळी आजोबांच्या आधारावर आपलं जीवन घडवलेली माणसं नंतरही आवर्जून भेटायला येत तेव्हा आजीलाही आनंद वाटायचा..

काळ पालटत गेला. देश स्वतंत्रही झाला. नव्या पिढीवर राज्य आलं.. आणि बदलत्या गतिमान काळानुसार सर्वच क्षेत्रांत ध्येयपूर्तीपेक्षा धनपूर्तीला स्वाभाविक महत्त्व आलं. तेव्हाच आजोबांसारखी माणसं त्यांच्या क्षेत्रात कालबाह्य़ ठरू लागली होती.. वय वाढू लागलं तसतसं आजी-आजोबांचं आयुष्य आम्हा नातवंडांभोवती अधिकाधिक केंद्रित झालं.. मला घरात वडिलांची आई आणि त्याच इमारतीत राहाणारे हे आजी-आजोबा; अशा तिघांच्या वात्सल्यछायेची ऊब अनुभवता आली.. या आजोबांकडे म्हणजे मामाकडे अनेकदा रात्री आम्ही मुलं मुलं झोपत असू तेव्हा मध्यरात्रीनंतर मला अचानक जाग येई. आजोबांच्या ‘एकांत खोली’तला दिवा चालूच असे. ते अनेकदा वाचनात, टिपणं काढण्यात नाहीतर डोळे मिटून बसण्यात दंग असत.. त्यांच्याकडचे शेकडो ग्रंथ आणि टिपणं त्यांनी मला पुढे जणू वारसा म्हणून दिली. त्यात पुण्यात जुन्या काळी झालेल्या अनेक महत्त्वाच्या तत्त्वचर्चाचा गोषवारा असे.. अनेक शास्त्री-पंडितांच्या प्रवचनांचा सारांश असे.. पत्रकारितेला उपयुक्त असे शब्द, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, अनुवादित शब्द यांची जंत्रीही असे.. पुराणांवरील तपशीलही असे आणि स्वरचित इंग्रजी कविताही असत.. अनेक अभंगांलगत काही मुद्दे वा शंका नोंदवल्या असत.. ज्या माझ्या आध्यात्मिक वाटचालीत मलाही प्रारंभी मार्गदर्शक ठरल्या. त्यांच्या सहृदय धर्मपरायणतेचे आणि भाषा साधनेचे संस्कार माझ्यावर झालेच.. माझ्या दोन्ही आज्ज्यांबरोबर मी कीर्तनाला जात असे.. त्या कीर्तन श्रवणानं नकळत भावसंस्कार झाले, पण सूक्ष्म असे भाषिक संस्कारही झाले. खरं धर्माचरण माणुसकीशिवाय असूच शकत नाही, हे आजोबांनी त्यांच्या कृतीतून बिंबवलं.. दंगल भडकली तेव्हा आमच्या इमारतीतल्या परधर्मीयाला वाचवण्यात आजोबाच सर्वप्रथम सरसावले होते.

आज या तिन्ही कृपाछाया नाहीत, पण त्या सावलीत झालेल्या संस्कारांचे ठसे अमीट आहेत.. शेवटी काळानुसार माणसं अस्तंगत होणारच.. पण बिजानं स्वत:ला मातीत गाडून घेतलं म्हणूनच ना रोपाचा ‘जन्म’ झाला! त्या रोपाचं तरारणं, फळणं अन् फुलणं आणि डौलदार वृक्षात रूपांतरित होणं.. हे सारं त्या एका बीजाच्याच आधारावर शक्य झालंय ना? त्या मुळांपासून दुरावलं तर झाडाचा सगळा डोलाराच कोसळेल.. आपल्याही प्रत्येकाच्या जीवनात अशा आजी-आजोबांच्या संस्कारांचा वाटा असेल.. आपणही त्या मुळांचं स्मरण करू या आणि त्यांच्या प्रेरक स्मृतींतून अविरत वाहत असलेला तत्त्वसंस्कारांचा जीवनरस पुन्हा शोषून घेऊ या.. दिनदर्शिकेवर एक ऑक्टोबरचा दिवस ‘जागतिक वृद्ध दिना’ची छापील नोंद करतो म्हणून नव्हे.. तर कृतज्ञता म्हणून त्या मुळांचं स्मरण करू या.. कारण आपलं आजचं सारं बहरणं त्यांच्याहीमुळे तर साधलं आहे!

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विचार पारंब्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Importance of rituals and traditions of grandmother and father