‘बाळ-बोध’

लहान मुलं निरागस आणि निष्कपट असतात.

लहान मुलं निरागस आणि निष्कपट असतात. मनात एक आणि तोंडी एक, असं बोलण्याची मोठय़ांची ‘समज’ त्यांना आलेली नसते. त्यांचं बोलणं आडाखेबंद नसल्यानं अनेकदा तडाखेबंदही होतं. कधी कधी ते नकळत गुगली टाकून ‘बोलचीत’ करतात, तर कधी आपल्याच सांगीव ‘ज्ञाना’चे माप आपल्या पदरात टाकून मोकळे होतात. बरेचदा त्यांच्या सहज निर्मळ अनपेक्षित विनोदानं ओठांच्या कडा रुंदावतात, तर कधी त्यांच्या निर्विष वृत्तीच्या बोलण्यानं डोळ्यांच्या कडा पाणावतात! त्यांच्या बोलण्यानं कधी कधी मोठय़ांची मोठीच कोंडी होते, तर कधी मोठय़ांनाही सुचणार नाही असा मार्ग अनाहूतपणे सुचवून ते एखादी कोंडी फोडतातसुद्धा! त्यांच्या बोलण्यातून शिकण्यासारखंही कधी काही गवसतं.. पण एखाद्या झऱ्यासारख्या वाहत असलेल्या या सहज ‘बाळ-बोधा’कडे आपण तितक्याच निर्मळ मनानं पाहातो का? तसं पाहता आलं, तर जगण्याच्या लढाईत गुंतून दमछाक झालेल्या मनाला विश्रांतीची, हास्याची, उमेदीची आणि तृप्तीची संधी देणारी ही मुलं म्हणजे निरागस देवदूतच भासतील! दूरवर दिसत असलेल्या मृगजळापाठी धावताना कवेत सामावणारे हे ‘ओअ‍ॅसिस’ दिसले मात्र पाहिजेत!

एकदा भर उन्हातून लहानगा हर्ष आईबरोबर एका नातेवाईकाकडे गेला होता. ‘‘निदान सरबत तरी करते,’’ असं म्हणत त्या बाई स्वयंपाकघरात गेल्या. थोडय़ाच वेळात सरबताचे पेले आले. सरबत पिता पिता हर्ष मोठय़ानं म्हणाला, ‘‘आई हे नुसतं पाणीच पाणी लागतंय!’’ आईची आणि त्या बाईंचीही झालेली कोंडी हर्षला कुठून कळणार? त्या बाई ओशाळं हसून म्हणाल्या, ‘‘अहो लिंबू अर्धच उरलंय हे मला आठवलंच नव्हतं..’’ आई लगेच म्हणाली, ‘‘नाही हो.. चांगलं झालंय सरबत..’’ अर्थात ते चांगलं झालेलं नाही, हे सत्य त्या सरबताच्या घोटाबरोबर दोघींनी गिळून टाकलं! बाहेर पडल्यावर आई म्हणाली, ‘‘असं बोलायचं नसतं.’’ त्यावर हर्ष म्हणाला, ‘‘पण तूच सांगतेस ना की नेहमी खरं बोलावं?’’ आई संस्कृत शिक्षिका होती. त्यामुळे, ‘सत्य बोलावं, पण प्रिय वाटेल असंच सत्य बोलावं,’ हा श्लोक तिला आठवला.. पण मग लोकांना सगळं सत्य का प्रिय नाही, हा प्रश्न आला असता!

लहानगा अनिक म्हणजे अनिकेत बालवाडीतून येताना रस्ताभर चिवचिवाट करायचा. घराचे तीन जिने चढताना त्याचा चिमुकला हात मी अधिकच घट्ट पकडत असे. कारण बोलता बोलता तो काय काय घडलं ते मध्येच हातवारे करून सांगू पाहायचा. त्या नादात मध्येच एक पायरी खाली तरी रेंगाळायचा किंवा पुढच्या पायरीवर उडी घ्यायचा. एका हातात त्याची पाण्याची बाटली, खाऊचा डबा वगैरे असलेली आयताकृती पिशवी आणि दुसऱ्या हातात त्याचा चिमुकला हात घेतला असताना त्याच्या या उत्स्फूर्त एकपात्री प्रयोगातल्या उडय़ांनी, तो पडेल आणि मला त्याला नीट पकडून सावरता येणार नाही, असं वाटायचं. म्हणून मी त्याला अधेमधे रागे भरायचो की, ‘‘हे बघ, तुझा पाय सटकला आणि तू पडलास ना, तर मी एकटा वर घरी निघून जाईन. मग तू बस रडत आणि ये वर एकटा!’’ तेव्हा तो समजल्यासारखा भाव किंवा आव चेहऱ्यावर आणून क्षणभर शांत राहायचा आणि मग पुन्हा किलबिल सुरू व्हायची. एकदा माझ्या चपलेचा अंगठा तुटला होता आणि त्यामुळे एका बाजूला अनिक आणि दुसऱ्या बाजूला चप्पल सावरत असताना माझा पाय सटकला. अनिकनं काळजीयुक्त स्वरात विचारलं, ‘‘काका तू आत्ता पडणार होतास ना?’’ मी होकार भरत विचारलं, ‘‘हो रे! मी जिन्यात पडलो असतो तर तू काय केलं असतंस?’’ आपल्या कुरळ्या केसांचा मुकुट सावरत अनिक माझ्याकडे टकमक पाहात होता तेव्हा, ‘मी रडलो असतो,’ असं काहीसं उत्तर ऐकायला माझे कान आतुरले होते. तर निमूट पुढची पायरी चढत अनिक म्हणाला, ‘‘काही नाही. मी एकटा घरी गेलो असतो!’’

अनिकपेक्षा दोन-चार वर्षांनी मोठी होती त्याची बहीण आसा म्हणजे आसावरी. तिचा जन्म झाला तेव्हाच माझे वडील म्हणजे तिचे आजोबा नोकरीतून निवृत्त झाले होते, पण माझी आई म्हणजे तिची आजी नोकरी करीत होती. वडील जुन्या काळातले एलएल.बी. होते आणि चाळीस वर्षांच्या महापालिका सेवेतील निवृत्तीआधीची त्यांची बरीचशी वर्षे कायद्याशी संबंधित विभागात गेलेली. सरकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक कायदे, त्यातले बारकावे आणि खाचाखोचा त्यांना मुखोद्गत होत्या. त्यामुळे कायदेशीर सल्ल्यासाठी त्यांच्याकडे अनेक जण येत. पण बरेचदा मुलं शाळेत गेलेली असली किंवा दुपार कलल्यावर ती खेळायला गेलेली असली की हे लोक येत. त्यामुळे आजोबा आणि नातवंडांच्या सहवासात सहसा खंड पडत नसे. तेव्हा लहानपणापासून आजोबांचा सहवास आसाला अधिक मिळालेला. आजीची कामावर जाण्याची लगबग आणि कामावरून परतल्यावरचं थोडंसं थकलेपणही ती अनुभवत होती. नोकरीवर जाणाऱ्या या आजीचा लळा आणि संस्कार तिला लाभलेच, पण आपल्याला बरेचदा शाळेत नेणारे आणि आणणारे, रोज दुपारी जेवू घालणारे, कधी तर खमंग भाजीही बनवणारे, आपला अभ्यास घेणारे, परवचा आणि श्लोक पाठ करवून घेणारे आजोबा तिला जवळचे वाटत. एकदा मात्र गंमत झाली. लहानग्या अनिकचा अभ्यास आसा घेत होती. जवळच आरामखुर्चीत बसलेले आजोबा वर्तमानपत्र वाचता वाचता मध्येच या ‘बालशिक्षिके’कडे कौतुकानं पाहात होते.

अनिक मन लावून अभ्यास करीत नाही, नुसता दंगामस्ती करतो, या भावनेनं आसा त्याला ओरडत होती. त्याच्यापेक्षा तीन-चार पावसाळे तिनं अधिक पाहिले होतेच ना! तर ओरडता ओरडता ती म्हणाली, ‘‘तुला अभ्यास करून नीट शिकायचंय की आजोबांसारखा तू जन्मभर घरात बसून राहणार आहेस?’’ हा बोध ऐकून आजोबांना हसावं की रडावं ते कळेना!

या मुलांमधल्या ‘विचारवंता’ची चुणूकही कधी कधी मिळायची. आसा लहानपणी काही वेळा विचारायची की, ‘माझा जन्म कसा झाला? तुम्ही मला घरी कसं आणलंत?’ एकदा तिचा जन्म झालेल्या प्रसूतीगृहावरून जाताना आजी म्हणाली, ‘‘तुझा जन्म इथं झाला बरं का! तुला इथूनच आणलं आम्ही!’’ आदल्या महिन्यात दुकानात जाऊन बाबानं नव्या दूरचित्रवाणी संचासाठी नोंदणी केली होती. ते तिला आठवलं. लोकं तशीच मुलांसाठी नोंदणी करीत असतील, असं तिला वाटलं. त्यामुळे त्या प्रसूतीगृहाकडे तिनं कौतुकानं पाहिलं. त्या प्रसूतीगृहाच्या डॉ. म्हसकरबाईंकडे ती कौतुकानं पाहात असे. अनिकचा जन्मही त्याच रुग्णालयातला. मात्र त्याच्या जन्मानंतर आपल्या लाडात वाटेकरी निर्माण झाल्याची बालस्वाभाविक सल काही काळ ती अनुभवत होती. एकदा त्याच्याविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचून ती म्हणाली, ‘‘हा मुलगा वाईट आहे. आपण म्हसकरबाईंना तो परत देऊन टाकू या!’’ हसून आजीनं विचारलं, ‘‘अगं असं कसं करता येईल?’’ त्यावर फणकारून ती म्हणाली, ‘‘परवा शहाकाकांच्या दुकानातला ब्रेड खराब निघाला म्हणून तूच परत केलास ना तो? काही न बोलता त्यांनी घेतलाच किनई?’’

एकदा मित्राकडे गेलो होतो. त्याचा लहानगा पुतण्या शार्दूल तिथं आला. मित्र त्याला अनेक प्रश्न विचारून भंडावू लागला. त्यात एक प्रश्न होता की, ‘‘मोठेपणी तू कोण होणार?’’ आपणही लहानपणी या प्रश्नाचं उत्तर अनेकदा दिलंय आणि तसे आपण झालो नाही, हेसुद्धा आपल्याला माहीत आहे. तरीही आपण मुलांना हा प्रश्न विचारतोच. तर हा प्रश्न ऐकून लहानग्या शार्दूलनं काकाकडे नजर रोखून पाहत विचारलं, ‘‘तू अजून बरीच वर्ष आहेस ना?’’ माझा मित्र आश्चर्यमिश्रित हसून म्हणाला, ‘‘हो.. पण का?’’ त्यावर शार्दूल उद्गारला, ‘‘मग तुला दिसेलच ना मी कोण झालोय ते!’’

मीही एकदा गमतीनं लहानग्या अनिकला म्हणालो, ‘‘मी म्हातारा झालो की मला सांभाळशील ना?’’ त्यावर पोक्त चेहरा करीत तो उद्गारला, ‘‘हो! मी तुला, आई-बाबा, आजी-आजोबा सगळ्यांना नीट सांभाळीन, पण आत्ता तुम्ही तेवढं मला नीट सांभाळा!’’

माझ्या मित्राच्या हॉटेलात एक गोंडस बिहारी मुलगा काम करीत होता. बालकामगार कायदा आल्यावर तो गावी परतायला निघाला. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा पाणावल्या डोळ्यांनी तो म्हणाला, ‘‘अब मैं बडम आदमी बनके आऊँगा!’’ मी हसून म्हणालो, ‘‘बडम आदमी बनोगे तो यहाँ क्यू आओगे?..’’

आज वाटतं आपणही मोठं झाल्यावर लहानपणच्या त्या गोड अनुभवांकडे कुठे परततो? उलट असं वाटतं की आपण वयानं कितीही वाढत गेलो तरी लहानपणचा गोडवा, निरागसता, सहृदयता जपण्याची समज मात्र वाढतच नाही.. नव्हे या गोष्टींना आपण बालिशच तर मानतो! लहानपणी चिमटीत मावणारं सुखही पुरेसं वाटायचं.. आता मात्र दोन्ही हातांनी कितीही ओरबाडलं तरी चिमूटभरसुद्धा सुख उरत नाही! त्यातल्या त्यात समाधान एवढंच की आज मृगजळ आहेच, पण ‘ओअ‍ॅसिस’सुद्धा आहेत! मृगजळामागे जितकं धावाल, तितकं ते दूर-दूर जाईल आणि या ‘ओअ‍ॅसिस’कडे त्यांच्यातला एक होऊन फक्त हात पसरा.. ती स्वत: धावत येऊन तुम्हाला बिलगतील! तुमच्यातही नसेल इतक्या आपलेपणानं अन् विश्वासानं!

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विचार पारंब्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thinking like a child can change your life